न्या य नि र्ण य
(व्दाराः- मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्या)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांचे मालकीची इंडिका कार क्र. एमएच-09-डीए-0439 असून तिचा विमा वि.प. विमा कंपनीकडे उतरविला आहे. सदर पॉलिसीचा नंबर 1605003117P107845567 असा असून कालावधी दि. 02/09/2017 ते 01/09/2018 असा होता. दि. 29/3/2018 रोजी सदर कारला अपघात होवून कारचे नुकसान झाले. दुसरे दिवशी गुड फ्रायडे होता, त्यावेळी विमा कंपनीचे ऑफिस बंद असणार असे तक्रारदारांना वाटले तसेच ता. 01/04/2018 रोजी रविवार होता. त्यामुळे तक्रारदार यांनी विमा कंपनीला न कळविला अपघातस्थळावरुन देसाई मोटार्स प्रा.लि. यांचेकडे कार घेवून गेले. तसेच सदर अपघाताबाबतची खबर पोलिस स्टेशनला दिली नाही. त्यानंतर दि. 02/04/2018 रोजी तक्रारदारानी वि.प. विमा कंपनीला नुकसानीबाबत कळविले. त्यानंतर वि.प. कंपनीचे सर्व्हेअर यांनी सदर घटनेचा रितसर सर्व्हे केला. तक्रारदार यांनी देसाई मोटार्स प्रा.लि. यांचेकडून कारदुरुस्तीचे अंदाजपत्रक रक्कम रु.3,41,532/- घेतले व वि.प.कंपनीकडे क्लेम सादर केला. परंतु वि.प यांनी तक्रारदाराचा क्लेम चुकीची कारणे नमूद करुन नामंजूर केला आहे. तक्रारदाराची कार ही देसाई मोटार्स प्रा.लि. यांचेकडे पडून आहे. देसाई मोटार्स प्रा.लि. यांनी सदरची कार घेवून जावी अन्यथा दि. 30/3/18 पासून सदर कारचे भाडे द्यावे अशी मागणी केली आहे. अशा प्रकारे वि.प. यांनी सेवेत त्रुटी केल्याने प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराने दाखल केली आहे. सबब, तक्रारदारास वि.प. यांचेकडून क्लेमची रक्कम रु.1,70,000/-, सदर रकमेवर द.सा.द.शे. 12 टक्के प्रमाणे व्याज, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.20,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु.10,000/- देणेचा आदेश वि.प. यांना व्हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
2. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत विमा पॉलिसी, त्रुटी पत्र, अपघात सूचना पत्र, दावा फॉर्म, इस्टिमेट, ड्रायव्हींग लायसेन्स इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
3. वि.प. यांनी याकामी दि.30/10/18 रोजी तक्रारदाराचे तक्रारअर्जास म्हणणे दाखल केले असून तक्रारदाराची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारली आहे. तक्रारदारांनी सदरचे अपघाताची माहिती 5 दिवसानंतर वि.प. यांना कळविलेली आहे. तक्रारदार यांनी वि.प. यांचे स्पॉट सर्व्हेअरला सदरचे अपघाताचे वेळी कळविले नाही. तसेच पोलिसांना देखील कळविलले नाही. अपघात हा मोठा असलेने तक्रारदारांनी स्पॉट सर्व्हे करणे तसेच पोलिसांना कळवून सर्व बाबींची पूर्तता करणे आवश्यक होते. सबब, सदरची बाब न कळवून तक्रारदार यांनी वि.प. कंपनीची दिशाभूल केलेली आहे. तसेच परिस्थितीजन्य पुरावा (Factual evidence) नाश केलेला आहे. मोठया वाहनाने कारला पाठीमागून धडक देवून सदरचे वादातील कारचे नुकसान झालेचे दिसून येत नाही. सदरचे वाहनाचे Odimeter reading 234235 आहे. त्या कारणाने सदरचे वाहनाचे दैनिक/दररोजचे रनिंग 140 किमी आहे. तक्रारदारांची स्वतःची ट्रॅव्हल एजन्सी स्टाईल मूग ट्रॅव्हल्स एजन्सी या नावाने असून तक्रारदार कार भाडयाने देतात. यावरुन तक्रारदार यांनी सदरचे वाहनाचा वापर व्यापारी कारणाकरिता करुन पॉलिसीतील अटी व शर्तींचा भंग केलेला आहे. सदरचे वाहनामध्ये असलेल्या व्यक्तींना कोणत्याही गंभीर स्वरुपाचे जखमा झालेल्या नाहीत. सबब, सदरचे वरील सर्व बाबींवरुन सदरचे वाहनाचे अपघातासाठी घडलेले कारण आणि त्यामुळे झालेल्या वाहनाचे नुकसानीशी कोणताही संबंध दिसून येत नाही. त्या कारणाने तक्रारदारांचा क्लेम योग्य कारणाने वि.प. यांनी नाकारलेला आहे. सबब, वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली नाही असे वि.प. यांचे कथन आहे. सबब, वि.प. विमा कंपनीने कोणतीही त्रुटी न दिल्याने तक्रारअर्ज खर्चासह नामंजूर करण्यात यावा अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.
4. वि.प.क्र.1 यांनी याकामी पॉलिसी प्रत व सर्व्हेअरचा रिपोर्ट तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
5. तक्रारदारांचा तक्रारअर्ज, वि.प. यांचे म्हणणे, दाखल केलेली अनुषंगिक कागदपत्रे, तक्रारदाराचे व वि.प. यांचे पुराव्याचे शपथपत्र, लेखी युक्तिवाद यांचा विचार करता निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे विमा रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | तक्रारदार हे मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
5 | अंतिम आदेश काय ? | अंशतः मंजूर. |
कारणमिमांसा –
मुद्दा क्र. 1 –
6. प्रस्तुतकामी तक्रारदा यांचे मालकीची इंडिका कार क्र. एमएच-09-डीए-0439 असून तिचा विमा वि.प. विमा कंपनीकडे उतरविला आहे त्याचा पॉलिसी क्र. 1605003117P107845567 त्याचा कालावधी दि. 02/09/2017 ते 01/09/2018 तक्रारदार यांनी कारची पॅकेज पॉलिसी उतरविली आहे. प्रस्तुतकामी तक्रारदाराने वि.प. विमा कंपनीची विमा पॉलिसीची प्रत दाखल केली आहे. सदरची पॉलिसी व तिचा कालावधी वि.प. यांनी नाकारलेला नाही. त्या कारणाने तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी दिले आहे.
7. उपरोक्त मुद्दा क्र.1 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत. ता. 29/3/2018 रोजी तक्रारदार हे सदर कारने कोल्हापूर ते गारगोटी रस्त्याने येत असताना कारचे समोर अचानकपणे कुत्रा आडवा आल्याने कार उजवीकडे घेत असताना मागून येणा-या ट्रकने कारला धडक दिली. त्यामुळे तक्रारदार यांची कार रस्त्याच्या उजव्या बाजूला झाडाला धडकली व बाजूचे चरीत जावून पडली. सदर वि.प. विमा कंपनीचे ऑफिस बंद असणार असे तक्रारदार यांना वाटल्याने तक्रारदार यांनी वि.प. विमा कंपनीला न कळविता अपघातग्रस्त कार देसाई मोटार्स प्रा.लि. टाटा मोटर्स सर्व्हिस सेंटर येथे दिली. तक्रारदार यांनी वि.प. विमा कंपनीकडे क्लेम फॉर्म भरुन त्यासोबत इस्टीमेट जोडले व क्लेमची मागणी केली असता वि.प. विमा कंपनीने यांनी ता. 09/08/2018 रोजी तक्रारदारांचा क्लेम नाकारला. सबब, वि.प. यांनी तक्रारदारांकडून विमा हप्ता स्वीकारुन देखील तक्रारदारांचा क्लेम नाकारुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. सदरचे मुद्याचे अनुषंगाने दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता तक्रारदारांनी वि.प. यांचे दि. 9/8/2018 रोजी तक्रारदारांचा क्लेम नाकारलेचे पत्र दाखल केले आहे. सदरचे पत्राचे अवलोकन करता तक्रारदारांनी अपघाताची सूचना 8 दिवसांनी विलंब, त्याचप्रमाणे पोलिस स्टेशनला सूचना दिली नाही, तसेच मोठया वाहनाने कारला धडक दिली हे कारचे नुकसानीवरुन दिसून येते नाही, सदरचे वाहनाचे रनिंग जास्त झालेले आहे, वाहनाचा वापर कमर्शियल वापरासाठी होतो तसेच तक्रारदार यांना गंभीर दुखापती झाल्या नाहीत या कारणास्तव तक्रारदारांचा क्लेम नाकारलेला आहे. तक्रारदारांनी तक्रारीसोबत अपघात सूचना पत्र, दावाफॉर्म, देसाई मोटर्स कडील इस्टिमेट, पार्ट इस्टीमेट, तसेच ड्रायव्हींग लायसेन्स इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
8. वि.प. यांनी ता. 30/10/18 रोजी म्हणणे दाखल केले असून तक्रारदारांची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. वि.प. यांचे म्हणणेचे अवलोकन करता, तक्रारदारांनी सदरचे अपघाताची सूचना 5 दिवसांचे विलंबाने दिलेली असून तक्रारदार यांनी स्पॉट सर्व्हेला कळविले नसलेचे कथन केले आहे. त्याअनुषंगाने तक्रारदारांचे पुराव्याचे शपथपत्राचे अवलोकन करता सदरचा अपघात रात्री 8 ते 9 दरम्यान घडला. दुस-या दिवशी गुडफ्रायडे होता. त्यावेळी वि.प. विमा कंपनीचे ऑफिस बंद होते व ता. 31/3/2018 रोजी वि.प. विमा कंपनीचे ऑफिस बंद असणार असे तक्रारदार यांना वाटल्याने ता. 1/4/2018 रोजी रविवार होता. त्यामुळे तक्रारदार यांनी सदरचे वाहन देसाई मोटर्स प्रा.लि., जे टाटा मोटर्सचे अधिकृत सर्व्हिस सेंटर आहे, तेथे घेवून गेले असे कथन केले आहे. प्रस्तुतकामी तक्रारदारांनी पुढील न्यायनिवाडा दाखल केलेला आहे.
I 2020 CPJ 93 SC
Saurashtra Chemical Ltd. Vs. National Insurance Co. Ltd.
In view of the law laid down by the three-Judge Bench in the Sonnel Clocks, the argument that by appointing a surveyor, the respondent-insurer is estopped from raising the plea of violation of condition prescribing a time limit for intimation/lodging of the claim, has no legs to stand. Thus, issue No.(1) is answered accordingly.
9. प्रस्तुत कामी तक्रारदार यांनी वि.प. विमा कंपनीला कळविणेबाबत विंलब का झालेला आहे याची कारणे दिलेली असून विमा कंपनीने कळविलेनंतर त्यांनी सर्व्हे येवून केलेला आहे. त्यामुळे वि.प. विमा कंपनी विलंबाचे कारणास्तव सदरचे वाहनाचा क्लेम नाकारु शकत नाही या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
10. प्रस्तुतकामी वि.प. यांनी त्यांचे म्हणणेमध्ये तक्रारदार यांचे वाहनाचे Odimeter reading 234235 आहे. तसेच तक्रारदारांची स्वतःची ट्रॅव्हल एजन्सी आहे. सदरचे वाहन भाडयाने देतात. त्यांनी सदरचे वाहनाचा वापर व्यापारी कारणाकरिता केला असलेने पॉलिसीच्या अटींचा भंग केलेचे कथन केले आहे. तथापि सदरचे वाहन तक्रारदार भाडयाने देत असलेचे अनुषंगाने वि.प. यांनी कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. सबब, पुराव्याअभावी वि.प. यांचे सदरचे कथन विचारात घेता येत नाही.
11. प्रस्तुतकामी वि.प यांनी श्री एस.आर.शहापूरकर यांचा सर्व्हे रिरपोर्ट दाखल केलेला आहे. सदर सर्व्हे रिपोर्टमध्ये 10 comments – 1) Total loss नमूद आहे. Net Liability Approx. – 2,29,734.00 नमूद आहे. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत रिपेअरिंगचा खर्च रु. 3,41,532/- दर्शविला आहे. प्रस्तुतकामी पॉलिसीचे अवलोकन करता, सदचे वाहनाची IDV Rs.2,00,000/- नमूद आहे. सदरचे अपघाती परिस्थितीमध्ये सदरचे वाहन तक्रारदार यांनी रक्कम रु.30,000/- ला विक्री केलेचे मान्य केले आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी आयोगामध्ये सदर वाहनाचे नुकसानीपोटी रक्कम रु. 1,70,000/- ची मागणी केलेली आहे. तक्रारदार यांनी सदरचे वाहनाचे अपघाताची नोंद पोलिस स्टेशनला दिली नाही त्यामुळे सदरकामी सदरचे अपघाताचा पंचनामा दाखल नाही. सबब, वरील सर्व बाबींचा व कागदपत्रांचा विचार करता तक्रारदार हे सदरचा क्लेम नॉन स्टँडर्ड बेसीस या तत्वाखाली मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. त्याअनुषंगाने पुढील न्यायनिवाडयाचा आधार हे आयोग घेत आहे.
1) II (2010) CPJ (SC)
Amalendu Sahoo Vs. Oriental Insurance Co.Ltd.
Insurance – Non-standard Settlement – Terms of policy violated – Vehicle insured for personal use, used on hire – Claim repudiated by insurer – Complaint dismissed by Consumer Forum – Order upheld in appeal – Revision against order dismissed – Civil appeal filed – Repudiation of claim in toto unjustified – Settlement of claim on non-standard basis directed.
2) National Insurance Co.Ltd. Vs. Nitin Khandelwal
(2008) CPJ (SC)
The appellant insurance company liable to indemnify the owner of vehicle when the insurer obtain comprehensive policy for the loss caused to the insurer. The Respondent submitted that even assuming that there was a breach of conditions of insurance policy, the appellant insurance company ought to have settled the claim on non-standard basis.
सबब, वि.प. यांनी तक्रारदारांचा क्लेम पूर्णपणे नाकारुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.3
12. उपरोक्त मुद्दा क्र.2 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता वि.प. यांनी तक्रारदार यांचा संपूर्ण विमा क्लेम नाकारुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे. त्या कारणाने तक्रारदार हे वि.प. यांचेकडून सदरचे विमाक्लेमची वाहनाचे नुकसानीची रक्कम रु. 1,70,000/- चे 75 टक्के रक्कम नॉन स्टँडर्ड तत्वाप्रमाणे मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.4
13. उपरोक्त मुद्दा क्र.1 ते 3 मधील विवेचनाचा विचार करता, वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेने तक्रारदार यांना मानसिक त्रास झाला व सदरची तक्रार आयोगात दाखल करणे भाग पडले. त्या कारणाने तक्रारदार हे वि.प. यांचेकडून मानसिक त्रासापोटी रक्कम रु.8,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- मिळणेस पात्र आहेत. सबब, मुद्दा क्र.4 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.5 - सबब आदेश.
| - आ दे श - - तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
- वि.प.क्र.1 विमा कंपनी यांनी तक्रारदार यांना विमा पॉलसी क्र. 1605003117P107845567 अंतर्गत वाहनाचे नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.1,70,000/- चे नॉन स्टँडर्ड बेसीस तत्वाप्रमाणे 75 टक्केप्रमाणे होणारी रक्कम 8 आठवडयांचे आत रक्कम अदा करावी. सदरची रक्कम मुदतीत वि.प यांनी अदा न केलेस सदरचे रकमेवर मुदत संपले तारखेपासून सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदार यास मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्के प्रमाणे व्याज वि.प. यांनी अदा करावे.
- वि.प. यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.8,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- अदा करावी.
-
- वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
- विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 2019 मधील तरतुदीप्रमाणे वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
- आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.
|