नि का ल प त्र:- (व्दारा- मा. श्री. शरद डी. मडके, अध्यक्ष) (दि. 23-05-2016)
1) वि. प. बँक ऑफ महाराष्ट्र यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवलेने, तक्रारदारांनी ग्राहक सरंक्षण कायदा कलम 1986, कलम-12 अन्वये प्रस्तुतची तक्रार मंचात दाखल केली आहे.
2) तक्रादार यांचे बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा ताराराणी विद्यापीठ येथे बचत खाते नं. 68009790130 असून वि.प. बँकेचे एटीएम केंद्रे आहेत. तक्रारदार यांचे खाते एप्रिल 2012 पासून असून, त्यांचे खात्यावर दि. 9-01-2013 रोजी रक्कम रु. 46,991/- होते. तक्रारदार यांनी दि. 2-02-2013 रोजी रु. 10,000/- व दि. 6-02-2013 रोजी रक्कम रु. 15,000/- काढले. तक्रारदाराच्या खात्यावर रक्कम रु. 21,991/- शिल्लक होते.
3) तक्रारदार यांनी दि. 6-02-2013 रोजी रक्कमेची गरज असल्याने रु. 21,991/- पैकी रक्कम रु. 15,000/- काढण्याचा प्रयत्न केला पण रक्कम एटीएममधून मिळाली नाही. तक्रारदार यांनी नमूद केले की, एटीएम चे सुरक्षा रक्षकाचे सुचनेनुसार, तक्रारदार यांनी बॅकेतुन रक्कम काढण्यास गेले. तक्रारदार यांनी रक्कम रु. 20,000/- ची रक्कम काढण्याची रिसीट भरली पण संबंधित बँक अधिका-यांनी रु. 20,000/- शिल्लक नसल्याचे सांगितले व फक्त रु. 15,000/- काढणेस परवानगी दिली.
4) तक्रारदार पुढे म्हटले की, त्यांच्या खात्यावर रु. 6,199/- असणे आवश्यक असताना फक्त रु. 1,991/- शिल्ल्क असल्याचे दाखवले. तक्रारदार यांचे मते दि. 6-02-2013 रोजी ए.टी. एम. मधून रक्कम काढले नव्हते व नाही असे असताना दि. 6-02-2013 रोजी रक्कम काढल्याचे दाखवले.
5) तक्रारदार यांनी सदर रक्कम, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रार अर्जाचा खर्च मिळणेची मागणी केली आहे.
6) वि.प. यांनी तक्रार अर्जातील मजकूर नाकारला असून, तक्रारदार यांची तक्रार खोटी असल्याचे नमूद केले. वि.प. म्हणतात तक्रारदार यांनी दि. 2-02-2013 रोजी रक्कम रु. 10,000/- व दि. 6-02-2013 रोजी रक्कम रु. 15,000/- एटीएम मधून काढले हे सत्य आहे. वि.प. यांनी मान्य केले की, वरील दोन रक्कमा काढल्यावर तक्रारदार यांच्या खात्यावर रक्कम रु. 21,991/- दि. 6-02-2013 रोजी शिल्लक होते.
7) वि.प. यांनी परि. 2 मध्ये म्हटले की, तक्रारदार यांनी दि. 6-02-2013 रोजी रक्कम रु.15,000/- व रु. 5,000/- ए.टी.एम. व्दारे काढले व रक्कम रु. 15,000/- बँकेतून काढले. तक्रारदार यांनी एकूण रक्कम रु. 35,000/- दि. 6-02-2013 रोजी काढले. वि. प. यांनी नोटीसीच्या उत्तरामध्ये ही गोष्ट नमूद करुन तक्रारदारांना कळविली आहे.
8) तक्रारदार यांनी आपले म्हणणेचे समर्थनार्थ बँकेचे पासबुक, वि.प. कडे केलेला अर्ज, नोटीस व पोच पावती दाखल केली आहे.
9) वि.प. यांनी आपले कथनाचे पुष्टयर्थ तक्रारदाराचे अकॉंऊट स्टेटमेंट, नोटीसीला दिलेले दि. 28-05-2013 रोजीचे उत्तर, ए.टी.एम. चे स्टेटमेंट दाखल केले.
10) तक्रारदाराची तक्रार, दोन्ही बाजूंचे म्हणणे, व कागदपत्रांचे अवलोकन तसेच उभय वकिलांचा युक्तीवादाचा विचार करता, प्रस्तुत प्रकरणी, खालील मुद्दे विचारात घेतले आहेत.
मुद्दे उत्तरे
1. वि.प. यांनी तक्रारदार यांना देण्यात येणा-या
सेवेत त्रुटी केली आहे काय ? नाही.
2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
का र ण मि मां सा –
11) दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजूंनी दाखल केलेले कागदपत्रे यांचे अवलोकन केले. तक्रारदार यांचे बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या ताराराणी विद्यापीठ शाखेत बचत खाते एप्रिल 2012 पासून आहे हे दोन्ही बाजूंनी दाखल कागदपत्रावरुन दिसून येते.
12) तक्रारदार यांच्या खात्यावर दि. 2-02-2013 रोजी रक्कम रु. 46,991/- होते हे दिसून येते. तक्रारदार यांनी दि. 2-02-2013 रोजी रु. 10,000/- काढले हे मान्य आहे. तक्रारदार यांची दि. 6-02-2013 रोजी ए.टी.एम. मधून रक्कम रु. 15,000/- काढले हे मान्य आहे. तक्रारदार यांनी बँकेच्या खात्यामधून दि. 6-02-2013 रोजी रक्कम रु. 15,000/-काढले याबद्दलही वाद नाही.
13) तक्रारदार यांनी आपले तक्रार अर्ज, प्रतिज्ञापत्र व लेखी युक्तीवाद सादर करतांना नमूद केले की, दि. 6-02-2013 रोजी त्यांनी ए.टी.एम. मधून रु. 5,000/- काढले नाहीत. वि.प. यांनी आपले म्हणणे सिध्द करण्यासाठी तक्रारदार यांची एटीएम स्लीप दाखल केली आहे. त्यावरुन तक्रारदार यांच्या कार्डाचा वापर करुन दुपारी 12.57 मिनीटांनी ए.टी.एम. व्दारे रक्कम रु. 5,000/- काढले आहेत असे दिसून येते. सदर रक्कम यशस्वीरित्या काढली असून त्यावेळी तक्रारदारांच्या खात्यावर रक्कम रु. 16,991/- शिल्लक असल्याचे स्पष्ट होते.
14) तक्रारदार यांनी मान्य केले की, त्यांची सेव्हिंग्ज खात्यावरील रक्कम रु. 15,000/- स्वत: बँकेतून काढले आहेत. त्यावेळी बॅलन्स रक्कम रु. 1,991/- शिल्लक होता असे दिसून येते.
15) बँकेचे स्टेटमेंट ऑफ अकाऊंट दाखल असून त्यावरुन असे दिसून येते की, तक्रारदार यांनी रक्कम रु. 5,000/- एटीएम व्दारे काढले. तक्रारदार यांनी असे कोठेही नमूद केले नाही की, त्यांचे एटीएमचा वापर करुन इतर व्यक्तीने रक्कम उचलली आहे.
16) बँकर्स बुक्स इव्हीडन्स अॅक्ट, 1891 च्या कलम 4 चा संदर्भ खाली देत आहोत.
The Banker,s Book Evidence Act, 1891 Sec. 4 - Mode of proof of entries in bankers books.Subject to the provisions of this Act, a certified copy of any entry in a bankers books shall in all legal proceedings be received as prima facie evidence of the existence of such entry, and shall be admitted as evidence of the matters, transactions and accounts therein recorded in every case where, and to the same extent as, the original entry itself is now by law admissible, but not further or otherwise.
17) मंचाचे मते दाखल पुराव्यावरुन व कायदेशीर तरतुदींचा विचार करता, वि.प. यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यामध्ये कोणतीही त्रुटी नसुन, तक्रारदार यांना कोणताही संयुक्तीक पुरावा दाखल केला नाही. वि.प. यांच्या सुरक्षा गार्डनी रक्कम काढणेसंबंधी तक्रारदार यांना योग्य मार्गदर्शन केल्याचे तक्रारदार यांनी मान्य केले असून,त्यानंतरच तक्रारदार ए.टी.एम. सेंटरवरुन बँकेकडे रक्कम काढण्यास गेले हे दिसून येते. वि.प. यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली नसल्याचे स्पष्ट होते.
18) न्यायाचे दृष्टीने मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे. सबब, आदेश.
आ दे श
1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करणेत येतो.
2) खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
3) सदर आदेशाच्या प्रमाणीत प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.