--- आदेश ---
(पारित दि. 06-12-2007 )
द्वाराश्रीमती प्रतिभा बा.पोटदुखे, अध्यक्षा -
तक्रारकर्ता श्रीमती मंजु विजय गुप्ता यांनी दाखल केलेल्या ग्राहक तक्रारीचा आशय असा की,..................................
1. त.क.यांनी प्रमिलाबाई जयस्वाल यांच्याकडून रामनगर, गोंदिया येथे घर विकत घेतले. तेथे प्रमिलाबाई यांच्या नावाचे 430010024671 या क्रमांकाचे मीटर होते. त.क. घर विकत घेतल्यानंतर हे मीटर वापरत होते व त्याच्या देयकांचा भरणा नियमितपणे करीत होते.
2. वि.प.यांनी त.क.यांचे मीटर हे तीनदा बदलविले परंतु देयका मध्ये तशी नोंद केली नाही. त्यामुळे वि.प.यांनी जाहीर केलेली देयके ही चुकिच्या मीटर रिडींगवर आधारलेली होती. त.क.यांनी अनेकदा वि.प.यांना ती सुधारुन देण्याची विनंती केली आहे. परंतु वि.प.यांनी याकडे दुर्लक्ष केले.
3. वि.प.यांनी त.क.यांना रुपये11,734/- ही अतिरिक्त रक्कम लावून मार्च-07 मध्ये देयक पाठविले, हे बील चुकिचे आहे.
3.
4. त.क.यांनी मागणी केली आहे की, वि.प.यांना रुपये 11,734/- एवढी रक्कम कमी करुन व्याज व दंड न लावता त.क.यांना सुधारित देयक देण्याचे निर्देश देण्यात यावे, वि.प.यांनी त.क.यांना रुपये 5000/- त्रासासाठी तर ग्राहक तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 2000/- देण्याचा आदेश व्हावा.
5. वि.प.यांनी त्यांचे लेखी जबाब निशाणी क्रं. 7 वर दाखल केले आहे. वि.प.म्हणतात की, त.क.हे ग्राहक नाहीत, ते स्वच्छ हाताने विद्यमान न्यायमंचासमोर आलेले नाही. दि. 05-05-2006 रोजी भरारी पथक नागपूर द्वारा त.क.यांच्या मीटरची पाहणी करण्यात आली तेव्हा त्यांना अनेक अनियमितता आढळून आल्या. तक्रारकर्ता श्रीमती मंजु गुप्ता यांचे पती श्री. विजय गुप्ता हे तेव्हा ज्युनिअर इंजिनियर होते व गोंदियातील रामनगर विभागाचा कार्यभार त्यांच्याकडे होता. भरारी पथकाच्या रिपोर्टवरुन आकारणी करण्यात आलेल्या रक्कमे पैकी 50% रक्कम म्हणजेच रुपये 24,025/- ही श्री. विजय गुप्ता यांनी भरली मात्र उर्वरित 50% रक्कम ही अजून भरावयाची आहे. श्री. विजय गुप्ता यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई सुरु आहे. तक्रारकर्ता हे नियमितपणे विद्युत देयकांचा भरणा करीत नव्हते, त्यामुळे त्यांच्यावर रुपये 36,375.97/- एवढी थकबाकी सप्टेंबर-07 पर्यंत बाकी होती. तक्रारकर्ता यांनी मार्च-05 पासून विद्युत देयक भरलेले नाही, त्यामुळे तक्रारकर्ता यांनी केलेली खोटी व बनावट तक्रार ही खर्चासह खारीज करण्यात यावी.
कारणे व निष्कर्ष
6. तक्रारकर्ता व वि.प.यांनी रेकॉर्डवर दाखल केलेली कागदपत्रे, शपथपत्र, इतर पुरावा व केलेला युक्तिवाद यावरुन असे निदर्शनास येते की, मार्च 2007 च्या लेजरप्रमाणे रुपये 11,734.47/- ही रक्कम “Adj against Energy Bill” या सदराखाली दि.13-08-2007 च्या देयकात दर्शविण्यात आली आहे.
7. वि.प.त्यांच्या लेखी जबाबात नि.क्रं. 7 मध्ये ग्राहक तक्रारीच्या परिच्छेद क्रं. 4 ते 6 चे उत्तर देतांना म्हणतात की, ‘‘ मे-2000 मध्ये तक्रारकर्ता यांनी रुपये 6,000/- चा भरणा केल्याचे चुकीने लेजरमध्ये दाखविण्यात आले. तसेच रुपये 6354/- (2118 + 2118+2118) हे रुपये 3296/- च्या इन्स्पेक्शन रिकव्हरीसाठी अडजस्ट करण्यात आल्याचे नोव्हेबंर-04, मार्च-05 व मे-05 मध्ये चुकीने दाखविण्यात आले. त्यामुळे मार्च-07 मध्ये ही रक्कम विद्युत देयकात पुन्हा दाखविण्यात आली आहे’’ . मात्र या संपूर्ण रक्कमेची बेरीज केली तरी रुपये 11,734.47/- हा आकडा येत नाही.
8. तसेच विद्युत कायदा 2003 च्या कलम- 56 (2) मध्ये असे नमूद केले आहे की, ‘‘ग्राहक यांचेकडून एखादी रक्कम वसूल करता येणार नाही जर का ती रक्कम जेव्हा वसूल करण्याचे कारण उद्भवले त्यापासून दोन वर्षांच्या आत वसूल केल्या गेली नसेल अथवा ती रक्कम फक्त तेव्हाच वसूल करता येईल जर का ती देयकांमध्ये नियमितपणे दाखविल्या गेली असेल ’’. सदर ग्राहक तक्रारीमध्ये असे दिसून येते की, रुपये 11,734.47/- ही रक्कम नियमितपणे देयकात वसूल करावयाची आहे असे दाखविण्यात आलेले नाही. त्यामुळे वि.प.यांनी मे-2000 , नोव्हेबंर-04, मार्च-05 व मे-05 मधील रक्कमेची वसुली करण्यासाठी ऑगस्ट-07 मध्ये देयक पाठविणे हे संयुक्तिक नाही.
8.
9. मीटर हे तक्रारकर्ता यांच्या नावे झाले नसले तरी सुध्दा त्या वि.प.यांच्या वीज सेवेचा लाभ घेत असल्यामुळे लाभार्थी ठरतात व ग्राहक या संज्ञेत येतात.
10. तक्रारकर्ता यांनी दाखल केलेल्या दस्ताऐवज क्रं. 4 या वि.प.यांच्या अहवालात असे नमूद केले आहे की, ‘‘ सदर ग्राहकाचे मीटर दि.04-08-2005 ला जुने मीटर 02180 मीटर वाचनावर बदली होवून नवीन मीटर 00003 मीटर वाचनावर बसविण्यात आले. हे मीटर बदली अहवाल उपविभागीय कार्यालयात प्राप्त न झाल्यामुळे माहे सप्टेंबर-05 ते डिसेंबर-05 पर्यंत सरासरी युनिटनुसार वीज देयकाची आकारणी झालेली आहे ’’.
11. देयक दि. 13-08-07 मध्ये रुपये 3193.14/- असे इंटरेस्ट अरिअर्स दाखविण्यात आले आहेत. ते कशाचे आधारावर लावले ते स्पष्ट होत नाही.
असे तथ्य व परिस्थिती असतांना सदर आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
1. वि.प.यांनी तक्रारकर्ता यांना दि. 13-08-2007 चे विद्युत देयकातून रुपये 11,734/- व इंटरेस्ट अरिअर्सचे रुपये 3193.14/- या रकमा वजा करुन देयक जारी करावे.
2. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना ग्राहक तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 1000/- द्यावेत.
3. आदेशाचे पालन वि.प.यांनी आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत करावे. अन्यथा ते ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम-27 प्रमाणे दंडाहर्य कारवाईस पात्र असतील.