जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – ५२/२०१३ तक्रार दाखल दिनांक – ०१/०७/२०१३
तक्रार निकाली दिनांक – १६/०१/२०१५
श्री. साहेबराव भिका पाटील
उ.व.- ६०, धंदा – शेती,
राह. – विखरण, ता.शिरपुर, जि.धुळे . तक्रारदार
विरुध्द
१. मा.शाखाधिकारी सो.,
कबाल जनरल इन्शु. सर्व्हिसेस प्रा.लि.
४ अे, देहमंदिर को – ऑप – हौसिंग
- , श्रीरंगनगर, पंपीग स्टेशन रोड,
गंगापुर रोड, नाशिक ४२२००२
२. मा.शाखाधिकारी सो.,
दि.न्यु इंडिया एश्यु. कंपनी,
मं.का. क्रमांक १३०८००, न्यु इंडिया
सेंटर सातवा माला, १७-ए, कुपरेज रोड
मुंबई – ४०० ०३९.
३. मा.शाखाधिकारी सो.,
दि इंडिया एश्यु. कंपनी, लि.
नाशिककर कॉम्प्लेक्स, राणाप्रताप चौक
स्वस्तिक टॉकी जवळ, धुळे . सामनेवाला
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
(मा.सदस्या – सौ.के.एस. जगपती)
उपस्थिती
(तक्रारदारातर्फे – अॅड.श्री.डी.डी. घरटे)
(सामनेवाला क्र.२ तर्फे – अॅड.श्री.सी.पी. कुलकर्णी)
(सामनेवाला क्र.१ व ३ तर्फे – एकतर्फा)
निकालपत्र
(दवाराः मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
१. सामनेवाले यांनी शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत मिळणारी नुकसान भरपाई दिली नाही, या कारणावरून सदरची तक्रार दाखल केली आहे.
२. तक्रारदार यांनी तक्रारीत म्हटले आहे की, त्यांची पत्नी शेवंताबाई साहेबराव पाटील यांचा दि.१४/०५/२०१२ रोजी राहते घरी अपघाती (जळून) मृत्यू झाला. शासनाने शेतक-यांसाठी व्यक्तिगत अपघात विमा योजना सामनेवाले क्र.३ यांच्यामार्फत लागू केली होती. तक्रारदार यांनी दि.२०/१२/२०१२ रोजी त्याबाबतचा प्रस्ताव तालुका कृषि अधिकारी, शिरपूर यांच्यामार्फत सामनेवालेंकडे पाठविला होता. त्याबाबत सामनेवाले क्र.१ व २ यांच्याशी संपर्क साधला असता सामनेवाले क्र.१ व २ यांनी काहीही उत्तर दिले नाही अथवा विम्याची रक्कम हि अदा केली नाही. तसेच सामनेवाला यांनी प्रस्ताव उशिरा का पाठविला याबाबत म्हणणे मागविले होते. त्याबाबत तक्रारदार यांनी सामनेवाला विमा कंपनीला तालुका कृषि अधिकारी, शिरपूर यांचे मार्फेत प्रस्ताव उशिरा दाखल करण्याचे कारणे दिली होती. त्यात त्यांनी नमूद केले होते की, आम्ही अशिक्षित आहोत. आम्हाला या योजनेबाबत कुठलीही माहिती नव्हती. सदरची माहिती मला उशिरा मिळाली. तसेच कागदपत्रांची जमवा-जमव करणेस उशिर लागल्याने, सदरचा प्रस्ताव मी उशिराने दाखल केला असे कळविले. त्यानंतर दि.१८/०६/२०१३ रोजी सामनेवाला क्र.३ यांनी विमा प्रस्ताव वेळेत पाठविला नसल्यामुळे विमा क्लेम नाकारला आहे. सामनेवाले यांच्याकडून शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत रूपये १,००,०००/- व विमा रकमेवर दि.२०/१२/२०१२ पासून द.सा.द.शे. १८ टक्के प्रमाणे व्याज आणि शारीरिक, आर्थिक व मानसिक त्रासापोटी रूपये ५०,०००/- व तक्रारीचा खर्च रूपये ५,०००/- मिळावा अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे.
३. तक्रारीसोबत तक्रारदार यांनी नि.५ सोबत नि.५/१ वर पोलिसांना दिलेली खबर, नि.५/२ वर घटनास्थळाचा पंचनामा, नि.५/३ वर मरणोत्तर पंचनामा, नि.५/४ वर शवविच्छेदन अहवाल, नि.५/५ वर मृत्यू प्रमाणपत्र, नि.५/६ वर फेरफार नोंदीची प्रत, नि.५/७ वर सातबारा उतारा, नि.५/८ वर ता.कृषी अधिकारी यांचेकडे प्रस्ताव दाखल केल्याबाबतची पोच आदी कागदपत्रांच्या छायांकीत प्रती दाखल केल्या आहेत.
४. सामनेवाले क्र. २ यांनी हजर होवून खुलासा दाखल केला. त्यात म्हटले आहे की, विमा पॉलिसीची मुदत ही दि.१५/०८/२०११ ते दि.१४/०८/२०१२ अशी होती. तक्रारदार यांच्या पत्नीचे निधन १४/०५/२०१२ रोजी झाले होते. पॉलिसीतील कराराप्रमाणे मुदत संपल्यानंतर जास्तीत जास्त ९० दिवसात क्लेम सामनेवाल्याकडे पाठविण्यासाठी तालुका शेतकी अधिका-याकडे सादर करणे आवश्यक असते. परंतु तक्रारदारने त्याचा क्लेम दि.२०/१२/२०१२ रोजी सादर केला. पॉलिसीची मुदत संपल्यानंतर जास्तीत जास्त ९० दिवसांच्या आत म्हणजे दि.१२/११/२०१२ रोजी अथवा त्यापूर्वी तक्रारदाराने क्लेम सादर करणे आवश्यक होते. परंतु क्लेम दि.२०/१२/२०१२ रोजी म्हणजे विहीत मुदत संपल्यावर एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीत उलटल्यानंतर दाखल झाला. त्यामुळे सदरचा क्लेम मुदतबाह्य असल्यामुळे विमा कंपनीने मंजुरीसाठी विचारात घेतला नाही व नाकारला. त्यात सेवेतील कुठलीही त्रुटी नाही. या कारणामुळे तक्रारदाराची तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी, अशी मागणी सामनेवाले यांनी केली आहे.
५. मंचाची नोटीस मिळाल्यावरही सामनेवाले क्र.१ व ३ हे हजर झाले नाहीत व त्यांनी मुदतीत खुलासाही दाखल केला नाही. त्यामुळे त्यांच्याविरूध्द ‘एकतर्फा’ आदेश पारीत करण्यात आला.
६. तक्रारदार यांची तक्रार, त्यासोबत दाखल केलेली कागदपत्रे, सामनेवाले यांनी दिलेला खुलासा आणि उभयपक्षाच्या विद्वान वकिलांनी केलेला युक्तिवाद पाहता आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
. मुद्दे निष्कर्ष
अ तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? होय
ब. तक्रारदार हे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ
सामनेवाले क्र.२ व ३ यांच्याकडून मिळण्यास
पात्र आहेत काय ? होय
क. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
७. मुद्दा ‘अ’- सामनेवाले यांनी त्यांच्या जबाबात सदर शेतकरी अपघात विमा योजना नाकरलेली नाही. तसेच तक्रारदार हे मयत शेवतांबाई साहेबराव पाटील यांचे पती आहेत ही बाब नाकारलेली नाही. तक्रारदार हे मयताचे कायदेशीर वारस असल्याने सामनेवाला यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुददा क्र.’अ’ चे उत्तर होकारार्थी देण्यात आले आहे.
८. मुद्दा ‘ब’ – तक्रारदार यांच्या पत्नीचा राहत्या घरी अपघाती मृत्यू झालेला आहे. याबाबत तक्रारदार यांनी पोलीसांकडे कागदपत्र दाखल केले आहेत. दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता दि.१४/०५/२०१२ रोजी तक्रारदार यांच्या पत्नी शेवंताबाई साहेबराव पाटील यांचा राहते घरी अपघाती (जळून) मृत्यू झाला असून त्याबाबतचे पोलीसांकडे कागदपत्र व शवविच्छेदन अहवाल नि.५/१ ते नि.५/५ पर्यंत दाखल केलेले आहेत. त्यानंतर तक्रारदार यांनी विमा क्लेम रक्कम मिळणेकामी सामनवाले यांच्याकडे दि.२०/१२/२०१२ रोजी तालुका कृषी अधिकारी, शिरपूर यांच्याकडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज केला. सदर अर्ज नि.५/८ वर दाखल केलेला आहे. सदरचा क्लेम मुदतबाह्य असल्यामुळे विमा कंपनीने मंजुरीसाठी विचारात घेतला नाही व नाकारला असे दि.१८/०६/२०१३ रोजीच्या पत्राने कळविले आहे.
त्याबाबत तक्रारदार यांच्या पत्नीचे निधन हे दि.१४/०५/१२ रोजी झालेले असून शासन तरतुदीप्रमाणे व त्रिपक्षीय कराराप्रमाणे पॉलिसीची मुदत संपल्यावर जास्तीत जास्त ९० दिवसाच्या आत क्लेम सामनेवालेंकडे पाठविण्यासाठी तालुका शेतकरी अधिका-याकडे सादर करणे आवश्यक आहे. परंतु तक्रारदार यांनी दि.२०/१२/२०१२ रोजी मुदत संपल्यानंतर एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीनंतर सदर क्लेम दाखल केलेला आहे असे सामनेवाले यांचे म्हणणे आहे.
याबाबत आमचे असे मत आहे की तक्रारदार यांनी संबंधीत कृषी अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव हा दि.२०/१२/२०१२ रोजी पाठविला आहे. त्यामध्ये तक्रारदार यांनी सामनेवाला विमा कंपनीला तालुका कृषि अधिकारी, शिरपूर यांचे मार्फेत प्रस्ताव उशिरा दाखल करण्याचे कारणे दिली होती. त्यात त्यांनी नमूद केले होते की, आम्ही अशिक्षित आहोत. आम्हाला या योजनेबाबत कुठलीही माहिती नव्हती. सदरची माहिती मला उशिरा मिळाली. तसेच कागदपत्रांची जमवा-जमव करणेस उशिर लागल्याने, सदरचा प्रस्ताव मी उशिराने दाखल केला असे कळविले आहे. या कारणांचा विचार करता व नैसर्गिक न्याय तत्वाचा विचार करता सामनेवाले यांनी तक्रारदाराचा प्रस्ताव हा मंजूरीसाठी विचारात घेणे आवश्यक होते. परंतु सामनेवाले यांनी प्रस्ताव विचारात न घेता नाकारलेला आहे. यावरून सामनेवाले यांनी केवळ तांत्रीक कारणांचा आधार घेवून तक्रारदाराचा क्लेम नाकरला आहे असे दिसते. सदर बाबींवरून सामनेवालें क्र. २ व ३ यांची सेवेत त्रुटी स्पष्ट होते.
तक्रारदार यांनी नि.५/६ वर फेरफार नोंदीची प्रत व नि.५/७ वर सातबारा उतारा दाखल केलेला आहे. या वरील नोंदी पाहता अर्जदाराचे नाव मालक सदरी लागलेले आहे. सबब मयत ही तक्रारदाराची पत्नी असल्याने त्या अपघाताच्या वेळी शेतकरी होत्या हे स्पष्ट होत आहे.
वरील सर्व कारणांचा व परिपत्रकांचा विचार होता सामनेवाले यांनी केवळ तांत्रिक बाबींचा आधार घेऊन तक्रारदार यांचा क्लेम नाकारला आहे. त्यामूळे सामनेवाला यांनी सेवा देण्यात कमतरता केली आहे असे मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा ‘ब’ चे उत्तर होकारार्थी देण्यात आले आहे.
शासन परिपत्रकाप्रमाणे शेतक-यांचा अपघाती मृत्यू झाल्यास सामनेवाला क्र.२ व ३ यांनी रक्कम रू.१,००,०००/- ची विमा जोखीम स्वीकारलेली आहे हे स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारदार हे सदर रक्कम व्याजासह मिळण्यास पात्र आहेत. याचा विचार होता तक्रारदार हे सामनेवाला क्रं.२ व ३ यांचेकडून विमा क्लेमपोटी रक्कम रू.१,००,०००/- सामनेवालेंनी क्लेम नाकारलेल्या दि.१८/०६/२०१३ पासून रक्कम फीटेपर्यंत द.सा.द.शे.९ टक्के दरा प्रमाणे व्याजासह अशी एकूण रक्कम मिळण्यास पात्र आहेत असे या न्यायमंचाचे मत आहे.
तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडून मानसिक, आर्थिक, शारिरिक त्रास व अर्जाच्या खर्चाची मागणी केली आहे. सामनेवाला क्रं.२ व ३ यांनी कोणत्याही तांत्रीक बाबीचा आधार न घेता तक्रारदाराचा विमा क्लेम योग्य वेळेत मंजूर केलेला नाही. त्याकामी तक्रारदार यांना या ग्राहक मंचात दाद मागावी लागलेली आहे. वरील कारणामुळे तक्रारदारास निश्चितच मानसिक त्रास व खर्च सहन करावा लागलेला आहे याचा विचार होता, तक्रारदार हे सामनेवाला क्र.२ व ३ यांचेकडून मानसिक त्रासापोटी रू.१,०००/- व अर्जाचा खर्च रू.१,०००/- मिळण्यास पात्र आहेत असे या न्यायमंचाचे मत आहे.
शासन तरतुदीप्रमाणे व त्रिपक्षीय कराराप्रमाणे पॉलिसीचा प्रस्ताव तालुका शेतकरी अधिका-याकडे सादर करणे आवश्यक आहे. केवळ विमा प्रस्ताव स्विकारणे व त्याची तपासणी करून पुढील कार्यवाहीसाठी विमा कंपनीकडे पाठवणे एवढीच जबाबदारी सामनेवाले क्र.१ यांची दिसत आहे. त्यामुळे त्यांच्यावर विमा क्लेम देण्याची जबाबदारी नाही. सबब सामनेवाला क्रं.१ यांचे विरूध्द सदर तक्रार अर्ज नामंजूर करण्यात यावा असे या न्यायमंचाचे मत आहे.
९. मुद्दा ‘क’ - तक्रारदार व सामनेवाले यांचे अर्ज, प्रतिज्ञापत्र व दाखल केलेली सर्व कागदपत्रे व दोन्ही वकीलांचा युक्तिवाद तसेच वरील सर्व विवेचन यांचा विचार होऊन पुढील प्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
आ दे श
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येत आहे.
२. सामनेवाला क्रं.१ यांच्या विरूध्द अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
३. सामनेवाला क्रं.२ व ३ यांनी, सदर आदेश प्राप्तीपासून पुढील तीस दिवसांचे आत, तक्रारदारांना खलील प्रमाणे रक्कमा दयाव्यात.
- विमा क्लेमपोटी रक्कम रू.१,००,०००/- (अक्षरी रूपये एक लाख मात्र)
व या रकमेवर सामनेवालेंनी क्लेम नाकारलेल्या दि.१८/०६/२०१३ पासून रक्कम फीटेपर्यंत द.सा.द.शे.९ टक्के दराने संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत व्याज दयावे.
- मानसिक त्रासापोटी रक्कम रू.१,०००/- (अक्षरी रू. एक हजार मात्र)
व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रू.१,०००/- (अक्षरी रू. एक हजार मात्र)
धुळे.
दिनांक १६/०१/२०१५.
(सौ.के.एस. जगपती) (श्री.एस.एस. जोशी) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.