ग्राहक तक्रार क्र. 237/2016
अर्ज दाखल तारीख : 05/08/2016
निकाल तारीख : 01/11/2017
कालावधी: 01 वर्षे 02 महिने 26 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. श्री.सुरेश पि.विश्वनाथ पवार,
वय – 50 वर्षे, धंदा – शेती,
रा. वाघोली, ता. जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. ईगल सिडस अॅन्ड बायोटेक लि.,
117 सिल्हर संचोरा, विद्यापीठासमोर,
7 आर.एन.टीमार्ग, इंदौर, मध्यप्रदेश, भारत.
2. मे. अजित कृषी सेवा केंद्र,
शिवाजी चौक, वाघोली,
ता.जि. उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.एन.एन. वाघोलीकर.
विरुध्द पक्षकार क्र. 1 तर्फे विधिज्ञ : श्री.एन.व्हि.मनियार.
विरुध्द पक्षकार क्र. 2 विरुध्द तक्रार रद्द.
न्यायनिर्णय
मा. सदस्य श्री.मुकुंद बी.सस्ते यांचे व्दारा
(तक यांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.)
1. अर्जदार हा मौजे वाघोली, जि.उस्मानाबाद येथील रहिवाशी आहेत. तक्रारकर्ता यांच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. त्यांची मौजे वाघोली, जि.उस्मानाबाद येथील जमीन गट क्र.136/5 मध्ये 86 आर. क्षेत्र आहे. विरुध्द पक्षकार क्र.1 हे उत्पादक तर विरुध्द पक्षकार क्र.2 हे विक्रेते आहेत.
2) अर्जदार यांनी सन 2014 च्या खरीप हंगामातील पेरणीकरीता विरुध्द पक्षकार क्र.2 यांच्याकडून विरुध्द पक्षकार क्र.1 यांनी उत्पादीत केलेले सोयाबीन जेएस 441 वाणाचे लॉट क्र.251080 बियाणे 25 किलो वजनाची खरेदी केली व आवश्यक ती काळजी घेऊन योग्य पोषक वातावरणात त्याची पेरणी केली मात्र परंतू अपेक्षेप्रमाणे उगवण झाली नसल्याने व बियाणे नाश पावत असल्याचे लक्षात आल्याने विरुध्द पक्षकार यांना कळवले तसेच कृषी अधिकारी, पंचायत समिती, कळंब यांना कळविले. सदर तक्रार अर्जावरुन तक्रार निवारण समितीने पाहणी अहवाल दिला. सदर अहवालात बियाणामध्ये दोष असल्याने बियाणे उगवले नसल्याबाबत अभिप्राय दिलेला आहे. सदर बियाणे लागवड करण्यासाठी नांगरणी, शेणखत, खुरपणी ई. चा झालेला खर्च तक यांनी केलेली आहे तसेच तक्रारकर्ता यांनी आवश्यक ती सर्व काळजी घेऊनही तक्रारकर्ता यांना झालेले उत्पादन अत्यल्प असून तक्रारकर्ता यांचे मोठे नुकसान झाले आहे व त्यास विरुध्द पक्षकार यांचे बियाणे जबाबदार आहे म्हणून विरुध्द पक्षकार यांनी तक्रारकर्ता यांना एकूण रु.1,20,000/- चे पीकापोटी नुकसान झालेले नुकसान मिळावे अशी विनंती करण्यात आली आहे.
3) विरुध्द पक्षकार क्र.1 यांना सदर तक्रारीबाबत नोटीस पाठवण्यात आली असता त्यांनी म्हणणे पुढीलप्रमाणे दिले आहे.
विप उत्पादक कंपनी ही शासनाने ठरवुन दिलेल्या नियमानुसार काम करणारी नोंदणीकृत कंपनी विप यांच्या प्रयोगशाळेला शासनाच्या कार्याल्याने कायदेशीर मान्यता दिलेली आहे. विप यांनी शासनाच्या सर्व आवश्यक परवाने/परवानग्या मिळवलेल्या आहेत. सोयाबिन बियाणे नाजूक कवच असलेल्या बियाण्याची काळजी घ्यावी लागते. तक्रारकर्ता यांनी बियाणांची वाहतूक, हाताळतांना तसेच पेरणी, माती परिक्षण, बियाणे साठवणूक, पीएच बॅलन्स, पेरणीपुर्व मशागत, लागवड तंत्रज्ञान इतर आवश्यक बाबी करतांना योग्य ती काळजी घेतली नाही. तक्रारकर्ता यांनी बियाणे प्रयोगशाळेत तपासून घेऊन अहवाल सादर केलेला नाही. मराठवाडयात आवश्यकतेपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे उत्पादनात घट येणे क्रमप्राप्त आहे. पाहणी अहवालावेळी विप ला कळविणे आवश्यक असतांना कळवले नाही. सदर पाहणी अहवालात मत सविस्तर स्पष्ट करण्यात आलेले नाही सदर अहवाल त्रुटीपुर्ण व अपुर्ण असून केवळ ‘सदोष बियाणे’ नमूद करण्यात आले आहे. तक्रारकर्ता यांच्या शेताची पाहणी करुन दिलेला अहवाल महाराष्ट्र शासन कृषि संचालयालय पुणे आदेश परिपत्रकानुसार नसल्याने गैरकायदेशीर व नैसर्गीक न्यायाचे दृष्टीने योग्य नाही. तक्रारकर्ता यांनी पाण्याच्या बापराबद्दल पुरेशी व समाधानकारक माहिती दिलेली नाही तसेच तक्रारकर्ता यांनी लागवडीबाबत सबळ पुरावा दिलेला नाही. कृषी अधिकारी यांनी पाहणी केली व कमी उगवण झाली वगैरे नामंजूर आहे. उगवणीबाबत केवळ तक्रारकर्त्याचीच तक्रार आहे. तक्रारकर्ता यांच्याकडूनच सुचनांचे पालन न केल्याने कमी उत्पादन मिळाले असावे. विप यांनी सेवेत कुठलीही त्रुटी केली नसून त्यास तक्रारकर्ता हेच जबाबदार आहेत. म्हणून तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी असे नमूद केले आहे.
विप यांनी आपल्या म्हणण्यामध्ये अनेक ठिकाणी रकाने रिकामे ठेवले आहेत उदा. काही तक्रारीमध्ये लॉट क्रमांक नमूद नाही.
4) विरुध्द पक्षकार क्र.2 यांना वरील तक्रारीबाबत नोटीस बजावणी करण्यास तक्रारकर्ता यांनी स्टेप्स न घेतल्याने त्यांचे विरुध्द तक्रार डिसमिस करण्यात आली.
5) तक ची तक्रार सोबत जोडलेली कागदपत्रे केलेला युक्तिवाद विप चे म्हणणे सोबत जोडलेली कागदपत्रे व उभयतांचा युक्तिवाद यांचा एकत्रितपणे विचार करुन निष्कर्षासाठी खालील मुद्दे निघतात.
मुद्दा उत्तर
1) तक विप चा ग्राहक आहे काय? होय.
2) तक ची तक्रार बियाणातील दोषा संदर्भात
तक ने सिध्द केलेली आहे काय ? नाही.
3) तक नुकसान भरपाईस पात्र आहे काय? नाही.
4) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमिमांसा
मुद्दा क्र. 1
6) विप कडून निर्मीत व वितरीत सोयाबीन बियाणे तक ने खरेदी घेतल्या पुराव्याकामी तक्रारकर्ता यांनी पावती हजर केली आहे त्यामुळे तक्रारकर्ता विरुध्द पक्षकार यांचा ग्राहक आहे त्याबद्दल वाद नाही. तक ने खरेदी पावती हजर केली आहे. किंमत देऊन तक ने बियाणे खरेदी केले आहे तसेच सदर पिकांचे पंचनामे कृषी अधिकारी यांच मार्फेत झाल्यामुळे ते या प्रकरणात आवश्यक पक्षकार आहेत. त्यामुळे तक हा विप क्र.1 व 2 चा ग्राहक आहे. म्हणून आम्ही मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देतो.
मुद्दा क्र.2 व 3
7) या पुर्वीच्या प्रकरणात आणि या प्रकरणात गुणवत्तेच्या संदर्भात फारसा फरक नसला तरी विप ने जे आक्षेप घेतलेले आहेत त्याचे निवारण करणे हि जबाबदारी तक ची होती कारण तक ने त्याची तक्रार सिध्द करणे हि जबाबदारी ग्राहक संरक्षण कायद्यानुसार त्याचेवर आहे. त्या कारणस्तव तक्रारदाराने दाखल केलेले पुरावे पाहता मुख्यत: तपासणी अहवाल पुर्णपणे भरलेला असला तरी पेरणी क्षेत्र 80 आर खोडून 40 आर. करण्यात आलेले आहे तसेच पेरणी करिता वापरलेले बियाणे 54 किलो खोडून 27 किलो वापरलेले दाखवण्यात आलेले आहेत मात्र तक्रारदार आपल्या तक्रारीत दोन एकर क्षेत्रात दोन बॅग बियाणांची पेरणी केल्याचे नमूद करतो तसेच तो दोन बॅग ची पावती सादर करतो यावरुन तक्रारदाराच्या तक्रारीत अनेक विसंगती दिसतात. क्षेत्र 1 एकर मान्य केले तरी अहवालातील निष्कर्षा या रकान्यात ‘’ सिड ट्रीटमेंट केली होती, पेरणीच्या वेळी पुरेशी ओल होती, पुर्वी पेरलेले बियाणे न उगवल्याने दुबार पेरणी केल्याचे दिसुन आले त्यामुळे पुर्वी पेरलेले बियाणे किती प्रमाणात उगवले याची तपासणी करता आली नाही’’ असे स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे तेव्हा अश्या पाहणी अहवाला वरुन कोणताही निर्णय देणे शक्य नाही. तसेच अशा अपुर्ण व अस्प्ष्ट पुराव्याच्या आधार नुकसानीचे मुल्यांकन करणे योग्य ठरणार नाही.
8) तक्रारदाराची तक्रार पहिल्या पेरणीतील बियाणांच्या उगवणीबाबत होती. दुबार पेरणी नंतर त्याच्या उत्पादनातील नुकसान अथवा झालेला अतिरिक्त खर्च हा त्याला पुराव्यानिशी सादर करता आला असता व मग योग्य त्या पुराव्याच्या आधारे नुकसान भरपाई निश्चित करता आली असती त्यामुळे सध्य स्थितीत तक्रारदाराची तक्रार रद्द करणे एवढाच पर्याय न्याय मंचापुढे आहे म्हणून तक्रारदाराची तक्रार योग्य त्या पुराव्या अभावी फेटाळण्यात येत आहे.
आदेश
तक ची तक्रार फेटाळण्यात येते.
1) तक्रारीच्या खर्चापाटी कोणतेही आदेश नाही.
2) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती नि:शुल्क देण्यात याव्यात.
3) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे दाखल तक्रारीतील मा.सदस्यांसाठींचे संच अपिलार्थीने हस्तगत करावेत.
(श्री.मुकुंद.बी.सस्ते) (श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.