न्या य नि र्ण य
(व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 2019 चे कलम 35 (1)प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे—
तक्रारदार हे तक्रारीत नमुद पत्त्यावर राहतात. वि प हे वाहतुकीची सेवा देणारी एजन्सी आहे. तक्रारदार व त्यांचे कुटूंबिय फातीमा खदिजा व मरियम यांना दि.07/01/2020 रोजी दादर ते वाठार कोल्हापूर असा प्रवास होता. वि प यांनी त्यांचे कंपनीची प्रवासी बस व त्या अनुषंगाने देण्यात येणारे सोई सुविधा याची माहिती व हमी दिलेली होती. तसेच तक्रारदारास वि प यांनी दर्शविलेली बस व त्याची अंतर्गत रचना व चांगल्या वाहतुक सेवेची खात्री दिलेली होती. वि प यांनी तक्रारदारांकडून सदर प्रवासाचे भाडे रक्कम रु.1,240/- आकारले होते. तक्रारदाराने सदरची रक्कम वि प यांना नेट बँकींगव्दारे अदा केलेली होती. वि प यांनी तक्रारदारास TP2970443861 या कमांकाचे व 27, 28, 29, 30 या आसन क्रमांकाचे तिकीट दिलेले होते. प्रवासाचे दिवशी म्हणजे दि.07/01/2020 रोजी वि प कंपनीची MH-04-GP-5565 या क्रमांकाची प्रवासी बस रात्री 9 वाजता दादर स्टेशन येथे आली होती. सदर बसमध्ये तक्रारदार व त्यांचे कुटूंब बसले असता सदर बसमधील आसने अतिशय खराब व मोडकळलेली होती. तसेच कुशनही अस्वच्छ फाटलेली व निकृष्ट दर्जाची होती. त्याबाबत तक्रारदार यांनी वि प यांचे बस ड्रायव्हर यांचेकडे तक्रार केली असता त्यांनी अन्य आसनावर बसणेची व्यवस्था करणेचा प्रयत्न केला होता. परंतु सदर बसमधील सर्व आसने ही अतिशय निकृष्ट दर्जाची व मोडलेली होती. तक्रारदारांचे कुटूंबियापैकी खतिजा यांना शारिरीक अंपगत्व आलेले असले कारणाने त्या मदतीशिवाय प्रवास करु शकत नव्हत्या. सदरची बाब बसचे ड्रायव्हरचे निदर्शनास आणून दिली असता त्यांनी तक्रारदारास व त्यांचे कुटूंबियांना शिवीगाळ करुन अपरात्री दादर पासून अर्ध्यातासाचे अंतरावर अनोळखी ठिकाणी जबरदस्तीने बस मधून खाली उतरविले होते. त्यामुळे तक्रारदार व त्यांचे कुटूंबियांना नाईलाजाने दुस-या प्रवासी बसने पुढील प्रवास करणे भाग पडले होते. अशाप्रकारे वि प यांनी तक्रारदारास सदोष प्रवास सेवा देऊन तक्रारदारास मानसिक व आर्थिक त्रास दिेलेला आहे. तक्रारदार यांनी वि प यांना अॅड.जे.एस.देसाई यांचेमार्फत नोटीस दिली होती. सदर नोटीसीस वि प यांनी कोणताही प्रतिसाद न दिलेने प्रस्तुतची तक्रार दाखल करणे भाग पडले आहे.
तक्रारदाराने याकामी तिकीट बुकींगपोटी दिलेली रक्कम रु.1,240/-, जादा तिकीटाचा खर्च रु.1,000/- , लिगल नोटीसचा खर्च रु.2,000/-, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/-, शारिरीक त्रास व असुविधाचा खर्च रु.10,000/- व तक्रारीचा खर्च रु.5,000/- असे एकूण रक्कम रु.44,240/-वि.प. यांचेकडून 12 % दराने व्याजासह वसूल होवून मिळावेत अशी विनंती याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत वि प यांनी तक्रारदारास बस तिकीटाचा दिलेला मेसेज, बस बोर्डींग पॉईंट व ट्रॅकींग डिटेल वि प यांचे बसचे फोटो, बसच्या अंतर्गत फोटो, वि प यांना वकीलांमार्फत पाठविलेली नोटीस इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रार अर्ज, शपथपत्र व कागदपत्रे हाच पुरावा समजावा व लेखी युक्तीवाद समजावा अशी पुरसिस दाखल केली.
4. वि.प. यांना सदर कामी नोटीस लागू होऊनही ते सदर कामी हजर न झालेने प्रस्तुतचे प्रकरण त्यांचेविरुध्द एकतर्फा चालविणेचा आदेश नि.1 वर दिऋ.13/01/2022 रोजी पारीत करण्यात आला.
5. वर नमूद तक्रारदार यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ.क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प.हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला सेवेत त्रुटी/कमतरता दिली आहे काय? | होय. |
3 | तक्रारदार वि.प. यांचेकडून बस प्रवास भाडे व नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय, अंशतः. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
मुद्दा क्र.1 ते 4
6. प्रस्तुत प्रकरणी तक्रारदार यांनी कागदयादीसोबत अ.क्र.1 कडे दाखल केलेल्या वि प यांच्या मेसेजमध्ये वि प कंपनीचे नांव व मुंबई ते वाठार सीट नं.27-मुस्तफा, सीट नं.28-फातिमा 29-खतिजा व 30-मरियम तिकीट नं.TP2970443861 भाडे रु.1240/- नमुद आहे व Bus information and tracking details will be shared on the following number on the day of journey -918796414481 नमुद असलेचे दिसून येते. तसेच वि प यांनी प्रस्तुत कामी हजर होऊन सदरचा मेसेज नाकारलेला नाही. यावरुन तक्रारदार हे वि प यांचे ग्राहक असलेचे सिध्द होते. तक्रारदार व वि प यांचेमध्ये ग्राहक व सेवापुरवठादार असे नाते असलेने स्पष्ट होते. सबब मुद्दा क्र.1चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. तक्रारदार यांनी कागद यादीसोबत अ.क्र.1 ला दाखल केलेल्या वि प कंपनीच्या मेसेज वरुन असे दिसते की, तक्रारदाराने स्वत:करिता व त्यांचे कुटूंबियांकरिता दि.07/01/2020 रोजी मुंबई ते वाठार या प्रवासाकरिता चौघांकरिता भाडे रक्कम रु.1,240/- भरले होते व सिट नं.27 ते 30 अशी चार आसने तक्रारदाराचे नांवे बुकींग केले होते. त्याचा तिकीट नं. TP2970443861 असा नमुद असलेचे दिसून येते. तसेच Bus information and tracking details will be shared on the following number on the day of journey -918796414481 नमुद आहे. यावरुन तक्रारदार यांनी वि प कंपनीचे दि.07/01/2020 रोजी मुंबई(दादर) ते वाठार,कोल्हापूर या प्रवासाठी चार व्यक्तींसाठी बुकींग केलेचे स्पष्ट होते. सदरचा प्रवास हा दि.07/01/2020 रोजी रात्री दादरहून 9.00वाजता सुरु होणार होता. तक्रारदार यांचे कथनानुसार, प्रवासाचे दिवशी म्हणजे दि.07/01/2020 रोजी वि प कंपनीची MH-04-GP-5565 या क्रमांकाची प्रवासी बस रात्री 9 वाजता दादर स्टेशन येथे आली होती. सदर बसमध्ये तक्रारदार व त्यांचे कुटूंब बसले असता सदर बसमधील आसने अतिशय खराब व मोडकळलेली होती. तसेच कुशनही अस्वच्छ, फाटलेली व निकृष्ट दर्जाची होती. त्याबाबत तक्रारदार यांनी वि प यांचे बस ड्रायव्हर यांचेकडे तक्रार केली असता त्यांनी अन्य आसनावर बसणेची व्यवस्था करणेचा प्रयत्न केला. परंतु सदर बसमधील सर्व आसने ही अतिशय निकृष्ट दर्जाची व मोडलेली होती. तक्रारदारांचे कुटूंबियापैकी खतिजा यांना शारिरीक अंपगत्व असले कारणाने त्या मदतीशिवाय प्रवास करु शकत नव्हत्या. सदरची बाब वि प कंपनीच्या बस ड्रायव्हरचे निदर्शनास आणून दिली असता त्यांनी तक्रारदारास व त्यांचे कुटूंबियांना शिवीगाळ करुन अपरात्री दादर पासून अर्ध्या तासाचे अंतरावर अनोळखी ठिकाणी जबरदस्तीने बस मधून खाली उतरविले होते. त्यामुळे तक्रारदार व त्यांचे कुटूंबियांना नाईलाजाने दुस-या प्रवासी बसने पुढील प्रवास करणे भाग पडले होते. तसेच तक्रारदाराने दाखल केलेले वि प कंपनीचे बसचे फोटो व बसचे आतील फोटो पाहता तक्रारदार यांनी वि प कंपनीकडे प्रवासाकरिता प्रवासभाडे भरुनदेखील वि प यांनी तक्रारदारास प्रवासासाठी योग्य त्या सोई सुविधा पुरविलेल्या नाहीत तसेच प्रवासासाठी वापरलेली बसमधील सर्व आसने ही निकृष्ट दर्जाची असलेचे सिध्द होते. यावरुन वि प कंपनीने तक्रारदारास दयावयाचे सेवेत त्रुटी ठेवून अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केलेचे सिध्द होते. तक्रारदाराने सादर केलेला पुरावा हा त्याची संपूर्ण केस शाबीत करण्याकरिता पुरेसा आहे. हा सर्व पुरावा जसाच्या तसा मान्य करण्यासारखा आहे, कारण वि प यांनी प्रस्तुत प्रकरणात हजर राहून तक्रारदाराचे तक्रारअर्जातील कोणतीही कथने नाकारलेली नाहीत किंवा त्याचा पुरावा देखील नाकारलेला नाही. वि.प. यांनी तक्रारदाराचे पार्सल व्यवस्थित न पाठवून तक्रारदारास दयावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे. वि.प. यांनी प्रस्तुत प्रकरणामध्ये वर नमूद केल्याप्रमाणे आपली लेखी कैफियत दाखल केलेली नाही आणि तक्रारदाराचे कोणतेही कथन अमान्य केलेले नाही. त्यामुळे वि.प. यांना तक्रारदाराची संपूर्ण कथने मान्य आहेत असेच गृहित धरावे लागेल. यावरुन तक्रारदार यांना प्रवासी सेवा देणेमध्ये वि.प. असमर्थ ठरले आहेत ही बाब सिध्द होते. सबब, तक्रारदाराने आपली केस पूर्णतया शाबीत केलेली असून वि.प. यांनी तक्रारदारास सेवेत त्रुटी दिलेली आहे असा या मंचाचा निष्कर्ष आहे. सबब मुद्दा क्र.2 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
8. तिकीट बुकींगपोटी दिलेली रक्कम रु.1,240/-, जादा तिकीटाचा खर्च रु.1,000/- , लिगल नोटीसचा खर्च रु.2,000/-, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/-, शारिरीक त्रास व असुविधाचा खर्च रु.10,000/- व तक्रारीचा खर्च रु.5,000/- असे एकूण रक्कम रु.44,240/- ची मागणी वि.प. यांचेकडून केली आहे.परंतु तक्रारदाराने वि.प. यांचेकडे मुंबई(दादर) ते वाठार,कोल्हापूर या प्रवासाठी चार व्यक्तींसाठी भरलेली रक्कम रु.1,240/- व तक्रारदारास दुस-या प्रवासी बससाठी भरावी लागलेली रक्कम रु.1,000/- परत मिळणेस तक्रारदार पात्र आहेत असा या आयोगाचा निष्कर्ष आहे. तक्रारदाराने मानसिक त्रासापोटीची रक्कम रु.25,000/-, शारिरीक त्रास व असुविधासाठी रु.10,000/- व तक्रारीचा खर्च रु.5,000/- ची मागणी ही अवास्तव व अवाजवी वाटते. प्रस्तुत प्रकरणाचा एकूण सारासार विचार करता तक्रारदाराला मानसिक व आर्थिक व शारिरीक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.3,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.2,000/- वि.प. ने तक्रारदारास अदा करणे न्यायाचित वाटते. म्हणून हे आयोग मुद्दा क्र.3 चे उत्तर होय अंशत: असे देऊन प्रस्तुत कामी आम्ही पुढीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत. सबब, आदेश.
- आ दे श –
1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
2) वि.प.यांनी तक्रारदाराला प्रवास भाडे रु.1,240/-(रक्कम रुपये एक हजार दोनशे चाळीस फक्त) तसेच दुस-या बस प्रवासाठी भरावी लागलेली रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) अदा करावी.
3) वि.प. यांनी तक्रारदाराला मानसिक, आर्थिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.3,000/- (रक्कम रुपये तीन हजार फक्त) व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 2,000/- (रक्कम रुपये दोन हजार फक्त) अदा करावी.
4) वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 2019 कलम 71 व 72
प्रमाणे वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.