न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 11 व 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांनी मालवाहतुकीसाठी पिकअप जीप क्र. एम.एच.10-एडब्ल्यू 3721 घेतले होते. सदर वाहतुकीच्या व्यवसायातून येणा-या उत्पन्नावर ते स्वतःची उपजिविका करीत होते. सदर जीपचा विमा तक्रारदार यांनी वि.प. कंपनीकडे उतरविलेला असून त्याचा क्र. 3379/01858695/000/00 असा होता व कालावधी दि. 7/11/2017 ते 6/11/2018 असा होता. सदर वाहनावर तक्रारदार यांनी श्री संजय केशव निकम यांस ड्रायव्हर म्हणून ठेवले होते. सदर वाहनास दि.16/04/2018 रोजी अपघात होवून जीपचे मोठया प्रमाणात नुकसान झाले व ड्रायव्हर संजय निकम याचे या अपघातात निधन झाले. अपघातानंतर तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे कलेम सादर केला. परंतु वि.प. कंपनीने तक्रारदार यांना दि. 10/07/2018 रोजी पत्र पाठवून तक्रारदार यांनी विमा कंपनीस अपघाताची माहिती देण्यास उशिर केला असे कारण देवून तक्रारदाराचा विमा क्लेम देणेस नकार दिला. तसेच वि.प. यांनी तक्रारदार यांना दि.11/07/2018 रोजी तक्रारदार यांचे वाहनात चार लोक प्रवास करीत होते असे कारण देवून क्लेम नाकारला आहे. वि.प. कंपनीने मा.राष्ट्रीय आयोगाने दिलेल्या निर्देशांकडे दुर्लक्ष करुन तक्रारदार यांचा खरा क्लेम नामंजूर केला आहे. अशा प्रकारे वि.प. यांनी सेवात्रुटी केली आहे. म्हणून, तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रारअर्ज या मंचात दाखल केला आहे.
2. प्रस्तुतकामी तक्रारदाराने वि.प. यांचेकडून वाहनाचे नुकसानीपोटी रक्कम रु. 5,23,000/-, बुडालेल्या उत्पन्नापोटी रक्कम रु.60,000/-, मानसिक त्रासापोटी रु.20,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.10,000/- वि.प. कडून वसूल होवून मिळावा अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत अ.क्र.1 ते 8 कडे अनुक्रमे वाहन खरेदीची पावती, पॉलिसी, तक्रारदार यांचा जबाब, वाहन ओढून नेलेची पावती, वाहन दुरुस्तीचे कोटेशन, वि.प. कंपनीने दिलेले पत्र, तक्रारदार यांचे ओळखपत्र वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. वि.प. यांनी सदरकामी म्हणणे/कैफियत व अॅफिडेव्हीट, कागदयादीसोबत पॉलिसीची प्रत, क्लेम फॉर्म, खबरी जबाब, आर.सी.प्रत., आरटीओ सर्टिफिकेट, क्लेम नाकारलेचे पत्र, सर्व्हे रिपोर्ट, पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. वि.प. ने त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. वि.प. ने तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.
i) वि.प. यांनी तक्रारअर्जातील विमा पॉलिसी व तिचा कालावधी मान्य केला आहे.
ii) तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्यातील सर्व मजकूर खोटा व लबाडीचा असून मान्य व कबूल नाही.
iii) तक्रारदाराने अपघाताची घटना घडल्यावर तात्काळ वि.प. कंपनीस कळविणे बंधनकारक असतानाही वि.प. यांना तक्रारदाराने सदर घटना घडलेनंतर तात्काळ कळविलेले नाही तर उशिराने कळविले.
iv) तक्रारदाराचे वाहन हे मालवाहतुकीचे आहे. सदर वाहनाची क्षमता व परवाना चालकास मिळून 2 व्यक्तीच नेण्याचा आहे. असे असताना अपघातावेळी सदर वाहनात चालकाशिवाय 3 व्यक्ती अनाधिकृतपणे प्रवासी म्हणून व धोकादायक रीतीने बसलेले होते. तसेच हे सर्व प्रवासी वाहनाशी व मालवाहतुकीशी संबंधीत नव्हते. तक्रारदाराचे चालकाचे बेकायदेशीर कृत्यामुळेच सदरचा अपघात घडला आहे. सदर चालकाविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. अशा प्रकारे विमा पॉलिसीतील अटींचे उल्लंघन होवून सदरची बेकायदेशीर वाहतूक होत असताना झाले अपघातातील नुकसानीच्या क्लेमची व अनाधिकृत प्रवाशांची जबाबदारी या वि.प. ला स्वीकारुन क्लेम मंजूर करणे बंधनकारक नाही.
v) सबब, तक्ररदाराचा विमा क्लेम वि.प. ने योग्य कारणे देवून नाकारलेला असलेने वि.प. ने तक्रारदाराला सेवेत त्रुटी करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे वि.प. हे तक्रारदाराला कोणतीही विमाक्लेमची रक्कम देणेस जबाबदार नाहीत.
vi) तक्रारदाराने सदरचे वाहन हे फायनान्स कंपनीकडून कर्ज घेवून खरेदी केले आहे. मात्र नमूद फायनान्स कंपनीला याकामी आवश्यक पक्षकार म्हणून सामील केलले नाही. त्यामुळे या तक्रारीस नॉन जॉइंडर ऑफ नेसेसरी पार्टीज या तत्वाची बाधा येते.
vii) वैकल्पिकरित्या वि.प. चे म्हणणे असे की, नुकसानीची रक्कम सर्व्हेअरच्या असेसमेंट प्रमाणेच ठरवता येते. सबब, तक्रारदार हे रक्कम रु.5,23,000/- ही विमा क्लेमची रक्कम मिळण्यास पात्र नाही. सबब, तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.
अशा स्वरुपाचे आक्षेप वि.प. यांनी तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.
5. याकामी वि.प. यांनी खालील नमूद मा. वरिष्ठ न्यायालयांचे न्यायनिवाडे दाखल केलेल आहेत.
- 4640 (2011) 1 WLC 62
Supreme Court of India
- (2019) 2 CONLT 382 : (2018) 4 CPJ 582 : (2018) 4 CPR 546
National Consumer Disputes Redressal Commission
6. वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे वि.प. यांचेकडून विमाक्लेमची रक्कम व नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
7. वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्तरे आम्ही होकारार्थी दिली आहेत कारण तक्रारदार यांनी त्यांचे पिकअप जीप क्र. एम.एच.10-एडब्ल्यू 3721 चा विमा तक्रारदार यांनी वि.प. कंपनीकडे उतरविलेला असून त्याचा क्र. 3379/01858695/000/00 असा होता व कालावधी दि. 7/11/2017 ते 6/11/2018 असा होता. सदर पॉलिसीच्या अनुषंगाने वि.प. यांनी तक्रारदाराचे वाहनाची नुकसानीची जबाबदारी स्वीकारली होती. सदरची विमा पॉलिसी याकामी दाखल असून वि.प. यांनी सदरची बाब नाकारलेली नाही. सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द झालेली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
8. वर नमूद मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे कारण तक्रारदाराचे वाहन पिकअप जीप क्र. एम.एच.10-एडब्ल्यू 3721 वरील ड्रायव्हर संजय केशव निकम हे दि. 16/04/2018 रोजी मुंबईहून परत येत असताना ते पुणे-बंगलोर हायवेवर मौजे लिंब ता. व जि. सातारा गावचे हद्दीत आले असता त्यांचे वाहनासमोर जाणारे मालट्रक नं. आर.जे. 19 जी.ई 1659 चे ड्रायव्हरने अचानक वाहनाचा वेग कमी केलेने तक्रारदाराचे जीपवरील ड्रायव्हरचे ताबेतील पिकअपची धडक समोरील नमूद मालट्रकला बसली. सदर धडकेमुळे तक्रारदाराचे वादातील जीपचे मोठया प्रमाणात नुकसान झाले तसेच अपघातग्रस्त तक्रारदाराचे जीपचा ड्रायव्हर संजय केशव निकम यांचे निधन झाले.
9. सदरच्या अपघाताबाबत व नुकसानीबाबत तक्रारदारने वि.प. कंपनीस कळविले. त्यानंतर तक्रारदाराने सर्व कागदपत्रांनिशी वि.प. विमा कंपनीकडे क्लेम सादर केला. त्यानंतर तक्रारदाराने वेळोवेळी वि.प. कंपनीस विमाक्लेमबाबत विचारले असता वि.प. कंपनीने तक्रारदाराचा विमाक्लेम तक्रारदाराने अपघाताची माहिती वि.प. कंपनीस उशिराने कळविली व दि. 11/07/2018 रोजी वि.प. कंपनीने तक्रारदाराला पत्र देवून तक्रारदाराचे वादतील वाहनात विमा पॉलिसीचे नियमाविरोधात जास्त लोक म्हणजे चार लोक प्रवास करत होते असे कारण देवून तक्रारदाराचा विमाक्लेम नाकारला आहे.
10. वास्तविक झाले अपघाताच्या घटनेची माहिती तक्रारदाराने वि.प. विमाकंपनीस उशिराने दिली हे कारण देवून तक्रारदाराचा न्याय क्लेम वि.प. कंपनीस नाकारता येणार नाही याबाबत मा. राष्ट्रीय आयोगाने वेगवेगळे न्यायानिवाडे दिले आहे. तसेच वि.प. विमा कंपनीने तक्रारदाराने त्यांचे वादातील वाहनात विमा पॉलिसीच्या नियमाविरुध्द चार लोक प्रवास करत हेाते असे कारण देवून तक्रारदाराचा नुकसान भरपाई क्लेम नाकारला आहे ही वि.प. ने तक्रारदाराला दिलेली सेवात्रुटीच आहे असे या आयोगाचे मत आहे. याकामी आम्ही पुढील न्यायनिवाडे विचारात घेतले.
1) (1996) 4 Supreme Court Cass 647
Motor Vehicles Act, 1988 Sec.147, 149 - Breach of carrying humans in a goods vehicle more than the number permitted in terms of the Insurance policy. Hence, cannot be said to be such fundamental breach so as to afford ground to the insurer to deny indemnification unless there were some factors which contributed to the causing of the accident – Exclusion term of the Insurance policy must be read down to serve the main purpose of the policy – Motor Vehicles Act 1939
असा रेशो दिला आहे. सदर तक्रारअर्जात नमूद झालेला अपघात या वाहनात चार लोक बसविले या कारणामुळे झालेला आहे ही बाब वि.प. ने सिध्द केलेली नाही.
2) (2016) 3 Supreme Court Cases 100
Insurance – Motor Insurance – Insurer when may avoid liability towards loss suffered by owner of vehicle in motor accident –Breach of policy terms as ground for denying claim – Need for insurer to establish fundamental breach/that breach concerned had casual relationship with the accident – Burden of proof to establish the same lies on insurer – Claim for reimbursement of repairs occasioned by accident – Goods Vehicle – Alleged breach )carrying more persons in goods vehicle than permitted) if fundamental in nature and if had casual relationship with accident – Need for insurer established.
3) 2018 (1) CPR 772 (NC)
Consumer Protection Act, 1986 – Insurance – Complainant/respondent herein, obtained a private car package policy bearing in respect of his Opel Astra – Vehicle was reported to have been stolen and FIR was lodged – Delay of 16 days in intimation of theft of vehicle to the petitioner / Insurance company and thus, violation of condition No.1 of the policy – Genuine claims are not to be repudiated on the basis of delay of intimation to the insurance company – Revision petition dismissed.
वर नमूद मे. वरिष्ठ न्यायालयांचे न्यायानिवाडे व त्यातील दंडकांचा ऊहापोह करता याकामी वि..प. विमा कंपनीने तक्रारदारांचा न्याययोग्य क्लेम नाकारुन तक्रारदारास द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
11. वर नमूद मुद्दा क्र.3 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे कारण तक्रारदाराने त्यांचे अपघातग्रस्त वाहनाचे झाले नुकसानीसाठी रक्कम रु. 5,23,000/- एवढया विमा क्लेमच्या रकमेची तसेच झाले नुकसान व मानसिक त्रास व अर्जाचा खर्च मिळून एकूण रक्कम रु.6,13,000/- रकमेची मागणी याकामी केली आहे. मात्र सदरकामी वि.प. विमा कंपनीने अपघातग्रस्त वाहनाचा सर्व्हे केला असून सदरचा सर्व्हे रिपोर्ट याकामी दाखल केला आहे. सदर सर्व्हे रिपोर्टप्रमाणे रक्कम रु.2,59,275/- एवढी रक्कम सॅल्वेज वजा जाता तक्रारदाराला देणे योग्य होईल असे सर्व्हे रिपोर्टमध्ये नमूद केले आहे. सबब, नैसर्गिक न्यायतत्वाचा विचार करता याकामी तक्रारदार हे वि.प. विमा कंपनीकडून वादातील अपघातग्रस्त वाहनाचच्या नुकसानीपोटी रक्कम रु.2,59,275/- (रुपये दोन लाख एकोणसाठ हजार दोनशे पंच्याहत्तर मात्र) एवढी रक्कम मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच सदरचे रकमेवर तक्रारदार हे विमा क्लेम नाकारलेचे तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याजदराने वसूल होवून मिळणेस तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- वि.प. यांचेकडून वसूल होवून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
सबब, प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांना विमाक्लेमपोटी रक्कम रु. 2,59,275/- अदा करावेत व सदर रकमेवर विमा क्लेम नाकारले तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
3) मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 10,000/- व अर्जाचा खर्च रु.5,000/- वि.प. विमा कंपनीने तक्रारदारास अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदींअन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.