न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 11 व 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे जीवन सरल विमा पॉलिसी घेतलेली होती. सदर पॉलिसीचा क्र. 947589918 असा असून कालावधी दि. 15/8/2008 ते 15/8/2018 असा होता व आहे. सदर विमा पॉलिसीचा वार्षिक हप्ता रक्कम रु. 19,216/- असा होता. सदर विमा योजनेतील तरतुदीनुसार विमाधारकास रक्कम रु.4,00,000/- पर्यंतची भरपाई देण्याची खात्री वि.प. यांनी दिलेली होती. तथापि विमाधारक यांनी सदर विमा योजनेच्या कालावधीमध्ये कोणताही लाभ घेतलेला नाही. सदर योजनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे विमा योजनेची मुदत पूर्ण होईपर्यंत सदर विमाधारक हयात असलेस अशा प्रसंगी सदर वि.प. हे विमाधारकास त्याने जमा केलेल्या रक्कम अधिक तेवढीच वि.प यांचेकडील रक्कम विमाधारकास देय लागतील अशी खात्री दिली होती. म्हणजेच तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे जमा केलेली रक्कम रु.1,92,160/- व तेवढीच वि.प. यांचेकडील रक्कम रु.1,92,160/- अशी एकूण रक्कम रु.3,84,320/- वि.प. हे तक्रारदार यांना अदा करणेस बांधील आहेत. म्हणून तक्रारदार यांनी दि. 23/8/2018 रोजी वि.प. यांचेकडे रक्कम रु. 3,84,320/- ची मागणी केली. परंतु वि.प. यांनी सदरची रक्कम तक्रारदार यांना आजपावेतो अदा केलेली नाही. वि.प. यांचे सदरचे कृत्य हे अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब करणारे आहे. म्हणून, तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रारअर्ज या मंचात दाखल केला आहे.
2. प्रस्तुतकामी तक्रारदाराने वि.प. यांचेकडून विमा रकमेपोटी रक्कम रु. 3,84,320/- व सदर रकमेवर दि. 15/8/20218 पासून होणारे व्याज रु. 7,686/-, मानसिक त्रासापोटी रु. 50,000/- व तक्रारअर्जाचा खर्च रु. 25,000/- मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत अ.क्र.1 ते 12 कडे अनुक्रमे पॉलिसीचे माहितीपत्रक, पॉलिसी प्रत, प्रिमिअम भरलेच्या पावत्या वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. वि.प.क्र.1 व 2 यांनी सदरकामी म्हणणे/कैफियत व अॅफिडेव्हीट, कागदयादीसोबत नेफ्ट पेमेंट एन्क्वायरी, पॉलिसी स्टेटस रिपोर्ट, पॉलसी मॅच्युरिटी डाटाशीट, पॉलिसी प्रिमियम हिस्ट्री, पॉलिसी मॅच्युरिटी डिस्चार्ज व्हाऊचर, पॉलिसी बॉण्ड, कॅन्स्ल्ड चेक, नेफ्ट फॉर्म, महाराष्ट्र दुकाने आस्थापना अधिनियम 1948, तक्रारदाराचे आधार कार्ड, पॅन कार्ड, पेमेंट व्हाऊचर तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. वि.प. क्र.1 व 2 यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. वि.प. यांनी तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.
i) तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्यातील सर्व मजकूर मान्य व कबूल नाही.
ii) जीवन सरल पॉलिसी ही मुदतीनंतर मिळणारी रक्कम, अपघाती मृत्यू जोखीम, मृत्यूनंतर मिळणारी रक्कम तीन बाबींवर आधारित आहे.
iii) मुदतीनंतर तक्रारदार यांना रु. 48,944/- मिळणार असलेची माहिती दिली होती व तसे पॉलिसीमध्ये नमूद केले होते. तरीसुध्दा मुदतीनंतर सर्व लाभासहीत होणारी रक्कम रु.48,944/- व रु. 13,375/- असे एकूण रु. 66,319/- तक्रारदार यांना दिले आहेत. तक्रारदार यांनी दि. 23/7/2018 रोजी डिस्चार्ज व्हाऊचर भरुन घेवून सदर रक्कम कोणतीही तक्रार न करता स्वीकारली आहे. तक्रारदार यांना मुदतीनंतर जमा रक्कम व्याजासह मिळेल असे कधीही सांगितले नव्हते. तक्रारदार यांना पॉलिसी घेताना मुदतींनतर रु.48,944/- तसेच मृत्यू झालेस रु.4,00,000/- व अपघात जोखीम रु. 4,00,000/- मिळतील अशी माहिती दिली होती व तसे पॉलिसीत नमूद आहे. त्यामुळे तक्रारदार मागणी करतात ती रक्कम देणेस वि.प. जबाबदार नाहीत. सबब, तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.
अशा स्वरुपाचे आक्षेप वि.प. यांनी तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.
5. वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | नाही. |
3 | तक्रारदार हे वि.प. यांचेकडून मागणी केलेली रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | नाही. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
6. वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिली आहेत कारण तक्रारदारांनी वि.प. यांचेकडे जीवन सरल विमा पॉलिसी घेतलेली होती. सदर पॉलिसीचा क्र. 947589918 असा असून कालावधी दि. 15/8/2008 ते 15/8/2018 असा होता व आहे. सदर विमा पॉलिसीचा वार्षिक हप्ता रक्कम रु.19,216/- असा होता. सदर विमा पॉलिसीची प्रत तसेच प्रिमिअम भरलेच्या पावत्या याकामी तक्रारदारांनी दाखल केल्या आहेत. सदरची बाब वि.प. यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये मान्य केली आहे. सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द झालेली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. प्रस्तुतकामी तक्रारदारांचे तक्रारअर्जाचे अवलोकन केले असता, तक्रारदार यांनी सदर विमा योजनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे विमा योजनेची मुदत पूर्ण होईपर्यंत सदर विमाधारक हयात असलेस अशा प्रसंगी सदर वि.प. हे विमाधारकास त्याने जमा केलेली रक्कम अधिक तेवढीच वि.प यांचेकडील रक्कम विमाधारकास देय लागतील अशी खात्री दिली होती. म्हणजेच तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे जमा केलेली रक्कम रु.1,92,160/- व तेवढीच वि.प. यांचेकडील रक्कम रु.1,92,160/- अशी एकूण रक्कम रु.3,84,320/- वि.प. हे तक्रारदार यांना अदा करणेस बांधील आहेत. परंतु वि.प. यांनी सदरची रक्कम तक्रारदार यांना आजपावेतो अदा केलेली नाही अशी तक्रारदाराची तक्रार आहे. याउलट वि.प. यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारदार यांना पॉलिसी घेताना मुदतींनतर रु.48,944/- तसेच मृत्यू झालेस रु.4,00,000/- व अपघात जोखीम रु. 4,00,000/- मिळतील अशी माहिती दिली होती व तसे पॉलिसीत नमूद आहे असे कथन केले आहे. सदरकामी तक्रारदाराने पॉलिसीची प्रत दाखल केली आहे. सदर पॉलिसीचे अवलोकन करता, विमाधारक मुदतींनतर रु.48,944/- तसेच मृत्यू झालेस रु.4,00,000/- व अपघात जोखीम रु. 4,00,000/- मिळणेस पात्र आहे असे नमूद केले आहे. सदर पॉलिसीमध्ये कोठेही विमाधारक यांनी वि.प. यांचेकडे जमा केलेली रक्कम व तेवढीच वि.प. यांचेकडील रक्कम अशी एकूण रक्कम विमाधारकास देण्यास वि.प. हे बांधील आहेत असे नमूद नाही. विमा पॉलिसीची मुदत संपलेनंतर वि.प. यांनी तक्रारदार यांना रक्कम रु.48,944/- अदा केली आहे व या रकमेशिवाय अधिक रक्कम रु. 13,375/- अदा केली आहे व ती रक्कम तक्रारदाराने कोणतीही तक्रार न करता स्वीकारली आहे. सबब, पॉलिसीमध्ये नमूद केल्याप्रमाणे वि.प. यांनी तक्रारदार यांना रक्कम अदा केली आहे हे स्पष्टपणे दिसून येते. याचा विचार करता तक्रारदारांनी त्यांचे तक्रारअर्जात वि.प. यांचेकडून मिळावयाचे रकमेबाबत जी कथने केली आहे ती, कथने ही केवळ मोघम कथने आहेत. त्याबाबत कोणताही पुरावा तक्रारदारांनी याकामी दाखल केलेला नाही. सदर कथन शाबीत करण्याची जबाबदारी ही तक्रारदाराची होती. परंतु तक्रारदारांनी आपले कथनांचे पुष्ठयर्थ कोणताही ठोस पुरावा दाखल केलेला नाही. सबब, कोणत्याही पुराव्याअभावी तक्रारदारांचे कथनांवर विश्वास ठेवणे या आयोगास संयुक्तिक वाटत नाही. सबब, तक्रारदारांनी आपली तक्रार शाबीत केलेली नाही या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, तक्रारदाराची तक्रार नामंजूर होण्यास पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्ही नकारार्थी दिले आहे.
8. तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात आल्याने तक्रारदार हे मागणी केल्याप्रमाणे कोणतीही रक्कम मिळण्यास पात्र नाहीत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर आम्ही नकारार्थी दिले आहे.
सबब, प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येतो.
2) खर्चाबाबत आदेश नाहीत.
3) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.