न्या य नि र्ण य
द्वारा – मा. सौ मनिषा सं. कुलकर्णी, सदस्या
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 2019 चे कलम 34 व 35 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रारदार यांचे पती कै. शशिकांत कृष्णा मुदाळकर यांचे वि.प. क्र.1 बँकेकडे बचत खाते आहे. सदरचे खात्याला नॉमिनी म्हणून तक्रारदार यांचे नावाची नोंद नमूद आहे. भारत सरकारने जारी केले “ प्रधानमंत्री जीवनज्योती ” विमा योजनेनुसार बचत खातेधारकांनी रक्कम रु.330/ -चा हप्ता देय केलेस खातेदाराचे मृत्यूपश्चात त्याचे नॉमिनीस रक्कम रु. 2 लाख विमा दिला जातो. तक्रारदार यांचे पतींनी सदरचा लाभ घेणेकरिता वि.प.क्र.1 यांचेकडे रितसर अर्ज केला होता. परंतु सदरची रक्कम तक्रारदार यांना मिळालेली नाही. सबब, प्रस्तुतचा अर्ज तक्रारदारास दाखल करणे भाग पडले.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांचे पती कै शशिकांत कृष्णा मुदाळकर यांचे वि.प.क्र.1 बँकेकडे बचत खाते असून त्याचा खाते क्र. 20212313016 आहे. सदर खात्याला नॉमिनी म्हणून तक्रारदार यांचे नावाची नोंद नमूद आहे. भारत सरकाने जारी केले प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेनुसार बचत खाततेधारकाने वार्षिक रक्कम रु.330/- चा हप्ता देय केलेस खातेधारकाचे मृत्यू पश्चात त्याचे नॉमिनीस रु.2 लाख विमा दिला जातो. तक्रारदार यांचे पतींनी सदरच्या विमा योजनेचा लाभ घेणेकरिता वि.प.क्र. 1 यांचेकडे रितसर अर्ज केला होता. त्यानुसार सदर विम्याचा लाभ घेणेकरिता व भारत सरकारने जारी केले मार्गदर्शक तत्वानुसार विमा रक्कम बचत खातेतून ऑटो डेबीट प्रोसेस या प्रणालीद्वारे विमा कंपनीस वर्ग होणे आवश्यक असते व सदरचे विम्याचे नूतनीकरण देखील अॅटो डेबीट प्रोसेस प्रणालीद्वारेच होते व सदरची प्रणाली तक्रारदार यांचे पतींनी कार्यान्वित केली होती. त्यानुसार तक्रारदार यांचे पतीचे बचत खातेवरुन रक्कम रु. 330/- वि.प.क्र.1 बँकेकडून वि.प.क्र.2 विमा कंपनीस वर्ग झालेली होती व आहे. सदर पॉलिसीचा नंबर 900100075 असा असून त्याचा कालावधी दि. 11/7/2019 ते दि. 31/05/2020 असा आहे.
3. दि. 18/09/2019 रोजी तक्रारदार यांचे पतीचा अचानक मृत्यू झाला. तदनंतर वि.प.क्र.1 यांनी दिले सूचनेनुसार सदरचे योजनेअंतर्गत नॉमिनी म्हणून मिळणारी विमा रक्कम मिळणेकरिता दि. 25/10/2020 रोजी क्लेमकरिता आवश्यक ती कागदपत्रे जोडून क्लेम फॉर्म दिला होता. त्यानंतर वि.प.क्र. 1 यांनी सदर विम्याची रक्कम दि. 15 ते 20 दिवसांत तक्रारदार यांचे वि.प.क्र.1 बँकेचे बचत खातेमध्ये जमा होईल असे सांगितले. मात्र 15 ते 20 दिवसांत रक्कम जमा न झालेने तक्रारदार यांनी वेळोवेळी वि.प. यांचेशी संपर्क साधला. मात्र एल.आय.सी.कडे क्लेम फॉर्म पाठविला आहे व याबाबत कार्यवाही चालू आहे असे सांगितले गेले. मात्र तदनंतरही डिसेंबर 2019 मध्ये वि.प.क्र.1 यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी वि.प.क्र.2 यांनी क्लेम नामंजूर केलेचे सांगत त्याबाबत ईमेलची प्रत तक्रारदार यांचे नातेवाईकांनी ईमेलद्वारे पाठविली. वि.प.क्र.1 यांचेमार्फत उतरविलेल्या विम्याची रक्कम वि.प.क्र.2 यांचेकडे मुदतीत वर्ग न झालेचे कारण नमूद करुन क्लेम नामंजूर झालेचे कळविले गेले. प्रत्यक्षात तक्रारदार यांचे पतीचे बचत खातेवरुन विमा रक्कम रु.330/- ही रक्कम दि. 11/07/2019 रोजी वर्ग झालेली आहे व तशा नोंदीही पासबुकवर आहेत. परंतु वि.प.क्र.1 यांनी केले निष्काळजीपणा व हयगयीमुळे तक्रारदार यांचा कायदेशीर क्लेम नामंजूर झाला आहे. तदनंतरही वि.प.क्र.1 यांची भेट घेतली असता व त्याबाबत लेखी माहिती मागणेचा प्रयत्न केला असता वि.प.क्र.1 यांनी कोणत्याही प्रकारची दाद दिली नाही व दि. 28/1/2020 रोजी लेखी अर्ज देवून विमा रक्कम मागणेची विनंतीही केली. मात्र त्यासंदर्भात कोणतीही कार्यवाही केलेली नाही. वि.प. हे तक्रारदार यांचा क्लेम देत नसलेने तक्रारदार यांनी नोडल ऑफिसर बँकींग लोकपाल, रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया, मुंबई यांना दि. 23/3/200 रोजीही पत्र पाठवून सदरचे प्रकरणाची चौकशी होवून न्याय मिळणेकरिता विनंती केली. मात्र त्यावर देखील आजअखेर कार्यवाही झालेली नाही. मार्च महिन्यामध्ये कोव्हीड–19 या महामारीमुळे भारत सरकारने जारी केलेल्या लॉकडाऊनमुळे तक्रारदार यांना प्रचंड आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. सबब, सदरची विमा दावा रक्कम वि.प. यांनी नामंजूर केलेने तक्रारदार यांना सदरची दाखल करणे भाग पडले. याकरिता तक्रारदार यांनी विमादाव्याची रक्कम रु.2 लाख तसेच विमा रकमेवरील दि. 25/10/2019 ते 09/11/2020 अखेर द.सा.द.शे.18 टक्के दराने होणारी व्याजाची रक्कम रु.37,578/- व तक्रारअर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- व तक्रारदार यांना झाले मानसिक व शारिरिक त्रासाची रक्कम रु.2,00,000/- व वि.प. यांना नोटीस पाठविणेचा आलेला खर्च रु.2,000/- अशी एकूण रककम रु.4,44,878/- ची मागणी तक्रारदाराने याकामी केलेली आहे.
4. तक्रारदाराने तक्रारीसोबत शपथपत्र व कागदयादीसोबत तक्रारदार यांचे पतीचे बॅंक पासबुक, मृत्यू दाखला, क्लेम फॉर्म, विमा सर्टिफिकेट, वि.प.क्र.1 यांनी वि.प.क्र.2 यांना पाठविलेले पत्र, तक्रारदारयांनी वि.प.क्र.1 यांना दिलेला अर्ज, वि.प.क्र.1 यांना पत्र पोहोच झालेचा रिपोर्ट, क्लेम रिजेक्टचा मेल, नोडल ऑफिसर यांना पाठविलेले पत्र, तक्रारदारांनी वि.प. यांना पाठविलेली नोटीस, सदर नोटीसची पोहोच, वि.प.क्र.1 यांनी दिलेले नोटीस उत्तर इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
5. वि.प.क्र.1 व 2 यांना आयोगाची नोटीस लागू झालेनंतर त्यांनी हजर होवून या आयोगासमोर आपले म्हणणे दाखल केले. वि.प.क्र.1 यांचे कथनानुसार, तक्रारअर्जातील संपूर्ण मजकूर वि.प. यांना मान्य व कबूल नाही. त्याचा ते स्पष्टपणे इन्कार करतात. वि.प.क्र.1 ही बँकेची तथाकथित विमापॉलिसीबाबत कोणतीही वैयक्तिक जबाबदारी कधीही येत नव्हती व नाही. बँकेने अर्जदार यांचे क्लेमबाबत मुदतीमध्ये आवश्यक असलेली सर्व कार्यवाही केलेली आहे. मुदतीमध्ये आवश्यक असलेले सर्व कागद घेवून सदर योजनेतील नियमाप्रमाणे ते वेळेत भारतीय जीवन विमा यांचेकडे कळविलेले होते. त्याप्रमाणे तसेच वेळोवेळी ईमेल देखील केले आहेत. बँकेतर्फे आवश्यक असलेली सर्व प्रकारची कार्यवाही बँकेने पूर्ण केलेली आहे. त्यामध्ये कोणतीही कुचराई केलेली नाही. तक्रारदार यांनी वि.प.क्र.2 भारतीय जीवन विमा निगम यांचेशी संपर्क साधून योग्य ती चौकशी व आवश्यक ती योग्य कारवाई वि.प.क्र.2 यांचेविरुध्द करावी. त्याची तोशीस वि.प.क्र.1 यांना लागू देवू नये. सबब, सदरची कोणतीही विमा रक्कम देणेची जबाबदारी बँकेवर येत नसल्याने अर्ज खर्चासह नामंजूर करावा असे वि.प.क्र.1 यांनी कथन केले आहे.
6. वि.प.क्र.2 यांचे कथनानुसार, तक्रारअर्जातील विमा पॉलिसी क्रमांक, कालावधी, पॉलिसीचे नॉमिनी, विमा हप्ता, अॅटो डेबीट प्रोसेस याबाबतची सर्व माहिती सर्वसाधारणपणे बरोबर आहे. तथापि विमा कंपनीच्या पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार तक्रारदार यांना विमा रक्कम देय होत नाही. सदर विमा पॉलिसी नियमाप्रमाणे नामंजूर करत असल्याचे पत्र वि.प.क्र.2 यांनी तक्रारदार यांना दि. 15/12/2019 रोजी पाठविलेले आहे. तक्रारदार यांनी केलेली मागणी ही बेकायदेशीर व अवाजवी असून ती सदरचे वि.प. यांना मान्य व कबूल नाही. सदर पॉलिसीचा कालावधी हा दि.11/7/2019 ते 31/05/2020 असा होता व आहे. सदर पॉलिसीला वार्षिक विमाहप्ता होता. विमा पॉलिसीचा पहिला विमा हप्ता दि. 14/08/2019 रोजी युटीआर नं. MAHBH19228042391 ने मिळाला होता. सदरचा विमा हप्ता दि. 11/07/2019 रोजी मयताच्या खातेवरुन अॅटोडेबीट झाला होता. सदर पॉलिसीचे नियमाप्रमाणे पहिल्या वर्षातील वार्षिक विमा हप्त्याची रक्कम पॉलिसी धारकाच्या खात्यातून अॅटो डेबिट झाल्यापासून 15 दिवसांचे आत विमा कंपनीला पोहोचणे आवश्यक आहे व तसे न घडल्यास विमा पॉलिसीच्या हप्त्याची रक्कम ज्या दिवशी विमा कंपनीला मिळेल, त्या दिवसापासून पॉलिसी धारकाची पॉलीसी चालू होते व त्याप्रमाणे पॉलिसी चालू झालेपासून पुढील 45 दिवसांचा कालावधी हा लिन पिरेड असतो. सबब, तदनंतरची येणारी जोखीम स्वीकारली जाते. सदर लिन पिरेडमध्ये येणारे क्लेम्स नियमाप्रमाणे देय होत नाहीत. सबब, तक्रारदार यांना दि. 15/12/2019 रोजी सदरचा विमादावा नामंजूर करीत असलेचे पत्र वि.प.क्र.2 यांनी पाठविलेले आहे. या कारणास्तव सदरचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत यावा असे कथन वि.प.क्र.2 यांनी केले आहे.
7. वि.प.क्र.2 यांनी याकामी वि.प.क्र.1 व 2 यांचे समझोत्याचे करारपत्र, वि.प.क्र.1 यांना मास्टर पॉलिसी पाठविल्याचे पत्र, मास्टर पॉलिसी व अटी व शर्ती, वि.प.क्र.1 यांनी वि.प.क्र.2 ला पाठविलेले पत्र इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
8. तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे तसेच वि.प. यांचे म्हणणे, पुरावा व युक्तिवाद यावरुन आयोगासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हा वि.प. यांचा ग्राहक होतो काय ? | होय. |
2 | वि.प.क्र.1 बँक ऑफ महाराष्ट्र यांनी तक्रारदार यांना सेवा देणेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदारांनी केलेल्या मागण्या मिळणेस तक्रारदार पात्र आहे काय ? | होय, अंशतः. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
विवेचन
मुद्दा क्र.1
9. यातील वि.प.क्र.2 ही इन्शुरन्स कंपनी असून ग्राहकांना विमा संरक्षण देणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. वि.प.क्र.2 ही प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेअंतर्गत ग्राहकांना विमा संरक्षण देते. वि.प.क्र.1 ही बँक असून तक्रारदार यांचे पती हे सदर बँकेचे खातेधारक आहेत. त्यास वारसदार म्हणून तक्रारदार यांचे नांव आहे. सबब, तक्रारदार व वि.प. यांचेमध्ये सेवा घेणार व देणार हे नाते निर्माण झाले आहे. याकरिता तक्रारदार हा ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत ग्राहक होतो या निष्कर्षाप्रत हे आयेाग येत आहे.
मुद्दा क्र.2 ते 4
10. वि.प.क्र.2 विमा कंपनीने तक्रारदार यांची विमा पॉलिसी ही तक्रारदार यांचे पॉलिसीचे लिन पिरेडमध्ये येत असलेने नामंजूर करीत असलेचे पत्र तक्रारदार यांना दि. 15/12/2019 रोजी पाठविलेले आहे. या संदर्भात तक्रारदार यांनी कागदपत्रे दाखल केली आहेत. सदर कागदपत्रांचे अवलोकन करता तक्रारदार यांनी अ.क्र. 1 ला वि.प. क्र.1 बँक ऑफ महाराष्ट्रचे पासबुक दाखल केलेले आहे. सदरचे पासबुकवरुन दि. 11/7/2019 रोजीच रक्कम रु. 330/- ही अर्जात नमूद विमा पॉलिसीचे अंतर्गत असणा-या हप्त्याकरिता कपात झालेचे दिसून येते. मात्र सदरची रक्कम ही विमा पॉलिसीचे अटी व शर्तीनुसार हप्त्याची रक्कम पॉलिसी धारकाचे खातेतून अॅटो डेबिट झालेपासून 15 दिवसांचे आत विमा कंपनीला पोचणे आवश्यक असते. तथापि सदरची रक्कम ही वि.प. विमा कंपनीस दि. 14/08/2019 रोजी युटीआर नं. MAHBH19228042391 ने मिळालेली आहे. यावरुन असे स्पष्ट होते की, मयताच्या वि.प.क्र.1 यांचेकडे असणा-या खातेवरुन रक्कम दि. 11/07/2019 रोजी कपात झालेली आहे. मात्र विमा कंपनीस दि.14/08/2019 रोजी रक्कम मिळालेली आहे. याचाच अर्थ सदरची रक्कम ही वि.प. विमा कंपनीस अॅटो डेबिट झालेपासून 15 दिवसांनंतर मिळालेली आहे व तक्रारदार यांचा मृत्यू हा दि. 18/09/2019 रोजी म्हणजेच आताचे पॉलिसीचे लिन पिरेडमध्ये झालेला आहे. सबब, पॉलिसीचे नियमाप्रमाणे सदरचा विमा दावा हा पॉलिसीचे लिन पिरडमध्ये म्हणजेच पॉलिसी चालू झालेपासून 45 दिवसांमध्ये येत असलेचे स्पष्ट होते.
11. सबब, या कारणास्तव वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांचा विमादावा नामंजूर केलेला आहे. तक्रारदार यांचे खातेमधून अॅटो डेबीट झालेपासून 15 दिवसांचे आत वि.प. विमा कंपनीकडे सदरची विमा हप्त्याची रक्कम जमा झालेली नाही. याबाबतची सर्व जबाबदारी ही वि.प.क्र.1 बँकेची असते व आहे व या संदर्भातील खुलासा वि.प. बँकेने आपल्या म्हणण्यामध्ये स्पष्ट केलेला नाही. तसेच स्वतःची जबाबदारी वि.प. बँक ही विमा कंपनीवर लादत आहे. मात्र तक्रारदार व वि.प. यांचे दाखल कागदपत्रांचा विचार करता सदरची विमा हप्त्याची रक्कम वि.प. विमा कंपनीस वेळेत मिळणेची सर्वस्वी जबाबदारी ही वि.प. बँकेचीच असते व आहे. याकरिता जरी तक्रारदार यांचा विमा दावा नामंजूर झाला असला तरी वि.प. बँकेकडून सदरची रक्कम वि.प. विमा कंपनीस वेळेत न मिळालेने तक्रारदार यांचा विमादावा वि.प. विमा कंपनीने नामंजूर केलेला आहे. सबब, ही सर्वस्वी जबाबदारी वि.प. बँकेची असूनही त्यांनी वेळेत पार पाडली नसलेने वि.प.क्र.1 बँकेने तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेमध्ये त्रुटी केलेचे निष्कर्षाप्रत हे आयेाग येत आहे. जर वि.प. बँकेने वेळेत म्हणजेच अॅटो डेबीट झालेपासून 15 दिवसांचे आत विमा हप्तेची रक्कम वि.प. विमा कंपनीस पाठविली असती तर तक्रारदार यांचेवर ही वेळ आली नसती असे या आयोगाचे स्पष्ट मत आहे. सबब, वि.प.क्र.1 बँकेने तक्रारदार यांची विमा दाव्याची रक्कम रु. 2 लाख ही वि.प. विमा कंपनीने विमादावा नाकारले तारखेपासून ते संपूर्ण रक्कम हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने देणेचे आदेश वि.प.क्र.1 बँकेस करण्यात येतात. तसेच तक्रारदार यांनी तक्रारअर्जात मागणी केलेली मानसिक त्रासाची रक्कम रु. 2 लाख व अर्जाचे खर्चाची व वकील फीची अशी एकूण रक्कम रु.7,000/- ही या आयेागास संयुक्तिक वाटत नसलेने मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु.3,000/- देणेचे आदेश वि.प.क्र.1 बँकेस करण्यात येतात. वि.प.क्र.2 विमा कंपनीबाबत कोणतेही आदेश नाहीत. सबब, हे आयोग खालील आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. वि.प.क्र.1 यांनी तक्रारदार यांना विम्यापोटीची रक्कम रु.2,00,000/- देणेचे आदेश करणेत येतात. तसेच सदरचे रकमेवर विमा दावा नाकारलेपासून संपूर्ण रक्कम तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज देणेचे आदेश करणेत येतात.
3. वि.प.क्र.1 यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- देणेचे आदेश करणेत येतात.
4. वर नमूद आदेशांची पूर्तता वि.प.क्र.1 यांनी आदेशाचे तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5. विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तदतुदींअन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6. जर यापूर्वी वि.प. यांनी काही रक्कम तक्रारदार यांना अदा केली असेल तर त्याची वजावट करण्याची वि.प. यांना मुभा राहील.
7. सदर आदेशाच्या प्रती उभय पक्षकारांना विनाशुल्क पाठवाव्यात.