नि.1 खालील आदेश
द्वारा – मा. श्रीमती भारती सं. सोळवंडे, अध्यक्ष
1. प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा 2019 चे कलम 35 अन्वये दाखल केली आहे.
2. तक्रारदार यांचा कॅन्सरचे पेशंटना उपचार देणेचा व्यवसाय असून त्यासाठी त्यांची हॉस्पीटल्स महाराष्ट्रात ब-याच ठिकाणी आहेत. जाबदार हे जाहीरात एजन्सी चालवितात. तक्रारदार यांनी त्यांचे कॅन्सर सेंटरची जाहीरात करणेसाठी जाबदार यांचेबरोबर बोलणी केली. त्यानुसार जाबदार यांनी जाहीरात करण्यासाठी रक्कम रु. 7,56,144/- रकमेचे कोटेशन तक्रारदार यांना दिले. तक्रारदार यांनी सदरची रक्कम जाबदार यांचे खातेवर दि. 28/8/2019 रोजी जमा केली. त्यामुळे तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक झाले आहेत. तदनंतर जाबदार यांनी तक्रारदार यांच्या हॉस्पीटलची ऑडिओ जाहीरात करण्याचे काम सुरु केले. परंतु तक्रारदार यांना कोणतीही पूर्वसूचना न देता जाबदार यांनी दि.25/12/2022 पासून तक्रारदार यांचे हॉस्पीटलचे जाहीरात करण्याचे काम बंद केले. म्हणून तक्रारदार यांनी जाबदार यांचेशी वेळोवेळी संपर्क साधला परंतु जाबदार यांनी त्यांना कोणताही प्रतिसाद दिला नाही. तक्रारदार यांनी जाबदार यांना दिलेल्या रकमेपैकी रु.5,74,849/- एवढया रकमेपर्यंतचीच जाहीरात जाबदार यांनी केली. त्यामुळे उर्वरीत रक्कम रु.1,81,295/- जाबदार हे तक्रारदारांना देय लागतात. म्हणून तक्रारदारांनी जाबदार यांना दि. 16/12/2023 व दि. 8/02/2024 रोजी नोटीस पाठविली. परंतु सदरची नोटीस स्वीकारण्याचे जाबदार यांनी टाळलेले आहे. अशा प्रकारे जाबदारांनी सेवा देण्यात त्रुटी केली आहे. म्हणून तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. सबब, तक्रारदारांनी जाबदारांकडून नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.1,81,295/- व्याजासह मिळावेत, तसेच मानसिक त्रासापोटी रु.50,000/- व अर्जाचा खर्च मिळावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. तदनंतर तक्रारदाराने तक्रारअर्जात दुरुस्ती केली असून तक्रारीत नव्याने मजकूर समाविष्ट केला आहे. तक्रारदार यांनी सामाजिक हेतूने सदर हॉस्पीटलची उभारणी केली आहे. शहरातील गोर-गरीब, सर्वसामान्य कॅन्सर पेशंटना माफक व सवलतीच्या दरात उपचार मिळावेत म्हणून हॉस्पीटल बांधलेले आहे. सदर हॉस्पीटलमध्ये पिवळे व केशरी रेशनकार्ड धारकांना परवडतील अशा दरांमध्ये उपचाराची सुविधा पुरविली जाते. सातारा जिल्हयामध्ये बरेच हॉस्पीटल्स आहेत. त्यामुळे या व्यवसायामध्ये प्रचंड स्पर्धा आहे. त्यामुळे तक्रारदार हॉस्पीटलला फार मोठया प्रमाणात उत्पन्न मिळत नाही. तक्रारदार यांचे हॉस्पीटल हे तक्रारदार यांचे एकमेव चरितार्थाचे साधन आहे. त्यामुळे तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक आहेत असे तक्रारदारांचे कथन आहे.
3. तक्रारदारांनी तक्रारअर्जाचे पुष्ठयर्थ शपथपत्र, कागद यादीसोबत तक्रारदारांनी जाबदारांना पाठविलेली नोटीस, सदर नोटीसचा परत आलेला लखोटा, तक्रारदारांनी जाबदार यांचेकडे भरणा केलेल्या रकमेचा तपशील, जाबदार यांनी दिलेले इन्व्हॉईस, तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये वेळोवेळी झालेल्या ई-मेल व संदेशांचा तपशील इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.
4. सदरकामी तक्रारदारतर्फे ॲड ए.बी.तोडकर यांचा दाखलपूर्व युक्तिवाद ऐकला. तसेच दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले.
5. तक्रारदाराचे तक्रारअर्जातील कथन विचारात घेता तक्रारदार यांचा कॅन्सरचे पेशंटना उपचार देणेचा व्यवसाय असून त्यासाठी त्यांची हॉस्पीटल्स महाराष्ट्रात ब-याच ठिकाणी आहेत असे तक्रारदाराचे कथन आहे. तक्रारदाराचे स्वतःचे उदरनिर्वाहासाठी सातारा येथे एकमेव हॉस्पीटल आहे असे तक्रारदाराचे कथन नाही. सदर हॉस्पीटलमध्ये अधिक संख्येने कॅन्सरचे पेशंट उपचारासाठी यावेत यासाठी तक्रारदारांनी जाबदार या जाहीरात एजन्सीला तक्रारदार संस्थेची जाहीरात करण्यास सांगितले व त्यासाठी त्यांनी जाबदारांना मोबदला म्हणून रक्कम अदा केली आहे. सदरच्या सर्व बाबी विचारात घेता तक्रारदार यांचा व्यवसाय असून सदरचे व्यवसायाचे वृध्दीसाठी त्यांनी जाबदार यांचे जाहीरात एजन्सीला मोबदला देवून जाहीरात करण्यास सांगितले ही बाब स्पष्टपणे दिसून येते. सबब, तक्रारदार जाबदार यांचेबरोबर करत असलेले व्यवहार हे व्यापारी हेतूसाठी किंवा नफा कमविण्यासाठी (Commercial purpose) करीत असल्याने तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायदा 2019 मधील कलम 2(7) नुसार ग्राहक होत नाही असे या आयोगाचे मत आहे.
Section 2(7) : "Consumer" means any person who-
(i) buys any goods for a consideration which has been paid or promised or partly paid and partly promised, or under any system of deferred payment and includes any user of such goods other than the person who buys such goods for consideration paid or promised or partly paid or partly promised, or under any system of deferred payment, when such use is made with the approval of such person, but does not include a person who obtains such goods for resale or for any commercial purpose; or
(ii) hires or avails of any service for a consideration which has been paid or promised or partly paid and partly promised, or under any system of deferred payment and includes any beneficiary of such service other than the person who hires or avails of the services for consideration paid or promised, or partly paid and partly promised, or under any system of deferred payment, when such services are availed of with the approval of the first mentioned person, but does not include a person who avails of such service for any commercial purpose.
Explanation. -For the purposes of this clause, -
(a) the expression "commercial purpose " does not include use by a person of goods bought and used by him exclusively for the purpose of earning his livelihood, by means of self-employment;
(b) the expressions "buys any goods " and "hires or avails any services " includes offline or online transactions through electronic means or by teleshopping or direct selling or multi-level marketing;
वर नमूद ग्राहक या संज्ञेच्या व्याख्येमध्ये एखादी व्यक्ती व्यापारी कारणास्तव सेवा घेत असेल तर ती ग्राहक होत नाही असे स्पष्ट नमूद केले आहे. प्रस्तुत प्रकरणी तक्रारदार यांनी हॉस्पीटलचे व्यवसायाचे वृध्दीसाठी जाबदारांना जाहीरात करण्यास सांगितले आहे. सबब, तक्रारदारांनी जाबदारांकडून घेतलेली सेवा ही व्यापारी कारणास्तव/नफा कमविण्यासाठी घेतलेली आहे ही बाब स्पष्टपणे दिसून येते. सबब, ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदींनुसार तक्रारदार हा ग्राहक या संज्ञेत येत नाही असे या आयोगाचे मत आहे.
याकामी आयोगाने खालील वरिष्ठ न्यायालयांचे न्यायनिवाडयांचा आधार घेतला आहे.
- Kalpavruksha Charitable Trust Vs. Toshniwal Brothers
Supreme Court decided on 12th Oct. 1999
- Superior Air Products Ltd. Vs. Vimala Hospital P.Ltd.
(1996) 11 NCDRC CK 0057
सदरचे निवाडयांमध्ये हॉस्पीटल हे ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदींनुसार ग्राहक होत नाही असे स्पष्ट निरिक्षण मा. वरिष्ठ न्यायालयांनी नोंदविलेले आहे.
6. तक्रारदारांनी त्यांचे तक्रारअर्जात, तक्रारदार यांनी सामाजिक हेतूने सदर हॉस्पीटलची उभारणी केली आहे. शहरातील गोर-गरीब, सर्वसामान्य कॅन्सर पेशंटना माफक व सवलतीच्या दरात उपचार मिळावेत म्हणून हॉस्पीटल बांधलेले आहे. सदर हॉस्पीटलमध्ये पिवळे व केशरी रेशनकार्ड धारकांना परवडतील अशा दरांमध्ये उपचाराची सुविधा पुरविली जाते. सातारा जिल्हयामध्ये बरेच हॉस्पीटल्स आहेत. त्यामुळे या व्यवसायामध्ये प्रचंड स्पर्धा आहे. त्यामुळे तक्रारदार हॉस्पीटलला फार मोठया प्रमाणात उत्पन्न मिळत नाही असे कथन केले आहे. तथापि सदर कथनांचे पुष्ठयर्थ तक्रारदाराने कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारदार संस्थेची महाराष्ट्रात एकाहून अधिक हॉस्पीटल्स आहेत. त्यामुळे सदर हॉस्पीटल हे एकमेव चरितार्थाचे साधन आहे हे तक्रारदाराचे कथन शाबीत होत नाही असे या आयोगाचे मत आहे.
7. सबब, वरील सर्व कारणांचा विचार करता तक्रारदार हा जाबदारांचा ग्राहक होत नसलेने प्रस्तुतची तक्रार या आयोगासमोर चालणेस पात्र नाही या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
- तक्रारदार हा जाबदारांचा ग्राहक होत नसलेने, प्रस्तुत वादविषयाबाबत योग्य त्या न्यायालयात दाद मागणेचा तक्रारदाराचा हक्क अबाधित ठेवून, प्रस्तुतची तक्रार दाखल करुन घेण्यापूर्वीच फेटाळण्यात येते.
- खर्चाबाबत आदेश नाहीत.