::: निकालपञ:::
(आयोगाचे निर्णयान्वये, मा. सौ. कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- 18/11/2021)
1. तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक सरंक्षण कायद्याचे कलम 12 अंतर्गत, गै.अ. यांचे विरुध्द दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
2. तक्रारकर्ता हा शेतकरी असून जोडधंदा म्हणून त्याने श्रीराम ट्रांस्पोर्ट फायनान्स कं.लि. यांचेकडून अशोक लेलँड कंपनीचे मॉडेल अशोक लेलॅन्ड दोस्त एल.एस.बी.एस-3 वाहन विकत घेतले व तशी नोंद उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर येथे करण्यांत येवून दिनांक 10/08/2016 रोजी सदर वाहनाची नोंदणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर येथे तक्रारकर्त्याचे नांवावर करण्यांत आली. सदर वाहन तेंव्हापासून तक्रारकर्त्याचे नांवावर नोंदणीकृत आहे. तक्रारकर्त्याने वि.प.कंपनीकडून विमा पॉलिसी क्र.3379/01827062/000/00 अन्वये सदर वाहनाचा दिनांक 29/9/2017 ते दि. 28/9/2018 या कालावधीचा विमा काढला होता. तक्रारकर्त्याने श्री.मोरेश्वर रामचंद्र मडावी या वैध वाहन परवाना धारण करणा-या व्यक्तीला सदर वाहन चालविण्याकरीता नियुक्त केले होते. सदर व्यक्ती दिनांक 3/2/2018 रोजी सदर वाहनाने मौजा भटालीवरुन तणस घेवून मौजा पिंपळगांव येथे जात असता त्यावर इलेक्ट्रीकची तार पडून शॉर्ट सर्कीट होऊन वाहन पुर्णत: खाक झाले. तात्काळ वाहनचालकाने घटनेची माहिती पोलीस स्टेशन गडचांदूर,जि. चंद्रपूर यांना दिली असता पोलीसांनी घटनास्थळाला भेट देवून दिनांक 3/2/2018 रोजी मोका पंचनामा केला. सदर पंचनाम्यात वाहन जळाल्यामुळे सुमारे 4 लाखाचे नुकसान झाल्याचे नमूद केले आहे. पोलीसांनी सुचीत केल्यावर सदर वाहनाला लागलेली आग बल्लारपूर नगरपालिकेचे अग्नीशमन विभागाने विझविली.
3. यानंतर तक्रारकर्त्याने घटनेची सुचना विरुदध पक्षाला दिली व नुकसान-भरपाई मिळण्यास्तव विमादावा आवश्यक दस्तावेजांसह वि.प.कडे दाखल केला. मात्र अपघाताचे दिवशी सदर वाहन तक्रारकर्त्याच्या मालकीचे नव्हते असा आक्षेप नोंदवून तक्रारकर्त्याचा विमा दावा विरुध्द पक्षाने फेटाळला. परंतु सदर वाहन तक्रारकर्त्याने अन्य कोणालाही हस्तांतरीत केले नसून ते सतत तक्रारकर्त्याचेच नांवावर नोंदणीकृत आहे. सबब वि.प.ने बेकायदेशीररीत्या तक्रारकर्त्याचा विमादावा फेटाळून सेवेत न्युनता केली आहे. सबब तक्रार मंजूर करुन वाहनाची नुकसान भरपाई रु. 4 लाख 18 टक्के व्याजासह, आर्थीक नुकसानापोटी रु. 1 लाख, शारिरीक व मानसीक त्रासापोटी रु.50,000/- व तक्रारीचा खर्च रु.25,000/-, वि.प.कडुन मिळावा अशी त्याने विनंती केली आहे.
4. तक्रारकर्त्याची तक्रार स्विकृत करुन विरुध्द पक्षांना नोटीस काढण्यात आले. विरुध्द पक्ष क्रं. 1व 2 ने हजर होवून तक्रारीला संयुक्त उत्तर दाखल केले असून त्यात तक्रारीतील कथन नाकबूल करीत पुढे असे नमूद केले की तक्रारकर्त्याने विमादावा दाखल केल्यानंतर वि.प.नी चौकशी केली असता, अपघाताचे दिवशी सदर वाहन तक्रारकर्त्याच्या मालकीचे नव्हते व त्याने सदर वाहन आधीच श्री.मोरेश्वर रामचंद्र मडावी यांना विकले होते मात्र सदर व्यवहार आरटीओचे कागदपत्रात नोंदविला नाही व तशी सुचना देखील वि.प. यांना दिली नाही. सबब पॉलिसीतील शर्ती व अटींनुसार असा दावा देय होत नसल्याने तसा आक्षेप नोंदवून तक्रारकर्त्याचा विमादावा विरुध्द पक्षाने फेटाळला. त्यामध्ये वि.प.यांनी कोणतीही सेवेत न्यूनता दर्शवली नाही. उपरोक्त कारणास्तव तक्रारकर्त्याची तक्रार खर्चासह खारीज होण्यांस पात्र आहे.
5. तक्रारकर्त्याची तक्रार, दस्तावेज, पुरावा शपथपञ. वि.प. क्र.1व 2 यांचे संयुक्त लेखी कथन,लेखी उत्तरातील मजकुरालाच त्यांचा पुरावा समजण्यात यावा अशी पुरसीस दाखल व उभय पक्षांचे परस्पविरोधी कथनावरुन खालील मुद्दे आयोगाच्या विचारार्थ घेण्यात आले त्याबाबतची कारणमिमांसा आणि निष्कर्ष पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) तक्रारकर्ता हा वि.प.क्र.1व 2 यांचा ग्राहक आहे काय ? होय
2) विरूध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्त्याप्रति न्युनता पूर्ण सेवा दिली आहे
काय ? : होय
3) आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
6. तक्रारकर्त्याने अशोक लेलँड कंपनीचा क्रमांक एमएच 49-डी 0061 असलेला मॉडल अशोक लेलॅन्ड दोस्त एल.एस.बी.एस-3 विकत घेतला व तशी नोंद उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर येथे करण्यांत येवून दिनांक 10/08/2016 रोजी सदर वाहनाची नोंदणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर येथे तक्रारकर्त्याचे नांवावर करण्यांत आली आहे. तक्रारकर्त्याने वि.प.कंपनीकडून प्रिमियम भरुन विमा पॉलिसी क्र.3379/01827062/000/00 अन्वये सदर वाहनाचा दिनांक 29/9/2017 ते दिनांक 28/9/2018 या कालावधीचा विमा काढला होता. सदर पॉलीसी निशाणी क्र. 4 सोबत दस्त क्रं.5 वर दाखल आहे. यावरून तक्रारकर्ता सदर पॉलिसी अंतर्गत वि.प.क्र.1 व 2 यांचा ग्राहक आहे हे सिध्द होते.सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर त्याअनुषंगाने नोंदविण्यांत येते.
मुद्दा क्रं. 2 बाबतः-
7. तक्रारकर्त्याने अशोक लेलँड कंपनीचा एमएच 49-डी 0061 असलेला मॉडेल अशोक लेलॅन्ड दोस्त एल.एस.बी.एस-3 या वाहनाचा वि.प.कंपनीकडे प्रिमियम भरुन विमा पॉलिसी क्र.3379/01827062/000/00 अन्वये दिनांक 29/9/2017 ते दिनांक 28/9/2018 या कालावधीचा विमा काढला होता यात विवाद नाही. तसेच श्री.मोरेश्वर रामचंद्र मडावी ही वैध वाहन परवाना धारण करणारी व्यक्ती सदर वाहनाने दिनांक 3/2/2018 रोजी मौजा भटालीवरुन तणस घेवून मौजा पिंपळगांव ते नांदाफाटा येथे जात असता त्यावर इलेक्ट्रीकची तार पडून शॉर्ट सर्कीट होऊन वाहन पुर्णत: नष्ट झाले व सदर वाहनचालकाने घटनेची माहिती पोलीस स्टेशन गडचांदूर,जि. चंद्रपूर यांना दिली असता पोलीसांनी घटनास्थळाला भेट देवून दिनांक 3/2/2018 रोजी मोका पंचनामा केला व त्यात वाहन पूर्णत: जळाल्यामुळे अंदाजे 4 लाखाचे नुकसान झाल्याचे नमूद केले आहे. सदर घटनास्थळ पंचनामा दस्त क्रं.6 वर दाखल आहे. तसेच पोलीसांनी सुचीत केल्यावर सदर वाहनाला लागलेली आग बल्लारपूर नगरपालिकेचे अग्नीशमन विभागाने विझविली या सर्व बाबी निर्विवाद आहेत. मात्र अपघाताचे वेळी सदर वाहन चालविणारे श्री.मोरेश्वर रामचंद्र मडावी हे तक्रारकर्त्याने नियुक्त केलेले वाहनचालक नसून तक्रारकर्त्याने सदर वाहन सदर श्री. मडावी यांना विकलेले होते व परिणामत: तक्रारकर्ता हे अपघाताचे वेळी वाहनाचे मालक नसल्यामुळे पॉलिसी अटी व शर्तींनुसार तक्रारकर्त्याला विमादावा देय होत नाही या कारणास्तव तक्रारकर्त्याचा विमादावा विरुध्द पक्षाने फेटाळला. वि.प.ने तक्रारकर्ता तसेच सदर श्री.मोरेश्वर रामचंद्र मडावी यांच्या बयानाची झेरॉक्स प्रत प्रकरणात दाखल केली आहे. मात्र तक्रारकर्त्याने प्रकरणात नि.क्र.4 सोबत दस्त क्रं. 1 वर दाखल केलेल्या उपरोक्त वाहनाच्या आरटीओ नोंदणी प्रमाणत्रात तक्रारकर्त्याच्याच नांवाची नोंद दिसून येते. सदर वाहन तक्रारकर्त्याने सदर श्री.मडावी यांना कायदेशीररीत्या विकल्याचा वा हस्तांतरीत केल्याचा कोणताही दस्तावेज वा पुरावा वि.प.नी प्रकरणात दाखल केलेला नाही. साध्या कागदावरील बयान हा वाहन हस्तांतरणाचा वैध पुरावा नसून त्याबाबत नोंदणी प्रमाणपत्रातील नोंद हाच पुरावा ग्राहय धरणे क्रमप्राप्त आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाने देखील सुरेंद्रकुमार विरुध्द न्यु इंडिया ॲश्युरंस या प्रकरणात दिनांक 18/6/2020 रोजी दिलेल्या निवाडयात,
“The person in whose name the motor vehicle stands registered who would be treated as the “owner” of the vehicle, for the purposes of Ownership of vehicle under M.V.Act.”
The Supreme Court further observed that
“If the insured continues to remain the owner in law in view of the statutory provisions of the M.V.Act, the insurer can not evade its liability in case of an accident.”
प्रस्तूत प्रकरणातदेखील विवादीत वाहन हे दिनांक 10/08/2016 पासून उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर येथे तक्रारकर्त्याचे नांवावर नोंदणीकृत आहे. साहजीकच अपघाताचे वेळी सदर वाहन तक्रारकर्त्याचेच नांवावर होते. सबब वि.पक्ष क्र.1व 2 विमा कंपनीने तक्रारकर्त्याचा विमादावा फेटाळून त्याचेप्रती सेवेत न्युनता केली आहे. सबब विमा पॉलिसीत नमूद वाहनाची, विमाधारकाने जाहीर केलेली किंमत (IDV) विमादाव्यापोटी मिळण्यांस तक्रारकर्ता पात्र आहे असे आयोगाचे मत आहे. याशिवाय विमादाव्याची रक्कम विनाकारण अडविल्यामुळे तक्रारकर्त्याला शारिरीक व मानसीक त्रास झाल्याने तक्रारकर्ता हा वि.प.क्र.1व 2 यांचेकडून उचीत नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळण्यांस पात्र आहे. सबब मुद्दा क्र.3 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यांत येते.
मुद्दा क्रं. 3 बाबतः-
8. वरील मुद्दा क्र.1 व 2 चे विवेचन व निष्कर्षावरून आयोग खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्त्याची तक्रार क्र.147/2018 अंशतः मंजूर करण्यांत येते.
(2) वि.पक्ष क्र.1व 2 यांनी वैयक्तीक वा संयुक्तरीत्या तक्रारकर्त्याला विमादावा
रक्कम हि पॉलीसीमध्ये नमुद असलेली आय.डी.व्ही. रक्कम रू.1,80,000/-
अदा करावी.
(3) वि.पक्ष क्र.1व 2 यांनी वैयक्तीक वा संयुक्तरीत्या तक्रारकर्त्याला शारिरीक व
मानसीक त्रासापोटी नुकसान भरपाई रक्कम रू.10,000/- व तक्रारीचा खर्च
रक्कम रू.5,000/- द्यावा.
(4) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी.
(श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री.अतुल डी.आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, चंद्रपूर.