श्रीमती. अंजली देशमुख, मा. अध्यक्ष यांचेनुसार,
:- निकालपत्र :-
दिनांक 13 मे 2011
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. जाबदेणार यांनी राबविलेल्या योजनेत तक्रारदारानी सभासदत्व रक्कम रुपये 1,00,000/- भरुन घेतले. ही रक्कम एकाच वेळी भरणे शक्य नसल्याचे सांगितल्यावर आय.सी.आय.सी.आय बँक व स्टॅन्डर्ड चार्टड बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे रक्कम रुपये 1,00,000/- 5 वर्षाच्या कालावधीत दरमहा रक्कम रुपये 3,000/- च्या समान हप्त्यात रक्कम भरण्याची तरतुद असल्याचे जाबदेणार यांनी तक्रारदारास सांगितले. तक्रारदारानी जाबदेणार यांच्या योजनेत भाग घेतला. त्याचवेळी तक्रारदारास असेही सांगण्यात आले की या सभासदत्वाबरोबर 45 दिवसात मायक्रोवेव्ह ओव्हन, 42 इंच एल.सी.डी टी.व्ही या वस्तू मिळतील. या योजनेनुसार तक्रारदारास पाच वर्षाचे सभासदत्व, कन्ट्री क्लबचे आजीवन सभासदत्व, वरील उत्पादने यांचा समावेश होता. कन्ट्री क्लबचे आजीवन सभासदत्व त्यात जीम स्पा फॅसिलीटी व फंक्शन हॉल यांचादेखील समावेश होता. त्यानुसार तक्रारदारानी आय.सी.आय.सी.आय बँक व स्टॅन्डर्ड चार्टड बँकेच्या क्रेडिट कार्डाचा वापर करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तक्रारदाराच्या असे लक्षात आले की आय.सी.आय.सी.आय बँकेनी रक्कम रुपये 1,00,000/- साठी प्रतिमहिना रक्कम रुपये 3,000/- पाच वर्षासाठी असा व्यवहार मानला नाही. त्यामुळे तक्रारदारानी जाबदेणार यांच्या प्रतिनिधीस भेटून त्यांची समस्या सांगितली परंतू त्यावर उपाय शोधला नाही. दरम्यान आय.सी.आय.सी.आय बँकेकडून तक्रारदारास स्टेटमेंट येणे चालू झाले. तक्रारदारानी ज्याज्या वेळेस कन्ट्री व्हॅकेशनच्या ऑफिसमध्ये जाऊन याबद्यल विचारणा केली त्यावेळी सर्व कर्मचारी मिटींगमध्ये बिझी असल्याचे सांगण्यात आले. तक्रारदाराकडून रक्कम घेतल्यानंतर जाबदेणार यांनी तक्रारदारास व्यवस्थित वागणूक दिली नाही. त्यानंतर तक्रारदारानी मॅनेजर श्री.रशीद यांना पत्र पाठविले. परंतू काहीही उपयोग झाला नाही. कस्टमर केअरला ईमेल करुनही उपयोग झाला नाही. तक्रारदारास योजनेचा कुठलाही फायदा झाला नाही. तक्रारदारास सर्व रक्कम रुपये 1,00,000/- एकाच महिन्यात भरण्यास सांगण्यात आले, जे तक्रारदारास शक्य नव्हते. रक्कम रुपये 1,00,000/- दरमहा समान हप्त्यात भरावयाचे असल्यास तक्रारदारास दरवर्षी रक्कम रुपये 15,000/- अतिरिक्त भरावे लागणार होते. तक्रारदारास यासर्वांचा शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास झाला. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून नुकसान भरपाईपोटी रक्कम रुपये 6,00,000/- मागतात. तक्रारदारानी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदाराच्या मागणीस विरोध दर्शविला. जाबदेणार यांनी मायक्रोवेव्ह ओव्हन व 42 इंच एल सी डी टी व्ही देणार होते हे तक्रारदाराचे म्हणणे अमान्य केले. परंतू कन्ट्री व्हॅकेशन्सचे पाच वर्षांचे सभासदत्व व कन्ट्री क्लब इंडिया लि. यांचे आजीवन सभासदत्व देणार होते हे मान्य केले. सभासदत्वाची रक्कम EMI क्रेडिट कार्डद्वारा भरता येणार होती. कन्ट्री क्लब इंडिया लि. आजीवन सभासदत्वाबरोबर जाबदेणार जीम, स्वीमिंग यासारख्या सुविधा देणार होते हे मान्य करतात. तसेच तक्रारदारानी जाबदेणार यांच्याकडे रक्कम भरल्याचे मान्य करतात. जाबदेणार यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदारानी योजनेच्या सुविधांची फायदयांची मागणीच केलेली नव्हती. योजनेच्या सुविधा देण्यास जाबदेणार बांधील आहेत. जर तक्रारदारास सभासदत्व नको होते तर त्यांनी त्यांच्या पत्नीसह जाबदेणार यांच्याकडे अर्ज करुन सभासदत्व रद्य करण्याची मागणी करावयास हवी होती. तसेच तक्रारदारानी मुळ करारनामा देखील जाबदेणार कंपनीकडे परत पाठवावयास हवा होता. या बाबींची पुर्तता केल्यानंतरच तक्रारदार सभासदत्वाच्या रक्कमेच्या वीस टक्के रक्कमेचा परतावा मिळण्यास पात्र आहेत, असे नमूद करुन तक्रार खारीज करण्याची मागणी केली. लेखी जबाबासोबत जाबदेणार यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले.
3. दोन्ही पक्षांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचानी पाहणी केली. तक्रारदारानी जाबदेणार यांच्याकडून कन्ट्री व्हॅकेशन्सचे सभासदत्व घेतले. सभासदत्व घेतेवेळेस एकरकमी रक्कम रुपये 1,00,000/- भरण्याची तक्रारदाराची क्षमता नसल्यसाचे त्यांनी जाबदेणार यांना सांगितले. त्याचवेळेस जाबदेणार यांच्या प्रतिनिधीनी आय.सी.आय.सी.आय बँकेतर्फे रक्कम रुपये 1,00,000/- मिळू शकतील, त्याचे दरमहा रक्कम रुपये 3,000/- प्रमाणे पाच वर्षापर्यन्त हप्ते भरावे लागतील असे तक्रारदारास सांगण्यात आले. परंतू बँकेनी असा व्यवहार केला नाही असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. तक्रारदारानी स्वत:च ही तक्रार लिहीली व मांडलेली आहे. त्यामुळे त्यात काही बाबींचे संपूर्ण स्पष्टीकरण आलेले नाही व हा पुरावा सुध्दा आलेला नाही. तरीही तक्रारदारानी जाबदेणार यांच्याकडे रक्कम रुपये 1,00,000/- सभासदत्वापोटी भरले व सभासदत्व स्विकारले हे जाबदेणार यांना मान्य आहे.
4. एखादया कंपनीने एखादी योजना लॉन्च करतेवेळेस त्यांच्या प्रतिनिधींनी योजनेचे सभासदत्व ग्राहकांनी घ्यावे म्हणून ग्राहकांना अनेक बढाचढाके योजनेची वैशिष्टये सांगतात. कधीकधी त्यांच्या माहितीपुस्तीकेत किंवा करारात नमूद केलेल्या नसतांनाही परंतू ग्राहकांना या योजनेकडे आकृष्ट करण्यासाठी अशा प्रकारची बतावणी करतात हे रोजच आपण पाहतो. तशाच प्रकारे इथेसुध्दा जाबदेणार यांनी मायक्रोवेव्ह ओव्हन व 42 इंच एल सी डी टी व्ही देउ असे तक्रारदारास सांगितले असावे. युक्तीवादाच्या वेळेस तक्रारदारानी या मायक्रोवेव्ह, 42 इंच एल सी डी टी व्ही दिलेच नाही तसेच जीम, स्पा ची सुविधा, फंक्शन हॉल याचीही सुविधा दिली नाही असे सांगितले. मंचामध्ये रोजच एक किंवा दोन तक्रारी कन्ट्री व्हॅकेशन किंवा कन्ट्री क्लब विरुध्द आहेत. प्रत्येक तक्रारीमध्ये करारात नमूद केल्याप्रमाणे तसेच तोंडी आश्वासने दिल्याप्रमाणे सोई सुविधा दिलेल्या नाहीत व रक्कमही परत केलेली नाही म्हणून रक्कम परत मिळणेबाबत तक्रारी आहेत. त्यामुळे मंच रोजच्या हया सर्व तक्रारींवरुन judicial note घेऊन प्रस्तूतच्या तक्रारीत तक्रारदारास काय म्हणावयाचे आहे याची नोंद घेतो. तक्रारदारास आता जाबदेणार यांच्यावर विश्वास राहिलेला नाही म्हणून ते आता भरलेल्या रक्कमेचा परतावा मागतात व नुकसान भरपाई मागतात. ग्राहकांच्या घामाचा पैसा, कुठल्याही सोईसुविधा न देता जाबदेणार वापरतात, यावरुन जाबदेणार अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब करतात हे दिसून येते. लेखी जबाबात तक्रारदारानी रक्कम रुपये 1,00,000/- भरल्याचे जाबदेणार मान्य करतात. जाबदेणार यांनी तक्रारदार आवश्यक बाबींची पुर्तता केल्यानंतर भरलेल्या रक्कमेच्या
वरील विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो-
:- आदेश :-
1. तक्रार मान्य करण्यात येते.
2. जाबदेणार यांनी तक्रारदारास रक्कम रुपये 1,00,000/- व तक्रारीचा खर्च रक्कम रुपये 1,000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयात दयावी.
3. आदेशाची प्रत दोन्ही पक्षास विनामूल्य पाठविण्यात यावी.