न्या य नि र्ण य
द्वारा – मा. सौ मनिषा सं. कुलकर्णी, सदस्या
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 11 व 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रारदार यांचे मालकीचे इनोव्हा कार नं. एमएच 09-बीके 0797 असून तिचा विमा वि.प. विमा कंपनीकडे उतरविलेला होता. सदरचे वर नमूद वाहन हे पुण्याकडे जात असता, तळबीडच्या अलिकडे असताना इनोव्हा कारचे पुढे असलेल्या कंटेनरला ओव्हरटेक करीत असताना कंटेनरच्या पुढे ट्रॅक्टर ऊसाने भरलेल्या ट्रेलरसह चालला होता, सदर ट्रॅक्टरच्या पाठीमागील ट्रेलरचे पाठीमागील चाक अचानक पंक्चर झालेने ती ट्रॉली आडवी आलेने इनोव्हा कारचा अपघात झाला व वर नमूद इनोव्हा कारचे संपूर्ण नुकसान (Total loss) झाले. सदर इनोव्हा कारमधील लोक गंभीर जखमी झाल्याने तक्रारदार हे त्यांना अॅडमिट करणेत व त्यांना मेडिकल सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या गडबडीत असल्यामुळे वि.प. विमा कंपनीस तक्रारदार हे मुदतीत इंटीमेशन/सूचना देवू शकले नाहीत. त्यानंतर वि.प. विमा कंपनीने सदर अपघाताची खात्रीही करुन घेतली आहे. तरीसुध्दा वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांचा न्यायोचित क्लेम न देवून तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी दर्शविल्याने सदरचा तक्रारअर्ज तक्रारदारास दाखल करणे भाग पडले.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांचे मालकीची इनोव्हा कार नं. एमएच-09-बीके-0797 असून तिचा विमा वि.प. विमा कंपनीकडे उतरविला होता. त्याचा पॉलिसी नं 1605823117P109052332 असा असून त्याचा कलावधी दि. 25/09/2017 ते 24/09/2018 असा होता व आहे. सदर इनोव्हा कार ही तक्रारदार व त्यांचे एकत्र असलेले कुटुंब यांचे खाजगी कामासाठीच वापर करीत होते. “सावित्रीबाई अपंग पुनर्वसन संस्था” चिखली, ता.कागल जि. कोल्हापूर ही संस्था तक्रारदार यांचे गावी असून सदर संस्थेचे चेअरमन व इतर संचालकांशी तक्रारदार यांचे वडीलांचे चांगले संबंध असल्याने तसेच सदर संस्थेचे पुण्याला काम असलेने तक्रारदारांचे वडीलांनी सदरची इनोव्हा कार त्यांचा चालक अमोल दत्तात्रय डवरी यांचेमार्फत पाठवून दिली होती. सदर इनोव्हामध्ये चेअरमन, दोन संचालक, संस्थेचे क्लार्क, चालकाचा मित्र व चालक असे लोक होते. या संस्थेला तक्रारदारांचे वडीलांनी अर्जात नमूद इनोव्हा कार भाडयाने दिलेली नव्हती. दि. 20/1/2018 रोजी रात्री 9.30 वा चिखली येथून अमोल डवरी हा सदरची इनोव्हा कार चालवत घेवून जात असताना कार तळबीडच्या अलिकडे आली असता सदर इनोव्हा कारचे पुढे कंटेनर होता व त्याला ओव्हरटेक करीत असताना कंटेनरच्या पुढे ट्रॅक्टर ऊसाने भरलेल्या ट्रेलरसह चालला असता सदरच्या ट्रॅक्टरच्या पाठीमागील ट्रेलरचे पाठीमागील चाक अचानक पंक्चर झालेने ती ट्रॉली आडवी आलेने इनोव्हा कारचा अपघात झाला यात कारचे संपूर्ण नुकसान झाले. तसेच सदर इनोव्हामधील लोक गंभीर जखमी झालेने तक्रारदार हे त्यांना अॅडमिट करणेत व मेडिकल सुविधा उपलब्ध करुन देणे या गडबडीत असलेने वि.प. विमा कंपनीस मुदतीत इंटिमेशन देवू शकले नाहीत. वि.प. विमा कंपनीनेही सदर अपघाताची खात्री करुन घेतली आहेत. विमा कंपनीला अपघाताबाबत तक्रारदार यांनी माहिती दिल्यानंतर विमा कंपनीने रितसर इन्व्हेस्टीगेशन केले व श्री दिघे सर्व्हेअर यांचे मार्फत फायनल सर्व्हे करुन घेतला आहे. तसेच आर. आर. बॉडी बिल्डर्स यांचेकडून दुरुस्त कोटेशन घेवून ते विमा कंपनीस सादर केले होते व त्या कोटेशनप्रमाणे सदरची कार दुरुस्तीसाठी लागणारे स्पेअर पार्टसकरिता रक्कम रु. 10,14,589/- इतका खर्च येणार होता व संपूर्ण लेबर चार्ज हा रक्कम रु. 1,11,625/- इतका येणार होता असा एकंदरीत रक्कम रु.11,26,214/- इतका खर्च सदरची इनोव्हा कार दुरुस्तीसाठी येणार होता. इनोव्हा कार 2009 मॉडेलची असून विमा उतरवितेवेळी तिची आय.डी.व्ही. रक्कम रु. 5 लाख इतकी दर्शविली आहे. त्यामुळे सदरचे कारचे संपूर्ण नुकसान झालेले आहे व त्याप्रमाणे सायमा मोटार्स, युनिव्हर्सल साल्वेज बायर व आर.आर.बॉडी बिल्डर्स यांचेकडून त्यांचे किंमतीबाबतही विचारणा करुन घेतली आहे. मात्र तदनंतरही वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांना काहीही कळविले नसलेने दि. 10/09/2018 रोजी तक्रारदार यांचा क्लेम नाकारल्याचे पत्र पाठविले. या कारणास्तव सदरचा तक्रारअर्ज तक्रारदारास दाखल करणे भाग पडले. वि.प. विमा कंपनीने जी कारणे दर्शविलेली होती, ती म्हणजे इंटीमेशन देण्यास विलंब झाला, स्पॉट सर्व्हे करण्यास मिळाला नाही, व इन्व्हेस्टीगेटरच्या रिपोर्टप्रमाणे सदरची कार भाडयाने दिली होती या कारणास्तव क्लेम नामंजूर केलेला आहे. मात्र सदरची इनोव्हा कार आर.आर.बॉडी बिल्डर्स यांचेकडे असलेने त्यांनी पार्कींग चार्जेस रक्कम रु.12,000/- व एस्टिमेट चार्जेस रक्कम रु.22,524/- भरण्यासंदर्भात तक्रारदारांना कळविले आहे व अपघातानंतर ती कार पडून राहिल्यामुळे तिचे नुकसानही झाले आहे. सबब, त्यांनी फक्त रक्कम रु. 90,000/- इतक्या किंमतीस इनोव्हा कार घेतली. कारची आय.डी.व्ही.प्रमाणे असलेली किंमत रु.5 लाख मधून रक्कम रु.90,000/- वजा जाता रु.4,10,000/- इतके इनोव्हा कारचे नुकसान झाले आहे असे तक्रारदार यांचे कथन आहे. सबब, तक्रारअर्ज संपूर्ण खर्चासह मंजूर करणेत यावा व वि.प. विमा कंपनीकडून नुकसान भरपाईपोटी रु.4,10,000/- वसूल होवून मिळावेत, सदरची रक्कम ही व्याजासह विमा दावा नाकारले तारखेपासून 12 टक्के व्याजदराने मिळावी असेही कथन केले आहे. मानसिक त्रासापोटी रक्कम रु.40,000/- व अर्जाचा खर्च रु.10,000/- मिळावा असे कथन तक्रारदार यांनी केले आहे.
3. तक्रारदाराने तक्रारीसोबत शपथपत्र व कागदयादीसोबत एफ.आय.आर., त्रुटीपत्र, व पॉलिसी इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. वि.प. विमा कंपनीस आयोगाची नोटीस लागू होवून त्यांनी हजर होवून या आयोगासमोर आपले म्हणणे दखल केले. वि.प. यांचे कथनानुसार, सदरचा अर्ज सेवात्रुटी केले नसल्याकारणाने ग्राहक मंचाकडे चालणेस योग्य होत नाही. तसेच तक्रारदार हे सदरची इनोव्हा कार तक्रारदार व त्यांचे एकत्र असलेले कुटुंब हे त्यांचे खाजगी कामासाठीच वापर करतात ही विधाने चुकीची असल्यामुळे वि.प. यांना मान्य नाहीत. तक्रारदार यांचे वडीलांनी सदरची कार पाठवून दिलेली होती व या विधानाची प्रत्यक्षात माहिती नसल्यामुळे वि.प. यांना मान्य नाही. तसेच अपघातात नमूद कारणेही वि.प. यांना मान्य नाहीत व या कारणास्तव वि.प. विमा कंपनीला तक्रारदार हे वेळेत इंटीमेशन देवू शकले नाहीत हे ही वि.प. विमा कंपनीस कबूल नाही. तक्रारदार यांचे कुटुंब हे सधन कुटुंब असून त्यांनी आपल्या कामासाठी इनोव्हा कार घेतली होती या विधानाची वि.प. यांना प्रत्यक्ष माहिती नसल्यामुळे सदरची बाबही मान्य नाही. तसेच विमा कंपनीला अपघाताबाबत कल्पना दिल्यानंतर विमा कंपनीने रितसर इन्व्हेस्टीगेशन केले व दीघे सर्व्हेअर यांचेमार्फत फायनल सर्व्हे करुन घेतलेला आहे तसेच आर.आर. बॉडी यांचेकडून दुरुस्ती कोटेशन घेवून ते विमा कंपनीस सादर केले होते व त्याप्रमाणे दुरुस्तीसाठी लागणारा खर्च हा रक्कम रु.11,26,214/- इतका येणार होता व आहे. ही सर्व विधाने वि.प. विमा कंपनीस मान्य व कबूल नाहीत. दि. 10/09/2018 रोजी तक्रारदार यांना वि.प. विमा कंपनीने क्लेम नाकारल्याचे पत्र पाठविले आहे व त्यामध्ये जी कारणे दर्शविली होती व आहेत, ती म्हणजे इंटीमेशन देण्यास विलंब झाला, स्पॉट सर्व्हे करण्यास मिळाला नाही व इनव्हेस्टीगेटरच्या रिपोर्टप्रमाणे सदरची कार भाडयाने दिली हाती अशी चुकीची व खोटी कारणे दर्शवून तक्रारदार यांचा क्लेम नामंजूर केला आहे हेही विधान वि.प. विमा कंपनीस मान्य व कबूल नाही. सावित्रीबाई अपंग व निराधार संस्थेचे चेअरमन यांनी ड्रायव्हर अमोल दत्तात्रय डवरी यांना रक्कम रु.6,000/- दिले होते व डवरी यांनी रक्कम रु.4,000/- चे पेट्रोल गाडीमध्ये भरले व रक्कम रु. 2,000/- स्वतःकडे ड्रायव्हींग मोबदला म्हणून ठेवून दिले असा जबाब वरील इसमांनी विमा कंपनीचे इन्व्हेस्टीगेटर यांना लिहून दिलेले आहेत. जबाबाची प्रतही दाखल केलेली आहे. सबब, सदरची कार तक्रारदार यांनी भाडेतत्वावर देवून इन्शुरन्स पॉलिसीमधील तत्वाचा भंग केल्यामुळे वि.प. विमा कंपनीची कोणतीही जबाबदारी येत नाही. तसेच सदरची कार ही रक्कम रु.90,000/- ला विकली. यासंदर्भातील कोणताही पुरावा या मंचासमोर दाखल नाही. आर.आर.बॉडी बिल्डर्स यांचे नुसार सदरची गाडी रक्कम रु. 1,62,000/- इतक्या किंमतीस आहे व त्या परिस्थितीमध्ये घेणेस तयार असलेचे लेखी स्वरुपात दिलेले आहे व सर्व्हे रिपोर्टनुसार सुध्दा सॅल्वेजची किंमत ही रक्कम रु.1,60,000/- इतकीच आहे. वरील सर्व कारणास्तव तक्रारदार यांची तक्रार नामंजूर करणेत यावी व वि.प. यांना झाले मानसिक त्रासापोटी तक्रारदार यांचेकडून रक्कम रु. 5,000/- देण्यात यावेत असे कथन वि.प. यांनी केले आहे.
5. वि.प. यांनी या संदर्भात कागदयादीसोबत इन्व्हेस्टीगेशन रिपोर्ट, यासीन नाईक यांचा जबाब, गितांजली पंडीत यांचा जबाब, अमोल डवरी यांचा जबाब, युनिव्हर्सल सॅल्वेज बायर यांचे एस्टिमेट, सायमा मोटार्स यांचे एस्टिमेट, एन.के.बॉडी बिल्डर्स यांचे एस्टिमेट तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
6. तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे तसेच वि.प. यांचे म्हणणे, पुरावा व युक्तिवाद यावरुन आयोगासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हा वि.प. यांचा ग्राहक होतो काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदार यांना सेवा देणेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदारांनी केलेल्या मागण्या मिळणेस तक्रारदार पात्र आहे काय ? | होय, अंशतः. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
विवेचन
मुद्दा क्र.1
7. तक्रारदार यांचे मालकीची इनोव्हा कार नं. एमएच-09-बीके-0797 असून तिचा विमा वि.प. विमा कंपनीकडे उतरविला होता. त्याचा पॉलिसी नं 1605823117P109052332 असा असून त्याचा कलावधी दि. 25/09/2017 ते 24/09/2018 असा होता व आहे. सदरची पॉलिसी उभय पक्षांनी याकामी दाखल केली आहे व सदरची बाब उभयपक्षी मान्य आहे. सबब, तक्रारदार व वि.प. यांचेमध्ये सेवा घेणार व देणार हे नाते निर्माण झाले आहे. याकरिता तक्रारदार हा ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत ग्राहक होतो या निष्कर्षाप्रत हे आयेाग येत आहे.
मुद्दा क्र.2 ते 4
8. वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांचा विमादावा हा क्लेम नामंजूरीचे पत्राप्रमाणे तक्रारदार यांचे इनोव्हा कारचा अपघात हा दि. 21/1/2018 रोजी झालेला होता, मात्र तक्रारदार यांनी सदरची सूचना वि.प. विमा कंपनीस दि. 31/1/2018 रोजी दिलेली आहे. म्हणजेच 10 दिवसांनंतर वि.प. विमा कंपनीस अपघात झालेची बाब निदर्शनास आणून दिली आहे. तसेच इनव्हेस्टीगेशन रिपोर्टप्रमाणे सात लोकांनाच प्रवास करण्याची मर्यादा असते. मात्र सदर वाहनामध्ये असणारे लोक हे त्यांचे व्यावसायिक उद्देशाकरिताच पुण्याला गेलले होते व त्यापैकी कोणीही तक्रारदार यांचे नातलगांपैकी नव्हता.
- The accident occurred on 21/01/2018 whereas the intimation was received on 31/10/2018 almost 10 days after the accident.
- Though a major accident, no request for spot survey was made, as such the company was prevented from getting the factual evidences in the subject cases.
- The investigators report confirms that total seven persons were travelling in the vehicle for their business purpose to Pune. They had taken vehicle from you on Hire to travel to Pune.
वरील कारणास्तव वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांचा विमादावा नाकारलेला आहे. मात्र तक्रारदार व वि.प. यांनी शपथपत्र तसेच काही कागदपत्रेही दाखल केलेली आहेत. तक्रारदार यांनी वि.प. विमा कंपनीचे विमादावा नाकारलेचे पत्र तसेच पॉलिसी दाखल केलेली आहे. मात्र वि.प. विमा कंपनीने आपल्या म्हणण्यासोबत इन्व्हेस्टीगेशन रिपोर्ट, यासीन पापालाल नाईक यांचा जबाब, तसेच गीतांजली पंडीत, अमोल दतात्रय डवरी (गाडीचे चालक) यांचेही जबाब दाखल केलेले आहेत व युनिव्हर्सल सॅल्वेज बायर यांचे साल्वेजचे संदर्भातील एस्टिमेट, सायमा मोटार्स यांचेकडील इस्टिमेट दाखल केले आहे. मात्र तक्रारदार यांनी यासंदर्भात काही वरिष्ठ न्यायालयाचे न्यायनि र्णय दाखल केले आहेत याचाही विचार हे आयोग करीत आहे. जरी तक्रारदार यांना वि.प. विमा कंपनीस इंटीमेशन देणेस 10 दिवसांचे विलंब झाला असला तरी तक्रारदार यांनी सदरचे अपघातग्रस्त लोकांना हॉस्पीटलमध्ये नेणेसाठी मदत करत असलेने विलंब झाला असे स्पष्ट कथन केले आहे, सबब योग्य कारणास्तव तक्रारदार यांना विलंब झालेने वि.प. विमा कंपनीने घेतलेला हा आक्षेप हे आयोग फेटाळून लावत आहे. याचा विचार करता तक्रारदार यांनी जरी सदरची अपघातग्रस्त इनोव्हा कार ही रक्कम रु. 90,000/- इतक्या किंमतीस आर.आर.बॉडी बिल्डर्स यांनी विकत घेतली आहे असे नमूद केले असले तरी वि.प. विमा कंपनीने या संदर्भातील काही कागदपत्रे दाखल केलली आहेत, जसे की, वि.प. विमा कंपनीने युनिव्हर्सल सॅल्वेज बायर यांचे साल्वेजचे संदर्भातील एस्टिमेशन हे रक्कम रु. 1,45,000/- इतके नमूद केलेले आहे व सायमा मोटर्स यांनीही रु.1,55,000/- इतके एस्टिेशन नमूद केलेले आहे. तसेच आर.आर. बॉडी बिल्डर्स यांनी दि. 10/3/2018 रोजी सदरची अपघातग्रस्त इनोव्हा कार ही रक्कम रु. 1,62,000/- इतक्या रकमेस घेणेस आपण तयार आहोत असे कथन केले आहे व या संदर्भातील सुभाष नारायण पलांडे यांचे पुराव्याचे शपथपत्रही दाखल केले आहे. या शपथपत्रानुसारही सदरचे इनोव्हा कारचे एस्टिमेशन हे रु.1,60,000/- इतके आहे असे कथन केलेचे दिसून येते. सबब, तक्रारदार यांनी जरी सदरची किंमत ही रक्कम रु. 90,000/- नमूद केली असली तरी या संदर्भातील कोणताही पुरावा तक्रारदार यांनी या आयेागासमोर दाखल केलेला नाही. मात्र वि.प. विमा कंपनीने वर नमूद कागदपत्रे दाखल करुन साल्वेजची असणारी किंमत रक्कम रु.1,45,000/- असलेची बाब सर्व्हेअर श्री दिघे यांचा गाडीचा सर्व्हे रिपोर्टवरुन दिसून येते. सबब, वर नमूद कारणांचा विचार करता, वि.प. विमा कंपनीचे सर्व्हे रिपोर्टप्रमाणे असणारी रक्कम रु.1,45,000/- निश्चित करणेचे निर्णयाप्रत हे आयेाग येत आहे. या कारणांचा विचार करता तक्रारदार यांनी पॉलिसीचे अटी शर्तींचा कोणताही भंग केले नसलेचे निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे व तक्रारदार यांना विमादाव्यापोटी साल्वेजची रक्कम रु.1,45,000/- ही आय.डी.व्ही. व्हॅल्यूचे रक्कम रु. 5 लाख मधून वजा जाता येणारी रक्कम देणेचे निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
9. वि.प. विमा कंपनीने कागदयादीसोबत अमोल डवरी, गितांजली कळमकर, तसेच यासीन नाईक यांचे जबाबाच्या प्रती दाखल केल्या आहेत व तक्रारदार हे स्वतःच्या कामासाठी प्रवासाला गेले नसून त्यांनी त्यांचे वाहन हे भाडयाने दिले होते असे कथन केले आहे. तथापि आपल्या म्हणण्यामध्येच वि.प. यानी सदचे वाहन हे तक्रारदार यांनी आपल्या कामासाठी नेले याची आपणास माहिती नाही असे स्पष्ट कथन केले आहे व दाखल जबाबांवरुन सदरचे वाहन हे संस्थेच्या कामाकरिता नेलेचे दिसून येते. ड्रायव्हरचे पैसे अथवा डिझेलचे पैसे देणे यावरुन सदरचे वाहन भाडयाने दिले म्हणता येणार नाही असे आयोगाचे स्पष्ट मत आहे.
या संदर्भातील वरिष्ठ न्यायालयाचे काही न्यायनिर्णयही तक्रारदार यांनी दाखल केलेले आहेत.
- I (2020) CPJ 93 (SC)
Saurashtra Chemicals Ltd.Vs.National Insurance Co.Ltd.
- I (2020) CPJ 99 (SC)
Canara Bank Vs.United India Insurance Co. & Ors.
10. वर नमूद न्यायनिर्णयांचाही विचार हे आयोग करीत आहे व सदरची होणारी रक्कम रु. 3,55,000/- देण्याचे निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. तक्रारदार यांनी सदरची रक्कम ही 12 टक्के व्याजदराने जरी मागितली असली तरी ती या आयेागास संयुक्तिक वाटत नसलने सदचे रकमेवर द.सा.द.शे.6 टक्के दराने विमा दावा नाकारले तारखेपासून म्हणजेच दि. 10/09/2018 पासून ते संपूर्ण रक्कम हाती पडेपर्यंत देणेचे आदेश वि.प. विमा कंपनीस करणेत येतात तसेच तक्रारदाराने मानसिक त्रासापोटी तसेच तक्रारअर्जाचे खर्चापोटी मागितलेली रक्कम रु. 40,000/- व 10,000/- ही या आयोगास संयुक्तिक वाटत नसलेने मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.3,000/- देणेचे निष्कर्षाप्रत हे आयेाग येत आहे. सबब, हे आयोग खालील आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. वि.प. यांनी तक्रारदार यांना रक्कम रु. 3,55,000/- देणेचे आदेश करणेत येतात. तसेच सदरचे रकमेवर दि. 10/09/2018 पासून संपूर्ण रक्कम तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज देणेचे आदेश करणेत येतात.
3. वि.प. यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- देणेचे आदेश करणेत येतात.
4. वर नमूद आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाचे तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5. विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तदतुदींअन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6. जर यापूर्वी वि.प. यांनी काही रक्कम तक्रारदार यांना अदा केली असेल तर त्याची वजावट करण्याची वि.प. यांना मुभा राहील.
7. सदर आदेशाच्या प्रती उभय पक्षकारांना विनाशुल्क पाठवाव्यात.