ग्राहक तक्रार क्र. 212/2016
अर्ज दाखल तारीख : 11/07/2016
निकाल तारीख : 01/03/2017
कालावधी: 0 वर्षे 07 महिने 20 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. आनंदराव पि. भानुदास पखाले,
वय - 34 वर्षे, धंदा – लोहारकी,
रा. ईट, ता.भुम, जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. शाखा व्यवस्थापक,
बँक ऑफ महाराष्ट्र शाखा ईट,
ता.भुम,जि.उस्मानाबाद.
2. विभागीय अधिकारी, बँक ऑफ महाराष्ट्र,
विभागीय कार्यालय, सोलापूर, ता.जि. सोलापूर. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.एस.के.अंधारे.
विरुध्द पक्षकार क्र.1 व 2 विरुध्द एकतर्फा आदेश पारित.
न्यायनिर्णय
मा. सदस्य श्री.मुकुंद बी.सस्ते यांचे व्दारा :
तक यांचे तक्रारीतील म्हणणे थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
1. तक हे मौजे ईट ता. भुम जि.उस्मानाबाद येथील कायम स्वरुपाचे रहिवाशी आहेत. तक यांच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह लोहारकी व्यवसायावर चालतो तक यांचे एकत्र कुटूंब आहे. foविप क्र. 1 यांच्याकडे तक यांचे बचत खते क्र.20241929629 असे आहे. म्हणून तक हा विप चा ग्राहक आहे. तक यांनी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्यादित उस्मानाबाद यांचेकडे आपला कर्ज मिळण्याबाबत अर्ज केला. तक यांच्या विनंती नुसार तक यांचा अर्ज मंजूर करण्यात आला त्यात तक यांना रु.4,00,000/- कर्ज देण्याचे बँक ऑफ महाराष्ट शाखा ईट यांना कळविले. वर नमुद महामंडळाकडे पैसे नसल्यामुळे तक यांनी स्वत: जवळचे रु.1,00,000/- डीडी क्र.380345 काढून विप क्र.1 यांच्याकडे सहभाग जमा केला. विप क्र.1 यांच्याकडे आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह कर्ज फाईल जमा केली. सदर फाईल मंजूर झालेली असतांना विप क्र.1 यांनी फाईलमधील कोटेशन बदलले आहे. तक यांची फसवणूक करुन रु.3,00,000/- कर्ज मंजूर केलेले दाखवले आहे. रु.3,00,000/- खाते क्र.60125647824 वर दि.25/02/2013 रोजी नमूद केलेली आहे. परंतु ही कर्ज रक्कम तक यांना मिळालेली नाही. विप क्र. 1 यांनी ती कधीही दिलेली नाही. विप क्र.1 यांनी फाईलमध्ये जोडलेले खोटे कोटेशन जे की, संगमेश्वर ट्रेडर्स ईट प्रो.प्रा. सुरेश देशमुख यांच्या दुकानाचे आहे. तक यांना कसलाही माल म्हणजेच सिमेंट, पत्रे बांधकाम साहित्य मिळालेले नाही. त्यामुळे तक वर नमूद व्यवसाय करु शकला नाही. अर्जदाराची माल घेणार म्हणून सही नाही त्याचप्रमाणे कर्ज मंजूरीबाबत असणारे पत्र यावरही कर्जदार म्हणून तक यांची सही नाही फक्त जामीनदार म्हणून नांव नसून सही आहे. कोणाची जामीनदार म्हणून सही घेतली आहे हे तक यास माहित नाही. मात्र तक यांच्या नावे सदर कर्ज टाकलेले आहे म्हणून तक यांनी वारंवार विप यांच्याकडे जाऊन विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तक यांनी विप यांच्याकडे जमा केलेले रु.1,00,000/- जमा तारखेपासून व्याजासहीत व वसंतराव विमुक्त जाती व भटक्या जामाती विकास महामंडळाने मंजूर केलेले कर्ज रक्कम रु.3,00,000/- तसेच तक यांना झालेल्या आर्थिक मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्कम रु.50,000/- व तक्रारीचा खर्च रक्कम रु.10,000/- मिळावी अशी विनंती केली आहे.
2. विप क्र.1 यांना सदर तक्रारीबाबत नोटीस पाठवण्यात आली असता विप क्र.1 यांनी नोटीस मिळूनही गैरहजर राहिल्याने त्यांचे विरुध्द दि.08/11/2016 रोजी एकतर्फा आदेश पारित करण्यात आला.
3. विप क्र.2 यांना सदर तक्रारीबाबत नोटीस पाठवण्यात आली असता विप क्र.2 यांनी नोटीस मिळूनही गैरहजर राहिल्याने त्यांचे विरुध्द दि.24/08/2016 रोजी एकतर्फा आदेश पारित करण्यात आला.
4. तक यांची तक्रार, सोबत दाखल केलेली कागदपत्रे, विप यांचे म्हणणे व उभयतांचा युक्तिवाद यांचा विचार करता आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात आम्ही त्यांची उत्तरे त्यांचे समोर खाली दिलेल्या कारणांसाठी लिहिली आहेत.
मुद्दे उत्तरे
1) तक विप चा ग्राहक आहे काय ? होय.
2) विप ने सेवेत त्रुटी केली आहे काय ? होय.
3) तक अनुतोषास पात्र आहे काय ? होय.
4) आदेश कोणता ? शेवटी दिलप्रमाणे.
कारणमिमांसा
मुद्दा क्र.1 ते 3 :
5. तक ने दाखल केलेली तक्रार विप क्र. 1 ने केलेल्या कथीत सेवेतील त्रुटीबाबत आहे. विप क्र. 2 हे विप क्र.1 चे वरिष्ठ कार्यालय आहे. तक च्या तक्रारीतील सारांश असा की तक ला मंजूर असलेले कर्ज रु.4,00,000/- त्याला मिळाले नाहीत परंतु विप क्र.1 ने त्यांची फाईल मधील कागदपत्र बदलून रु.3,00,000/- चे कर्ज मंजूर पत्र तयार केले. सदरचे मंजूर केलेले पत्र विप क्र. 1 ने संगमेश्वर ट्रेडर्स, ईट यांचेकडे परस्पर जमा केले मात्र तक ते मिळालेले नाही तसेच ज्या दुकानदाराकडे सदरची रक्कम जमा झाली त्यांनी व्यवसायासाठी तक याला कोणताही माल दिलेला नाही त्यामुळे तक व्यवसाय चालू करु शकला नाही. तक ने सदरचे कर्ज हे व.ना.वि.जा. व भ. ज. विकास महामंडळ मर्या. उस्मानाबाद मिळणा-या अनुदानावर अवलंबून तसेच स्वगुंतवणूकीतून भरणेची मागणी केली होती. त्यामुळे तक च्या म्हणणे नुसार तक यांनी 1 लक्ष जमा केले आहेत. जी सेवा भांडवल या स्वरुपात आहेत व व.ना.वि.जा. व भ. ज. विकास महामंडळ मर्या. उस्मानाबाद यांच्या कडून रु.1,00,000/- मिळणे आवश्यक होते तसेच मंजूर झालेली रक्कम त्याला मिळणे आवश्यक आहे या संदर्भात विप ला नोटीस काढुनही विप क्र. 1 व 2 अनुपस्थितीत राहिले आहेत त्यामुळे त्यांचे विरुध्द विप विरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आले. त्यामुळे तक ची तक्रार ही फक्त दाखल कागदपत्राच्या अनुषंगाने पडताळून पाहण्यात आली. तक ने दाखल केलेली कागदपत्रे ज्यामध्ये बँकेचे कर्ज मंजूरी पत्र आहे. त्यावर रु.4,00,000/- एवढे कर्ज मंजूर असल्याबाबतचे पत्र रेफरंन्स क्र.120/12 व तारीख 22/10/2012 अशी असलेली दिसुन येते. परंतु त्यानंतर दुसरे पत्र टर्म लोन रु.3,00,000/- चे तक ने दाखल केलेले आहे जे त्याला विप ने दिलेले असावे तथपि त्यावर सदरचे पत्र दि.25/02/2013 असल्याचे दिसुन येते परंतु त्यावर कोठेही ऑफिसीअली सही दिसुन येत नाही व त्यामुळेच सदरचे पत्र हे अर्थात अपुर्ण असल्याचे दिसुन येते. हे खरे की तक ने भांडवल अनुदान योजना अंतर्गत कर्ज मागणी केली असल्याने त्यात बीज भांडवल हे 25 टक्के इतके असते त्यामुळे तक ला रु.4,00,000/- एवढे कर्ज रक्कम मंजूर झाले आहे इथपर्यत तक्रार कागदपत्रांच्या पडताळणीअंती स्पष्ट झाल्याची दिसुन येते. प्रकल्प अहवाल तक ने दाखल केला नाही परंतु व. ना. वि. जा. व भ. ज. विकास महामंडळ मर्या. उस्मानाबाद यांना मागणी केलेल्या कर्ज रक्कमेच्या तपशिलामध्ये फक्त रु.4,00,000/- एवढया रक्कमेचा उल्लेख दिसुन येतो. तक ने दि.16/06/2016 चा मेल दाखल केला आहे. त्यामध्ये बँकेच्या वरिष्ठ कार्यालयाने हे स्पष्ट केले आहे की शाखेने रु.4,00,000/- एवढे लोन मंजूर केले असून रु.1,00,000/- मार्जिन मनीचे म्हणून व.ना.वि.जा. व भ. ज. विकास महामंडळ मर्या. उस्मानाबाद यांच्याकडून येणे होते ते न आल्यामुळे तक ने स्वत: रु.1,00,000/- भरल्याचे कबूल केले आहे. सदरची रक्कम ही बँकेचे एस.बी.एच. या शाखेत पडून असल्याबाबत निवेदन केले आहे. त्यानंतर पुढे असे ही म्हंटलेले आहे की व. ना. वि. जा. व भ. ज. विकास महामंडळ मर्या. उस्मानाबाद यांच्याकडून दि.19/05/2016 रोजी जमा झाले आहे जे की पेंन्डींग आहे व या संदर्भात सुचना शाखेला केलेली आहे. सदरचे पत्र हे दि.16/06/2016 रोजी बँकेस प्राप्त झालेले आहे. हे पत्र शाखेने तक ला दाखवले असता तक ने त्यावर बँकेने माझी फसवणूक केलेली आहे असा मजकूर लिहिलेला दिसुन येतो. दाखल तक्रारीवर विप क्र.1 व 2 चा से नसल्याने हे पत्रच बँकेचा से या स्वरुपात हे न्यायमंच वाचन करत आहे. विप ने दाखल केलेला मेल वरिल पत्र व्यवहार तक ची तक्रार व विप ने दिलेली सेवा या दोन्ही बाबी स्पष्ट करतात. विप ने रक्कम रु.4,00,000/- एवढे कर्ज मंजूर केले याबाबतचे जे निवेदन केले आहे ते खरे आहे. तक चे विप कडे एकूण जमा असलेली रक्कम स्वत: गुंतवणूक म्हणून रु.1,00,000/- व या नंतर बीज भांडवल या स्वरुपात व.ना.वि.जा. व भ. ज. विकास महामंडळ मर्या. उस्मानाबाद यांच्याकडून मिळालेले रु.1,00,000/- असे रु.2,00,000/- विप ला दाखवून व व. ना. वि. जा. व भ. ज. विकास महामंडळ मर्या. उस्मानाबाद यांच्याकडून मिळण्याची होती असे दिसुन येते. हे खरे की व.ना.वि.जा. व भ. ज. विकास महामंडळ मर्या. उस्मानाबाद यांच्याकडून मिळालेली रक्कम ही खुप उशीरा म्हणजेच दि.19/05/2012 रोजी मिळण्याची होती/आहे या दोन्ही कार्यालयांचा ऐकमेकात नसलेला सुसंवादाने तक यांचा चार वर्षाचा कालावधी गेल्याचे दिसुन येते. वास्तवीक पाहता हे विप यांच्या कडून रक्कम रु.1,00,000/- येण्याच्या आगोदरच तक ने दि.12/03/2013 रोजी स्व भांडवल विप ला दिले होते. त्यानुसार विप ने सर्व बाबींची शाहनिशा करुन तक ला रु.3,00,000/- एवढे कर्ज देणे अपेक्षित होते तक च्या म्हणण्यानुसार विप ने सदर रक्कम ही परस्पर अहवालामध्ये नसलेल्या संगमेश्वर ट्रेडर्स या दुकानदारास दिली व सदर दुकानदाराने त्याबद्दल कोणतेही साहित्य तक ला दिलेले नाही हया बाबत विप चे म्हणणे रेकॉर्डवर दिलेले नाही त्यामुळे पडताळून पाहता आलेले नाही. परंतु विप ने संधी असूनही म्हणणे दिलेले नसल्यामुळे उपलब्ध कागदपत्रावरुन तक चे म्हणणे खरे असल्याबाबत हे न्यायमंच मंजूरी देते व मुद्दा क्र. 1 ते 3 चे उत्तर होकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
1) विप ने प्रकल्प अहवालामध्ये नमुद कोटेशनवर नाव नसतांना संगमेश्वर ट्रेडर्स यांना दिलेली रक्कम ही कोणत्याही स्वरुपाची पडताळणी न करता दिल्याचे दिसुन येते सबब सदरची रक्कम ही जर अशा स्वरुपात दिली असेल तर विप ने संबंधीता कडून हया रकमेचे सामान तक ला दिल्याबाबतचा पुरावा ताब्यात घ्यावा अन्यथा ही रक्कम तक च्या कर्ज खात्यात विप क्र. 1 व 2 यांनी जमा करावी.
2) विप क्र.1 व 2 यांनी तक याला संयुक्तरित्या किंवा स्वतंत्ररित्या या तक्रारीचा खर्च म्हणून रु.5,000/- (रुपये पाच हजार फक्त) द्यावा.
3) उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी आदेश दिल्या तारखेपासुन तीस दिवसात करुन, विप यांनी तसा अहवाल 45 दिवसात मा.मंचासमोर सादर करावा, सदरकामी उभय पक्षकारांनी मंचात हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदाराने तसा अर्ज द्यावा.
4) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
5) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे दाखल तक्रारीतील मा.सदस्यां करीता असलेले संच तक्रारदाराने परत न्यावेत.
(श्री.मुकुंद.बी.सस्ते) (श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.