नि का ल प त्र :- (दि. 28/03/2012)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष)
(1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, तक्रारदार व सामनेवाला यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला.
(2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी,
सामनेवाला क्र. 1 व 2 हॉस्पीटलमध्ये रुग्णावर उपचार करुन सेवा दिली जाते. दि. 9/02/2011 रोजी दैनिकामध्ये “केस विरळ व केस गेलेल्यांना सुवर्णसंधी” या मथळयातून सामनेवाला क्र. 2 हॉस्पीटलमध्ये सामनेवाला क्र. 3 डॉ. रितेश नायक हे दि. 15/02/2011 रोजी केसाची तपासणी करुन उपचार केसाचे प्रत्योरापण करण्यासंदर्भात जाहिरात दिली. त्या अनुषंगाने तक्रारदारांनी प्रथमत: तपासणी फी रक्कम रु. 1,000/- भरली. सामनेवाला क्र. 3 डॉ. रितेश नायक यांनी तक्रारदारांची शारिरीक तपासणी केली त्यावेळेस तक्रारदारांना त्यांना रक्तदाबाच्या गोळया चालू आहेत अशी कल्पना दिली. तक्रारदारांना दि. 16/02/2011 रोजी सामनेवाला क्र. 1 यांचे हॉस्पीटलमध्ये येण्यास सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदार गेले असता सामनेवाला क्र. 3 यांचे सांगण्यावरुन तक्रारदारांची रक्त तपासणी केली. व सामनेवाला क्र. 3 यांनी हेअर प्लॅनटेशन सर्जरी करावी लागल व त्याचा खर्च रक्कम रु. 45,000/- येणार असल्याचे सांगितले. सामनेवाला क्र. 3 डॉ. नायक यांनी तक्रारदारांना दि. 17/02/2011 रोजी येण्यास सांगितले. व अॅडव्हान्स रक्कम रु. 20,000/- सामनेवाला क्र. 2 यांचेकडे भरण्यास सांगितले. व डिसचार्जचे वेळी रककम रु. 25,000/- भरण्यास सांगितले. त्याप्रमाणे दि. 17/02/2011 रोजी सामनेवाला क्र. 2 यांचेकडे रक्कम रु 20,000/- भरणा केले व त्यांनी त्याची पावती दिली आहे.
तक्रारदार त्यांच्या तक्रारीत पुढे सांगतात, उपरोक्त अॅडव्हान्स भरल्यानंतर सामनेवाला क्र. 3 यांनी तक्रारदारांना त्यांचे चेंबरमध्ये बोलावून ई. सी.जी. काढून घेतला व बी.पी. च्या गोळया चालू असताना सर्जरी करता येणार नाही व सदर गोळया बंद कराव्या लागतील असे सांगितले. प्रथमत: सामनेवाला क्र. 3 डॉ. रितेश नायक यांना बी.पी. च्या गोळया घेत असलेबाबत सांगूनही त्यांनी तक्रारदारांकडून पैसे भरुन घेतले व नंतर गोळया बंद कराव्या लागतील असे सांगितले. सामनेवाला क्र. 3 डॉ. नायक यांना बी.पी. च्या गोळया चालू आहेत हे यापूर्वी सांगूनही पैसे भरुन घेऊन गोळया बंद करावयास कसे काय सांगता असे विचारले असता त्यावेळी सामनेवाला क्र. 3 डॉ. नायक यांनी आपल्याकडील सुचनापत्र दिले व त्यावेळी सामनेवाला क्र. 2 हॉस्पीटलचे डॉ. अमोल कोडोलीकर यांना भेटण्यास सांगितले. त्याप्रमाणे सदर डॉ. अमोल कोडोलीकर यांनीसुध्दा गोळया बंद कराव्या लागतील असे सांगितले त्यावेळी तक्रारदार यांनी गोळया बंद करणे धोक्याचे असल्याने सर्जरी करण्यास नकार दिला. व सदर डॉ. अमोल कोडोलीकर यांनी सामनेवाला क्र. 3 डॉ. नायक यांना फोनवरुन तशी कल्पना दिली. त्यावेळेस डॉ. नायक यांनी तक्रारदारांनी भरलेली रक्कम अॅडव्हान्स रककम रु. 20,000/- परत देण्यास नकार दिला. व सदरची रक्कम जप्त केली.
तक्रारदार त्यांचे तक्रारीत पुढे सांगतात, सामनेवाला क्र. 1 व 2 या हॉस्पीटलनीच सामनेवाला क्र. 3 डॉ. नायक यांना बोलावून रुग्णसेवा देता आहोत. त्यामुळे सामनेवाला आधार हॉस्पीटल त्यांची जबाबदारी ते टाळू शकत नाहीत. उलट ती त्यांची नैतिक जबाबदारी आहे अशा प्रकारे तक्रारदारांनी सर्जरी न केलेली रक्कम परत देण्याची जबाबदारी ही सामनेवाला यांनी आहे. सदर रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याने वकिलामार्फत नोटीसही पाठविली परंतु त्यासही उत्तर दिलेले नाही. सबब, सामनेवाला यांना अॅडव्हान्सपोटी घेतलेली रक्कम रु. 20,000/- व शारिरीक, मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 50,000/- व तक्रारीचा खर्च रक्कम रु. 15,000/- द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह देण्याचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे.
(3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत दैनिक वृतपत्रातील कात्रण, डॉ. नायक यांचे व्हिजीटिंग कार्ड, तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडे सर्जरीसाठी भरलेली अॅडव्हान्स रक्कम, सामनेवाला यांनी तक्रारदार यांचे काढलेले ई.सी.जी., सामनेवाला क्र. 3 यांनी सामनेवाला क्र. 1 येथील डॉ. अमोल कोडोलीकर यांना दिलेले पत्र, तक्रारदार यांनी वकिलामार्फत पाठविलेली नोटीस, व नोटीस मिळालेची पोष्टाची रजि.ए.डी. पोच पावत्या इत्यादींच्या झेरॉक्सप्रती व शपथपत्र दाखल केले आहे.
(4) सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी एकत्रित म्हणणे दाखल करुन तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये कोणताही करार झालेला नाही. केस प्रत्यारोपनासाठी घेतलेली फी सामनेवाला क्र. 3 यांना दिलेली आहे. सदर सामनेवाला हे फक्त त्यांचे हॉस्पीटलमध्ये असलेल्या सोयी-सुविधा सामनेवाला क्र. 3 यांना पुरवित असतात. त्याप्रमाणे तक्रारदारांकडून घेतलेली रक्कम सदर सुविधा चार्जेस व टी.ड.एस. कपात करुन रक्कम रु. 19,125/- सामनेवाला क्र. 3 यांना अदा केलेली आहे. सदर रक्कम देण्याची सदर सामनेवाला यांची जबाबदारी सद्यस्थितीत राहिलेली नाही. केवळ रुग्णाच्या सेवेकरिता अशा प्रकारच्या सुविधा सदर हॉस्पीटलमध्ये सेवा उपलब्ध करुन देते. सदर सदर सामनेवाला हॉस्पीटलने कोणतीही सेवा त्रुटी केली नाही. सबब, तकारदारांचा तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा अशी विनंती केली आहे.
(5) सामनेवाला क्र. 3 यांनी म्हणणे दाखल करुन तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, सदर सामनेवाला क्र. 3 हे सामनेवाला क्र. 1 व 2 हॉस्पीटलकडे मेडीकल एजन्सी करीत असतात. त्यामुळे तक्रारदार हे सदर सामनेवाला यांचे ग्राहक होत नाहीत. ते सामनेवाला क्र. 1 व 2 यांचे ग्राहक आहेत. तक्रारदारांची तक्रार ही पश्चातबुध्दीची आहे. तक्रारदारांनी रक्कम रु. 20,000/- सदर सामनेवाला यांचेकडे भरलेली नाही. हेअर प्लॅन्टेशन सर्जरीकरिता सदर सामनेवाला त्यांची चार तज्ज्ञ मदतनीसांची टीम घेऊन आलेले होते. तक्रारदारांनी लपवून ठेवलेली माहिती तक्रारदार यांचे पत्नीकडून फोनवरुन कळाल्यानेच ऑपरेशन रद्द करण्यात आले. रुग्णावर उपचार करुन सामनेवाला क्र. 1 व 2 यांचेतर्फे सेवा दिली जाते. त्यावर सामनेवाला क्र. 1 हॉस्पीटलचे नियंत्रण असते. सदर सामनेवाला क्र. 3 हे पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करुन विनाकारण कोल्हापूर येथे जादा राहावे लागल्याने त्याबाबतचा राहण्याचा खर्च आलेला आहे. तक्रारदारांनी त्यांना उच्च रक्तदाब असल्याची माहिती दडवून ठेवलेली आहे. तक्रारदार हे सर्जरीस फीट नसल्याने सर्जरी रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. व त्यासाठी सामनेवाला क्र. 3 यांनी पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करुन सदर सामनेवाला यांना मुंबईहून कोल्हापूर येथे येण्यासाठी झालेला खर्च व राहणे, जेवण इत्यादीसाठी, मदतनिस यांचा खर्च आलेला आहे. त्यामुळे तक्रारदारांनी भरलेली रक्कम परत मागण्याचा त्यांना अधिकार नाही. सब, तक्रारदारांचा तक्रार अर्ज खर्चास मंजूर करण्यात यावा अशी विनंती केली आहे. सामनेवाला क्र. 3 यांना मानसिक त्रासापोटी व खर्चापोटी रक्कम रु. 10,000/- तक्रारदारांकडून मिळावेत.
(6) या मंचाने तक्रारदारांची तक्रार, सामनेवाला यांचे म्हणणे, दाखल कागदपत्रे यांचे अवलोकन केले आहे. प्रस्तुत प्रकरणी खालीलप्रमाणे मुद्दे निष्कर्षासाठी येतात.
मु्द्दे
1. तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक होतात काय ?
व सदरचा वाद हा ग्राहक वाद होतो काय ? होय
2. सामनेवाला यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब
केलेला आहे काय ? होय
3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
मुद्दा क्र. 1 -
सामनेवाला क्र. 1 व 2 आधार नर्सिंग होम व आधार स्पेशालिटी क्लिनीक हे हॉस्पीटल कोल्हापूर येथे चालवितात. व ते रुग्णांना सेवा देतात. सामनेवाला क्र. 3 डॉ. आर.आर. नायक यांनी दैनिक वृतपत्रामध्ये जाहिरात देऊन “केस विरळ व केस गेलेल्यासाठी सुवर्णसंधी” या मथळयाखाली जाहिरात दिलेली आहे व केसांची तपासणी व उपचार केस प्रत्यारोपण सामनेवाला क्र. 1 व 2 हॉस्पीटलमध्ये केले जाईल अशी जाहिरात दिलेली होती. सदर जाहिरातीस आकर्षित होऊन तक्रारदारांनी सामनेवाला क्र. 1 व 2 आधार हॉस्पीटल यांचेशी संपर्क साधलेला आहे. सामनेवाला क्र. 3 यांचेकडून केस प्रत्यारोपण करण्यासाठी रक्कम रु. 20,000/- सामनेवाला आधार हॉस्पीटल यांचेकडे अॅडव्हान्सपोटी भरुन घेतलेली आहे. व त्या अनुषगांने प्रस्तुत प्रकरणी वाद उपस्थित झालेला आहे. सामनेवाला आधार हॉस्पीटल यांनी बाहेरील डॉक्टरांना बोलवून त्यांचे हॉस्पीटलमध्ये सेवा व सुविधा पुरविणे यास अनुमती दिलेली आहे. व त्यासाठी ते चार्जेसही स्विकारतात इत्यादीचा विचार करता तक्रारदार हे सामनेवाला क्र. 1 व 2 आधार नर्सिंग होम व आधार स्पेशालिटी क्लिनीक व सामनेवाला क्र. 3 डॉ. आर.आर. नायक यांचे ग्राहक होतात व सदरचा वाद हा ग्राहक वाद होत आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र. 1 होकारार्थी आहे.
मुद्दा क्र. 2 -
प्रस्तुत प्रकरणाचे अवलोकन केले असता सामनेवाला क्र. 3 यांनी कोल्हापूर येथील स्थानिक दैनिक वृतपत्रामध्ये जाहिरात देऊन “केस विरळ व केस गेलेल्यांसाठी सुवर्णसंधी” या मथळयाखाली जाहिरात दिलेली आहे. व त्या अनुषंगाने आधार स्पेशालिटी क्लिनीकमध्ये केसांची तपासणी व उपचार व केसांचे प्रत्यारोपण केले जाईल अशी जाहिरात दिलेली आहे. सदर जाहिरातीस आकर्षित होऊन तक्रारदारांनी सामनेवाला आधार हॉस्पीटल यांचेकडे संपर्क साधलेला आहे. सर्जरीचे अॅडव्हान्सपोटी रक्कम रु. 20,000/- जमा करुन घेतलेले आहेत. त्यानंतर शारिरीक तपासणीनंतर तक्रारदार हे केस प्रत्यारोपण करण्यासाठी अनफीट असल्यामुळे तक्रारदारांनी सर्जरी करुन घेतलेली नाही. व अॅडव्हान्सपोटी भरलेली रककम रु.20,000/- सामनेवाला यांचेकडे परत मागितलेली आहे. परंतु अद्यापी सदर रक्कम तक्रारदारांना परत दिलेली नाही. त्यामुळे तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केलेली आहे. सामनेवाला आधार हॉस्पीटल यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारदारांची स्विकारलेली रक्कम सामनेवाला क्र. 3 यांना अदा केली आहे व सदर रक्कम देण्याची जबाबदारी सामनेवाला क्र. 3 यांची आहे असे प्रतिपादन केले आहे. परंतु सामनेवाला क्र.1 आधार हॉस्पीटल व सामनेवाला क्र. 3 डॉ. आर.आर. नायक यांनी केस प्रत्यारोपणासाठी त्यांचे हॉस्पीटलमध्ये जागा व सेवा सुविधा दिलेली आहे. व त्याचे चार्जेसही ते रितसर घेत असतात त्यामुळे तक्रारदार व रुग्णांचा त्यांचा काही संबंध नाही असे सामनेवाला क्र. 1 आधार हॉस्पीटल यांना म्हणता येणार नाही. हे मंच यापुढे असे स्पष्ट करते की कोणत्याही हॉस्पीटलमध्ये डॉक्टरांनी दिलेली रुग्णसेवा त्यास फक्त डॉक्टरच जबाबदार असतात. त्याला हॉस्पीटल जबाबदार असणार नाही. त्याअनुषंगाने सामनेवाला क्र. 1 यांनी घेतलेला मुद्दा हे मंच स्पष्टपणे फेटाळत आहे. डॉक्टरांचा हलगर्जीपणा अथवा वैद्यकीय निष्काळजीपणा, वैद्यकीय सेवात्रुटी इत्यादीबाबत हॉस्पीटलची निश्चितच जबाबदारी येते. व अशी जबाबदारी हॉस्पीटल टाळू शकणार नाही. तक्रारदार रुग्णाकडून अॅडव्हान्सपोटी घेतलेली रक्कम परत करण्यास सामनेवाला आधार हॉस्पीटल हे जबाबदार असणार नाही हा सामनेवाला क्र. 1 आधार हॉस्पीटल यांचा हा मुद्दा हे मंच स्पष्टपणे फेटाळत आहे.
वास्तविक पाहता तक्रारदारांचेकडून केस प्रत्यारोपण सर्जरीसाठी रक्कम रु. 20,000/- सामनेवाला यांनी स्विकारलेले आहेत. तक्रारदारांना रक्तदाब असल्याचे निष्पन्न झाल्याने सर्जरी रद्द करण्यात आली. सदरचा तक्रारदारांना रक्तदाब असल्याचे प्रथम तपासणीत तक्रारदारांनी सामनेवाला यांना कल्पना दिलेली आहे. तरी सुध्दा तक्रारदारांकडून सर्जरी अॅडव्हान्सपोटी रक्कम रु. 20,000/- जमा करुन करुन घेतलेले आहेत. व त्यानंतर सर्जरी रद्द केलेनंतर रक्कम रु. 20,000/- परत करण्यास सामनेवाला क्र. 3 यांनी नकार दिलेला आहे ही निश्चितच अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करणारी बाब आहे. व वैद्यकीय व्यवसायामध्ये असलेल्या नितीमध्ये विरुध्द असणार आहे. त्यामुळे सदरची रक्कम देण्यास सामनेवाला क्र. 3 तसेच हॉस्पीटलची जबाबदारी म्हणून सामनेवाला क्र. 1 व 2 असे सामनेवाला क्र. 1 ते 3 यांची वैयक्तीक व संयुक्तिकरित्या जबाबदारी असेल या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, आदेश.
आ दे श
1. तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते.
2. सामनेवाला क्र. 1 ते 3 यांनी तक्रारदारांना वैयक्तीक व संयुक्तिकरित्या तक्रारदारांची स्विकृत केलेली रक्कम रुपये 20,000/- (अक्षरी रुपये वीस हजार फक्त) परत करावी.
3. सामनेवाला क्र. 1 ते 3 यांनी तक्रारदारांना वैयक्तीक व संयुक्तिकरित्या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्कम रुपये 5,000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) द्यावेत.
4. सामनेवाला क्र. 1 ते 3 यांनी तक्रारदारांना वैयक्तीक व संयुक्तिकरित्या तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 2,000/- (अक्षरी रुपये दोन हजार फक्त) द्यावेत.