जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
ग्राहक तक्रार क्रमांक : 7/2016.
तक्रार दाखल दिनांक : 19/12/2015.
तक्रार आदेश दिनांक : 27/10/2016. निकाल कालावधी: 00 वर्षे 10 महिने 08 दिवस
अनुराग महेश सोनार,
अ.पा.क. पद्मीन नागनाथ सोनार, वय 70 वर्षे,
व्यवसाय : निवृत्तीवेतनधारक, रा. येडशी, ता.जि. उस्मानाबाद. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) शाखाधिकारी, बँक ऑफ महाराष्ट्र,
शाखा येडशी, ता.जि. उस्मानाबाद.
(2) मुख्य व्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र,
मुख्य शाखा शिवाजीनगर, पुणे. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- श्री. एम.व्ही. कुलकर्णी, अध्यक्ष
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्य श्री. मुकूंद बी. सस्ते, सदस्य
तक्रारकर्ता यांचेतर्फे विधिज्ञ : पी.पी. सुकाळे
विरुध्द पक्ष क्र.1 यांचेतर्फे विधिज्ञ : के.डी. लाखे
विरुध्द पक्ष क्र.2 अनुपस्थित / एकतर्फा
न्यायनिर्णय
श्री. मुकूंद बी. सस्ते, सदस्य यांचे द्वारा :-
1. तक्रारकर्ता यांचेद्वारे उपस्थित वादविषय थोडक्यात असा आहे की, पद्मीन नागनाथ सोनार यांनी त्यांचा नातू अनुराग यांचे नांवे दि.7/10/2005 रोजी विरुध्द पक्ष क्र.1 (यापुढे संक्षिप्त रुपामध्ये ‘महाराष्ट्र बँक’) यांच्याकडे मुदत ठेवीमध्ये रु.5,255/- गुंतवणूक केले होते. त्याप्रमाणे तक्रारकर्ते यांना ठेव पावती क्रमांक 0837997 देण्यात आली. तसेच तक्रारकर्त्या महाराष्ट्र बँकेच्या खातेदार असून त्यांचा खाते क्रमांक 20260366526 आहे. तक्रारकर्ते दि.7/10/2006 रोजी महाराष्ट्र बँकेकडे रक्कम स्वीकारण्यास गेले असता पावतीचे आपोआप नुतनीकरण होत असून त्यांचे मुळ अभिलेख विरुध्द पक्ष क्र.2 यांचेकडे वर्ग केले आहेत आणि अभिलेख प्राप्त होताच ठेव रक्कम व्याजासह परत करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर तक्रारकर्ते महाराष्ट्र बँकेकडे ठेव रकमेची वारंवार मागणी करीत आहे; परंतु महाराष्ट्र बँक त्यांना रक्कम परत करण्यास टाळाटाळ करीत आहे. दि.8/10/2014 रोजी लेखी अर्जाद्वारे विनंती करुनही रक्कम देण्याकरिता दखल घेण्यात आली नाही. उपरोक्त वादविषयाचे अनुषंगाने तक्रारकर्ते यांनी महाराष्ट्र बँकेकडून रु.9,197/- द.सा.द.शे. 12 टक्के व्याज दराने मिळण्यासह मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.15,000/- नुकसान भरपाई व रु.5,000/- तक्रार खर्च मिळावा, अशी विनंती केली आहे.
2. विरुध्द पक्ष क्र.1 महाराष्ट्र बँकेने अभिलेखावर लेखी उत्तर दाखल केले असून तक्रारीतील विधाने व मजकूर अमान्य केला आहे. त्यांच्या कथनाप्रमाणे तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे तक्रारकर्ते यांनी दि.7/10/2005 रोजी त्यांच्याकडे रु.5,255/- गुंतवणूक केल्याचे मान्य केले आहे. त्यानंतर तक्रारकर्ते यांनी मुळ मुदत ठेव पावती जमा न केल्यामुळे तक्रारकर्ते यांना रक्कम मिळालेली नाही. तक्रारकर्ते हे मौखिक व मुदत ठेव पावतीच्या छायाप्रतीच्या आधारे रकमेची मागणी करीत आहेत. त्यामुळे तक्रारकर्ते यांनी मुळ मुदत ठेव पावती जमा केल्यानंतर ठेव रक्कम देण्याकरिता तयार आहेत, अशी महाराष्ट्र बँकेची विनंती आहे.
3. विरुध्द पक्ष क्र.2 यांना जिल्हा मंचाच्या नोटीसची बजावणी झाल्यानंतर ते या जिल्हा मंचापुढे अनुपस्थित राहिले आणि लेखी उत्तर दाखल केले नाही. त्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करुन सुनावणी पूर्ण करण्यात आली.
4. तक्रारकर्ते यांची तक्रार, महाराष्ट्र बँकेचे लेखी उत्तर व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारीमध्ये उपस्थित वादविषयाचे निवारणार्थ उपस्थित होणा-या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
1. महाराष्ट्र बँकेने तक्रारकर्ते यांना द्यावयाच्या सेवेमध्ये
त्रुटी केल्याचे सिध्द होते काय ? होय.
2. तक्रारकर्ते ठेव रक्कम मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय.
3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमीमांसा
5. मुद्दा क्र. 1 व 2 :- प्रामुख्याने तक्रारकर्ते यांनी दि.7/10/2005 रोजी महाराष्ट्र बँकेमध्ये ठेव पावती क्रमांक 0837997 नुसार रु.5,255/- गुंतवणूक केल्याबाबत उभय पक्षांमध्ये वाद नाही. ठेव पावतीचे अवलोकन केले असता ठेव कालावधी 12 महिने असून ठेवीकरिता द.सा.द.शे.5.75 टक्के व्याज दर निदर्शनास येतो. निर्विवादपणे ठेव पावती दि.7/10/2006 रोजी परिपक्व झालेली आहे. या ठिकाणी असे निदर्शनास येतेय की, दि.7/10/2006 ते 8/10/2014 या एकूण 8 वर्षाच्या कालावधीमध्ये तक्रारकर्ते यांनी ठेवीची रक्कम मिळण्याकरिता वारंवार मागणी केली, असे तक्रारकर्ते यांचे कथन आहे. तक्रारकर्ते यांनी महाराष्ट्र बॅंकेकडे वारंवार ठेव रकमेची मागणी केल्याचे कथन केले असले तरी लेखी स्वरुपात दि.8/10/2014 रोजी प्रथमत: ठेव रक्कम मिळण्याकरिता अर्ज केल्याचे निदर्शनास येते. उलटपक्षी महाराष्ट्र बँकेच्या प्रतिवादाप्रमाणे तक्रारकर्ते हे मौखिक व मुदत ठेव पावतीच्या छायाप्रतीच्या आधारे रकमेची मागणी करीत असून मुळ मुदत ठेव पावती जमा केल्यानंतर जमा रक्कम देण्याकरिता तयार आहेत.
6. उभय पक्षांचा वाद-प्रतिवाद व दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारकर्ते यांनी ठेव पावतीच्या परिपक्वेनंतर रक्कम मिळण्याकरिता योग्यवेळी पाठपुरावा केल्याचे निदर्शनास येत नाही. त्याचप्रमाणे महाराष्ट्र बॅंकेने सुध्दा तक्रारकर्ते यांच्या ठेव पावतीच्या परिपक्वतेनंतर देय रक्कम परत करण्यासाठी काय कार्यवाही केली ? याचा स्पष्ट खुलासा केलेला नाही. आमच्या मते, ज्यावेळी बँकेकडे एखाद्या ठेवीदाराच्या ठेव पावतीची रक्कम त्या ठेव पावतीच्या परिपक्वतेनंतरही दावाविरहीत राहते, त्यावेळी ठेव रकमेचे अनिश्चित कालावधीकरिता नुतनीकरण करणे किंवा त्या रकमेवर बचत खात्याच्या दराने व्याज देणे, ठेवीदार त्यांच्याकडे ठेव रक्कम स्वीकारण्यास संपर्क साधत नसल्यास तशा सूचना ठेवीदारास देणे, ठेवीदार आढळून येत नसल्यास नामनिर्देशीत व्यक्तीशी संपर्क साधणे इ. कार्यवाही अपेक्षीत व आवश्यक आहे. परंतु या ठिकाणी महाराष्ट्र बँकेने वरीलप्रमाणे कोणतीही कार्यवाही केल्याचे निदर्शनास येत नाही. तक्रारकर्ते हे मौखिक व मुदत ठेव पावतीच्या छायाप्रतीच्या आधारे रकमेची मागणी करीत असल्याचा महाराष्ट्र बँकेचा बचाव असताना त्यांनी तक्रारकर्ते यांना मुळ पावती दाखल करुन रक्कमी स्वीकारण्याचे लेखी स्वरुपात कळवलेले नाही. इतकेच नव्हेतर तक्रारकर्ते यांनी दि.8/10/2014 रोजी दिलेल्या अर्जाकरिता कोणतेही उत्तर तक्रारकर्ते यांना पाठवलेले नाही. महाराष्ट्र बँकेने तक्रारकर्ते यांची ठेव रक्कम परत करण्यासाठी अत्यंत उदासिन भुमिका ठेवलेली आहे, हे सिध्द होते. प्रस्तुत कृत्ये महाराष्ट्र बँकेच्या सेवेतील त्रुटी ठरतात आणि तक्रारकर्ते हे ठेव रक्कम व्याजासह मिळण्याकरिता पात्र आहेत, असे या जिल्हा मंचाचे स्पष्ट मत आहे.
7. तक्रारकर्ते यांनी महाराष्ट्र बँकेकडून रु.9,197/- द.सा.द.शे. 12 टक्के व्याज दराने मिळावे, अशी विनंती केली आहे. परंतु त्यांच्या रु.9,197/- मागणीचे स्पष्टीकरण त्यांनी दिलेले नाही. ठेव पावतीप्रमाणे तक्रारकर्ता यांनी रु.5,255/- रक्कम गुंतवणूक केलेली आहे आणि मुदतीपूर्तीनंतर दि.7/10/2006 रोजी त्यांना रु.5,560/- देय आहेत. त्यामुळे दि.7/10/2006 पासून दि.8/10/2014 पर्यंत प्रस्तुत रक्कम रु.5,560/- द.सा.द.शे. 5.75 टक्के व्याज दराने व दि.9/10/2014 पासून पूर्ण रक्कम अदा करेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज मिळण्यास तक्रारकर्ते पात्र आहेत. वरील विवेचनावरुन आम्ही मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देऊन खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
आदेश
(1) तक्रारकर्ते यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्द पक्ष क्र.1 महाराष्ट्र बँकेने तक्रारकर्ते यांना ठेव पावती क्र.0837997 प्रमाणे देय रक्कम रु.5,560/- अदा करावी. तसेच प्रस्तुत रकमेवर दि.7/10/2006 ते दि.8/10/2014 कालावधीकरिता द.सा.द.शे. 5.75 टक्के व दि.9/10/2014 पासून संपूर्ण रक्कम अदा करेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज द्यावे.
(3) विरुध्द पक्ष क्र.1 महाराष्ट्र बँकेने उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 30 दिवसाचे आत करावी.
(4) उभय पक्षकारांना आदेशाची प्रथम प्रत नि:शुल्क पुरवण्यात यावी.
(श्री. मुकूंद बी. सस्ते) (सौ. व्ही.जे. दलभंजन) (श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
-00-
(संविक/स्व/241016)