(द्वारा मा. सदस्या – श्रीमती. माधुरी एस. विश्वरुपे)
1. तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदारांचा मुलगा तुषार भास्कर निरभवने यांने सामनेवाले यांचेकडुन दोन विमा पॉलीसी घेतल्या होत्या, तुषार निरभवने हा डोंबिवली महानगर पालिकेत सचिव कार्यालय विभागात शिपाई म्हणुन कार्यरत होते. तुषार यांनी सदर दोन्ही विमा पॉलीसीचे हप्ते फ्रेब्रुवारी 2014 पर्यंत नियमितपणे भरणा केले आहेत.
2. तक्रारदारांचा मुलगा तुषार मार्च 2014 ते नोव्हेंबर 2014 या कालावधीत आजारी असल्याने त्यांचेवर हॉस्पीटलमध्ये वैद्यकिय उपचार चालु होते. तथापी अखेर ता. 13/11/2014 रोजी त्यांचे निधन झाले.
3. सामनेवाले यांनी विमा कंपनीचे हप्ते थकीत असल्याबाबत कोणतीही माहीती पत्राद्वारे कळवली नाही. तक्रारदारांच्या मुलाच्या मृत्युपर्यंत सदर पॉलीसी कालबाह्य (laps) झाल्यानसुन तक्रारदारांना सदर पॉलीसीचा लाभ मिळणे आवश्यक असल्याने विमा पॉलीसीची रक्कम रु. 7,50,000/- मागणीसाठी प्रस्तुत तक्रार सामनेवाले यांचे विरुध्द दाखल केली आहे.
4. सामनेवाले यांना मंचाची नोटिस प्राप्त होवुनही गैरहजर असल्याने तसेच लेखी कैफियत दाखल न केल्याने सामनेवाले यांच्या विरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याबाबतचा आदेश ता. 05/05/2017 रोजी मंचाने पारित केला आहे.
5. कारण मिमांसा
अ) तक्रारदारांचा मुलगा तुषार निरभवने यांनी सामनेवाले यांचेकडुन खाली नमुद केलेल्या विमा पॉलीसी घेतल्या असुन त्याबाबतचा तपशील खालील प्रमाणे आहे.
अनु. क्र. | पॉलीसी | कालावधी | प्रिमियम | पॉलीसीची रक्कम |
1 | 925856349 | 10/09/2011 ते 10/09/2036 (25 वर्ष) | 1000.17 प्रतिमहा | 2,50,000/- (दोन लाख पन्नास हजारु फक्त) |
2 | 925856350 | 10/09/2011 ते 10/09/2036 (25 वर्षे) | 2000.43 प्रतिमहा | 5,00,000/- (पाच लाख फक्त) |
सदर दोन्ही पॉलीसीच्या प्रती मंचात दाखल आहेत.
ब) तक्रारदार यांचा मुलगा विमाधारक तुषार निरभवने हा कल्याण डोंबिवली महानगरपालिका येथे चतुर्थ क्षेणी कर्मचारी ‘शिपाई’ या पदावर कार्यरत असल्याबाबतच्या वेतन पावतीच्या झेरॉक्स प्रती तक्रारदार यांनी मंचात दाखल केल्या आहेत.
क) तक्रारीत दाखल केलेल्या विमाधारकाच्या वेतन पावत्यांचे सुक्ष्म अवलोकन केले असता वर नमुद विमा पॉलीसीच्या प्रिमियम रक्कमेची विमाधारकाच्या वेतन खात्यातून (Salary Account) मधुन दर महा एकुण रु. 3,063/- सातत्याने कपात झाल्याचे दिसुन येते.
ड) तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार विमाधारक तुषार फेब्रुवारी 2014 पर्यत नियमितपणे नोकरीवर हजा होता. परंतु मार्च 2014 मध्ये त्याला कॅन्सर असल्याचे निदान झाले. तुषारला सदर आजाराच्या वैद्यकिय उपचारासाठी मुबई येथील टाटा मेमोरियल सेंटर व ठाणे बेथनी हॉस्पीटल मध्ये शरिक करण्यात आले होते. व त्यामुळे त्याला सदर आजाराच्या दरम्यान नोकरीच्या ठिकाणी हजर राहणे शक्य झाले नाही. त्यामुळे पगारी खात्यावर त्याचे वेतनाची रक्कम जमा झाली नाही व विमा पॉलीसीचे दोन हप्ते थकीत झाले. विमाधारक तुषार सदर आजारातुन बरा होवु शकला नाही व दुर्दैवाने ता. 13/11/2014 रोजी त्याचे निधन झाले.
इ) विमा धारकाच्या वेतन खात्यातुन एप्रील 2014 पर्यंतच्या दोन्ही विमा पॉलीसीच्या प्रिमियमची रक्कम कपात झाली असल्याचे सामनेवाले यांच्या ता. 20/04/2015 रोजीच्या पत्रावरुन दिसुन येते. सदर पत्राची प्रत मंचात दाखल आहे. विमाधारक हॉस्पीटल मध्ये वैद्यकिय उपचारासाठी दाखल असल्याने त्यांनी मे 2014 पासून विमा हप्त्याची रक्कम भरणा केली नसल्याचे दिसुन येते.
ई) सामनेवाले प्रस्तुत प्रकरणात गैरहजर आहेत त्यांचे तर्फे आक्षेप दाखल नाही. सबब तक्रारदार यांचा पुरावा अबाधित आहे. सामनेवाले यांनी ता. 20/05/2015 रोजीच्या पत्राद्वारे पॉलीसी लॅप्स झाल्याचे माहीती विमाधारकाला पाठवली असल्याचे दिसुन येते. परंतु विमाधारकाचा मृत्यु ता. 13/11/2014 रोजी झालेला असुन मे 2014 पासून प्रिमियमची रक्कम सामनेवाले यांना प्राप्त झाली नसल्याबाबत सामनेवाले यांनी ता. 07/07/2016 रोजी पत्र पाठवले असुन विमाधारकाला ता. 15/09/2016 पर्यंत सदर पॉलीसीचे नुतनीकरण करण्याबाबत अंतीम तारीख दिल्याचे सदर पत्रावरुन दिसुन येते.
उ) विमेधारकाच्या प्रिमियमची रक्कम कल्याण डोबिवली महानगर पालिका मार्फत सामनेवाले यांचेकडे “employer Salary Scheme“ अन्वये भरणा करण्याची तरतुद करण्यात आलेली होती. तक्रारदार यांच्या विमा पॉलीसीच्या थकीत रकमेबाबत सामनेवाले यांनी कल्याण डोंबिवली महानगर पालिका अथवा विमेधारकाला त्यांच्या मृत्युपुर्वी ता. 13/11/2014 पुर्वी माहीती दिल्याबाबतचा कोणताही पुरावा मंचासमोर नाही. सबब पॉलीसीच्या थकीत प्रिमियमबाबत विमेधारकाला माहीती न देता पॉलीसी लॅपस करुन सामनेवाले यांनी त्रृटीची सेवा दिल्याचे दिसुन येते. विमेधारकाने जाणुन-बुजुन सदर प्रिमियमची रक्कम थकित केली नाही. विमाधारकाच्या ता. 29/01/2014 रोजी पासून सदर आजाराच्या निदानासाठी वेगवेगळया तपासणी चालु असल्याचे तक्रारदार यांनी दाखल केलेल्या वैद्यकीय कागदपत्रावरुन दिसुन येते.
ऊ) सामनेवाले यांनी विमाधारकाला ह्यात असतांना प्रिमियमच्या थकीत रकमेची माहीती दिलेली नसल्याचे तक्रारीतील दाखल पुराव्यावरुन स्पष्ट होते. सबब, विमेधारक ह्यात असतांना सामनेवाले व विमाधारक यांचे मधील करार संपुष्टात आलेला नव्हता हे स्पष्ट होते. तक्रारदार सदर दोन्ही विमा पॉलीसीच्या नॅामीनी असल्याचे पॉलीसी कागदपत्रावर नमुद केले आहे.
ए) तक्रारदार यांचा मुलगा तुषार निरभवने यांनी सामनेवाले यांचेकडुन घेतलेल्या तक्रारीतील नमुद दोन्ही विमा पॉलीसी त्यांच्या ह्यातीमध्ये त्यांना प्रिमियमचा रक्कम भ्रणा करण्याबाबत माहीती दिल्याशिवाय रद्द बातल होत नाही. सबब सामनेवाले यांना मे 2014 ते नोव्हेंबर 2014 या कालावधीची सदर दोन्ही पॉलीसी अंतर्गत देय असलेली प्रिमियमची रक्कम तक्रारदार यांना देय असलेल्या विमा लाभ रक्कम सामनेवाले यांनी तक्रारदार यांना देणे योग्य आहे असे मंचाचे मत आहे.
6. सबब, खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्र. 730/2016 अंशतः मंजुर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा दिल्याचे जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदार यांना विमा पॉलीसी क्र. 925856349 अंतर्गत देय असलेली मुळ विमा रक्कम रु. 2,50,000/- (अक्षरी रु. दोन लाख पंन्नास हजार फक्त) व इतर बोनससहीत देय रक्कम नियमाप्रमाणे तक्रार दाखल तारखेपासून म्हणजेच ता. 27/10/2016 पासुन ता. 31/08/2017 पर्यंत द.सा.द.शे 6% व्याज दरासह द्यावी. विहीत मुदतीत अदा न केल्यास सदर रक्कम ता. 01/09/2017 पासून संपुर्ण आदेशाच्या पुर्ततेपर्यंत द.सा.द.शे 9% व्याजदरासह द्यावी.
4. सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदार यांना विमा पॉलीसी क्र. 925856350 अंतर्गत देय असलेली मुळ विमा रक्कम रु. 5,00,000/- (अक्षरी रु. पाच लाख फक्त) व इतर बोनससहीत देय रक्कम नियमाप्रमाणे तक्रार दाखल तारखेपासून म्हणजेच ता. 27/10/2016 पासुन ता. 31/08/2017 पर्यंत द.सा.द.शे 6% व्याज दरासह द्यावी. विहीत मुदतीत अदा न केल्यास सदर रक्कम ता. 01/09/2017 पासून संपुर्ण आदेशाच्या पुर्ततेपर्यंत द.सा.द.शे 9% व्याजदरासह द्यावी.
5. सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की, वर आदेश क्र. 3 व 4 मध्ये नमुद पॉलीसी अंतर्गत देय असलेल्या मे 2014 ते नोव्हेंबर 2014 या कालावधीच्या प्रिमियमची रक्कम आदेश क्र. 3 व 4 मध्ये नमुद केलेल्या तक्रारदारांच्या विमा लाभ देय रकमेमधुन समायोजित करावी.
6. सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदार यांना तक्रारीच्या खर्चाची रक्कम रु. 10,000/- (अक्षरी रु. दहा हजार फक्त) ता. 31/08/2017 पर्यंत द्यावी.
7. आदेशाच्या प्रती उभय पक्षांना विनाविलंब व विनामुल्य पोष्टाने पाठविण्यात याव्यात.
8. संचिकेच्या अतिरिक्त प्रती असल्यास तक्रारदारांना परत करण्यात याव्यात.