आदेश पारित द्वारा मा. अध्यक्ष, श्री. एम. जी. चिलबुले
तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्तीची सासू संजूबाई प्रकाश हजारे ही इस्टर्न सेंट्रल रेल्वे, गोंदीया येथे सफाई कामगार म्हणून नोकरीस होती. तिने विरूध्द पक्ष क्रमांक 1 व 2 भारतीय जीवन विमा निगम यांचेकडून खालीलप्रमाणे दोन जीवन विमा पॉलीसी खरेदी केल्या होत्या.
अ.क्र. पॉलीसी क्रमांक खरेदी दिनांक पॉलीसी मूल्य
1. 972503604 28.09.1998 रू. 50,000/-
2. 972995800 28.03.2004 रू. 40,000/-
वरील पॉलीसीचे प्रिमियम संजूबाईच्या पगारातून परस्पर कपात होत होते.
3. वरील अनुक्रमांक 1 च्या पॉलीसीसाठी संजूबाईचा मोठा मुलगा शंकर प्रकाश हजारे हा नॉमिनी होता, तर अनुक्रमांक 2 च्या पॉलीसीसाठी लहान मुलगा तक्रारकर्तीचा पती गणेश प्रकाश हजारे हा नॉमिनी होता. मात्र संजूबाईचे हयातीतच तिचा मोठा मुलगा शंकर दिनांक 21/11/2013 रोजी अविवाहित मरण पावला. तसेच लहान मुलगा गणेश दिनांक 13/10/2011 रोजी मरण पावला. मुलांच्या मरणानंतर संजूबाईने वरील पॉलीसीसाठी दुसरे नॉमिनी नियुक्त केले नाही. संजूबाई वयाच्या 53 व्या वर्षी दिनांक 19/05/2014 रोजी रेल्वेच्या सेवेत असतांनाच गोंदीया येथे मरण पावली.
4. वरीलप्रमाणे संजूबाईचा मुलगा शंकर हा अविवाहित मरण पावल्यामुळे व विवाहित मुलगा गणेश हा देखील तिच्या हयातीत मरण पावल्यामुळे आणि तिला अन्य मुलगा किंवा मुलगी नसल्यामुळे मयत गणेश यांचे वारस 1) विधवा-रिना गणेश हजारे, 2) मुलगी प्राची गणेश हजारे (अज्ञान), 3) मुलगा देवेन्द्र गणेश हजारे (अज्ञान) हेच मयत संजूबाई हिचे वारस असून त्यांच्याशिवाय अन्य वारस नाहीत. तक्रारकर्ती रिना ही तिच्या अज्ञान मुलांची नैसर्गिक व कायदेशीर पालनकर्ती असून त्यांचे पालन पोषण करीत आहे.
5. संजूबाईच्या मृत्यूनंतर तिचे वारस असलेली अर्जदार व तिच्या मुलांना वरील दोन्ही विमा पॉलीसीच्या रकमा मिळाव्या म्हणून तक्रारकर्तीने विरूध्द पक्ष क्रमांक 1 ची भेट घेतली असता त्यांनी वारसान प्रमाणपत्र (Heir ship Certificate) आणण्यास सांगितले. त्याप्रमाणे तक्रारकर्तीने तिच्या व मुलांच्या नांवाने दिवाणी न्यायाधीश, गोंदीया यांच्या न्यायालयातून दिनांक 03/12/2015 रोजी वारसान दाखला मिळविला आणि डिसेंबर 2015 मध्ये विरूध्द पक्षाकडे मृत्यू विमा दावा मिळण्यासाठी आवश्यक दस्तावेजांसह अर्ज केला. परंतु विरूध्द पक्षाने अनावश्यक कागदपत्रांसाठी मागणी केली आणि विमा दावा आजपर्यंत मंजूर केला नाही. सदरची बाब विमा लाभार्थ्याप्रती सेवेतील न्यूनता असल्याने तक्रारीत खालीलप्रमाणे मागणी केली आहे.
(1) तक्रारीत नमूद पॉलीसी क्रमांक 972503604 व 972995800 पोटी मृत्यू दाव्याची बोनससह देय रक्कम एकूण रू.1,47,670/- द.सा.द.शे. 15% व्याजासह तक्रारकर्तीस देण्याचा विरूध्द पक्ष क्रमांक 1 व 2 ला आदेश व्हावा.
(2) सेवेतील न्यूनतेबाबत भरपाई रू.25,000/- मिळावी.
(3) शारिरिक व मानसिक त्रासाबाबत नुकसानभरपाई रू.25,000/- आणि तक्रारखर्च रू.10,000/- मिळावा.
6. तक्रारीचे पुष्ठ्यर्थ तक्रारकर्तीने मृतक संजूबाई प्रकाश हजारे हिचे ओळखपत्र, संजूबाई हजारे हिचे मृत्यू प्रमाणपत्र, दोन्ही पॉलीसीचे डिटेल्स, शंकर हजारे व गणेश हजारे यांचे मृत्यू प्रमाणपत्र, कायदेशीर वारस असल्याबाबतचे दिवाणी न्यायालयाने दिलेले वारसांन प्रमाणपत्र, तक्रारकर्तीचे आधार कार्ड इत्यादी दस्तावेज दाखल केले आहेत.
7. विरूध्द पक्ष क्रमांक 1 व 2 यांनी लेखी जबाबाद्वारे तक्रारीस सक्त विरोध केला आहे. संजूबाई प्रकाश हजारे हिने तक्रारीत नमूद दोन जीवन विमा पॉलीसी विरूध्द पक्षाकडून खरेदी केल्याचे मान्य केले आहे. तसेच वरील पॉलीसीसाठी नियुक्त केलेले नॉमिनी अनुक्रमे 13/10/2011 आणि 21/11/2013 रोजी मरण पावल्याचे देखील कबूल केले आहे. विरूध्द पक्षाच्या कार्यालयाने वारसान दाखला आणण्यासाठी तक्रारकर्तीला तोंडी सांगितल्याचे विरूध्द पक्षाने नाकबूल केले आहे. मात्र तक्रारकर्तीने तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे दिवाणी न्यायाधीश, गोंदीया यांचेकडून वारसान दाखला प्राप्त करून तो विरूध्द पक्षाकडे दाखल केल्याचे मान्य केले आहे. परंतु त्यांत LIC पॉलीसीबाबत कोणताही उल्लेख नसल्याने तक्रारकर्तीस उत्तराधिकारी प्रमाणपत्र (Succession Certificate) दाखल करण्यांस दिनांक 29/01/2016 चे पत्रान्वये कळविण्यांत आले. मात्र तक्रारकर्तीने आवश्यक दस्तावेजांची पूर्तता केली नसल्याने विमा दावा निकाली काढता आला नाही. विरूध्द पक्षाने अनावश्यक दस्तावेजांची मागणी करून विमा दावा रोखून ठेवला व सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार केल्याचे नाकबूल केले आहे. तक्रारकर्तीची तक्रार खोटी असल्याने खारीज करण्याची विनंती केली आहे.
8. तक्रारकर्ती व विरूध्द पक्ष यांच्या परस्पर विरोधी कथनांवरून तक्रारीच्या निर्णितीसाठी खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष व कारणमिमांसा खालीलप्रमाणेः-
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | विरूध्द पक्ष क्रमांक 1 व 2 ने सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार केला आहे काय? | होय |
2. | तक्रारकर्ती मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहे काय? | अंशतः |
3. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | अंतिम आदेशाप्रमाणे |
- कारणमिमांसा –
9. मुद्दा क्रमांक 1 बाबतः- सदरच्या प्रकरणात संजूबाई प्रकाश हजारे हिने विरूध्द पक्षाकडे तक्रारीत नमूद पॉलीसी काढल्याचे व सदर पॉलीसीसाठी नॉमिनी असलेली त्यांची मुले शंकर प्रकाश हजारे दिनांक 21/11/2013 रोजी आणि गणेश प्रकाश हजारे दिनंक 13/10/2011 रोजी संजूबाईचे हयातीत मरण पावल्याचे व त्यांचेऐवजी दुसरे नॉमिनी रेकॉर्डवर नसल्याचे उभय पक्षांना मान्य आहे. संजूबाई देखील दिनांक 19/05/2014 रोजी कोणतेही मृत्यूपत्र न करता मरण पावली. त्यामुळे संजूबाईच्या वरील दोन्ही पॉलीसीचे पैसे मिळण्याचा हक्क संजूबाईचे वारसानांना प्राप्त झाला आहे. तक्रारकर्तीने दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर), गोंदीया यांच्या न्यायालयात आर. एम. जे. सी. क्रमांक 57/2015 प्रमाणे वारसान प्रमाणपत्र (Heir ship Certificate) मिळण्यासाठी दिनंक 09/10/2015 रोजी अर्ज दिला होता. त्यावरून दिनांक 27/10/2015 रोजी ‘दैनिक कशिश’ मध्ये नोटीस प्रसिध्द करून हरकती मागविण्यांत आल्या. अर्जदारांना वारसान दाखला देण्यास कोणीही हरकत घेतली नसल्याने मा. दिवाणी न्यायालयाने उपलब्ध दस्तावेजांची शहानिशा करून (1) तक्रारकर्ती रिना गणेश हजारे, (2) कु. प्राची गणेश हजारे वय 7 वर्षे (अज्ञान), (3) देवेन्द्र गणेश हजारे वय 6 वर्षे (अज्ञान) हेच मयत संजूबाई प्रकाश हजारे हिचे वारसान असल्याबाबत वारसान प्रमाणपत्र दिले आहे. अर्जदाराने सदर प्रमाणपत्र सादर करूनही तिला विमाधारक संजूबाईच्या मृत्यू विमा दाव्याची रक्कम न देण्याची विरूध्द पक्षाची कृती निश्चितच विमा लाभार्थ्याप्रती सेवेतील न्यूनता आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 वरील निष्कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.
10. मुद्दा क्रमांक 2 व 3 बाबतः– तक्रारकर्ती रिना व तिची अज्ञान मुलगी प्राची आणि अज्ञान मुलगा देवेन्द्र हे मयत पॉलीसीधारक संजूबाई प्रकाश हजारे हिचे वारस म्हणून पॉलीसी स्टेटस् रिपोर्ट मध्ये दर्शविलेली खालील रक्कम
अ.क्र. पॉलीसी क्रमांक विमा रक्कम बोनस एकूण
1. 972503604 रू.50,000/- रू.41,200/- रू.91,200/-
2. 972995800 रू. 40,000/- रू.16,470/- रू.56,470/-
एकूण रू. 1,47,670/-
तक्रार दाखल दिनांक 18/03/2016 पासून प्रत्यक्ष अदायगीपर्यंत द. सा. द. शे. 9% व्याजासह मिळण्यास पात्र आहे. याशिवाय शारिरिक व मानसिक त्रासाबाबत नुकसानभरपाई रू.10,000/- आणि तक्रार खर्च रू.5,000/- मिळण्यास देखील तक्रारकर्ती पात्र आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 2 व 3 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविले आहेत.
वरील निष्कर्षास अनुसरुन खालील आदेश पारित करण्यात येत आहे.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्तीची ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 च्या कलम 12 खालील तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
2. विरुध्द पक्ष क्रमांक 1 व 2 यांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला स्वतः साठी तसेच तिची अज्ञान मुलगी प्राची आणि अज्ञान मुलगा देवेन्द्र यांची अज्ञान पालनकर्ती म्हणून पॉलीसी स्टेटस् रिपोर्टमध्ये दर्शविल्याप्रमाणे पॉलीसी क्रमांक 972503604 ची बोनससह येणारी रक्कम रू. 91,200/- व पॉलीसी क्रमांक 972995800 ची बोनससह येणारी रक्कम रू. 56,470/- अशी एकूण रक्कम रू. 1,47,670/- तक्रार दाखल केल्याच्या तारखेपासून म्हणजेच दिनांक 18/03/2016 पासून प्रत्यक्ष अदायगीपर्यंत द. सा. द. शे. 9% व्याजासह अदा करावी.
3. विरुध्द पक्ष क्रमांक 1 व 2 यांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला झालेल्या शारिरिक व मानसिक त्रासाबाबत नुकसानभरपाई रू.10,000/- आणि तक्रारीचा खर्च रू.5,000/- द्यावा.
4. विरूध्द पक्ष क्रमांक 1 व 2 यांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी उपरोक्त आदेशाचे पालन व्यक्तिशः किंवा संयुक्तिकरित्या करावे.
5. विरूध्द पक्ष क्रमांक 1 व 2 यांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी उपरोक्त आदेशाची पूर्तता आदेश प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांचे आंत करावी.
6. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्क द्यावी.
7. प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल तक्रारकर्तीस परत करावी.