द्वारा- श्रीमती. शुभांगी दुनाखे, सदस्य
(१) तक्रारदारांनी जाबदार क्र. 1 ते 4 यांच्याविरुद्ध सेवेतील त्रुटीबद्दल खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे-
तक्रारदारांच्या कथनानुसार जाबदार क्र. 1 ही आधी वापरलेल्या/जुन्या बीएमडब्ल्यू कार्स विकणारी फर्म असून इतरही लक्झरी ब्रँडच्या कार्स विक्री करतात. जाबदार क्र.2 व 3 हे जाबदार क्र.१ चे भागीदार आहेत. जाबदार क्र. 4 हे बीएमडब्ल्यू कार्सचे उत्पादक आहेत आणि त्यांचे अधिकृत विक्रेते मे. बावरिया मोटर्स हे आहेत. तक्रारदारांनी दि. 20/09/2018 रोजी जाबदार क्र. 1 यांच्या शोरूमसमोर आधी वापरलेल्या कार्स ठेवलेल्या पाहिल्या. सदर कार्स पाहून तक्रारदारांची उत्सुकता वाढली व त्यांनी त्या कार्सबाबत चौकशी केली. त्यांना सदर कार्सपैकी बीएमडब्ल्यू X5 नोंदणी क्र. एम. एच. 14 ईसी 7029 ही कार आवडली. तक्रारदारांनी सदर कार विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली. जाबदार क्र. 2, जे जाबदार क्र. 1 यांचे भागीदार आहेत, त्यांनी सदर कारविषयी तक्रारदारांना संपूर्ण माहिती देऊन कारची किंमत 14.50 लाख असल्याचे सांगितले. त्यांनी असेही सांगितले की, जरी सदर कार आधी वापरलेली जुनी कार असली तरी सदर कार जाबदार क्र 4 यांनी विविध परीक्षा घेऊन प्रमाणित केलेली आहे. तक्रारदारांनी जाबदार क्र. 2 यांना कारबाबत अनेक प्रश्न व शंका विचारून त्याचा खुलासा करून घेतला. तक्रारदारांनी जाबदार क्र. 2 यांना असेही विचारले की, सदर कारमध्ये एखादी समस्या आहे का? त्यावेळी जाबदार क्र. 2 यांनी तक्रारदारांना 'अजिबात नाही' असे उत्तर दिले आणि त्यांनी सदर कारची एक वर्षाची वॉरंटी देत असल्याचेही सांगितले. सदर कार नव्याप्रमाणेच आहे आणि तक्रारदारांनी कार खरेदी केल्यानंतर कारमध्ये काही समस्या उद्भवलीच तर ते सदर समस्या दूर करून देतील कारण त्यांचे कोंढवा येथे स्वतःचे सर्विस सेंटर असल्याचे आश्वासन तक्रारदारांना दिले. सर्व शंकांचे निवारण करून घेतल्यानंतर तक्रारदारांनी कारच्या रकमेबाबत वाटाघाटी करून सदर कार रक्कम रुपये 13,25,000/- किमतीस खरेदी करण्याचे ठरवले. तक्रारदारांनी असे मान्य केले की, सदर कार तक्रारदारांच्या नावे करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा जो खर्च येईल तो तक्रारदार भरतील. त्यानुसार तक्रारदारांनी रक्कम रु. 25,000/- सदर कारचे टोकन म्हणून जाबदार क्र. 1 यांना रोख स्वरूपात दिले. दि. 21/09/2018 रोजी जाबदार क्र. 3 यांनी तक्रारदारांना बोलावून रक्कम रु. 5,00,000/- जाबदारांच्या खात्यावर जमा करण्यात करण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदारांनी एनईएफटी द्वारे जाबदारांच्या इंडसइंड बँकेच्या खात्यावर सदर रक्कम जमा केली. त्यानंतर पुन्हा दि.22/09/2018 रोजी जाबदार क्र. 3 यांनी तक्रारदारांना रक्कम रु. 50,000/- ची मागणी केली. तक्रारदारांनी सदर रक्कम रोख स्वरूपात जाबदार क्र. 1 यांना त्याच दिवशी दिली.
(२) तक्रारदारांना सदर कारची डिलिव्हरी दसऱ्याच्या दिवशी अपेक्षित होती. म्हणून त्यांनी रक्कम रु. 6,00,000/- एनईएफटी द्वारे जाबदार क्र. 1 यांच्या इंडसइंड बँकेच्या खात्यावर दि. 09/10/2018 रोजी वर्ग केली. त्यानंतर दि. 10/10/2018 रोजी तक्रारदारांनी कारची उर्वरित संपूर्ण रक्कम रु.1,50,000/- जाबदार क्रमांक 1 यांना कारचा ताबा घेतेवेळी रोख स्वरूपात दिले. अशा प्रकारे तक्रारदारांनी एकूण रक्कम रु. 13,25,000/- जाबदार यांना सदर कारचा मोबदला म्हणून देऊ केली. सदर कारचा ताबा घेताना तक्रारदारांनी डिलिव्हरी नोटच्या को-या फॉर्मवर स्वाक्षरी केली. परंतु ताबा घेताना सदर कार सुरूच झाली नाही. जाबदारांच्या कर्मचाऱ्यांनी दीड ते दोन तास प्रयत्न केल्यानंतर सदर कार सुरू झाली. जाबदार क्र. 2 यांनी स्वतः ती कार तक्रारदारांच्या घरी पोहोचती केली. शोरूममधून घरी जात असताना तक्रारदारांच्या मुलाच्या असे लक्षात आले की, कारची ऑडिओ सिस्टीम काम करत नाही. त्यांनी जाबदार क्रमांक 2 यांच्या लक्षात ती बाब आणून दिली असता जाबदार क्रमांक 2 यांनी ऑडिओ सिस्टीम चालू करण्याचा काही वेळ प्रयत्न केला. परंतु कार घरी पोहोचल्यानंतरही जेव्हा ते सदर सिस्टीम चालू करू शकले नाहीत, तेव्हा त्यांनी तक्रारदारांना सांगितले की, ती छोटी समस्या असून ते शोरूममधून कोणालातरी सदर ऑडिओ सिस्टीम दुरुस्त करण्यासाठी पाठवून देतील.
(३) जाबदारांनी सदर कारचा ताबा तक्रारदारांना देण्यापूर्वी काही गोष्टींची तपासणी करणे आवश्यक होते जसे की, इंजिनमध्ये कोणत्याही प्रकारची गळती नाही, आॅईलची लेव्हल योग्य आहे, हेड गास्केटची परिस्थिती व एक्झॉस्ट स्मोकची परिस्थिती चांगली आहे, गियर चेंज करताना तो व्यवस्थित बदलता येत आहे, ब्रेक योग्य रीतीने काम करत आहेत, कारचे स्टिअरिंग योग्य रीतीने काम करत असून वळवताना कोणतीही अडचण येत नाही, टायरची परिस्थिती चांगली आहे, कारची अंतर्गत व्यवस्था ठीक आहे आणि कारचे सर्व दरवाजे उघडताना व बंद करताना व्यवस्थित बंद होत असून कोणत्याही प्रकारचा आवाज करत नाहीत, या सर्व बाबी जाबदारांनी तपासणे आवश्यक होते. तक्रारदारांनी सदर कार दोन दिवस वापरल्यानंतर त्यांच्या लक्षात कार मधील आणखी त्रुटी आल्या. त्यामध्ये पार्किंग डिस्टन्स कंट्रोलर काम करत नव्हते, ऑडिओ सिस्टीम, रियर व्ह्यू कॅमेरा बंद पडले होते, ड्रायव्हरच्या बाजूची खिडकी खूप आवाज करत होती, मधल्या सीटच्या उजव्या बाजूचे सेंट्रल लाॅक काम करत नव्हते, उजव्या बाजूचा पार्किंग लाईट बंद पडलेला होता आणि ड्रायव्हर साईडचा एसीही बंद पडलेला होता. तक्रारदारांनी कारमधल्या सदर त्रुटी फोन करून जाबदार क्र. 2 यांना सांगितले असता जाबदार क्र. 2 यांनी तक्रारदारांना सांगितले की, त्यांनी काळजी करण्याचे कारण नाही. कारमधल्या सगळ्या त्रुटी ते लवकरात लवकर दूर करून देतील. त्यानंतर जाबदार क्र. 2 आणि 3 यांनी सदर कार त्यांच्या शोरूममध्ये नेली आणि ती तिथे जवळपास दोन ते तीन आठवडे ठेवली. त्या काळात त्यांनी फक्त ऑडिओ सिस्टीम आणि रिअर व्ह्यू कॅमेऱ्याचे काम केले. त्यानंतर जाबदार क्र. 2 यांनी तक्रारदारांना फोन करून सांगितले की इतर त्रुटी तक्रारदारांनी स्वतःच्या खर्चाने दुरुस्त करून घ्याव्यात. त्याबाबत तक्रारदारांनी त्यांना त्यांच्या आश्वासनाची आठवण करून दिली असता जाबदार क्र. 2 यांनी निष्काळजीपणाने ते पुढील त्रुटी दुरुस्त करणार नाहीत असे उत्तर तक्रारदारांना दिले.
(४) दि. 14/12/2018 रोजी तक्रारदार त्यांच्या कुटुंबियांसह बीड येथे जात असताना अहमदनगरच्या अलीकडे सुपा येथे अचानक त्यांची कार न्यूट्रलवर आली आणि गिअर पडेनासे झाले. अचानकच कारचा वेग एकदम खाली आला आणि वाहत्या रस्त्यावर कार मधोमध थांबली. कारच्या डॅशबोर्ड वर असा मेसेज आला, "ट्रान्समिशन फॉल्टी". तक्रारदारांनी कसाबसा कारवर ताबा मिळवला आणि कार रस्त्याच्या बाजूला घेतली. तक्रारदारांनी लगेच जाबदार क्र. 2 यांना फोन करून झालेली घटना कळवली. जाबदार क्र. 2 यांनी तक्रारदारांना अतिशय सहजपणे उत्तर दिले की, तक्रारदारांनी प्रवास करत राहावा आणि कार दुरुस्त करून घ्यावी, तो काही फार मोठा प्रश्न नाहीये. तक्रारदारांना ते ऐकून धक्काच बसला. तेथे जवळपास अर्धा तास थांबले आणि त्यानंतर तक्रारदारांनी पुन्हा कार चालू करून पाहिली असता ती चालू झाल्याने भीतभीतच त्यांनी साधारणपणे 50 कि.मी. प्रतितास वेगाने प्रवास केला. दि. 16/12/2018 रोजी पुन्हा तक्रारदारांना तीच समस्या उद्भवली. संपूर्ण प्रवासात एसी काम करत नव्हता. पुन्हा दि. 14/04/2019 रोजी सकाळी 8.00च्या सुमारास तक्रारदारांना ट्रान्समिशन फेल्डची समस्या सहन करावी लागली. ते कुटुंबियांसह तुळजापूर येथे जात असताना हडपसर टोल नाक्याजवळ पोहोचल्यावर गिअर बॉक्समध्ये काहीतरी गंभीर समस्या निर्माण झाली, म्हणून तक्रारदारांनी सदरची समस्या जाबदार क्रमांक 2 व 3 यांना फोनद्वारे कळवली. तसेच ट्रान्समिशन फेल्ड इशू असा संदेश डॅशबोर्ड वर येत असल्याचे देखील कळवले. त्यांनी जाबदार यांना फोन करून सर्विस सेंटरचा नंबर कळवावा अशी विनंती केली. जाबदारांकडून अधिकृत सर्विस सेंटरचा फोन नंबर मिळण्याची अपेक्षा असताना जाबदार क्र. 3 यांनी तक्रारदारांना एक फ्रीलान्सर मेकॅनिक मोसिन मुश्ताक यांचा नंबर कळवला. त्यावरून तक्रारदारांच्या असे लक्षात आले की, जाबदार क्र. 2 व 3 यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचे स्वतःचे अधिकृत सर्विस सेंटर नाही. तक्रारदारांच्या हे देखील लक्षात आले की, जाबदारांनी त्यांना फसवण्याबरोबरच सेवेमध्ये त्रुटी देखील ठेवलेली आहे. तक्रारदारांनी त्याबाबत जाबदार क्र. 2 व 3 यांना सांगितले असता जाबदार क्र. 3 यांनी तक्रारदारांना असे सांगितले की, कारमध्ये असणारे सदरचे प्रश्न हा कारचा उत्पादकीय दोष असून जाबदार क्र. 2 व 3 त्याबाबत काहीही करू शकत नाहीत.
(५) दि. 15/04/2019 रोजी तुळजापूर येथून परत येत असताना सोलापूर हायवेवर गाडी चालू असताना अचानक गाडीचे ब्रेक जाम झाले व स्टिअरिंग देखील फिरेनासे झाले. डॅशबोर्डवर "Active steering inactive" असा संदेश आला. अचानक ब्रेक जाम झाल्यामुळे तक्रारदारांचा गाडीवरचा ताबा सुटला. तक्रारदारांनी कशीबशी गाडी सांभाळून स्वतःचे व कार मध्ये बसलेल्या कुटुंबियांचे प्राण वाचवले. तक्रारदारांनी सदर धक्क्यातून सावरल्यानंतर दि. 20/04/2019 रोजी जाबदार क्र. 2 व 3 यांना फोन करून कारमध्ये असणाऱ्या उत्पादकीय दोषाबद्दल कळवले आणि त्यांची कार परत घेऊन जाण्यास सांगितले. परंतु त्यानंतर जाबदार क्र. 2 व 3 यांनी तक्रारदारांचा फोन स्वीकारणे बंद केले. त्यामुळे जाबदार क्र. 1 चे भागीदार जाबदार क्र. 2 व 3 यांनी तक्रारदारांची फसवणूक केली आहे याबद्दल त्यांची खात्री पटली. दि. 25/04/2019 रोजी जाबदार क्र. 2 यांनी तक्रारदारांचा फोन स्वीकारला आणि तक्रारदारांना त्यांची कार त्यांचे फ्रीलान्सर श्री. मोसीन यांच्या गॅरेजमध्ये नेऊन देण्याचे सांगितले. जाबदार क्रमांक 2 यांनी असेदेखील सांगितले की, कारच्या दुरुस्तीचा जो खर्च येईल त्याचा 50 टक्के खर्च जाबदार क्रमांक 1 करतील, परंतु तक्रारदारांना उर्वरित 50 टक्के खर्च द्यावा लागेल. त्यांनी तक्रारदारांना रक्कम रुपये 15,000/- श्री. मोसीन यांना देण्याचे सांगितले. त्यानुसार तक्रारदारांनी रक्कम रुपये 15,000/- श्री. मोसीन यांच्या खात्यावर एन.इ.एफ.टी.द्वारे जमा केली. श्री मोसीन यांनी तक्रारदारांची कार दोन-तीन आठवडे त्यांच्या गॅरेजमध्ये ठेवून घेतली आणि कोणतीही दुरुस्ती न करता, कारची कोणतीही समस्या दूर न करता जशी होती तशीच तक्रारदारांना परत दिली. त्यामुळे तक्रारदारांनी जाबदार क्र. 2 व 3 तसेच श्री. मोसीन यांना फोनवर त्याबाबत सांगण्याचा प्रयत्न केला असता श्री. मोसीन व जाबदार क्र. 2 व 3 यांनी तक्रारदारांचा फोन स्वीकारणे पुन्हा बंद केले.
(६) तक्रारदारांनी अनेकदा प्रयत्न करूनही जाबदार क्र. 2 व 3 तसेच श्री. मोसीन तक्रारदारांना कोणताही प्रतिसाद देत नसल्याने तक्रारदारांनी बीएमडब्ल्यू कंपनीच्या इतर अधिकृत सर्विस सेंटरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार तक्रारदारांना फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील अॅब्रोल ऑटोमोबाईल्स यांचा पत्ता कळाल्याने त्यांनी दि. 18/05/2019 रोजी त्यांची कार अॅब्रोल ऑटोमोबाईल्स येथे नेली. तेथील श्री. पोरस यांनी तक्रारदारांची कार तपासली आणि तक्रारदारांना सांगितले की. सदर कारचे खूप सारे काम करणे गरजेचे आहे आणि तक्रारदारांनी खूप जास्त खर्च करून खराब कार खरेदी केली आहे. सदर कारची दुरुस्ती केल्यास त्यासाठी खूप जास्त खर्च तक्रारदारांना करावा लागेल.
(७) दि. 15/06/2019 रोजी तक्रारदारांनी त्यांची कार व्हेलॉसिटी ऑप्टिमाइज्ड मोटरस्पोर्ट्स, विमान नगर येथे दाखवली असता त्यांनी कारची पाहणी करून तक्रारदारांना कारमधील समस्या दूर करण्यासाठी रक्कम रुपये 1,75,000/- खर्च येईल असे सांगितले. परंतु सदर दुरुस्ती केल्यानंतर त्याची वॉरंटी मिळणार नाही अशी देखील कल्पना तक्रारदारांना दिली. त्यानंतर तक्रारदारांनी जाबदार क्र. 4 यांच्या अधिकृत डीलर बावरिया मोटर्स यांना सदर कार दाखविण्याचे ठरवले. त्यानुसार दि. 16/07/2019 रोजी तक्रारदारांनी बावरिया मोटर्स यांना भेटून झालेल्या सर्व घटना सांगितल्या. तेथील तंत्रज्ञ श्री विनायक पाटील यांनी तक्रारदारांना सांगितले की ते जाबदार क्र. 1 यांना ओळखतात. परंतु त्यांचा जाबदार क्रमांक 1 यांच्याशी कोणताही व्यावसायिक संपर्क नाही. त्यांनी तक्रारदारांना कारमधील समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले. परंतु त्यासाठी तक्रारदारांनी दिलेले कोटेशन मान्य करण्याची गरज असल्याचे सांगितले. त्यांनी तक्रारदारांना रक्कम रुपये 99,000/- चे कोटेशन स्पेअर पार्ट व लेबर चार्जेससह दिले. तक्रारदारांनी मान्यता दिल्यानंतर त्यांनी कारच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असणाऱ्या स्पेअर पार्टसची ऑर्डर दिली. सदर स्पेअर पार्टस् येईपर्यंत साधारण 4 ते 6 आठवड्यांचा कालावधी गेला. सदर स्पेअर पार्ट बसवल्यानंतरही कारमधील समस्या दूर न झाल्याने त्यांनी तक्रारदारांना सांगितले की त्यांना आणखी काही स्पेअर पार्ट बदलावे लागतील. त्यासाठी अतिरिक्त खर्च येईल. परंतु सदर पार्ट बदलल्यानंतरही कार मधील समस्या दूर होतील याची त्यांना स्वतःला खात्री नव्हती. तक्रारदारांनी दुरुस्तीसाठी एवढी जास्त रक्कम खर्च करूनही सदर समस्या दूर झाली नाही. शेवटी त्यांनी तक्रारदारांना सदर दुरुस्ती होणे शक्य नाही असे सांगितले. त्यांनी तक्रारदारांना असेही सांगितले की, या समस्या दूर होणे अशक्य आहे. त्यासाठी किती मेहनत व किती पैसा खर्च करावा लागेल हे देखील सांगता येणार नाही. जाबदार क्र. 4 यांनी कारमधील दुरुस्तीसाठी तक्रारदारांकडून रक्कम रु. 94,655/- एवढी रक्कम काढून घेऊनही कारमध्ये दुरुस्ती केली नाही. त्यावरून सदर कारमध्ये उत्पादकीय दोष आहे हेच निष्पन्न झाले असून जाबदार क्र. 4 यांनी तक्रारदारांकडून रक्कम घेऊनही कारमध्ये दुरुस्ती न केल्याने सेवेमध्ये त्रुटी ठेवली आहे.
(८) सदर कार मध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल व प्रोग्रामिंग समस्या असल्याने कारमध्ये उत्पादकीय दोष असल्याचे पुन्हा पुन्हा सिद्ध झाले आहे. म्हणून तक्रारदारांसमोर प्रस्तुत तक्रार दाखल करण्यावाचून कोणताही पर्याय उरलेला नाही. सबब, प्रस्तुत तक्रारीद्वारे तक्रारदारांनी अशी मागणी केली आहे की, जाबदार क्र. 1 ते 4 यांनी सेवेमध्ये त्रुटी ठेवल्याचे जाहीर होऊन मिळावे, जाबदार क्रमांक 1 व 2 यांनी बीएमडब्ल्यू कार क्र. एम.एच. 14 ई.सी.7029 परत घेऊन तक्रारदारांना रक्कम रुपये 19,00,000/- वार्षिक 24 टक्के व्याजाने परत करावी, जाबदार क्र. 1 ते 3 यांना रक्कम रुपये 21,517/- तक्रारदारांना परत देण्याचा आदेश व्हावा, जाबदार क्र. 1 यांना रक्कम रुपये 94,655/- तक्रारदारांना परत देण्याचा आदेश व्हावा.
(९) जाबदार क्र. 1 ते 3 यांना संधी देवूनही त्यांनी लेखी जबाब दाखल न केल्याने पुणे जिल्हा आयोगाने दि. 27/11/2020 रोजी जाबदार क्र. 1 ते 3 विरुद्ध लेखी जबाब नाही हा आदेश पारित केला आहे.
(१०) जाबदार क्र. 4 यांनी आपल्या लेखी जबाबाबत असे नमूद केले आहे की, तक्रारदारांनी जाबदार क्र. 4 यांच्याविरुद्ध प्रस्तुत तक्रार कोणतेही कारण नसताना दाखल केली आहे. तक्रारीचे अवलोकन केल्यानंतर हे सिद्ध होते की, तक्रारदारांनी वापरलेली जुनी कार अनधिकृत डीलरकडून खरेदी केलेली असून जाबदार क्र. 4 यांच्या अधिकृत डीलरकडून खरेदी केलेली नाही. जाबदार क्र. 4 यांनी सदर कार कधीही तपासणी करून प्रमाणित केलेली नव्हती. तक्रारदार व जाबदार क्र. 4 यांच्यामध्ये कोणताही करार झालेला नसल्याने तक्रारदारांना जाबदार क्र. 4 यांच्याविरुद्ध प्रस्तुत तक्रार दाखल करण्याचा कोणताही अधिकार नाही. तक्रारदारांनी सदर कार खरेदी करण्यापूर्वी कारची तपासणी अधिकृत डीलरकडून करून घेण्याचा कधीही प्रयत्न केला असे दाखल तक्रारीवरून स्पष्ट होत नाही. त्यामुळे सदर कार खरेदी करण्यापूर्वी तक्रारदारांनी जी काळजी दाखवावयास हवी होती ती दाखवलेली नाही हेच दिसून येते. त्यावरून तक्रारदार व जाबदार क्र. 4 यांच्यामध्ये ग्राहक व सेवा पुरवठादार असे कोणतेही नाते नाही. त्याचप्रमाणे जाबदार क्र. 4 व जाबदार क्र. 1 यांच्यातही कोणताही व्यावसायिक संबंध नाही. जाबदार क्र. 1 हे जाबदार क्र. 4 यांचे अधिकृत डीलर नव्हते व नाहीत. तक्रारदारांच्या तक्रारीवरून असे दिसून येते की, तक्रारदारांची तक्रार जाबदार क्र. 1 यांच्याकडून खरेदी केलेल्या कारबाबत असून जाबदार क्रमांक 2 व 3 तसेच जाबदार क्र. 4 यांचे अधिकृत डीलर मे. बावरिया मोटर्स यांच्या सेवेतील त्रुटीबद्दल आहे. त्याचा व जाबदार क्र. 4 यांचा कोणताही प्रत्यक्ष संबंध येत नाही. तक्रारदारांनी संपूर्ण तक्रारीत जाबदार क्र. 4 यांनी सेवेमध्ये कोणती त्रुटी ठेवली आहे याचा उल्लेख केलेला नाही. त्या कारणावरून देखील प्रस्तुत तक्रार जाबदार क्र. 4 यांच्याविरुद्ध चालण्यास पात्र नाही. जाबदार क्र. 4 कारच्या दुरुस्तीसाठी किंवा सर्विसिंग साठी कार कोणत्याही फ्रीलान्सरकडे कधीच पाठवत नाहीत. जाबदार क्र. 4 यांनी उत्पादित केलेल्या कारची दुरुस्ती किंवा सर्विसिंग त्यांच्या अधिकृत कार डीलर्सकडेच केली जाते. तक्रारदारांनी दाखल केलेल्या कारच्या कागदपत्रांची पाहणी केली असता असे स्पष्ट होते की, सदर कारची नोंदणी सर्वप्रथम दि. 08/07/2009 रोजी झालेली असून तक्रारदारांना कारमध्ये सर्वात प्रथम जी समस्या जाणवली ती एप्रिल 2018 मध्ये जाणवली. त्यामुळे सदर कारची नोंदणी झाल्यापासून उद्भवलेल्या समस्येपर्यंत 9 वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटलेला असून तक्रारदारांना त्याबद्दल कारमध्ये उत्पादकीय दोष असल्याची तक्रार करता येणार नाही, कारण सदर कार 9 वर्षांपेक्षा अधिक काळ चालविण्यात आलेली आहे. जर कारमध्ये उत्पादकीय दोष असता तर मूळ मालकाने त्याबद्दल यापूर्वीच तक्रार केली असती, तक्रार न करता सदर कार 9 वर्षे चालविली नसती. तक्रारदारांनी सदर कार अनेकदा अनेक अनधिकृत सर्विसिंग सेंटर मधून दुरुस्त करून घेतल्याची बाब नमूद केलेली आहे. सदर सर्विसिंग सेंटर मध्ये काम करणारे तंत्रज्ञ बीएमडब्ल्यू टेक्नॉलॉजीनुसार अधिकृत ट्रेनिंग घेतलेले आहेत असे तक्रारदारांनी कुठेही नमूद केलेले नाही. त्यामुळे तक्रारदारांनी जाबदार क्र. 4 यांच्याविरुद्ध कारमधील उत्पादकीय दोषाबद्दल जे आक्षेप घेतलेले आहेत ते जाबदार क्र. 4 यांची प्रतिमा मलीन करण्याच्या उद्देशाने केलेले आहेत. जाबदार क्र. 4 व मे. बावरिया मोटर्स यांच्यामध्ये प्रिन्सिपल व एजंट असे नाते नसून प्रिन्सिपल टू प्रिन्सिपल असा करार झालेला आहे. त्यामुळे मे. बावरिया मोटर्स यांनी सेवेमध्ये कोणतीही त्रुटी ठेवली असल्यास त्याची जबाबदारी जाबदार क्र. 4 यांची नाही. तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीत अशी बाब नमूद केलेली आहे की, जाबदार क्र. 1 यांनी तक्रारदारांची फसवणूक केली आहे. अशा परिस्थितीत जाबदार क्र. 4 यांनी सेवेत त्रुटी ठेवल्याचा अथवा उत्पादकीय दोष असणारी कार उत्पादित केल्याचा तक्रारदारांचा आक्षेप पूर्णपणे चुकीचा व खोटा ठरत असल्याने तक्रारदारांची तक्रार जास्तीत जास्त खर्चासह फेटाळण्यात यावी अशी मागणी केली आहे.
(११) प्रस्तुत तक्रार पुणे जिल्हा आयोगातून या आयोगात दि. 01/10/2021 रोजी वर्ग करण्यात आली असून प्रकरणात प्रत्येक तारखेचा रोजनामा जोडलेला नाही. दि. 13/12/2019 ते दि. 06/08/2021 या कालावधीतील काही तारखांचा संगणकीय संयुक्त रोजनामा जोडलेला आहे.
(१२) उभय पक्षांनी दाखल केलेली कागदपत्र, शपथपत्र, लेखी युक्तिवाद इत्यादींचे अवलोकन करुन तक्रारदारातर्फे अॅड.काळे व विप क्र.४ तर्फे अॅड.राऊत यांचा तोंडी युक्तिवाद ऐकणेत आला.
कारणमीमांसा
(१३) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीत हे स्पष्टपणे नमूद केले आहे की, त्यांनी जाबदार क्र.1 यांच्याकडून वापरलेली जुनी कार खरेदी केली. सदर कार खरेदी करताना जाबदार क्र.2 व 3 यांनी सदर कार बी.एम्.डब्ल्यु. च्या अधिकृत सर्व्हिस सेंटरने प्रमाणित केली असल्याचेदेखील तक्रारदारांनी नमूद केले आहे. परंतु, दाखल कागदपत्रांत सदर कारचे प्रमाणपत्र जाबदार क्र.1 ते 3 यांनी तक्रारदारांना दिले असल्यास त्याची प्रत दाखल केलेली नाही. तक्रारदारांनी संपूर्ण तक्रारीत केवळ वापरलेली जुनी कार खरेदी केल्याचे नमूद केले असले तरी तक्रारदार सदर कारचे दुसरे ग्राहक असल्याचे दाखल कागदपत्रांवरुन दिसून येते. तक्रारदारांनी दाखल केलेल्या नोंदणी प्रमाणपत्रानुसार सदर कारचे पहिले मालक, श्री.अमीन पाटणी तर दुसरे मालक, श्री.किरण पेंडगांवकर म्हणजे तक्रारदार स्वत: असल्याचे स्पष्ट होते. म्हणजेच, तक्रारदारांनी वापरलेली जुनी कार खरेदी केली असून सदर अगोदरच्या मालकाने जेंव्हा ती कार वापरली तेंव्हा त्या कारबाबत कोणता अपघात घडला होता का याची माहिती कार खरेदी करण्यापूर्वी करुन घेतल्याचे दिसत नाही. ग्राहक संरक्षण कायद्याचा सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे Buyer be aware असून जेंव्हा खरेदीदार कोणतीही वस्तू खरेदी करतो, तेंव्हा खरेदी करण्यापूर्वी सदर वस्तु खरेदी करण्यायोग्य आहे का याची खात्री करुन मगच तो खरेदी करतो. तक्रारदारांची तक्रार जाबदार क्र.1 ते 3 यांनी फसवणूक करुन सेवेत त्रुटी केल्याची आहे. त्यामुळे या आयोगासमोर फसवणुकीच्या तक्रारी चालू शकत नाहीत. तक्रारदारांनी असे नमूद केले आहे की, दस-याच्या दिवशी जेंव्हा ती कार त्यांना घरी न्यायची होती, तेंव्हा ती दोन तास चालूच झाली नाही. याचाच अर्थ घरी नेण्यापूर्वी किंवा सदर कारची किंमत देण्यापूर्वी तक्रारदारांनी सदर कार चालवूनदेखील पाहिली नव्हती. मुळात, तक्रारदारांनी सदर कार खरेदी करताना जाबदार क्र.1 ते 3 हे बी.एम्.डब्ल्यु. कार विक्री करणारे अधिकृत डिलर आहेत किंवा नाही याचीदेखील खात्री करुन घेतली नव्हती.
(१४) तक्रारदारांनीच दाखल केलेल्या कागदपत्रांनुसार सदर कार दि.08.07.2009 रोजी प्रथमत: नोंदणीकृत करण्यात आली. तक्रारदारांनी सदर कार दि.10.10.2018 रोजी ताब्यात घेतली. म्हणजे 9 वर्षांपेक्षा अधिक कालावधी सदर कार वापरलेली होती. तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीत कुठेही सदर कार किती कि.मी. चालली याचा उल्लेख केलेला नाही. तक्रारदारांनी स्वत: दाखल केलेल्या स्पिडोमिटरचा फोटो पाहिला असता सदर कार 1,26,487 कि.मी. चालली असल्याचे दिसते. त्यामुळे जी कार एवढे अंतर चालते, त्या कारमध्ये उत्पादकीय दोष आहे असे म्हणता येणार नाही. तक्रारदार सदर कारचे मूळ मालक नसून त्यांनी जुनी वापरलेली कार खरेदी केलेली असल्याने त्यांना कारमध्ये उत्पादकीय दोष असल्याचा आक्षेप घेता येणार नाही. तक्रारदारांनी मा.राष्ट्रीय आयोगाच्या रिव्हीजन पिटीशन क्र.1912/2015 – फकिरचंद सिक्री वि. ओबेरिओ कार्स या प्रकरणात दि.24.11.2015 रोजी पारीत केलेल्या आदेशाचा आधार घेतला असून सदर आदेशात मा.राष्ट्रीय आयोगाने कारच्या स्पिडोमिटरमध्ये फेरफार केलेला असल्याने कारच्या आधीच्या मालकाने त्याचा खुलासा डिलरकडे करावयास हवा. सदर कार तक्रारदारांनी खरेदी केली तेंव्हा कार 47000 कि.मी. चालली असल्याचे दिसत होते. मात्र प्रत्यक्षात सदर कार 60000 कि.मी. चालली होती. म्हणून मा.राष्ट्रीय आयोगाने तक्रारदारांना नुकसान भरपाई वाढवून देण्याचे आदेश दिले होते. प्रस्तुत प्रकरणात तक्रारदारांनी कुठेही सदर कार किती किलोमिटर चालली आहे याचा खुलासा केलेला नाही किंवा कारच्या किलोमिटरच्या आकडयात कोणी फेरफार केला असल्याचीदेखील त्यांची तक्रार नाही. त्यामुळे सदरचा न्यायनिर्णय प्रस्तुत प्रकरणास लागू होत नाही.
(१५) तक्रारदारांनी मा.सर्वोच्च न्यायालयाच्या सिव्हील अपिल क्र.574/2021 – टाटा मोटर्स लि. विरुध्द अँटोनिओ पावलो वाज व इतर – या प्रमाणात दि.18.02.2021 रोजी त्रिसदस्यीय खंडपीठाने पारीत केलेला आदेश दाखल केलेला असून सदर न्यायनिर्णयात मा.सर्वोच्च न्यायालयाने असे निरीक्षण नोंदविले आहे की, दोषपूर्ण कार नवीन कार म्हणून विक्री करणे आणि कारमध्ये दोष आहेत हे मान्य करण्याऐवजी त्या दोषांबद्दलची जबाबदारी नाकारणे ही संबंधित कार डिलरच्या सेवेतील त्रुटी आहे. प्रस्तुत प्रकरणात जुनी कार नवी आहे असे भासवून तक्रारदारांना विक्री केली अशी तक्रारदारांची तक्रार नाही. कारमध्ये प्रथमदर्शनी ज्या त्रुटी होत्या त्या सदर कार घरी नेत असतानाच तक्रारदारांच्या लक्षात आल्या होत्या. तरीदेखील तक्रारदारांनी सदर कारची डिलिव्हरी स्वीकारली. त्यामुळे वरील न्यायनिर्णय प्रस्तुत प्रकरणास लागू होत नाही.
(१६) जाबदार क्र.४ यांनी तक्रारदारांना प्रत्यक्ष कार विकलेली नाही. त्यामुळे तक्रारदार जाबदार क्र.4 बी.एम्.डब्ल्यु. कंपनीविरुध्द उत्पादकीय दोषाचे कारण दाखवून नुकसान भरपाईची मागणी करु शकत नाहीत.
(१७) तक्रारदारांनी जाबदार क्र.1 ते 3 यांच्याविरुध्द जे आक्षेप नोंदविले आहेत, त्यानुसार त्यांनी सदर कार बी.एम्.डब्ल्यु.च्या अधिकृत डिलरने प्रमाणित केली आहे. तसेच, कारमध्ये कोणताही दोष उदभविल्यास जाबदार क्र.1 ते 3 तो दूर करुन देतील असे कार खरेदी करण्यापूर्वी तक्रारदारांना सांगितले असे नमूद केले आहे. परंतु, जाबदार क्र.1 ते 3 यांनी दिलेली सदरची आश्वासने सिध्द करण्यासाठी तक्रारदारांनी कोणताही सबळ कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारदारांनी जाबदार क्र.1 ते 3 यांच्याकडून कार खरेदी केल्याच्या पावत्या व कारमध्ये उदभलेल्या समस्या दाखविणारे फोटो याव्यवतिरिक्त काहीही दाखल केलेले नाही. त्याउलट, तक्रारदारांनी दि.10.10.2018 रोजीची जाबदार क्र.1 ते 3 यांनी दिलेली जी डिलिव्हरी नोट दाखल केली आहे, त्यानुसार त्यांना कारचा ताबा मिळाल्याबद्दल ते समाधानी आहेत, कारच्या देखभाल खर्चासाठी तक्रारदार स्वत: जबाबदार असतील व सदर कारचा ताबा ते स्वत:च्या जबाबदारीवर घेत असल्याचे त्यांनी सदर डिलिव्हरी नोटवर स्पष्टपणे नमूद केले आहे. मुळात सदर कार घरी आणताना ती दोन तास चालू झाली नाही, कारची ऑडिओ सिस्टम बंद होती या सर्व बाबी तक्रारदारांच्या निदर्शनास आल्या असतानाही तक्रारदारांनी सदर डिलिव्हरी नोटवर विनातक्रार स्वाक्षरी कलेली असल्याने आता तक्रारदारांना त्याबाबत तक्रार करण्यास estoppel या तत्त्वाची बाधा येते. तक्रारदारांनी जाबदार क्र.1 ते 3 यांनी कारमध्ये ज्या कामांची पाहणी करावयास हवी होती, असे नमूद केले आहे, त्या कामांची पाहणी तक्रारदारदेखील सदर कारची किंमत देण्यापूर्वी करु शकले असते. मात्र, तक्रारदारानी कोणतीही पाहणी न करता सदर कारची ठरलेली रक्कम देवून टाकली व नंतर कारमध्ये त्रुटी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तक्रारदारांनी सदर कारचा ताबा दि.10.10.2018 रोजी घेतला असून त्यांना पहिली तक्रार दि.14.12.2018 रोजी जाणवली. याचाच अर्थ जवळपास 2 महिने तक्रारदारांनी सदर कार विनातक्रार चालविली. त्यामुळे जाबदारांनी त्यांना दोषपूर्ण कार विक्री केली असे म्हणता येणार नाही.
(१८) तक्रारदारांनी जाबदार क्र.1 ते 4 यांनी सेवेत त्रुटी ठेवल्याची तक्रार सबळ पुराव्यानिशी सिध्द केलेली नाही असा निष्कर्ष काढून प्रस्तुत तक्रार खालील आदेशानुसार फेटाळण्यात येत आहे.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार फेटाळणेत येते.
- खर्चाबाबत आदेश नाहीत.
- उभय पक्षकारांना निकालाच्या प्रती निःशुल्क पुरविण्यात याव्यात.