न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 11 व 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांनी चारचाकी वाहन क्र. जीए-03-पी-3281 हे दि. 7/7/15 रोजी गाडीचे मूळ मालक श्री रोमियो जोसेफ डिसील्व्हा यांचेकडून खरेदी घेतलेले आहे. सदर गाडीचा तक्रारदार यांचे नावे पॉलिसी नं. TIL/10314535 अन्वये दि. 25/2/16 ते 24/2/17 रोजीपर्यंतचा विमा होता. दि.27/6/16 रोजी तक्रारदार यांचे मित्र गजानन उत्तम ज्वारे हे तक्रारदार यांचे परवानगीने सदरचे वाहन घेवून पणजीहून निपाणी येथे निघाले होते. त्यावेळी सदरचे वाहन हे उत्तुरजवळ आले असता सदर वाहनावरील चालकाचा ताबा सुटलेने सदरचे वाहनास अपघात झाला व त्यामध्ये वाहनाचे नुकसान झाले. तदनंतर तक्रारदारांनी सदरचे वाहन टोप संभापूर येथे कंपनीचे वर्कशॅापमध्ये दि. 30/6/16 ते 28/9/16 अखेर दुरुस्तीसाठी दिले होते. सदरचे वर्कशॉपने दि.4,18,000/- इतका खर्च वाहन दुरुस्तीसाठी येणार असलेचे एस्टिमेट दिले. म्हणून तक्रारदारांनी क्लेम फॉर्म भरुन वि.प. यांचेकडे क्लेमची मागणी केली. तथापि वि.प. विमा कंपनीने Vehicle was sold and R.C. and insurance policy was not transferred till the date of loss या कारणावरुन दि. 21/9/16 रोजी तक्रारदाराचा क्लेम नाकारला आहे. अशा प्रकारे वि.प. यांनी तक्रारदारास द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे. म्हणून, तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रारअर्ज या मंचात दाखल केला आहे.
2. प्रस्तुतकामी तक्रारदाराने वि.प. कंपनीकडून विमाक्लेमची रक्कम रु.4,81,000/- तसेच पार्कींग चार्जेसपोटी रु. 16,965/-, सर्व्हेअरचे फीपोटी रु.20,300/-, वाहन ओढून आणण्याचा खर्च रु. 15,000/-, मानसिक त्रासापोटी रु. 50,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/- वि.प. कडून वसूल होवून मिळावा अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत अ.क्र.1 ते 11 कडे अनुक्रमे वर्दी जबाब, अपघात स्थळाचा पंचनामा, वाहनाचे आर.बी.बुक, विमा पॉलिसी, वाहन दुरुस्तीचे एस्टिमेट, सर्व्हे रिपोर्ट, वि.प. कंपनीचे क्लेमबाबतचे पत्र, सर्व्हेअरने दिलेली पावती, गाडीचे फोटो, वाहन चालकाचा परवाना, पार्कींग बिल, तक्रारदाराचे पुराव्याचे शपथपत्र, पुरावा संपलेची पुरसीस, लेखी युक्तिवाद वगैरे कागदपत्रे दाखल केली आहे.
4. वि.प. यांनी सदरकामी म्हणणे/कैफियत, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तिवाद वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. वि.प. ने त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. वि.प. ने तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.
i) तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्यातील सर्व मजकूर मान्य व कबूल नाही.
ii) वि.प. यांनी कोणत्याही प्रकारे सेवेत त्रुटी केलेली नाही. वि.प. यांनी सर्व बाबींचा विचार करुन तक्रारदाराचा क्लेम योग्य त्या कारणासाठीच नाकारला आहे.
iii) तक्रारदार यांनी वादातील वाहन हे अपघातापूर्वी विकलेले आहे. सबब, तक्रारदाराचे सदरचे वाहनास अपघातावेळी विमायोग्य हितसंबंध नव्हता. त्यामुळे तक्रारदारास नुकसान भरपाई मिळणेचा कोणताही हक्क नाही. तक्रारदाराने सदरचे वाहनाचे विक्रीबाबतची माहिती वि.प. यांना दिलेली नाही.
iv) वि.प. यांचे वैकल्पिकरित्या असे म्हणणे आहे की, सदरच्या अपघाताची माहिती वि.प. यांना उशिरा मिळालेने त्रयस्थ सर्व्हेअरकडून वाहनाचा स्पॉट सर्व्हे व क्लेम असेसमेंट करण्याची संधी मिळालेली नाही. क्लेमची रक्कम ही दुरुस्तीची बिले व सर्व्हेप्रमाणे ठरते. सबब वि.प. यांनी सेवेत कोणतीही त्रुटी न केल्याने तक्रारअर्ज नामंजूर करण्यात यावा अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.
अशा स्वरुपाचे आक्षेप वि.प. यांनी तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.
5. वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. विमा कंपनीने तक्रारदाराचा विमाक्लेम नाकारुन तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे वि.प. विमा कंपनीकडून विमाक्लेमची रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
6. वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्तरे आम्ही होकारार्थी दिली आहेत कारण तक्रारदार यांनी त्यांचे चारचाकी वाहन क्र. जीए-03-पी-3281 चा विमा वि.प. विमा कंपनीकडे उतरविला होता. सदर पॉलिसीचा नं. TIL/10314535 असा असून विमा कालावधी दि. 25/2/16 ते 24/2/17 रोजीपर्यंतचा होता. सदरची बाब वि.प.विमा कंपनीने त्यांचे म्हणण्यामध्ये नाकारलेली नाही. तक्रारदाराने सदर पॉलिसीची प्रत याकामी दाखल केली आहे. सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द झालेली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. वि.प. यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये, तक्रारदार यांनी वादातील वाहन हे अपघातापूर्वी विकलेले आहे, सबब, तक्रारदाराचे सदरचे वाहनास अपघातावेळी विमायोग्य हितसंबंध नव्हता. त्यामुळे तक्रारदारास नुकसान भरपाई मिळणेचा कोणताही हक्क नाही. तक्रारदाराने सदरचे वाहनाचे विक्रीबाबतची माहिती वि.प. यांना दिलेली नाही या कारणास्तव वि.प. यांनी तक्रारदाराचा विमादावा नाकारला आहे असे कथन केले आहे. परंतु तक्रारदाराने अपघात होणेपूर्वी सदरचे वाहन हे विकलेले होते हे दर्शविणारा कोणताही ठोस पुरावा वि.प. यांनी याकामी दाखल केलेला नाही. वि.प. यांना पुरावा दाखल करणेसाठी पुरेशी संधी देण्यात आली होती. परंतु तरीही वि.प. यांनी पुरावा दाखल केला नसलेने त्यांचे विरुध्द “पुरावा नाही” असा आदेश पारीत करण्यात आला आहे. सबब, वि.प. यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये जो बचाव घेतला आहे, तो योग्य त्या पुराव्यानिशी शाबीत केलेला नाही असे या मंचाचे मत आहे. वरील सर्व बाबींचा विचार करता तक्रारदार यांनी वादातील वाहन हे अपघातापूर्वी विकलेले आहे व तक्रारदाराचे सदरचे वाहनास अपघातावेळी विमायोग्य हितसंबंध नव्हता ही बाब याकामी शाबीत झालेली नाही. सबब, वि.प. यांनी तक्रारदारांचा न्याययोग्य क्लेम नाकारुन तक्रारदारास सदोष सेवा दिली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
8. तक्रारदार यांनी याकामी डी.एस.के. मोटर्स प्रा.लि. यांनी दिलेले वाहनाचे दुरुस्तीचे एस्टिमेट दाखल केले आहे. सदर एस्टिमेटनुसार वाहन दुरुस्तीसाठी रक्कम रु. 3,54,071/- इतका खर्च अपेक्षित आहे. तसेच तक्रारदार यांनी याकामी पूर्ववत सर्व्हेअर यांचा रिपोर्टही दाखल केला आहे. सदर रिपोर्टनुसार नुकसानीची रक्कम ही रु.3,72,000/- इतकी होते. सदर रक्कम इस्टिमेटमधील रकमेपेक्षा जास्त आहे. सबब, सदर कामी दुरुस्तीचे एस्टिमेटमध्ये नमूद केलेली रक्कम रु.3,54,071/- तक्रारदारांना मंजूर करणे न्यायोचित ठरेल असे या मंचाचे मत आहे. सबब, तक्रारदार हे वि.प. यांचेकडून वाहन दुरुस्तीचे खर्चापोटी रक्कम रु. 3,54,071/- मिळणेस पात्र आहेत तसेच सदर रकमेवर वि.प. यांनी विमा क्लेम नाकारले तारखेपासून विमाक्लेमची रक्कम तक्रारदाराचे हाती प्रत्यक्ष पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजदराने वसूल होवून मिळणेस तसेच मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु.3,000/- वि.प. यांचेकडून वसूल होवून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
सबब, प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांना, विमाक्लेमपोटी रक्कम रु. 3,54,071/- अदा करावी व सदर रकमेवर वि.प. यांनी विमा क्लेम नाकारले तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज अदा करावे.
3) मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 5,000/- व अर्जाचा खर्च रु.3,000/- वि.प. विमा कंपनीने तक्रारदारास अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 25 व 27 अन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.