आदेश पारित द्वारा मा. अध्यक्ष, श्री. एम. जी. चिलबुले
तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्ता विरूध्द पक्ष महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा वीज ग्राहक असून त्याचा ग्राहक क्रमांक डीएल 430010183230 आणि मीटर क्रमांक 5801839037 असा होता. विरूध्द पक्षाने सदर मीटर बदलवितांना प्रत्यक्ष किती मीटर रिडींग होते याची कोणतीही माहिती लेखी स्वरूपात न देता जुना मीटर बदलून नवीन मीटर लावला आहे. जुना मीटर असतांना मे-जून 2013 मध्ये 30 युनिट वीज वापर असतांना विरूध्द पक्षाने Reading not available दाखवून तक्रारकर्त्यास रू.3,222.86 चे बिल पाठविले. त्यांत मागील थकबाकी रू.2,937.25 दाखविली. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाची भेट घेऊन सदर बेकायदेशीर बिलाबाबत तक्रार केली. परंतु त्यांनी सदर बिलाचा भरणा करण्यास सांगितले आणि बिल दुरूस्त करून दिले नाही. तक्रारकर्त्याने नाईलाजास्तव सदर बिलाचा दिनांक 19/07/2013 रोजी भरणा केला. परंतु जुलै-ऑगष्ट मध्ये पुन्हा रू.1050.02 थकित दाखवून विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्यास बिल पाठविले. तक्रारकर्त्याने दिनांक 10/12/2013 रोजी सदोष मीटर बदलविण्यासाठी विरूध्द पक्षाकडे अर्ज दिला, त्यांत नमूद केले की, जुलै 2013 पासून मीटर बंद आहे. परंतु विरूध्द पक्षाने सदर अर्जाकडे दुर्लक्ष केले आणि वेळीच सदोष मीटर बदलला नाही आणि चुकीची थकबाकी पुढील बिलांत दाखविणे सुरूच ठेवले.
3. तक्रारकर्त्याने विनंती करूनही विरूध्द पक्षाने बिल कमी केले नाही. संपूर्ण वर्षभराच्या कालावधीत R.N.A. दर्शवून सरासरी वीज वापर दाखवून दिनांक 04/12/2013 रोजी रू.4,730/-, दिनांक 23/01/2014 रोजी रू.4,730/- आणि दिनांक 28/03/2014 रोजी रू.10,000/- चे बिल देण्यांत आले. त्यानंतर मीटर बदलवून नवीन मीटर क्रमांक 9802574699 तक्रारकर्त्याचे घरी लावण्यात आला. मात्र जुन्या मीटरच्या चुकीच्या नोंदीप्रमाणे थकबाकी बिलांत दर्शविण्यांत येत आहे. सदरची बाब सेवेतील न्यूनता असल्याने तक्रारकर्त्याने तक्रारीत खालीलप्रमाणे मागणी केली आहे.
(1) विरूध्द पक्षाने विद्युत बिल दुरूस्त करून देण्याचा व अधिकची वसूल केलेली रक्कम तक्रारकर्त्यास परत करण्याचा विरूध्द पक्षास आदेश व्हावा.
(2) सेवेतील न्यूनतेबाबत रू.10,000/- नुकसानभरपाई देण्याचा विरूध्द पक्षास आदेश व्हावा.
(3) इतर योग्य दाद मिळावी.
4. तक्रारीचे पुष्ठ्यर्थ तक्रारकर्त्याने दिनांक 18/03/2013 रोजीचे विद्युत बिल, दिनांक 18/05/2013 चे विद्युत बिल, दिनांक 19/07/2013 ची पावती, दिनांक 18/08/2013 चे विद्युत बिल, दिनांक 18/09/2013 चे विद्युत बिल, दिनांक 18/10/2013 चे विद्युत बिल, दिनांक 04/12/2013 ची पावती, दिनांक 18/10/2013 ते 18/12/2013 पर्यंत चे विद्युत बिल, दिनांक 10/12/2013 चा तक्रारकर्त्याचा अर्ज, दिनांक 08/01/2014 रोजीचे तक्रारकर्त्याचे स्मरणपत्र, दिनांक 18/02/2014 व 18/03/2014 चे विद्युत बिल, दिनांक 28/03/2014 ची पावती इत्यादी दस्तावेज दाखल केले आहेत.
5. विरूध्द पक्ष क्रमांक 1 ते 3 यांनी संयुक्त लेखी जबाब दाखल करून तक्रारीस सक्त विरोध केला आहे. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे तक्रारकर्ता विरूध्द पक्षाचा ग्राहक असल्याचे कबूल केले आहे. जुना मीटर काढून योग्य वीज वापराची नोंद होण्यासाठी नवीन मीटर लावण्यांत आल्याचे मान्य केले आहे., परंतु तक्रारकर्त्यास मीटर रिप्लेसमेंट रिपोर्ट दिला नसल्याचे नाकबूल केले आहे. जुन्या मीटरची रिडींग 567 होती त्यानंतर मीटर रिडर काही कारणामुळे जून 2013 पासून प्रत्यक्ष वीज वापराच्या नोंदी घेऊ शकला नाही म्हणून जानेवारी 2014 पर्यंत सरासरी वीज वापराप्रमाणे वीज बिल देण्यांत आले.
दिनांक 23/01/2014 रोजी जुना मीटर बदलून नवीन मीटर लावण्यांत आला त्यावेळी मीटर रिडींग 3907 होते. त्यामुळे जुलै 2013 ते जानेवारी 2014 या कालावधीतील 7 महिन्यांचा वीज वापर3340 युनिट गृहित धरून त्याचे बिल तयार करण्यांत आले व तक्रारकर्त्याने सदर काळात भरणा केलेली बिलाची रक्कम रू.6,133.37 चे क्रेडिट देऊन रू.21,149/- चे बिल तक्रारकर्त्यास देण्यांत आले. त्यापैकी तक्रारकर्त्याने दिनांक 28/03/2014 रोजी रू.10,000/- आणि दिनांक 24/03/2014 रोजी रू.3,000/- चा भरणा केलेला आहे. तसेच मीटर बदलण्यापूर्वी प्रत्यक्ष वीज वापराप्रमाणे तक्रारकर्त्यास देण्यांत आलेल्या बिल रू.3,220/- चा दिनांक 19/07/2013 रोजी, रू.4730/- चा दिनांक 04/12/2013 रोजी आणि रू.2610/- चा दिनांक 23/01/2014 रोजी भरणा केला आहे. तक्रारकर्त्यास देण्यांत आलेले वीज बिल प्रत्यक्ष वीज वापराप्रमाणे असून त्याद्वारे सेवेत कोणताही न्यूनतापूर्ण व्यवहार झालेला नाही. म्हणून तक्रार खारीज करावी अशी विरूध्द पक्षाने विनंती केलेली आहे.
6. आपल्या लेखी जबाबाच्या पुष्ठ्यर्थ विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या वैयक्तिक ग्राहक खतावणीची नक्कल दाखल केली आहे.
7. तक्रारकर्ता व विरूध्द पक्ष यांच्या परस्पर विरोधी कथनांवरून तक्रारीच्या निर्णितीसाठी खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष व कारणमिमांसा खालीलप्रमाणेः-
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | विरूध्द पक्षाने सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार केला आहे काय? | होय |
2. | तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहे काय? | अंशतः |
3. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | अंतिम आदेशाप्रमाणे |
- कारणमिमांसा –
8. मुद्दा क्रमांक 1 ते 3 बाबतः- सदरच्या प्रकरणात विरूध्द पक्षाने तक्रारकर्ता गरीब शकूर शेख याच्या ग्राहक खतावणीची जानेवारी 2013 ते जुलै 2014 पर्यंतची नक्कल दाखल केली आहे. त्याप्रमाणे तक्रारकर्त्याच्या घरी जानेवारी 2013, फेब्रुवारी 2013, मार्च 2013 मध्ये मीटर P.D. (Permanent Disconnected) दाखविला असून रिडींग प्रत्येक महिन्यात ‘0’ युनिट दाखविली आहे.
एप्रिल 2013 ते 23 जानेवारी 2014 पर्यंत तक्रारकर्त्याचे घरी मीटर क्रमांक 58/01839037 अस्तित्वात होता. मीटर सुरू होतांना रिडींग 01 युनिट दर्शविली आहे. त्यानंतर एप्रिल 2013 ते 23 जानेवारी 2014 पर्यंत मीटर स्थिती व वीज वापर आणि वीज बिल खालीलप्रमाणे दर्शविला आहेः-
वर्ष/महिना | मीटर स्टेटस् | वीज वापर युनिट | मासिक वीज बिल रू. | तक्रारकर्त्याने भरणा केलेली रक्कम व दिनांक | थकबाकीसह वीज बिल |
2013 | | | | | |
एप्रिल | RNA | 50 | 373.01 | | |
मे | Normal | 536 | 3380.23 | 380/- 31.05.2013 रोजी भरले | 3222.86 |
जून | Normal | 30 | 122.98 | | |
जुलै | RNT | 189 | 1030.48 | 3220/- 19.07.2013 रोजी भरले | |
ऑगष्ट | RNT | 189 | 2101.81 | | |
सप्टेंबर | RNT | 189 | 1086.42 | | 3393.25 |
ऑक्टोबर | RNT | 189 | 1089.50 | | 4703.19 |
नोव्हेंबर | RNT | 189 | 1097.90 | | 6037.16 |
डिसेंबर | RNT | 189 | 1076.76 | 4730/-04.12.2013 रोजी भरले | 2551.82 |
2014 जानेवारी नवीन मीटर क्र. 98/02574699 | Normal | 3340 (23.01.2014 पर्यंत) +6 3346 | क्रेडिट 6133.37 | 2610/-23.01.2014 रोजी भरले | 21149.30 |
तक्रारकर्त्याच्या अधिवक्त्यांचा युक्तिवाद असा की, विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याचे घरी एप्रिल 2013 मध्ये लावलेला मीटर सदोष असल्याने सदर मीटरने कधीही प्रत्यक्ष वीज वापर दर्शविला नाही. म्हणून विरूध्द पक्षाने एप्रिल ते डिसेंबर 2013 पर्यंत सरासरी 189 युनिटचे बिल दिले आणि दिनांक 23/01/2014 रोजी जुने मीटर बदलवून नवीन मीटर बसविले. मात्र जुने मीटर बंद असल्याने काढून नेले तेंव्हा प्रत्यक्ष वीज वापर दर्शवित नव्हता व म्हणून विरूध्द पक्षाच्या कर्मचा-याने वीज मीटर बदलविले तेंव्हा तक्रारकर्त्यास लेखी स्वरूपात वीज मीटरचे शेवटचे रिडींग दिले नाही. शेवटच्या रिडींगचा कोणताही पुरावा नसतांना जानेवारी 2014 मध्ये मागील मीटरचे रिडींग कोणत्याही आधाराशिवाय आणि तक्रारकर्त्यास कोणतीही माहिती न देता एकूण 3340 युनिट दर्शविले आणि एप्रिल ते जानेवारीचे विज बिलाची आकारणी रू.27,282.67 दर्शवून त्यापैकी सदर कालावधीत तक्रारकर्त्याने भरणा केलेली बिलाची रक्कम रू.6,133.37 क्रेडिट देऊन रू.21,149.30 ची मागणी करणारे जानेवारी 2014 चे बिल पाठविले. ते अन्यायकारक असून सेवेतील न्यूनता आहे. म्हणून ते रद्द होऊन नवीन मीटर प्रमाणे जो सरासरी वीज वापर असेल त्याप्रमाणे वरील कालावधीचे बिल देण्याचा विरूध्द पक्षाला आदेश व्हावा.
याउलट विरूध्द पक्षाच्या अधिवक्त्यांचा युक्तिवाद असा की, एप्रिल 2013 ते 23 जानेवारी 2014 पर्यंत तक्रारकर्त्याचा एकूण वीज वापर 3340 युनिट होता. त्याप्रमाणे बिलाची आकारणी करून त्यातून तक्रारकर्त्याने भरणा केलेली रक्कम वजा करून जानेवारी 2014 चे रू.21,149.30 चे बिल देण्याची विरूध्द पक्षाची कृती बरोबर असून त्याद्वारे तक्रारकर्त्यास कोणतेही नुकसान होत नसल्याने विरूध्द पक्षाकडून सेवेत कोणताही न्यूनतापूर्ण व्यवहार झालेला नसल्यामुळे तक्रार खारीज होण्यास पात्र आहे.
एप्रिल, 2013 ते 23 जानेवारी 2014 पर्यंतच्या ग्राहक खतावणीतील नोंदीचे अवलोकन केले असता सदर मीटर योग्य वीज वापर नोंदवित नव्हते म्हणूनच विरूध्द पक्षाने सरासरी वीज वापराचे बिल दिले होते. तक्रारकर्त्याचा एप्रिल 2013 ते जानेवारी 2014 या 10 महिन्यांचा वीज वापर 3340 युनिट म्हणजे सरासरी मासिक वीज वापर 334 युनिट असल्याबाबत कोणताही पुरावा विरूध्द पक्षाने दाखल केलेला नाही. याउलट नवीन मीटर लावल्यानंतर ते तक्रारकर्त्याचा योग्य वीज वापर नोंदवित असल्याबाबत आणि त्याचे बिल तक्रारकर्ता भरीत असल्याबाबत उभय पक्षात दुमत नाही.
तक्रारकर्त्याने माहे जानेवारी 2017 चे नवीन मीटर क्रमांक 9802574699 चे बिल दाखल केले आहे. त्यांत फेब्रुवारी 2016 ते जानेवारी 2017 या 12 महिन्यांचा वीज वापर खालीलप्रमाणे दर्शविला आहे.
वर्ष | वीज वापर (युनिटमध्ये) |
फेब्रुवारी - 2016 | 42 |
मार्च - 2016 | 66 |
एप्रिल - 2016 | 74 |
मे - 2016 | 133 |
जून - 2016 | 79 |
जुलै - 2016 | 89 |
ऑगष्ट - 2016 | 82 |
सप्टेंबर - 2016 | 88 |
ऑक्टोबर-2016 | 73 |
नोव्हेंबर - 2016 | 44 |
डिसेंबर - 2016 | 37 |
जानेवारी 2017 | 31 |
एकूण | 838 |
= मासिक सरासरी वीज वापर 838÷12=69.83 युनिट
विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याकडे लावलेल्या निर्दोष मीटर प्रमाणे सरासरी मासिक वीज वापर 70 युनिट (पूर्णांक) आहे. तक्रारकर्त्यास सदोष मीटरच्या आधारे 10 महिन्याचा वीज वपर 3340 म्हणजे मासिक सरासरी वीज वापर 334 युनिट गृहित धरून त्याआधारे माहे जानेवारी 2014 च्या वीज बिलात थकित बिलाची रक्कम दर्शवून ती मागणी करण्याची विरूध्द पक्षाची कृती निश्चितच सेवेतील न्यूनता आणि अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब आहे. म्हणून तक्रारकर्ता सदर बिल व त्यांत दर्शविलेली थकबाकी रद्द करून नवीन योग्य आकारणीचे बिल मिळण्यास पात्र आहे.
वरीलप्रमाणे तक्रारकर्त्याचा एप्रिल 2013 ते 23 जानेवारी 2014 पर्यंतचा मासिक सरासरी वीज वापर 70 युनिट गृहित धरून विरूध्द पक्षाने कोणतेही अतिरिक्त व्याज किंवा दंडाची आकारणी न करता Monthly Break Up पध्दतीने वरील 10 महिन्याचे बिल तयार करावे आणि 23 जानेवारी 2014 नंतरचे बिल नवीन मीटरने प्रत्यक्ष दर्शविलेल्या वीज वापराप्रमाणे कोणतेही अतिरिक्त व्याज, थकबाकी किंवा दंडाची आकारणी न करता तयार करावे आणि वरील रकमेतून तक्रारकर्त्याने आजपर्यंत भरणा केलेली रक्कम वजा करून अधिकची रक्कम निघत असल्यास त्याची तक्रारकर्त्याकडे मागणी करावी आणि अशी मागणी प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आंत तक्रारकर्त्याने देय रकमेचा भरणा करावा.
परंतु जर तक्रारकर्त्याने एप्रिल 2013 पासून आजपर्यंत भरणा केलेली रक्कम वरीलप्रमाणे तयार केलेल्या बिलाच्या रकमेपेक्षा अधिक असेल तर ती रक्कम विरूध्द पक्षाने पुढील बिलाच्या रकमेत समायोजित करावी.
सदर प्रकरणाची विशेष वस्तुस्थिती लक्षात घेता शारिरिक व मानसिक त्रासाबद्दल नुकसानभरपाई किंवा तक्रारीचा खर्च देण्यांत येत नाही. म्हणून मुद्दा क्रमांक 1 ते 3 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविले आहेत.
वरील निष्कर्षास अनुसरुन खालील आदेश पारित करण्यांत येत आहे.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्त्याची ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 च्या कलम 12 खालील तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
2. तक्रारकर्त्याचा एप्रिल 2013 ते 23 जानेवारी 2014 पर्यंतचा मासिक सरासरी वीज वापर 70 युनिट गृहित धरून विरूध्द पक्षाने कोणतेही अतिरिक्त व्याज किंवा दंडाची आकारणी न करता Monthly Break Up पध्दतीने वरील 10 महिन्याचे बिल तयार करावे आणि 23 जानेवारी 2014 नंतरचे बिल नवीन मीटरने प्रत्यक्ष दर्शविलेल्या वीज वापराप्रमाणे कोणतेही अतिरिक्त व्याज, थकबाकी किंवा दंडाची आकारणी न करता तयार करावे आणि वरील रकमेतून तक्रारकर्त्याने आजपर्यंत भरणा केलेली रक्कम वजा करून अधिकची रक्कम निघत असल्यास त्याची तक्रारकर्त्याकडे मागणी करावी
3. अशी मागणी प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आंत तक्रारकर्त्याने देय रकमेचा भरणा करावा.
4. जर तक्रारकर्त्याने एप्रिल 2013 पासून आजपर्यंत भरणा केलेली रक्कम वरीलप्रमाणे तयार केलेल्या बिलाच्या रकमेपेक्षा अधिक असेल तर ती रक्कम विरूध्द पक्षाने पुढील बिलाच्या रकमेत समायोजित करावी.
5. तक्रारीचा खर्च ज्याचा त्याने सहन करावा.
6. आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामूल्य पुरविण्यात यावी.
7. प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ प्रत तक्रारकर्त्यास परत करावी.