न्या य नि र्ण य
द्वारा – मा. सौ मनिषा सं. कुलकर्णी, सदस्या
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 11 व 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडून त्यांचे मालकीचे ट्रक क्र. एम.एच.11-एम-4146 या वाहन खरेदीसाठी दि. 1/7/2014 रोजी रक्कम रु. 3,50,000/- चे कर्ज उचल केले आहे व सदरचे वाहन तारण ठेवले. तथापि सदरचा ट्रक कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याने बेकायदेशीररित्या दीड वर्षापूर्वी ओढून नेलेला आहे. त्यामुळे तक्रारदार यांना सदर कर्जाचे हप्ते परतफेड करणे अडचणीचे झाले. तरीदेखील तक्रारदार यांनी आजपर्यंत रक्कम रु. 1,82,931/- इतकी रक्कम वेळोवेळी वि.प. यांचेकडे जमा केली आहे. वि.प. हे तक्रारदाराचे वाहन जप्त करण्याची धमकी देत आहेत. तक्रारदार हे सदर कर्जाचे आजतारखेपर्यंत होणारी कायदेशीर व्याजाप्रमाणे रक्कम पूर्णफेड करण्यास तयार आहेत परंतु वि.प. कंपनी तक्रारदाराची पिळवणूक करुन अतिरिक्त रक्कम बेकायदेशीररित्या विविध पोकळ खर्च टाकून वसूल करणेच्या प्रयत्नात आहेत. वि.प. कंपनीने तक्रारदार यांना अद्यापही रु.4,75,000/- येणे असल्याचे सांगून तडजोडीस सदर रक्कम अदा केलेनंतरच नाहरकत दाखला देणार असलेचे नमूद केले आहे. अशा प्रकारे वि.प. यांनी तक्रारदारास सेवात्रुटी दिली आहे. सबब, तक्रारदारास सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले असे तक्रारदाराचे कथन आहे.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडून त्यांचे मालकीचे ट्रक क्र. एम.एच.11-एम-4146 या वाहन खरेदीसाठी दि. 1/7/2014 रोजी रक्कम रु. 3,50,000/- चे कर्ज उचल केले आहे. सदर कर्जाचे वेळी तक्रारदार यांना कर्जाबाबतची कोणतीही कागदपत्रे देण्यात आली नाहीत तसेच तथाकथित कर्जाबाबतची संपूर्ण कागदपत्रे इंग्रजी अक्षरात होती व को-या कागदांवर सहया घेतलेनंतर तक्रारदाराकडून वि.प. कंपनीने कोरे धनादेशही घेतले होते. सदरचा ट्रक कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याने बेकायदेशीररित्या दीड वर्षापूर्वी ओढून नेलेला आहे. त्यामुळे तक्रारदार यांना सदर कर्जाचे हप्ते परतफेड करणे अडचणीचे झाले. तरीदेखील तक्रारदार यांनी आजपर्यंत रक्कम रु. 1,82,931/- इतकी रक्कम वेळोवेळी वि.प. यांचेकडे जमा केली आहे. वि.प. हे तक्रारदाराचे वाहन जप्त करण्याची धमकी देत आहेत. तक्रारदार हे सदर कर्जाचे आजतारखेपर्यंत होणारी कायदेशीर व्याजाप्रमाणे रक्कम पूर्णफेड करण्यास तयार आहेत परंतु वि.प. कंपनी तक्रारदाराची पिळवणूक करुन अतिरिक्त रक्कम बेकायदेशीररित्या विविध पोकळ खर्च टाकून वसूल करणेच्या प्रयत्नात आहेत. सदरची आकारणी ही पठाणी पध्दतीच्या व्याजाने केली आहे. तक्रारदार यांनी दि. 23/6/17 रोजी वि.प. यांचेकडे अर्ज देवून खातेउता-याची मागणी केली आहे. वि.प. यांनी सदरचे कर्जाचा व्याजदर हा 13 टक्केंपेक्षाही जादा लावला आहे. तसेच वि.प. कंपनीने खोटे व बेकायदेशीर खर्च तथाकथित कर्जावर टाकलेचे त्यांचे खातेउतारा पाहिलेनंतर दिसून येते. वि.प. कंपनीने तक्रारदार यांना अद्यापही रु.4,75,000/- येणे असल्याचे सांगून तडजोडीस सदर रक्कम अदा केलेनंतरच नाहरकत दाखला देणार असलेचे नमूद केले आहे. अशा प्रकारे वि.प. यांनी तक्रारदारास सेवात्रुटी दिली आहे. सबब, वि.प. कंपनीस तक्रारदाराचे नावे असलेल्या तथाकथित कर्जाची सरळ व्याजाने होणारी कायेदशीर रकमेतून पूर्वी भरलेली रक्कम वजा करुन उर्वरीत होणारी कायदेशीर रक्कम भरणा करुन घेवून ना हरकत दाखला देणेबाबत आदेश व्हावा, तक्रारदाराचे वाहन वि.प. यांनी जप्त करुन नये याबाबत मनाई ताकीद करणेत यावी. तसेच तक्रारदार यांचेकडून वि.प. कंपनीने कर्जाची बेकायदेशीर वसुली करु नये अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
3. तक्रारदाराने तक्रारीसोबत शपथपत्र व कागदयादीसोबत वि.प. कंपनीचा खातेउतारा, तक्रारदार यांनी वि.प. कंपनीला पाठविलेला अर्ज, तक्रारदार यांनी वि.प. कंपनीला पाठविलेल्या पत्राची पोहोच पावती इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. वि.प. यांना नोटीस लागू झालेनंतर वि.प. यांनी आयोगासमोर हजर होवून आपले लेखी म्हणणे दाखल केले. वि.प. यांनी आपले लेखी म्हणणेमध्ये तक्रारदाराचे तक्रारअर्जातील संपूर्ण मजकूर नाकारला आहे. वि.प. यांचे कथनानुसार, तक्रारदार हा वि.प. यांचा ग्राहक होत नाही. तक्रारदाराने वादातील वाहन हे व्यवसायासाठी घेतलेले आहे. सदरचे वाहन चालविण्यासाठी तक्रारदाराने परवाना घेतलेला नाही. त्या कारणाने सदरची तक्रार ही या आयोगासमोर चालणेस पात्र नाही. तक्रारदार व वि.प. यांचेमधील कराराप्रमाणे उभय पक्षांमध्ये कर्जाचे हिशेबासंदर्भात काही वाद निर्माण झाला तर तो वाद प्रथम लवादासमोर घेवून जाणेचा आहे व त्यांनी दिलेला निर्णय दोघांनाही बंधनकारक आहे. वि.प. यांनी केलेली व्याजाची आकारणी ही कर्ज करारातील अटी व शर्तीनुसार केली आहे. त्यामुळे तक्रारदारास आता त्याबाबत वाद उत्पन्न करता येणार नाही. कर्ज अदा करतेवेळी तक्रारदारास कर्जाचा व्याजदर हा 23.2 टक्के असेल असे सांगण्यात आले होते. तसेच दर महिन्याच्या एक तारखेस जर हप्ता भरला नाही तर होणा-या उशिराचे दिवसाचे व्याज हे 48 टक्के आकारण्यात येईल हे तक्रारदारास सांगितले होते व त्यांनी ते मान्य केले होते. तक्रारदारांनी कर्जाचे हप्त्याची रक्कम वि.प. कार्यालयात येवून न भरलेने प्रत्येक महिन्याला वि.प यांना आपला कर्मचारी तक्रारदाराचे घरी पाठवून हप्त्याची रक्कम मागणी करावी लागत होती. तक्रारदारांनी नेमले तारखेस हप्ते न भरल्याने त्यास दंडव्याज लागले आहे. तक्रारदाराने दि. 22/09/2015 पासून आजतागायत एकही रुपया भरलेला नाही. तक्रारदाराने वि.प कंपनीचे कर्जास तारण असणारा ट्रक बेकायदेशीररित्या कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्यास तारण दिला होता. त्यांचेकडून घेतलेली रक्कमही तक्रारदाराने थकविल्यामुळे त्यांनी तक्रारदाराचा ट्रक ओढून नेला आहे. अशा परिस्थितीत वि.प. यांना सदरचा ट्रक जप्त करता येत नाही. सबब, वि.प. यांनी कोणतीही सेवात्रुटी न केल्याने तक्रारअर्ज फेटाळण्यात यावा अशी मागणी वि.प यांनी केली आहे.
5. वि.प यांनी याकामी कागदयादीसोबत तक्रारदाराचा कर्ज मागणी अर्ज, कर्ज करारपत्र, कर्जफेडीचा उतारा इ. कागदपत्रे तसेच सरतपासाचे शपथपत्र दाखल केले आहे.
6. तक्रारदाराची तक्रार, दाखल पुरावे व युक्तिवाद तसेच वि.प. यांचे म्हणणे, पुरावा व युक्तिवाद यावरुन मंचासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हा वि.प. यांचा ग्राहक होतो काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदार यांना सेवा देणेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदारांनी केलेल्या मागण्या मिळणेस तक्रारदार पात्र आहे काय ? | होय, अंशतः. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
विवेचन
मुद्दा क्र.1
7. तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडून त्यांचे मालकीचे ट्रक क्र. एम.एच.11-एम-4146 या वाहन खरेदीसाठी दि. 1/7/2014 रोजी रक्कम रु. 3,50,000/- चे कर्ज उचल केले आहे. सदरची बाब वि.प. यांनी मान्य केली आहे. वि.प. यांनी सदर कर्जाचा खातेउतारा याकामी दाखल केला आहे. सबब, तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये सेवा घेणार व सेवा देणार हे नाते प्रस्थापित झालेचे दिसून येते. सबब, तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदींनुसार जाबदार यांचे ग्राहक होतात या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2 ते 4
8. तक्रारदाराने वि.प. कंपनीकडून त्यांच्या मालकीचा ट्रक क्र. एम.एच.11-एम-4146 हे वाहन खरेदीसाठी रक्कम रु. 3,50,000/- चे कर्ज दि. 1/7/2014 रोजी द.सा.द.शे. 13 टक्के व्याजदराने घेतले मात्र सदरचे वाहन कुंभी कासारी कारखान्याने ओढून नेले आहे व तक्रारदार हे तथाकथित कर्जाची रक्कम हे सरळव्याजाने भरणेची तयारी दाखवित आहेत.
9. तथापि वि.प. कंपनीचे करारपत्र व इतर कागदपत्रांचा विचार करता व्याजदर हा 13 टक्के नसून 23.02 इतका असलेचे दिसून येते. वि.प. यांचे करारपत्रातील सर्वच अटी या बंधनकारक नाहीत. तक्रारदार यांचे वाहन हे कुंभी कासारी कारखान्याने ओढून नेलेने तक्रारदाराचा व्यवसाय बंद पडला आहे. सबब, उदरनिर्वाहाचे साधनच बंद असलेने तक्रारदार हा वि.प. यांचे हप्ते भरु शकलेला नाही. मात्र तरीसुध्दा तक्रारदाराची हप्ते भरणेचे तयारी दिसून येते. सबब, तक्रारदार यांनी भरलेली रक्कम वजा जाता उर्वरीत कर्जाची रक्कम ही तक्रार दाखल तारखेपर्यंत द.सा.द.शे. 23 टक्के दराने भरुन घेवून (सरळ व्याजाने) त्यांना ना हरकत दाखला देणेचे आदेश वि.प. कंपनीस करणेत येतात. वाहन जप्त आधीच केले असलेने त्याबाबत आदेश नाहीत. तसेच सदरचे हप्तेची रक्कम ही तक्रारदार यांचेकडून 10 मासिक समान हप्त्याप्रमाणे भरुन घ्यावी. सदरची रक्कम तक्रारदार यांनी न भरलेस ती एकरकमी वसूल करुन घ्यावी असेही आदेश वि.प. यांना करणेत येतात. सबब, हे आयोग खालील आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. तक्रारदार यांनी भरलेली रक्कम वजा जाता उर्वरीत कर्जाची रक्कम ही कर्ज मंजूर केले तारखेपासून ते तक्रार दाखल तारखेपर्यंत द.सा.द.शे. 23 टक्के दराने सरळ व्याजाने 10 समान मासिक हप्त्यांमध्ये भरुन घेवून वि.प. यांनी तक्रारदार यांना ना हरकत दाखला देणेचे आदेश वि.प. कंपनीस करणेत येतात. सदरची रक्कम न भरलेस ती एकरकमी भरुन घेणेचे आदेश वि.प. कंपनीस करणेत येतात.
3. वर नमूद आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाचे तारखेपासून 45 दिवसांत करावी.
4. विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तदतुदींअन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
5. जर यापूर्वी जाबदार यांनी काही रक्कम तक्रारदार यांना अदा केली असेल तर त्याची वजावट करण्याची जाबदार यांना मुभा राहील.
6. सदर आदेशाच्या प्रती उभय पक्षकारांना विनाशुल्क पाठवाव्यात.