तक्रार दाखल ता.31/03/2015
तक्रार निकाल ता.31/08/2016
न्यायनिर्णय
द्वारा:- - मा. अध्यक्षा –सौ. सविता पी.भोसले.
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-12 प्रमाणे दाखल केला आहे.
2. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे:-
तक्रारदार हे पांगीरे, ता. चिक्कोडी, जि.बेळगांव येथील रहिवाशी आहेत तर वि.प. ही विमा कंपनी आहे. तक्रारदाराचे मयत पती अशोक बापू कानडे यांनी वि.प.विमा कंपनीकडे आपले कुटुंबाच्या कल्याणाकरीता पॉलीसी क्र.947308568 ने रक्कम रु.2,00,000/- इतक्या रकमेची न्यु बीमा गोल्ड टेबल नं.179 पॉलीसी दि.11.02.2008 रोजी उतरवली होती. सदर पॉलीसीची मुदत दि.11.02.2028 रोजी संपणार होती. तक्रारदाराचे पतीने विमा पॉलीसी घेतलेनंतर सहामाही हप्ते पॉलीसीच्या अटी व शर्तीप्रमाणे वेळेवर भरलेले आहेत. तक्रारदाराचे पती अशोक कानडे हे दि.07.06.2014 रोजी मोटर अपघातात मयत झाले आहेत. त्यांचे पश्चात तक्रारदाराने वि.प.विमा कंपनीकडे मयत अशोक बाबू कानडे यांचा विमा क्लेम सादर केला होता. त्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे तक्रारदाराने वि.प.यांचेकडे क्लेम फॉर्मसोबत दाखल केली होती. असे असतानाही वि.प.विमा कंपनीने तक्रारदाराचा अपघाती फायद्याचा विमा क्लेम चुकीच्या कारणाने नामंजूर करुन तक्रारदाराल सेवात्रुटी दिली आहे. सबब, वि.प.यांचेकडून तक्रारदाराचे पतीचा अपघाती फायद्याचा विमा क्लेमची रक्कम वसुल होऊन मिळणेसाठी प्रस्तुत तक्रार अर्ज मे.मंचात दाखल केला आहे.
3. प्रस्तुत कामी तक्रारदाराने वि.प.विमा कंपनीकडून अपघाती फायद्याची रक्कम रु.2,00,000/- वसुल होऊन मिळावा. मानसिक त्रासापोटी तक्रारदार यांना वि.प.कडून रक्कम रु.25,000/- वसुल होऊन मिळावेत, तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- वि.प.कडून वसुल होऊन मिळावा. प्रस्तुत वर नमुद संपूर्ण रक्कमेवर अर्ज दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष वसुल होईपर्यंत द.सा.द.शे.18टक्के व्याज वि.प.कडून वसुल होऊन मिळावे अशी विनंती तक्रारदाराने या कामी केली आहे.
4. तक्रारदाराने या कामी अॅफीडेव्हीट, नि.3 चे कागद यादीसोबत विमा क्लेम नाकारलेचे पत्र, तक्रारदाराचा क्लेम फॉर्म, चार्जशीट, पुराव्याचे शपथपत्र, लेखी युक्तीवादा, वगैरे कागदपत्रे या कामी दाखल केली आहेत.
5. प्रस्तुत कामी वि.प.यांनी म्हणणे /कैफियत, स्टेटस् रिपोर्ट ऑफ पॉलीसी, विमा पॉलीसी, प्रिमीयम हिस्ट्री, पुराव्याचे शपथपत्र, लेखी युक्तीवाद, वगैरे कागदपत्रे या कामी वि.प.ने दाखल केली आहेत.
6. वि.प.ने त्यांचे म्हणणे/कैफियतीमध्ये तक्रारदाराचे तक्रार अर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. वि.प.ने तक्रार अर्जावर पुढीलप्रमाणे आक्षेप नोंदविले आहेत.
- तक्रारदाराचा तक्रार अर्ज व त्यातील सर्व कथन मान्य व कबुल नाही.
- तक्रारदाराचे पतीने विमा पॉलीसीची सर्व हप्ते भरले होते ही बाब पुर्णत: खोटी व चुकीची आहे. तर तक्रारदाराचे पतीने दि.11.02.2008 रोजी पॉलीसी उतरविली असून शेवटचा हप्ता ऑक्टोबर, 2013 चा भरला आहे. तक्रारदाराचे पती हे दि.07.06.2014 रोजी मयत झाले. त्यांनी फेब्रुवारी, 2014 चा विमा हप्ता भरलेला नाही. त्यामुळे तक्रारदाराचे पती विमा पॉलीसीतील अटी व शर्तीप्रमाणे हप्ते भरले हे तक्रारदाराचे कथन पुर्णत: चुकीचे आहे.
- वि.प.ने चुकीचे कारण देऊन अपघाती फायद्याचा क्लेम नाकारला हे मान्य व कबुल नाही. कारण तक्रारदाराने विमा पॉलीसीमधील अटी व शर्तींचा भंग केला असलेने तक्रारदाराचे पतीचा अपघाती फायद्याचा क्लेम नाकारलेला आहे.
- विमा पॉलीसीतील अटीनुसार, तक्रारदाराने दोन वर्षे हप्ते भरलेनंतर पुढील 2 वर्षे हप्ते न भरलेस त्यांना विमा पॉलीसीचा लाभ मिळतो. त्यामुळे तक्रारदाराला तिचे पतीचे निधनानंतर त्यांनी फेब्रुवारी, 2014 रोजीचा हप्ता भरलेला नसतानाही विमा पॉलीसीची रक्कम रु.2,00,000/- अदा केली आहे. परंतु तक्रारदाराचे पतीने फेब्रुवारी, 2014 चा हप्ता भरलेला नसलेमुळे पॉलीसीतील अटी व शर्तीप्रमाणे अपघाती लाभ मिळणेस तक्रारदार पात्र नाहीत. त्यामुळे विमा पॉलीसीतील अट क्र.4 मधील तरतुदीप्रमाणे तक्रारदाराला अपघाती लाभ दिलेला नाही. त्यामुळे वि.प.ने सेवात्रुटी केली असे म्हणणे चुकीचे आहे. तक्रारदाराचा विमा क्लेम वि.प.ने योग्य कारणासाठी नाकारला आहे. यामुळे वि.प.ने तक्रारदाराला कोणतीही सेवात्रुटी दिलेली नाही व तक्रारदार यांना कोणतीही रक्कम देणेस वि.प.हे जबाबदार नाहीत. सबब, तक्रारादाराचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळणेत यावा असे म्हणणे वि.प.ने दाखल केले आहे.
7. प्रस्तुत कामी तक्रारदार व वि.प.यांनी दाखल केलेले सर्व कागदपत्रांचे काळजीपुर्वक अवलोकन करुन मे.मंचाने प्रस्तुत तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दयांचा विचार केला.
क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प.हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय |
2 | वि.प.यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | नाही |
3 | अंतिम आदेश काय ? | खालील नमुद आदेशाप्रमाणे |
विवेचन:-
8. मुद्दा क्र.1 ते 3:- वर मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्हीं होकारार्थी देत आहोत कारण तक्रारदाराचे पतीने वि.प.यांचेकडून न्यु बिमा गोल्ड ही विमा पॉलीसी घेतली असून तिचा पॉलीसी क्र.947308568 असा होता व प्रस्तुत वि.प.ने मान्य व कबुल केली आहे. सबब, तक्रारदार व वि.प. यांचे दरम्यान ग्राहक व सेवा पुरवठादार असे नाते आहे हे निर्विवादपणे स्पष्ट होत आहे. त्यामुळे मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्हीं होकारार्थी दिलेले आहे.
9. वर नमुद मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्हीं नकारार्थी दिलेले आहे. कारण तक्रारदाराने वि.प. यांचेकडून न्यू बीमा गोल्ड ही विमा पॉलीसी घेतली होती. प्रस्तुत विमा पॉलीसीचे सहामाही हप्ते पॉलीसीच्या अटी व शर्थीप्रमाणे ऑगस्ट, 2013 पर्यंत भरले होते. परंतु फेब्रुवारी, 2014 चा विमा हप्ता न भरलेने पॉलीसीतील अटी व शर्ती परिच्छेद-2 प्रमाणे विमा पॉलीसी बंद (Lapse) झाली होती. तरी सुध्दा वि.प. विमा कंपनीने तक्रारदाराने तिचे पतीचा दि.07.06.2014 रोजी अपघाताने मृत्यु झालेनंतर दाखल केले विमा क्लेम रक्कम रु.2,00,000/- Auto Cover नुसार मुळ कोष्टकातील (Sum Assured under Basic Plan) प्रमाणे तक्रारदाराला अदा केले आहेत. सदरची माहिती तक्रारदाराने मे.कोर्टासमोर आणलेली नाही. याउलट, वि.प.ने चुकीचे कारण देऊन वि.प.ने तक्रारदाराचा क्लेम नाकरलेचे कथन तक्रारदाराने केले आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, तक्रारदाराचे पतीने फेब्रुवारी, 2014 चा विमा हप्ता भरलेला नसलेमुळे विमा पॉलीसीतील अट क्र.4 मधील तरतुदीप्रमाणे अपघाती लाभ मिळणेस (Accident Benefit Rider Sum Assured) तक्रारदार पात्र नाहीत. त्यामुळे तक्रारदाराचा विमा क्लेम वि.प.यांनी योग्य कारणासाठीच नाकारलेला आहे. त्यामुळे तक्रारदाराने वि.प.ना कोणतीही सेवात्रुटी दिलेली नाही हे दाखल विमा पॉलीसीवरुन व त्यामधील अटी व शर्थीवरुन स्पष्ट होते. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्हीं नकारार्थी दिलेले आहे.
वरील सर्व कागदपत्रेव कारणमिमांसा यांचे अवलोकन केरता, तक्रारदारांना वि.प.ने Auto Cover प्रमाणे तक्रारदारोन फेब्रवारी, 2014 चा हप्ता न भरता सुध्दा Sum Assured ची रक्कम रु.2,00,000/- अदा केली आहे. मात्र अपघाती लाभाची रक्कम अदा केलेली नाही हे योग्य व न्यायोचीत आहे. सबब, वि.प.ने तक्रारदाराला कोणतीही सेवात्रुटी दिली नाही. त्यामुळे तक्रारदार हे तिचे पतीला मिळणारी अपघाती लाभाची रक्कम (Accident Benefit Rider Sum Assured) मिळणेस तक्रारदार हे पात्र नाहीत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, प्रस्तुत कामी आम्हीं पुढीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1 तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह नामंजूर करणेत येतो.
2 आदेशाच्या सत्यप्रतीं उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.