तक्रारदार : तक्रारदार स्वतः हजर.
सामनेवाले : सामनेवाले क्रं. 1 चे वकील श्री. सचिन राजे हजर
सामनेवाले क्रं. 2 व 3 एकतर्फा
*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- मा. श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*--*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
1. सामनेवाले क्रमांक 1 ही मोबाईलची सुविधा पुरविणारी कंपनी आहे, तर सामनेवाले क्रमांक 2 हे सामनेवाले क्रमांक 1 चे अधिकारी आहेत. यापुढे दोन्ही सामेनवाले यांना केवळ सामनेवाले असे संबोधले.
2. तक्रारदारांनी सामेनवाले यांचेकडून मोबाईलची सेवा स्विकारली होती व मोबाईलचा वापर तक्रारदार क्रमांक 1 व 2 दोघेही त्यांच्या सोयीप्रमाणे करीत होते. तक्रारदाराच्या तक्रारीतील कथनाप्रमाणे तक्रारदारांनी दिनांक 19/10/2009 रोजी रुपये 222/- चा टॉक टाईम जमा करुन घेतला. परंतु सामेनवाले यांनी दिनांक 9/11/2009 रोजी त्यामधून रुपये 100/- कमी केले. तक्रारदारांनी सामेनवाले यांचेकडे चौकशी केली असतांना ते वॉल पेपर कामी कमी करण्यात आले असा खुलासा सामेनवाले यांनी केला. तक्रारदारांच्या कथनाप्रमाणे तक्रारदारांनी त्यांच्या मोबाईलमधील वॉल पेपर बदलण्याबद्दल कोणतीही कार्यवाही केली नव्हती. त्यानंतर तक्रारदारांनी सामेनवाले यांचेकडे वारंवार पत्रव्यवहार केला, तसेच त्यांच्या अधिका-यांशी संपर्क प्रस्तापित केला होता. सामेनवाले यांचेकडून तक्रारदारांना रुपये 100/- चा वॉल पेपर बदलण्याबद्दलचा समाधान कारक खुलासा प्राप्त होऊ शकला नाही. त्यानंतर तक्रारदारांनी सामेनवाले यांचेविरुध्द प्रस्तुतची तक्रार दाखल केली.
2. सामनेवाले यांनी हजर होऊन आपली कैफीयत दाखल केली, व त्यामध्ये प्रस्तुतची तक्रार मोबाईलच्या बिलाबद्दलची असल्याने टेलीकॉम अॅक्ट 1885 यामधील तरतुदीनुसार ग्राहक तक्रार निवारण मंचास तक्रार चालविण्याचा अधिकार नाही, असे कथन केले. त्याचप्रमाणे तक्रारदार क्रमांक 2 यांना वॉल पेपर बदलल्याबद्दल दिनांक 8/11/2009 रोजी संदेश दिला होता व त्याप्रमाणे रुपये 100/- तक्रारदारांच्या जमा रक्कमेतून कमी करण्यात आले असेही कथन सामनेवाले यांनी केले.
3. तक्रारदाराने आपले पुराव्याचे शपथपत्र दाखल केले, तसेच लेखी युक्तीवाद दाखल केला. देन्ही बाजूंचा तोंडी युक्तीवाद ऐकून घेतला.
4. प्रस्तुत मंचाने तक्रारदाराची तक्रार, शपथपत्र व कागदपत्रे, तसेच सामनेवाले यांची कैफीयत, प्रतिज्ञापत्र व कागदपत्रे यांचे वाचन केले. त्यावरुन तक्रारीच्या न्यायनिर्णयाकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सामनेवाले यांनी तक्रारदारांच्या जमा रक्कमेमधून अनाधिकाराने रुपये 100/- कमी करुन सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केली, ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | होय. |
2 | तक्रारदार मूळची रक्कम रुपये 100 अधिक नुकसानभरपाई वसूल करण्यास पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतीम आदेश? | तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. |
कारण मिमांसा
सामनेवाले यांनी आपल्या कैफीयतीच्या परिच्छेद क्रमांक 2 व 3 यामध्ये टेलिकॉम अॅक्ट मधील तरतुदींचा संदर्भ दिला. तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाचा जनरल मॅनेजर, टेलीकॉम विरुध्द एम. कृष्णन व इतर या प्रकरणातील निकालाचा संदर्भ दिला. मा. महाराष्ट्र राज्य आयोग यांनी ग्राहक संरक्षण कायदा, तसेच टेलिकॉम अॅक्ट यामधील तरतुदी, तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाचा एम. कृष्णन व इतर या प्रकरणातील निकाल व मा. सर्वोच्च न्यायालयाच्या अन्य न्याय निर्णयांची चर्चा करुन दिनांक 6/11/2012 रोजी असा आदेश दिलेला आहे की, ग्राहक तक्रार निवारण मंचात मोबाईलची बिला बद्दलची तक्रार जर वैयक्तिक रित्या दाखल केलेली असली तर ती तक्रार दाखल करुन घेण्याचा मंचाला अधिकार आहे. मा. राज्य आयोगाचा सदरील न्याय निर्णय प्रस्तुत मंचाला बंधनकारक असल्याने सामनेवाले यांचा आक्षेप स्विकारता येत नाही. तक्रारदारांनी तक्रार प्रलंबित असतांना त्यांचे चिरंजीव कार्तिकेय यांना तक्रारदार नंबर 2 म्हणून संम्मीलीत केले. त्याचप्रमाणे तक्रारदारांनी आपल्या पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. तसेच पत्रव्यवहाराच्या प्रती हजर केल्या. सामनेवाले यांनी मात्र कैफीयत दाखल झाल्यानंतर पुराव्याचे वेगळे शपथपत्र दाखल केले नाही. त्याचप्रमाणे सामनेवाले यांनी कैफीयतीतील कथनाप्रमाणे तक्रारदार क्रमांक 2 कार्तिकेय यांच्या संदेशानुसार दिनांक 8/11/2009 रोजी वॉल पेपर बदलण्याबद्दल कार्यवाही केली, व त्याबद्दल रुपये 100/- कमी करण्यात आले असा पुरावा दाखल केला नाही. तक्रारदार क्रमांक 2 कार्तिकेय यांना दिनांक 8/11/2009 रोजी वॉल पेपर बदलण्याची सूचना सामनेवाले यांनी दिली होती याबद्दलचा पुरावा दाखल करणे सामनेवाले यांना शक्य होते परंतु सामनेवाले यांनी ती कार्यवाही केली नसल्याने सामनेवाले हे आपल्या कैफीयतीमधील कथन सिध्द करु शकले नाहीत. सहाजिकच सामनेवाले यांनी तक्रारदारांच्या जमा रकमेमधून 100/- अनाधिकाराने कमी केले या तक्रारदाराच्या कथनामध्ये तथ्य दिसून येते. याप्रकारे सामनेवाले यांनी तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केली ही बाब सिध्द होते.
तक्रारदारांनी आपल्या तक्रारीमध्ये सामनेवाले यांचेकडून मूळचे 100/- रुपये अधिक नुकसानभरपाई असे एकंदर रुपये 20,000/- ची मागणी केलेली आहे.
सामनेवाले यांनी तक्रारदारांना मोबाईलच्या जमा रकमेच्या संदर्भात मानसिक त्रास व गैरसोय होईल याप्रकारचे वर्तन केले. तक्रारदारांना दुसरे सिमकार्ड घ्यावे लागले. तक्रारदारांची झालेली गैरसोय विचारात घेता नुकसानभरपाईची रक्कम रुपये 5,000/- अधिक तक्रारीच्या खर्चाबद्दल रुपये 1,000/- व मूळचे रुपये 100/- असे एकूण रुपये 6,100/- सामनेवाले यांनी तक्रारदारांना विशिष्ट मुदतीत अदा करावेत असा आदेश देणे योग्य व न्याय्य आहे, असे प्रस्तुत मंचाचे मत आहे.
4. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षानुरुप पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 362/2010 अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना मोबाईलच्या जमा रकमेच्या संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केली आहे, असे जाहिर करण्यात येते.
3. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना मूळची रक्कम रुपये 100/- अधिक नुकसानभरपाई रुपये 5,000/- व रुपये 1,000/- तक्रारीच्या खर्चाबद्दल असे एकूण रक्कम रुपये 6,100/- न्याय निर्णयाची प्रत मिळाल्यापासून आठ आठवडयाच्या आत अदा करावेत असाही आदेश सामनेवाले यांना देण्यात येतो. अन्यथा वरील मुदत संपल्यापासून त्या रकमेवर 9 टक्के दराने व्याज द्यावे.
5. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात
याव्यात.
ठिकाणः मुंबई.
दिनांकः 30/07/2013
( एस. आर. सानप ) (ज.ल.देशपांडे)
सदस्य अध्यक्ष
एम.एम.टी./-