जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर यांचे समोर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 458/2010
तक्रार दाखल दिनांक : 30/07/2010
तक्रार आदेश दिनांक 18/11/2014
निकाल कालावधी 04वर्षे03म19दि
1) श्री.विश्वास रामचंद्र माने,
वय 58 वर्षे, धंदा-नोकरी,
2) श्री.उमेश रामचंद्र माने,
वय 51 वर्षे, धंदा- नोकरी
यांचे कुलमुखत्यार म्हणून
श्री.रामचंद्र दशरथ माने
वय 82 वर्षे, धंदा- सेवानिवृत्त,
रा.92 अ, इंदिरा नगर, विजापूर रोड,सोलापूर. ..तक्रारकर्ता/अर्जदार नं.1व2
विरुध्द
1) श्री.सी.एस.दिघे,
सहाय्यक अभियंता, ग्रामीण विभाग,
दक्षिण सोलापूर, म.रा.वि.वि.कंपनी,
जुनी मिल कंपौंड,सोलापूर.
2) श्री.ए.बी.पठाण,
कार्यकारी अभियंता, ग्रामीण विभाग,
म.रा.वि.वि.कंपनी, जुनी मिल कंपौंड,सोलापूर. ..विरुध्दपक्ष /गैरअर्जदार नं.1व2
उपस्थिती:- श्री.मिलिंद बी.पवार(हिरुगडे),अध्यक्ष
श्री.ओंकारसिंह जी.पाटील, सदस्य
सौ. बबिता एम.महंत-गाजरे,सदस्या
अर्जदार तर्फे विधिज्ञ :-श्री.पी.व्ही. कुलकर्णी
गैरअर्जदार तर्फे विधिज्ञ :-श्री.उ.कि.केकडे
(2) त.क्र.458/2010
निकालपत्र
(पारीत दिनांक:-18/11/2014)
मा.श्री.मिलिंद बी.पवार(हिरुगडे),अध्यक्ष यांचेव्दारा :-
1. अर्जदाराने गैरअर्जदारांविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे.
2. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार नं.1 व नं.2 हे सख्खे बंधू असून अर्जदार नं.2 यांनी त्यांचे वडील श्री.रामचंद्र दशरथ माने यांना जनरल कुलमुखत्यार म्हणून याकामी नियुक्त केले आहे. सामनेवाला नं. 1 व 2 हे वर नमुद केलेप्रमाणे महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ ग्रामीण विभाग येथे कार्यरत आहेत. तक्रारदार नं.1 व 2 यांचे नांवे डिस्ट्रीक्ट व सब डिस्ट्रीक्ट सोलापूर पैकी मौजे अकोले (मंद्रुप)ता.दक्षिण सोलापूर येथील शेतजमीन अनुक्रमे गट नं.75/7अ, क्षेत्र 0.50 आर आणि गट नं.75/7 ब क्षेत्र 0.50 आर असे एकूण 1.00 हेक्टर आहे. वर नमुद जमीन संपुर्ण बागायत व अर्जदाराच्या स्वतंत्र मालकी व कब्जे वहिवाटीची आहे. अर्जदार यांनी माहे फेब्रुवारी 2009 मध्ये एक बोअर घेतला असून सदर बोअरवर सब मर्सिबल पंप बसविला आहे. अर्जदार यांनी सामनेवाला यांचेकडे वीज कनेक्शन मिळणेकरीता रितसर अर्ज व कोटेशन भरुन वीज कनेक्शन घेतलेले आहे. वर नमुद केलेल्या शेतजमिनीत जैन कंपनीचा ठिंबक संच बसविला आहे. वर नमुद शेतजमीनीत 9805 या सुधारित जातीचे ऊसाचे बेणे आणुन ऑक्टोबर 2009 मध्ये ऊसाची लागण केली आहे. ऊस पिकाचे उत्पादन चांगले येणेसाठी जमीनीत हिरवळीचे खत, शेणखत, सुक्ष्म अन्नद्रव्य खत व रासायनिक खते योग्या प्रमाणात घातली आहेत. तसेच वेळेवर खुरपणी, बैलाचा राब, तणनाशक इ.मोठया प्रमाणात खर्च केला आहे. अर्जदार यांच्या जमिनीत वीज कनेक्शन दिलेल्या ट्रान्सफार्मवर लगतच्या शेतक-यांनी अर्जदार यांच्या बोअरचे कनेक्शन घेतल्यानंतर त्यांचे शेतात व त्यांचे जमिनीत बोअर घेवून व विहीरीवर सर्व्हीस कनेक्शन सामनेवाला कंपनीने दिल्याने ट्रान्सफार्मवर क्षमतेपेक्षा जास्त कनेक्शन झाल्याने अर्जदार यांना जानेवारी 2010 पासून त्यांच्या शेतजमिनीतील बोअरला पाणी कमी दाबाने येवू लागले. त्यामुळे पिकावर परिणाम होऊ लागल्याने अर्जदार व लगतच्या शेतक-यांनी सामनेवाला नं.1 यांचेकडे ज्यादा ट्रान्सफार्मर बसविण्याची मागणी केलेली असतांना सामनेवाला यांनी जाणूनबुजुन व हेतु पुरस्सरपणे टाळाटाळ केली. मार्च 2010 पासून पिकांस पाणी अपुरे पडू लागल्याने व
(3) त.क्र.458/2010
ट्रान्सफार्मरवर क्षमतेपेक्षा जास्त कनेक्शन दिल्याने पाणी कमी दाबाने येणे, पंप गरम होऊन तो बंद पडणे इ.कारणामुळे ऊसाचे पीक वाळत चालल्याने सामनेवाला यांना भेटून विनंती केल्यानंतर दि.18/04/2010 रोजी ज्यादा ट्रान्सफार्मर पाठविला आहे व तो आत्ता 7 ते 8 दिवसात बसविण्यात येईल असे सांगितले. परंतू दिले मुदतीमध्ये ट्रान्सफार्मर बसविण्याची कार्यवाही केलेली नाही.
3. अर्जदार यांनी दि.02/05/2010 रोजी पिकाची पाहणी केल्यानंतर ऊसाचे पीक पाण्याअभावी मुळापासून जळत असल्याचे दिसून आले. तक्रारदार यांनी मोठयाप्रमाणात व सुधारित ऊस बेणे, खते इ.खर्च केल्याने एकरी उत्पादन 75 ते 80 टन झाले असते. दि.20/0522010 रोजी पिकाचे पंचनामे करण्यासाठी मा.तहसिलदार दक्षिण सोलापूर यांचेकडे अर्ज दिला. त्यानंतर दि.25/05/2010 रोजी पंचनामे केले. पंचनाम्यानुसार ऊसाचे 50 टक्के नुकसान झाले. हंगाम 2011-2012 मध्ये खोडवा व 2012-2013 मध्ये निडवा पिकाचे उत्पन्न येणार नाही. केंद्र सरकारने हंगाम 2010-11 चे हंगामाचा ऊसाचा दर 9.5 टक्के रिकव्हरीस टनास रु.1391 व पुढील 1टक्के रिकव्हरीस रु.146/- केला आहे. पंचनामयानुसार एकरी उत्पन्न 35 टन प्रमाणे 2.5 एकराचे उत्पन्न रु.1,31,250/- होत आहे. 7 महिन्याचा लागवडीचा खर्च 14,000/- वीज बिल 3,500/- अशी एकूण 17,500/- वजा जाता 1,13,750/- होत आहे. खोडवा ऊस पिकाचा लागवड खर्च मजूरी 1 वर्षाची रु.24,000/-, खते, खुरपण,वीज बिल , बैलाचा राब असा एकूणन रु.41,000/- होत आहे. हंगाम 2011-2012 चा ऊस दर टनास रु.1,500/- प्रमाणे एकरी उत्पन्न 60 टनाप्रमाणे 2.5 एकराचे 150 टनाचे उत्पन्न रु.2,25,000/- होत आहे. त्यातून खर्च रु.41,000/- वजा जाता रक्कम रु.1,84,000/- राहत आहेत. हंगाम 2012-2013 चा ऊस दर टनास रु.1500/- प्रमाणे एकरी 40 टन म्हणजे 2.5 एकराचे 100 टनाचे उत्पन्न रु.1,50,000/- त्यातून खर्च रु.41,000/- वजा जाता निव्वळ उत्पन्न रु.1,09,000/-. एकूण 4,06,750/- नुकसान झाले आहे. यात सामनेवाला हेच सर्वस्वी जबाबदार आहेत. अर्जदार यांनी अर्जदाराचा अर्ज मंजूर करण्यात यावा, अर्जदाराच्या जळालेलया उभ्या ऊसाच्या पिकाची नुकसान भरपाई म्हणून अर्जदारास रु.4,06,750/- मिळावेत. मानसिक, आर्थिक त्रासपोटी रु.50,000/- मिळावेत, अर्जाचा खर्च व वकील फी सामनेवाला यांचेकडून मिळणेसाठी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
4. अर्जदाराने तक्रार अर्जातील कथनाचे पुष्ठयर्थ निशाणी 5 कडे 11कागदपत्रे हजर केलेली आहेत. तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदार नं.1 व 2 यांना नोटीस काढण्यात आली.
(4) त.क्र.458/2010
त्याप्रमाणे गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अनुक्रमे निशाणी 10 नुसार आपला लेखी जबाब दाखल केला आहे. त्यानुसार गैरअर्जदार यांनी तक्रारीतील विपरित विधाने / आरोप अमान्य करुन पुढे असे नमुद केले की, अर्जदाराचा अर्ज खोटा व चुकीचा असून त्यातील मजकूर सामनेवाला यांना मुळीच मान्य व कबूल नाही. अर्ज कलम 1 व 2 मधील मजकूर काही अंशी बरोबर असून बाकीचा मजकूर मान्य व कबूल नाही. अर्ज कलम 3 मधील मजकूराबाबत सामनेवाला यांना काहीही माहिती नाही, सदरची बाब अर्जदाराने सक्तपणे शाबीत केलेली नाही,अर्जदार विश्वास माने यांचे नांवे अकोले(मंद्रुप) येथील गट नं.75/7अ चा उतारा हजर केला आहे त्या जमीनित विहीर व बोअर नाही, जिरायत जमीन आहे.अर्जदार उमेश माने यांचे नांवे अकोले (मंद्रुप) येथील गट नं.75/7 ब जमीन असल्याचा उतारा हजर केला आहे. सदर जमीनीमध्ये बोअर नमूद आहे, जमीन जिरायत आहे, अर्ज कलम 4 मधील संपूर्ण मजकूर खोटा व चुकीचा असून तो मान्य व कबूल नाही. अर्जदार विश्वास रामचंद्र माने यांचे नावाने दि.09/03/1999 रोजी व उमेश रामचंद्र माने यांचे नावाने दि.14/04/1989 रोजी विजेच कनेक्शन घेतलेले आहे. दोन्ही विजेचे कनेक्शन हे पाच हॉर्स पॉवर क्षमतेचे आहेत, तेंव्हापासून अर्जदार हे विजेचे कनेक्शन वापरत आहेत. अर्जदाराचे वडील रामचंद्र दशरथ माने यांचे नावे पाच हॉर्स पॉवरचे विजेचे कनेक्शन असून ते त्यांनी दि.19/07/1973 रोजी घेतलेले आहे. अर्जदार यांनी शेतजमीनीत जैन कंपनीचा ठिंबक संच बसविला आहे व 9805 या सुधारीत जातीचे ऊसाचे बेणे परगावावरुन विकत आणून ऑक्टोंबर 2009 मध्ये लागण केले आहे हे सामनेवाला यांना माहित नाही. कोणतीही बिले अथवा बियाणे चांगल्या प्रतीचे असल्याचा पुरावा दाखल केला नाही. खुरपणी, बैलाचा राब, तणनाशक इ.साठी खर्च केल्याबाबत माहिती नाही, अथवा पुरावा दाखल केला नाही, 2010 पासून बोअरला पाणी कमी दाबाने येऊ लागल्याचा मजकूर खोटा आहे. ट्रान्सफार्मवर दि.11/5/2010 पर्यंत विज कनेक्शन दिलेल्या शेतक-याची यादी चुकीची आहे. अर्ज कलम 4 मधील इतर मजकूर खोटा असून तो कबूल नाही, अर्ज कलम 5,6,7 व 9 मधील मजकूर खोटा व चुकीचा असून तो मान्य व कबूल नाही. सामनेवाला नं.1 व 2 हे रु.4,06,750/- व इतर कोणतीही रक्कम देणेस मुळीच जबाबदार नाहीत,विज कनेक्शन दिलेल्या शेतक-याची यादी खोटी व चुकीची आहे, अर्जदार यांना 98 के.व्ही.ए.चे कनेक्शन दिलेले आहेत. त्यामुळे ट्रान्सफॉर्मरपेक्षा जास्ती लोडचे कनेक्शन मुळीच दिलेले नाहीत. अर्जदार हे नियमित बिल भरत नसून विश्वास रामचंद्र माने व उमेश रामच्रद माने यांनी जानेवारी 2010 पासून विजेचा वापर करुनही विजेचा भरणा केलेला नाही. त्यांचेकडे सप्टेंबर2010 अखेर पावेतो अनुक्रमे रु.26,139.86
(5) त.क्र.458/2010
व रु.23,123.63 पैसे इतकी थकबाकी आहे.थकबाकीदार ग्राहकास मे.कोर्टात दाद मागण्याचा मुळीच अधिकार नाही. अर्जदार नं.1 व 2 यांचे कुलमुखत्यार रामचंद्र दशरथ माने यांनीही मार्च 2010 पासून विजेचा वापर करुनही बिलांचा भरणा केलेला नाही. त्यांचेकडे सप्टेंबर 2010 अखेर पावेतो रु.25.781.16 पैसे इतकी थकबाकी आहे. सामनेवाला यांनी ट्रान्सफॉर्मरच्या क्षमतेपेक्षा जास्ती कनेक्शन्स मुळीच दिलेली नाहीत. त्यामुळे सामनेवाला यांच्या चुकीमुळे ऊस जळाला हे म्हणणे चुकीचे आहे. त्यामुळे सामनेवाला यांनी त्यांचे सेवेमध्ये कोणत्याही प्रकारे सेवेत त्रुटी केली नाही. तक्रारदारास नुकसान भरपाई अथवा इतर खर्च कंपनी देणेस जबाबदार नाही. तरी तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात यावी अशी विरुध्दपक्ष यांचेकडून विनंती केलेली आहे.
5. गैरअर्जदार यांनी लेखी जबाब पृष्ठयर्थ निशाणी 12 कडे 1 व नि.16 कडे 3 कागदपत्रे हजर केलेली नाहीत.
6. अर्जदाराची तक्रार, त्यांचे वकीलांचा युक्तीवाद व प्रतिज्ञापत्र व त्यासोबतची कागदपत्रे, गैरअर्जदार यांनी दाखल केलेले म्हणणे व कागदपत्रे यावरुन सदर प्रकरण निकाली करणे करिता ठेवण्यात आले.
7. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले लेखी युक्तीवाद व उभयतांच्या वकीलांच्या तोंडी युक्तीवाद व कागदपत्रे यावरुन मुद्दे निघतात.
मुद्दे उत्तर
1) तक्रारकर्ता हे विरुध्दपक्ष यांचे ग्राहक आहे का. ? होय
2) विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्ता यांना त्रुटीची सेवा दिली आहे का. ? होय
3) विरुध्दपक्षाकडून तक्रारकर्ता हे नुकसान भरपाई मिळणेस पात्र
आहेत का ? होय
4) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारण मिमांसा
8. मुद्दा क्र.1 ते 3:- विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांचेकडून तक्रारकर्ता यांनी विज पुरवठा घेतला आहे ही बाब विरुध्दपक्ष यांना मान्य आहे. परंतू तक्रारकर्ता यांना विरुध्द नं.1व2 यांना वैयक्तीक पक्षकार केले आहे. म्हणून त्यांचे तक्रारकर्ता हे ग्राहक नाहीत असा
(6) त.क्र.458/2010
बचाव विरुध्दपक्ष यांनी केला आहे. मात्र विरुध्दपक्ष क्र.1 व 2 हे विद्युत वितरण कंपनी जबाबदार अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांचे मार्फतच सदर विद्युत वितरण कंपनीचा कारभार चालवला जातो. सर्व कारभारावर त्यांचे नियंत्रण असते. विद्यंत वितरण कंपनीचे प्रत्येक कामकाजास ते जबाबदार असतात. त्यामुळे ते आपली जबाबदारी टाकू शकत नाहीत. त्यामुळे त्यांचा बचाव तथ्यहीन आहे. त्यामुळे तक्रारकर्ता हे विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांचे ग्राहक ठरतात.
9. तक्रारकर्ता यांनी सदर तक्रार कुलमुखत्यारामार्फत दाखल केली आहे. सदर कुलमुखतयार नि.5/11 कडे दाखल आहे. तक्रारकर्ता हे शेतकरी आहे हे नि.5/1 ते 5/4 वरील 7/12 वरुन दिसून येते व त्यांचे शेतामध्ये बोअर आहे हे सुध्दा नि.5/2 वरील गट नं.75/7ब वरील 7/12 वरुन दिसून येते. तक्रारकर्ता यांना विज पुरवठा केला होता याबाबत वाद नाही. वाद आहे तो सदर वीज पुरवठा हा कमी दाबाने होत होता व त्यामुळे शेतातील पिकांना पाणी देता आले नाही व त्यांचे नुकसान झाले याबाबत आहे. उपलब्ध कागदपत्रातील नि.5/5 व नि.5/6 वरील कागदपत्राचे अवलोकन केले. विरुध्दपक्ष यांचे कमी दाबाचे वीज पुरवठयामुळे तक्रारकर्ता यांचे शेतातील पिकांचे नुकसान झाले म्हणून तक्रारकर्ता यांनी तहसिलदार यांना अर्ज केला व त्याप्रमाणे तक्रारकर्ता यांचे पिकांचा पंचनामा झाला, त्याप्रमाणे तक्रारकर्ता यांचे पिकांचा पंचनामा झाला त्याप्रमाणे दि.25/05/2010 रोजी झालेला पंचनाम्यानुसार पाण्याअभावी शेतातील पिक करपून 50 टक्के इतके तक्रारकर्ता यांचे नुकसान झाले असल्याचे दिसून येते.
10. मात्र याबाबत विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्ता यांची तक्रार अमान्य करत सदर ठिकाणी 98 एचपी पर्यंत लोड आहे मात्र 125 पर्यंत वीज वापरली जावू शकते कारण एकाच वेळी सर्व शेतकरी वीज वापरत नाही असा बचाव केला आहे. परंतू वस्तुस्थिती पहाता नि.5/3 वरील पंचनामानुसार शेतीला कमी दाबाने वीज पुरवठा होत होता त्यामुळे पिके करपून तक्रारकर्ता यांचे नुकसान झाले आहे हे सिध्द होत आहे. तक्रारकर्ता यांना 5 एचपी चा लोड सॅक्शन केलेला आहे हे नि.5/7 व नि.14/7 वरील विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्ता यांना दिलेल्या पावतीवरुन दिसून येतो. त्यामुळे विरुध्दपक्ष यांनी तेवढा विज पुरवठा करणे कर्तव्य ठरते व तसा विज पुरवठा न करणे ही सेवेतील त्रुटी ठरते. विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्ता हे थकबाकीदार आहेत असासुध्दा बचाव केला आहे. मात्र जर वीज ग्राहक थकबाकीदार असतील तर वीज बिल वसूलीचे अनेक कायदेशीर प्रयत्न
(7) त.क्र.458/2010
विरुध्दपक्ष यांना उपलब्ध होते. व ते वापरु शकले असते. मात्र विरुध्दपक्ष यांनी ते न वापरता केवळ बचावात्मक भूमिका घेतली आहे आणि विशेष महत्वपूर्ण बाब म्हणजे तक्रारकर्ता यांची विज बिल वाढण्याचे कारण त्यांची पाण्याअभावी पिकांचे झालेले नुकसान त्यामुळे तक्रारकर्ता यांचे विज बील थकीत गेले म्हणजेच तक्रारकर्ता यांचे पिकास योग्य त्या पाणी पुरवठा झाला असताना त्यांचे आर्थिक नुकसान झाले नसते. त्यामुळे तक्रारकर्ता यांचे विज बील थकबाकीस विरुध्दपक्षच प्रामुख्याने जबाबदार ठरतात हे निर्विवादपणे दिसून येते. विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्ता यांना व्यवस्थित मान्य केलेला दाबाने वीज पुरवठा होत होता यांचे कोणताही पुरावा याकामी दाखल केला नाही अशा त-हेने वरील सर्व वस्तुस्थिती व पुरावा यावरुन विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्ता यांना कमी दाबाने वीज पुरवठा केला. वारंवार मागणी करुनही विरुध्दपक्ष यांनी त्याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे सदर विरुध्दपक्ष यांची कृतीही सेवेतील त्रुटी ठरते व त्यामुळे तक्रारकर्ता यांचे झाले नुकसानीस विरुध्दपक्ष जबाबदार आहे व त्यामुळे ती देणेस विरुध्दपक्ष जबाबदार आहेत असे विद्यमान मंचास वाटते. याबाबत मा.पश्चिम बंगाल राज्य आयोग कमीशन यांनी [IV(2014)CPJ 6A(CN)(WB)] WEST BENGAL STATE CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, KOLKATA, PARESHNATH SAMANTA V/S BHATAR GROUP ELECTRIC SUPPLY & ORS.
“ Consumer protection Act, 1986 - Sections 2(1)(g), 17 - Electricity – Low Deficiency of service – Calculation of losses made by complainant on account of low voltage problem and no supply of electricity not substantiated by convincing evidence – Damage caused to machineries attended with submersible pump for which repairing costs were incurred not supported by documentary evidence – Complainant entitled to Rs.25,000 as punitive cost against admitted negligence by Ops. ”
11. या निवाडयात कमी दाबाने वीज पुरवठा केलेस झाले नुकसानीस विरुध्दपक्ष जबाबदार आहे असे नमुद केले आहे. सदर निवाडा या प्रकरणात लागू पडतो त्यामुळे प्रस्तूत प्रकरणातसुध्दा विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्ता यांना कमी दाबाने वीज पुरवठा केला हे सिध्द होत आहे. त्यामुळे विरुध्दपक्षाकडून तक्रारकर्ता हे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे. तक्रारकर्ता यांनी त्यांचे तक्रारीमध्ये त्यांचे गट नं.75/7अ व 75/7ब मध्ये प्रत्येकी 50आर क्षेत्रामध्ये पिक होते व विजेच्या कमी दाबामुळे त्यांचे पिकांचे नुकसान झाले आहे त्याप्रमाणे खोडवा, निडवा या प्रमाणे एकूण रु.4,06,750/- चे नुकसान झाल्याने तेवढी मागणी केली आहे. मात्र याबाबत उपलब्ध कागदपत्राचे अवलोकन करणेत आले. त्यामध्ये
(8) त.क्र.458/2010
प्रामुख्याने नि.5/6 व नि.14/14(बी) वरील दि.25/5/2010 चे प्रमाणे तलाठी यांनी तक्रारकर्ता यांचे शेतातील पिकांचे नुकसानीचा पंचनामा केलेला आहे. सदर पंचनामयाचे बारकाहीने अवलोकन केले असता. सदर पंचनामेनुसार तक्रारकर्ता यांचे शेतजमीन गट नं.75/7 अ व 75/7 ब मधील पिकांचे पाण्याअभावी फक्त 50टक्के नुकसान झाले असल्याचे दिसून येते. म्हणजेच तक्रारकर्ता यांचे मागणी प्रमाणे त्यांचे 75/7 अ व 75/7 ब मधील पिकांचे पाण्याअभावी पूर्ण नुकसान झालेले नाही. सदर क्षेत्रातील ऊस हा कारखान्यास गेला आहे हे त्यावरुन त्यांना उत्पन्न मिळाले आहे हे नि.14/5 वरील सिध्देश्वर सहकारी कारखान्याचे ऊस बिलाचे खाते उता-यावरुन दिसून येते. म्हणजेच तक्रारकर्ता यांनी उर्वरीत ऊसापासून काही रक्कम मिळाली आहे यावरुन तक्रारकर्ता यांचे पिकांचे फक्त 50टक्के नुकसान झाले आहे हे निर्विवादपणे सिध्द होत आहे. तक्रारकर्ता यांनी त्यांचे दोन्ही शेताततील पिकांचे पूर्ण नुकसान झाले हे सिध्द केलेले नाही. नि.5/6 व नि.14/14(बी) वरील पंचनामयानुसार तक्रारकर्ता यांचे गट नं.75/7 ब मधील पिकांची संपुर्ण पहाणी केली, फक्त त्यांच्या गटात हे.0.50 आर क्षेत्रास ऊसाची लागण केलेली आहे व तेवढेच पिक करपले आहे. व सदर पिक हे ठिंबक सिंचनावर घेतलेले आहे. पाण्याअभावी 50 टक्के नुकसान झाले आहे असे स्पष्ट नमूद आहे. त्यामुळे जरी 75/7 अ व 75/7 ब वरील 7/12 वर ऊसाचे पिकांची नोंद असली तरी त्यांचे पाण्याअभावी पूर्ण नुकसान झाल्याचे तक्रारकर्ता हे सिध्द करु शकला नाही. उलटपक्षी त्यांना कारखान्याकडून काही प्रमाणात बिलसुध्दा मिळालेले आहे. त्यामुळे तक्रारकर्ता हे फक्त त्यांचे गट नं.75/7 अ व 75/7 ब मधीलच झाले. पिकांचे मागणीप्रमाणे 50टक्के नुकसान मिळणेस पात्र आहे असे दिसून येते. सदर नि.5/6 , 14/14(बी) वरील पंचानाम्यानुसार 50टक्के पिक करपले आहे. त्यामुळे तक्रारकर्ता यांचे 75/7अ , 75/7ब मधील पूर्ण नुकसान झाले नाही हे सिध्द होत आहे. त्यामुळे तक्रारकर्ता यांनी तक्रारीमधील दोन्ही गटाची मिळून 1 हेक्टर क्षेत्राची (100आर) एकूण रु.4,06,750/- मागणी केले आहे त्यापैकी 50 टक्के म्हणजेच नुकसान भरपाईची रक्कम रु.2,03,000/- मिळणेस तक्रारकर्ता हे पात्र आहे असे वि.मंचास न्यायोचित वाटते.
12. तक्रारकर्ता यांनी काही निवाडे दाखल केले आहेत परंतू सदर निवाडे हे ऊस जळीत संदर्भातील आहेत. त्यामुळे त्यामधील वाद विषय व प्रस्तूत प्रकरणातील वाद विषय वेगळा असल्याने ते या प्रकरणात लागू पडत नाहीत. तक्रारकर्ता यांना विरुध्दपक्ष यांनी
(9) त.क्र.458/2010
कमी दाबाचे विज पुरवठा केला, त्यामुळे त्यांचे नुकसान झाले व त्यांना वि.मंचात तक्रार दाखल करावी लागली त्यामुळे अर्जदार यांना झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.2,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.2,000/- मंजूर करावे असे मंचास न्यायोचित वाटते.
13. एकंदरीत वरील कारणे व निष्कर्ष यावरुन गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यात न्युनता केली असल्याचे निर्णयाप्रत हे मंच आलेले असल्याने खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
-: अं ति म आ दे श :-
1. अर्जदार यांचा गैरअर्जदार विरुध्दचा तक्रार अर्ज अशंत: मंजुर करण्यात येत आहे.
2. गैरअर्जदार नं.1 व 2 यांनी एकत्रितरित्या अथवा संयुक्तीकरित्या अर्जदार नं.1व2 यांना नुकसान भरपाईपोटी एकूण रु.2,03,000/- (रु.दोन लाख तीन हजार फक्त) अदा करावे. सदर देय रक्कमेपैकी 50 टक्के रक्कम अर्जदार नं.1 यांना व 50 टक्के रक्कम अर्जदार नं.2 यांना अदा करावे.
3. गैरअर्जदार नं.1 व 2 यांनी एकत्रितरित्या अथवा संयुक्तीकरित्या अर्जदार नं.1व2 यांना मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु.2,000/- (रु.दोन हजार फक्त) व तक्रार अर्जाचा खर्च रु.2,000/- (रु.दोन हजार फक्त) निम्मी निम्मी विभागून द्यावी.
4. गैरअर्जदार यांनी वरील आदेशाचे पालन आदेश प्राप्त झाल्यापासून 45 दिवसांत करावे. अन्यथा उपरोक्त कलम 2 मध्ये नमुद केल्याप्रमाणे निकाल पारीत दिनांका पासून म्हणजे दि.18/11/2014 पासून पुर्ण रक्कम देईपर्यंत दरसाल दरशेकडा 10टक्के प्रमाणे व्याज द्यावे लागेल याची नोंद घ्यावी.
5. निकालपत्राच्या प्रति सर्व संबंधीत पक्षांना माहितीस्तव व उचित कार्यवाहीकरीता पाठविण्यात याव्यांत.
6. तक्रारीमधील मुळ कागदपत्रे अर्जदार यांना परत करावीत.
(श्री.ओंकारसिंह जी.पाटील) (सौ. बबिता एम.महंत-गाजरे) (श्री.मिलिंद बी.पवार(हिरुगडे)
सदस्य सदस्या अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
दापांशिंनिलि02511140