3. तक्रारकर्ता व विरूध्द पक्ष यांच्या परस्पर विरोधी कथनांवरून तक्रारीच्या निर्मीतीसाठी खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष व कारणमिमांसा खालीलप्रमाणेः- अ.क्र. | मुद्दे | निर्णय | 1. | विरूध्द पक्षाने सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार केला आहे काय? | नाही | 2. | तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहे काय? | नाही | 3. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | अंतिम आदेशाप्रमाणे |
- कारणमिमांसा – 4. मुद्दा क्रमांक 1 बाबतः- तक्रारकर्त्याचे तक्रारीत नमूद बचत खाते विरूध्द पक्ष बँक ऑफ बडोदाच्या तुमसर शाखेत असून सदर खात्यातून पैसे काढण्यासाठी विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्यास एटीएम कार्ड दिले असल्याबाबत वाद नाही. तक्रारकर्त्याच्या अधिवक्त्यांचा युक्तिवाद असा की, दिनांक 01/10/2015 रोजी 16.48 वाजता तक्रारकर्त्याने रू.10,000/- काढण्यासाठी विरूध्द पक्षाच्या एटीएम मध्ये कार्ड टाकून प्रक्रिया पूर्ण केली असता पैसे निघाले नाही मात्र त्याच्या बचत खात्यातून रू.10,000/- कमी झाले आणि त्याप्रमाणे पावती प्राप्त झाली. याबाबत तक्रारकर्त्याने ताबडतोब विरूध्द पक्षाच्या शाखेत जाऊन तक्रार केली असता त्यांनी टोल फ्री नंबर वर तक्रार नोंदविण्यास सांगितले. त्याप्रमाणे तक्रारकर्त्याने आपली तक्रार नोंदविली आणि त्याबाबत विरुध्द पक्षाला माहिती दिली आणि एटीएम केअर सेंटरच्या निर्देशाप्रमाणे बँकेतर्फे देखिल तक्रार नोंदविण्यात आली. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास सांगितले की जर एटीएम मधून रक्कम निघाली नसेल तर तुमच्या खात्यात आपोआप जमा होईल. त्यानंतर दिनांक 17/12/2015 रोजी सीसीटीव्ही फुटेज तपासून तक्रारकर्त्याने पैसे काढले किंवा नाही याची खात्री करण्याची विनंती केली. विरुध्द पक्षाने सीसीटीव्ही फुटेज दाखविले परंतु त्यात पैसे मिळाले किंवा नाही हे स्पष्ट दिसले नाही म्हणून इतर सीसीटीव्ही कॅमे-यामधून चित्रीकरण तपासण्याची तक्रारकर्त्याने विनंती करुनही ती विरुध्द पक्षाने नाकारली. तसेच एटीएम मशीनमध्ये भरलेली रक्कम व मशीन मधून देण्यात आलेली रक्कम याचा हिशोब देण्याची विनंती केली परंतु विरुध्द पक्षाने ती देखिल नामंजुर केली. तक्रारकर्त्याला एटीएम मधून रुपये 10,000/- न मिळताच तेवढी रक्कम तक्रारकर्त्याच्या खात्यातून कमी होवून व्यवहार सफल झाल्याची पावती मिळाली आणि त्यानंतर तक्रारकर्त्याने विनंती करुनही विरुध्द पक्षाने एटीएम मधून तक्रारकर्त्यास न मिळालेली व त्याच्या खात्यास नांवे टाकण्यात आलेली रक्कम रुपये 10,000/- परत मिळण्याची मागणी करुनही ती दिली नाही. सदरची बाब बँक ग्राहकाप्रती सेवेतील न्युनता आहे. याउलट विरूध्द पक्षाच्या अधिवक्त्यांचा युक्तिवाद असा की, तक्रारकर्त्याने दिनांक 1/10/2015 रोजी 16.48 वाजता त्याच्या कार्डचा वापर करून खात्यातील रू.10,000/- काढण्यासाठी प्रक्रिया पूर्ण केली तेव्हा मशीनमधून रू.10,000/- देण्यांत आले आणि सदर रक्कम त्याच्या खात्यातून वजा करून रुपये 3,76,127/- शिल्लक दाखविण्यात आली. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे एटीएम मधून पैसे न मिळता रुपये 10,000/- खात्यातून कमी झाल्याबाबतची तक्रार दाखल केल्यानंतर त्यास टोल फ्री नंबरवर तक्रार दाखल करण्याचा विरुध्द पक्षाने सल्ला दिला आणि त्यानंतर एटीएम केअर सेंटर कडे तक्रारकर्त्याच्या सांगण्याप्रमाणे तक्रार पाठविली. एटीएम केअर सेंटर कडून चौकशी करण्यात आल्यानंतर तक्रारकर्त्याचा व्यवहार यशस्वी होवून एटीएम मधून पैसे देण्यात आल्याचे कळविण्यात आले तसेच एटीएम मध्ये न निघालेली कोणतीही रक्कम शिल्लक नसल्याचे एटीएम मध्ये पैसे भरणा-या LOGICASH SOLUTION PRI. LTD या संस्थेने विरुध्द पक्ष बँकेला कळविले. No access cash certificate and CBR report विरुध्द पक्षाने दस्त क्र.2 वर आणि Cash Balance Report दस्त क्र.8 वर दाखल केला आहे तसेच ‘complaint status report’ दस्त क्र.9 वर दाखल केला आहे. त्यात,“ Successful as per EJ – customer received money” असे नमुद आहे. वरील सर्व माहिती तक्रारकर्त्यास पुरविली आहे तसेच त्यांच्या मागणीप्रमाणे सीसीटीव्ही फुटेज देखिल दाखविण्यात आले आहे. तक्रारकर्त्यास एटीएम मधून रुपये 10,000/- ची रक्कम देण्यात आली असल्यामुळे त्याच्या मागणीप्रमाणे ती विरुध्द पक्षाने परत करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही व म्हणून विरुध्द पक्षाकडून सेवेत कोणताही न्युनतापुर्ण व्यवहार झालेला नाही. तक्रारकर्ता व विरूध्द पक्षाच्या अधिवक्त्यांचा युक्तिवाद आणि दाखल दस्तावेजांवरून हे दिसून येते की, तक्रारकर्त्याने दिनांक 01/01/2015 रोजी विरूध्द पक्ष बँकेच्या एटीएम मध्ये कार्डचा वापर करून 16.48 वाजता एटीएम मधून रू.10,000/- काढण्यासाठी कार्ड टाकून प्रक्रिया पूर्ण केली तेव्हा तक्रारकर्त्याच्या खात्यातून रू.10,000/- कमी करून रू.3,76,127/- शिल्लक बाकी दर्शविणारी पावती तक्रारकर्त्यास प्राप्त झाली. तक्रारकर्त्याचे म्हणणे असे की, त्याला प्रत्यक्षात रू.10,000/- ची रक्कम मिळाली नाही मात्र एटीएम मशीनमधील चुकीमुळे त्याच्या खात्यातील बाकी कमी करण्यांत आली. विरुध्द पक्षाने दिनांक 01/01/2015 रोजीच्या एटीएम व्यवहाराच्या पावत्यांची प्रत दस्त क्र.1 वर दाखल केली आहे. त्यातील एटीएम व्यवहाराच्या स्लिपचे अवलोकन केले असता खालीलप्रमाणे व्यवहार दिसून येतात. - 16.46 वाजता कार्ड क्रमांक 485....151 रुपये 15,000/- विड्रावलचा व्यवहार पूर्ण
झाला. - 16.48 वाजता कार्ड क्रमांक 606....7012 (तक्रारकर्ता) रू.10,000/- विड्रावल होऊन
शिल्लक बाकी रू.3,76,127/- दर्शविण्यात आली. - 16.52 वाजता कार्ड क्रमांक 622....0639. खात्यात पुरेशी शिल्लक नसल्याने
विड्रावल नाकारण्यात आला. - 16.53 वाजता कार्ड क्रमांक 606...2647. रू.1500/- विड्रावल (व्यवहार पूर्ण).
वरील व्यवहारांचे अवलोकन केले असता दिनांक 01/01/2015 रोजी तक्रारकर्त्याने विड्रावल व्यवहार करण्यापूर्वी आणि त्याच्या विड्रावल व्यवहारानंतरही एटीएम मशीन मधून यशस्वी व्यवहार झाले आहेत आणि त्याप्रमाणे प्रत्येकला एटीएम स्लिप देण्यांत आली आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याच्या विड्रावल व्यवहाराचे वेळी एटीएम मशीन मध्ये दोष असल्याच्या तक्रारकर्त्याच्या आरोपात तथ्थ्य दिसत नाही. वरीलप्रमाणे एटीएम मशीन मध्ये संबंधित वेळी कोणताही दोष नव्हता. तक्रारकर्त्याने रू.10,000/- विड्रावलची command दिल्यानंतर सदर command प्रमाणे एटीएम मशीनमधून रू.10,000/- दिल्याने व्यवहार यशस्वी झाल्याची नोंद एटीएम रेकॉर्डमध्ये उपलब्ध आहे. तक्रारकर्त्याच्या मागणी प्रमाणे विरुध्द पक्षाने सीसीटीव्ही फुटेज देखिल तक्रारकर्त्यास दाखविले. त्यात तक्रारकर्ता पावती घेतांना दिसत आहे परंतु त्याला पैसे मिळाले किंवा नाही हे स्पष्ट दिसत नाही. एवढयाच कारणावरुन सदर एटीएम व्यवहाराचे पैसे तक्रारकर्त्यास मिळाले नाही असा निष्कर्ष काढता येत नाही. केवळ सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून न देणे ही सेवेतील न्यूनता ठरता नाही असा अभिप्राय मा. राष्ट्रीय आयोगाने Revision Petition NO. 3182 of 2008 – SBI v/s K. K. Bhalla (Decided on 4th April, 2014 या प्रकरणात दिला आहे. वरीलप्रमाणे एटीएम व्यवहाराच्या नोंदीप्रमाणे तक्रारकर्त्याचा व्यवहार यशस्वी होवून त्यास रुपये 10,000/- देण्यात आल्याची computerized नोंद उपलब्ध असतांना आणि ती खोटी ठरविण्यासाठी अन्य कोणताही पुरावा नसतांना सदर नोंद खोटी आहे हे तक्रारकर्त्याचे म्हणणे निराधार ठरते व म्हणूनच ते ग्राहय धरता येत नाही. एटीएम मधील नोंदीप्रमाणे तक्रारकर्त्यास रुपये 10,000/- देण्यात आल्याचे सिध्द् होत असल्यामुळे ती रक्कम तक्रारकर्त्याच्या मागणी प्रमाणे परत करण्याची विरूध्द पक्षावर कोणतीही कायदेशीर जबाबदारी नसल्याने ती परत केली नाही म्हणून विरूध्द पक्षाकडून सेवेत कोणताही न्यूनतापूर्ण व्यवहार किंवा अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब झाल्याचे सिध्द होत नाही. म्हणून मुद्दा क्रमांक 1 वरील निष्कर्ष नकारार्थी नोंदविला आहे. 5. मुद्दा क्रमांक 2 व 3 बाबतः– मुद्दा क्रमांक 1 वरील निष्कर्षाप्रमाणे विरूध्द पक्षाकडून सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार झाला नसल्याने तक्रारकर्ता मागणी केलेली कोणतीही दाद मिळण्यास पात्र नाही. म्हणून मुद्दा क्रमांक 2 व 3 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविले आहेत. वरील निष्कर्षास अनुसरुन खालील आदेश पारित करण्यात येत आहे. // अंतिम आदेश // तक्रारकर्त्याची ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 च्या कलम 12 खालील तक्रार खारीज करण्यांत येते. 1. तक्रार खारीज. 2. तक्रारीचा खर्च ज्याचा त्याने सोसावा. 2. आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामूल्य पुरविण्यात यावी. 3. प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ प्रत तक्रारकर्त्यास परत करावी. |