न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 11 व 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे—
वि.प. क्र.1 हे टोयोटा कंपनीचे अधिकृत विक्रेते होते व वि.प.क्र.2 हे वाहन उत्पादन करणेचे काम करतात. तक्रारदार यांनी वि.प.क्र.1 यांचेकडे दि. 04/05/2016 रोजी Innova Crysta ZX गाडी खरेदी करण्याचा व्यवहार केलेला होता. सदर व्यवहारासाठी तक्रारदारयांनी वि.प.क्र.1 यांना रक्कम रु.1,00,000/- इतकी रक्कम दिली होती. सदरची रक्कम स्वीकारुन वि.प.क्र.1 यांनी 3 महिन्याने गाडी देतो असे लेखी आश्वासन दिले. परंतु आजपर्यंत वि.प. यांनी तक्रारदार यांना वर नमूद केलेल वाहन मिळालेले नाही. त्यामुळे तक्रारदार यांना शारिरिक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या वि.प.क्र.1 यांचे शोरुम बंद पडलेले आहे. अशा प्रकारे सदर रकमेचा वापर वि.प.क्र.1 व 2 यांनी स्वतःकरिता करुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे. तक्रारदार यांनी गाडी बुक केली तेव्हा गाडीची किंमत रक्कम रु. 24,43,010/- इतकी होती व सध्या या गाडीची किंमत रु. 30,00,000/- इतकी आहे. त्यामुळे तक्रारदार यांना सध्याच्या बाजारभावाने गाडी खरेदी करणेशिवाय पर्याय नाही. सबब, वि.प. यांचेकडून गाडीच्या किंमतीतील तफावत मिळावी अशीही तक्रारदाराची मागणी आहे. म्हणून, तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रारअर्ज या मंचात दाखल केला आहे.
2. प्रस्तुतकामी तक्रारदाराने वि.प. यांचेकडून वाहन नोंदणीची रक्कम रु.1,00,000/-, नवीन गाडी घेताना तक्रारदार यांना द्यावी लागणारी जादा रक्कम रु.6,00,000/-, तक्रारदार यांना भाडयाची गाडी घेवून प्रवास करावा लागत असल्याने त्यापोटीची रक्कम रु.1,00,000/-, मानसिक त्रासापोटी रु.50,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.25,000/- वि.प.क्र.1 व 2 यांचेकडून वसूल होवून मिळावा अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत अ.क्र.1 ते 3 कडे अनुक्रमे वि.प. यांचेकडील पावती, अधिकारपत्र, कलम 11(2)(ब) प्रमाणे अर्ज वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. प्रस्तुतकामी वि.प.क्र.1 यांना जाहीर नोटीसची बजावणी होवूनही ते याकामी हजर झालेले नाहीत व त्यांनी म्हणणे दाखल केलेले नाही. सबब, वि.प.क्र.1 यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला.
5. वि.प.क्र.2 यांनी सदरकामी म्हणणे/कैफियत व अॅफिडेव्हीट, कागदयादीसोबत वि.प.क्र.1 व 2 यांचे दरम्यान झालेले डीलरशीप अॅग्रीमेंट, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तिवाद वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. वि.प. क्र.2 ने त्यांचे म्हण0ण्यामध्ये तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. वि.प. क्र.2 ने तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.
i) तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्यातील सर्व मजकूर मान्य व कबूल नाही.
ii) वादातील वाहन तक्रारदारांनी वि.प.क्र.1 यांचेकडे बुक केलेले होते. तक्रारदार हे वि.प.क्र.2 यांचे ग्राहक होत नाहीत.
iii) वि.प.क्र.1 व 2 यांचेमध्ये झालेल्या डिलरशीप करारानुसार वाहनाचे बुकींग, डिलीव्हरी, कॅन्सलेशन, सर्व्हिसिंग या बाबी वि.प.क्र.1 द्वारे हाताळल्या जातात. वि.प.क्र.1 च्या कर्तव्यचुतीसाठी वि.प.क्र.2 जबाबदार असणार नाहीत.
iv) वि.प.क्र.1 यांच्या विनंतीवर वि.प.क्र.2 यांनी दि. 21 नोव्हेंबर 2017 रोजी संपुष्टात आणले गेले व आणि शोरुम बंद पडले.
v) वि.प.क्र.1 यांनी तक्रारदाराकडून स्वीकारलेली रक्कम ही वि.प.क्र.2 यांना अदा केलेली नाही.
vi) प्रस्तुत मंचास सदर तक्रारीचा निर्णय देण्याचे अधिकारक्षेत्र नाही. सबब, तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी वि.प.क्र.2 यांनी केली आहे.
अशा स्वरुपाचे आक्षेप वि.प. यांनी तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.
6. वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे वि.प. यांचेकडून वाहन बुकींगची रक्कम व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
7. वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्तरे आम्ही होकारार्थी दिली आहेत कारण तक्रारदार यांनी वि.प.क्र.1 यांचेकडे दि. 04/05/2016 रोजी Innova Crysta ZX गाडी खरेदी करण्याचा व्यवहार केलेला होता. सदर व्यवहारासाठी तक्रारदार यांनी वि.प.क्र.1 यांना रक्कम रु.1,00,000/- इतकी रक्कम दिली होती. सदर बुकींगची पावती क्र. 10544 तक्रारदाराने याकामी हजर केली आहे. सदरचे बुकींग हे वि.प.क्र.2 यांनी उत्पादित केलेल्या वाहनासाठी तक्रारदाराने केले होते. सबब, तक्रारदार व वि.प.क.1 व 2 हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द झालेली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
8. तक्रारदाराचे कथनानुसार, वि.प.क्र.1 यांनी तक्रारदारास बुकींगची रक्कम स्वीकारल्यानंतर तीन महिन्यांत डिलीव्हरी देण्याचे कबूल केले होते. परंतु वि.प.क्र.1 यांनी आजतागायत सदरचे वाहनाची डिलीव्हरी तक्रारदारास दिलेली नाही. प्रस्तुतकामी वि.प.क्र.1 यांना जाहीर नोटीसची बजावणी होवूनही ते याकामी हजर झालेले नाहीत. सबब, त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला आहे. म्हणजेच वि.प.क्र.1 यांनी तक्रारदाराचे तक्रारअर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही. सबब, तक्रारदाराने तक्रारअर्जात केले कथनांवर विश्वासार्हता ठेवणे न्यायोचित वाटते. वरील बाबींचा विचार करता, वि.प.क्र.1 यांनी तक्रारदाराकडून Innova Crysta ZX या वाहनाचे बुकींगपोटी रक्कम रु.1,00,000/- स्वीकारुन देखील वाहनाची डिलीव्हरी तक्रारदारास दिलेली नाही ही बाब शाबीत होते असे या आयोगाचे मत आहे.
9. वि.प.क्र.2 यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये, वादातील वाहन तक्रारदारांनी वि.प.क्र.1 यांचेकडे बुक केलेले होते. त्यामुळे तक्रारदार हे वि.प.क्र.2 यांचे ग्राहक होत नाहीत. वि.प.क्र.1 व 2 यांचेमध्ये झालेल्या डिलरशीप करारानुसार वाहनाचे बुकींग, डिलीव्हरी, कॅन्सलेशन, सर्व्हिसिंग या बाबी वि.प.क्र.1 द्वारे हाताळल्या जातात. वि.प.क्र.1 च्या कर्तव्यचुतीसाठी वि.प.क्र.2 जबाबदार असणार नाहीत. वि.प.क्र.1 यांच्या विनंतीवर वि.प.क्र.2 यांनी दि. 21 नोव्हेंबर 2017 रोजी संपुष्टात आणले गेले व आणि शोरुम बंद पडले. वि.प.क्र.1 यांनी तक्रारदाराकडून स्वीकारलेली रक्कम ही वि.प.क्र.2 यांना अदा केलेली नाही, असा बचाव वि.प.क्र.2 यांनी घेतलेला आहे. परंतु वि.प.क्र.2 चे सदरचे बचाव फेटाळण्यात येतात कारण वि.प.क्र.2 यांनी उत्पादित केलेल्या वाहनाचे बुकींग तक्रारदाराने वि.प.क्र.1 या वि.प.क्र.2 यांच्या डिलरकडे केलेले आहे. त्यामुळे वि.प.क्र.1 च्या प्रत्येक व्यावसायिक कृतीसाठी वि.प.क्र.2 हेही जबाबदार आहेत. वि.प.क्र.2 हे सदरची जबाबदारी टाळू शकत नाहीत. वि.प.क्र.2 यांनी वि.प.क्र.1 यांचे विनंतीवरुन वि.प.क्र.1 चे शोरुम बंद करताना, वि.प.क्र.1 यांनी वि.प.क्र.2 यांनी उत्पादित केलेल्या वाहनापोटी ग्राहकांकडून रकमा स्वीकारल्या आहेत किंवा कसे, याबाबतची शहानिशा करणे आवश्यक होते. तशी शहानिशा केल्याचे वि.प.क्र.2 यांचे कथन नाही. सबब, वि.प.क्र.1 यांचे शोरुम बंद केले या कारणास्तव वि.प.क्र.2 हे आपली जबाबदारी टाळू शकत नाहीत असे या आयोगाचे मत आहे. सबब, वाहनाचे बुकींगपोटी रक्कम स्वीकारुन देखील वाहनाची डिलीव्हरी तक्रारदारास न देवून वि.प.क्र.1 व 2 यांनी सेवात्रुटी केली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
10. सबब, तक्रारदारांनी वाहनाचे बुकींगसाठी वि.प.क्र.1 यांना दिलेली रक्कम रु. 1,00,000/- परत मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच सदरचे रकमेवर तक्रारदार हे सदर रक्कम वि.प.क्र.1 यांना अदा केले तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याजदराने वसूल होवून मिळणेस तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.20,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- वि.प.क्र.1 व 2 यांचेकडून वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या वसूल होवून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. तक्रारदाराने केलेल्या इतर मागण्या या पुराव्याअभावी विचारात घेण्यात येत नाहीत.
सबब, प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) वि.प.क्र.1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना वाहनाचे बुकींगची रक्कम रु.1,00,000/- अदा करावी व सदर रकमेवर सदर रक्कम वि.प.क्र.1 यांना अदा केले तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
3) मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 20,000/- व अर्जाचा खर्च रु.5,000/- वि.प. क्र.1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तक्रारदारास अदा करावा.
4) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प. क्र.1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीनुसार कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.