तक्रार क्र 871/2008
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर.
तक्रार अर्ज क्रमांक - 871/2008
तक्रार अर्ज दाखल तारीखः- 01/07/2008
तक्रार अर्ज निकाल तारीखः- 08/06/2015
निर्मल नंदकिशोर माहेश्वरी, ..........तक्रारदार
उ व 23 वर्षे धंदा व्यवसाय,
रा.द्वारा- शामलाल रघुनाथ तोतला,
मारवाडी गल्ली एरंडोल ता. एरंडोल जि.जळगांव.
विरुध्द
कार्पोरेशन बँक, एम.जी.रोड, .....सामनेवाला.
तर्फे शाखा व्यवस्थापक,
महानगरपालिका समोर नवीपेठ,जळगांव.
कोरम –
श्री.व्हि.आर.लोंढे. अध्यक्ष.
श्रीमती.पुनम नि. मलिक. सदस्या.
तक्रारदार तर्फे अॅड. आनंद मुजुमदार.
सामनेवाला तर्फे अॅड.प्रताप निकम .
नि का ल प त्र
(द्वारा – मा.श्री.विनायक रा. लोंढे, अध्यक्ष)
1. तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाले यांनी दयावयाच्या सेवेत त्रुटी केलेली आहे म्हणुन नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केलेली आहे.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालिलप्रमाणे.
तक्रारदार यांचे सामनेवाले बँकेत बचत खाते असुन त्याचा क्रमांक 6741 असा आहे. तक्रारदार यांनी सदरील खात्यात दि.10/05/2008 रोजी सामनेवाले बँकेचे व त्यांचे शाखेचे बचत खाते क्र.315 मध्ये रु.15,000/- चा चेक जमा करण्यासाठी दिला. तो दिवस शनिवारचा असल्याने सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्या खात्यात रक्कम दि.12/05/2008 रोजी जमा करुन असे सांगीतले. तक्रारदार यांनी सामनेवाले यांना सांगीतले की, त्यांच्या खात्यात वटविण्यासाठी एक चेक येणार आहे. म्हणुन त्यांनी भरलेल्या चेकची रक्कम त्यांच्या खात्यात जमा होणे आवश्यक आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्या खात्यात वटवीण्यासाठी दिलेल्या चेकची रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली नाही. तक्रारदार यांनी दि.12/05/2008 रोजी दिलेला चेक न वटता परत गेला. तक्रारदार यांचे शेअर्स तोटयात विकले गेले तसेच तक्रारदारास आय.पी.ओ.साठी अर्ज भरता आल्याने त्यांचे नुकसान झाले. सामनेवाले बँकेत बचत खाते क्र.315 आहे. दि.10/05/2008 रोजी अॅक्सीस बॅकेचे चेक दुस-या बॅकेचे असुनही दि.12/05/2008 रोजी जमा झाला. तसेच एच.डी.एफ.सी.बँकेचा चेक तोही जमा झाला. तक्रारदाराने दिलेला चेक दि.13/05/2008 रोजी जमा झाला. सामनेवाले यांचे निष्काळजीपणामुळे तक्रारदार यांचे खात्यात चेकची रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे तक्रारदार यांचे आर्थीक नुकसान रु.2,00,000/- चे झाले. तसेच तक्रारदारास झालेल्या मानसिक,शारिरीक त्रासापोटी रु.50,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.10,000/- मिळावे अशी विनंती केली आहे.
3. सामनेवाले हे या मंचासमोर हजर झाले. तक्रारदार यांच्या तक्रारीतील बाबी स्पष्टपणे नाकारलेले आहे. तक्रारदार यांचे बचत खाते आहे ही बाब मान्य आहे. तक्रादार यांनी दि.10/05/2008 रोजी चेक दिला होता ही बाब नाकारले आहे. सामनेवालेचे कथन की, वादातील चेक दि.12/05/2008 रोजी वटविण्यासाठी आला होता. तक्रारदाराच्या खात्यात धनादेश वटविण्या आधी रक्कम शिल्लक नव्हती. तक्रारदाराने बँकेच्या क्लिअरींग हाऊसनुसार वेळेच्या आत पैसे भरण्यास सांगितले. तक्रारदार यांनी काळजी घेतली नाही. सबब सामनेवाले बँकेने सदरचा धनादेश न परत पाठविला. त्यानंतर तक्रारदारामार्फत अर्जातील धनादेश जमा करण्यात आला परंतु भरणा करण्याची वेळ संपलेली होती. त्यामुळे धनादेशाची रक्कम नंतर जमा करण्यात येईल असे सांगितले. तक्रारदार यांनी दिलेला चेक न वटल्यामुळे सामनेवाले यांच्या बरोबर भांडण केले. तसेच सामनेवाले यांनी पुढे असे कथन केले की, तक्रारदार यांचा अनादरीत झालेला धनादेश दि.16/05/2008 रोजी वटविण्यात आला. खात्यात पुरेशी रक्कम असल्यामुळे तो धनादेश वटविला गेला. सामनेवाले यांनी ग्राहकांचे हित जोपासले आहे. तक्रारदारास द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली नाही. सबब तक्रार रद्य करण्यात यावी अशी विनंती केली आहे.
4. तक्रारदार यांचे वकीलांचा युक्तीवाद ऐकला. सामनेवाले यांचे वकीलांचा युक्तीवाद ऐकला. तक्रारदार यांनी दाखल केलेले शपथपत्र सामनेवाले यांनी दाखल केलेले शपथपत्र याचे अवलोकन केले असता न्यायनिर्णयासाठी खालील मुद्ये उपस्थित होतात.
मुद्ये उत्तर
1. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली ही बाब
तक्रारदार यांनी शाबीत केली आहे काय ? नाही.
2. तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय ? नाही.
3. आदेश कोणता ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमिमांसा
5. मुद्या क्र. 1 व 2 -
तक्रारदार यांनी दाखल केलेले शपथपत्र व दस्तऐवज यांचे अवलोकन केले असता तक्रारदाराचे कथन की, तक्रारदार सामनेवाले बॅकेत दि.10/05/2008 रोजी चेक क्र.628060 भरण्यासाठी दिला होता. सदरील दिवस शनिवार असल्यामुळे सामनेवाले हे दि.12/05/2008 रोजी खात्यात जमा होईल असे सांगितले. सदरील चेकची रक्कम दि.12/05/2008 रोजी जमा केली नाही. दि.12/05/2008 रोजी तक्रारदार यांनी दुस-या पार्टीस दिलेला चेक न वटता परत गेला. त्यामुळे तक्रारदाराचे नुकसान झाले. तक्रारदार यांनी दिलेल्या चेकची रक्कम त्यांच्या खात्यात जमा न करुन सामनेवाले यांनी द्यावयाच्या सेवेत त्रुटी केलेली आहे.
6. सामनेवाले यांचे कथन व पुरावा लक्षात घेतले असता वादातील धनादेश तक्रारदाराच्या खात्यात जमा करण्यासाठी आला असता भरणा करण्याची वेळ संपलेली होती. सदरील रक्कम तक्रारदार यांच्या खात्यात जमा करण्यात आली. तत्पुर्वी तक्रारदार यांनी दिलेला धनादेश वटविण्यासाठी आला होता. तक्रारदार यांच्या खात्यात रक्कम शिल्लक नव्हती म्हणुन तो धनादेश अनादरीत झाला. तसेच अनादरीत झालेला धनादेश पुन्हा वटविण्यासाठी आला. दि.16/05/2015 रोजी त्याची रक्कम अदा करण्यात आली.
7. वर नमुद केलेल्या बाबी लक्षात घेतले असता तक्रारदार यांनी अनादरीत झालेला धनादेश दिला होता. तक्रारदार यांनी त्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यासाठी धनादेश दि.12/05/2008 रोजी दिला होता. बॅकेच्या कार्यप्रणालीनुसार धनादेश वटणे कामी काही कालावधी देणे आवश्यक आहे. कार्यालयीन कार्यप्रणालीनुसार धनादेश पास झाल्यानंतर त्यांची रक्कम खातेदाराच्या खात्यात जमा होते. तक्रारदाराने ति-हाईत इसमास चेक दिला होता तो तक्रारदार यांच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्यामुळे अनादरीत झाला व त्यानंतर तक्रारदार यांनी त्यांच्या खात्यात भरण्यासाठी आलेला धनादेश पास करण्यात आला. असे निदर्शनास येते की, तक्रारदार यांनी ति-हाईत इसमास दिलेला धनादेश वटविणेकामी तक्रारदार यांनी त्यांच्या खात्यात रक्कम जमा करणे आवश्यक होते. तक्रारदार यांनी कोणत्या तारखेला धनादेश जमा केला होता त्या विषयी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. सामनेवाले यांनी तक्रारदार यांचे खाते उतारा दाखल केला त्याचे अवलोकन केले असता सामनेवाले यांची कुठेही जबाबदारी दिसून येत नाही. तसेच सामनेवाले यांनी द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली आहे असेही निष्कर्ष काढता येत नाही. तक्रारदार यांनी दिलेला धनादेश बँकेच्या कार्यप्रणालीनुसार बँकेने पास करुन त्यांच्या खात्यामध्ये जमा केला आहे ती रक्कम जमा होण्याच्या अगोदरच तक्रारदार यांनी दिलेला धनादेश अनादरीत झाला आहे त्यास सामनेवाले हे जबाबदार नाहीत. सबब तक्रारदार यांची तक्रार रद्य होण्यास पात्र आहे.
म्हणुन मुद्या क्र.1 व 2 चे उत्तर आम्ही नाकारार्थी देत आहोत. सबब खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1. तक्रारदार यांची तक्रार रद्य करण्यात येते.
2. तक्रारीचा खर्च ज्यांनी त्यांनी आपापला सोसावा.
3. तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदारास देण्यात यावे.
जळगांव.
दि.08/06/2015.
श्रीमती.पुनम नि. मलिक विनायक आर.लोंढे
सदस्या अध्यक्ष.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगांव.