तक्रार दाखल दिनांकः 11/02/2016
आदेश पारित दिनांकः 07/02/2017
तक्रार क्रमांक. : 22/2016
तक्रारकर्ता : श्री शैलेश माणिक रामटेके
वय – 40 वर्षे, धंदा – व्यवसाय,
रा. संत जगनाडे नगर, तुमसर जि.भंडारा
-: विरुद्ध :-
विरुध्द पक्ष : 1) शाखा व्यवस्थापक,
बँक ऑफ बडोदा, तुमसर
तुमसर जि.भंडारा
तक्रारकर्त्यातर्फे : अॅड.के.एस.मोटवानी, अॅड.व्ही.व्ही.तिवारी
वि.प. तर्फे : अॅड.पी.एम.रामटेके, अॅड.एन.के.गजभिये
गणपूर्ती : श्री. मनोहर चिलबुले - अध्यक्ष.
श्री. एच. एम. पटेरीया - सदस्य.
श्री. मनोहर चिलबुले, अध्यक्ष यांचे आदेशांन्वये.
-// आ दे श //-
(पारित दिनांक – 07 फेब्रुवारी 2017)
तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचे संक्षिप्त विवरण येणेप्रमाणे.
तक्रारीचा आशय खालीलप्रमाणे
- . तक्रारकर्ता मेसर्स सुचेता ट्रेडर्स, तुमसर या नावाने मौजा तुमसर येथे व्यवसाय करतो. त्याने मेसर्स सुचेता ट्रेडर्स या नावाने विरुध्द पक्ष बँक, बडोदा, शाखा तुमसर येथे चालू खाते क्रमांक 41630200000121 काढले आहे. दिनांक 8/10/2015 रोजी तक्रारकर्त्याच्या वरील चालू खात्यात रुपये 66,486/- NEFT द्वारे जमा झाले. तक्रारकर्त्याने दिनांक 9/10/2015 रोजी आपल्या वरील खात्यातून एटीएम द्वारे रुपये 10,000/- व 15,000/- आणि धनादेश क्रमांक 11770 द्वारे रुपये 75,000/- काढल्यावर शेष राशी रुपये 10,151/- जमा होती.
दिनांक 12/10/2015 रोजी तक्रारकर्ता पत्नी सोबत नागपूर येथे पत्नीच्या औषधोपचारासाठी गेला. दुपारी 4 वाजता पत्नी साठी औषध घेण्याकरीता त्याने एटीएम द्वारे त्याच्या वरील खात्यातून पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता विरुध्द पक्षाच्या बँकेच्या एटीएम मधून पैसे निघाले नाही त्यामुळे दुपारी 4.40 वाजता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वर्धमान नगर शाखेतील एटीएम मधून रुपये 2,000/- काढण्याचा प्रयत्न केला परंतु रक्कम मिळाली नाही आणि “Transcation declined due to insufficieny of funds for account no 41630200000121” याप्रमाणे तक्रारकर्त्याचा मोबाईल क्र.9423413827 वर मेसेज आला. त्यानंतर तक्रारकर्त्याने पुन्हा 4.47 वाजता एटीएम द्वारे खात्यातून पैसे काढण्याचा प्रयत्न केला परंतु रक्कम मिळाली नाही.
तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष बँकेत फोन करुन विचारणा केली असता बँकेच्या अधिका-यांनी सांगितले की त्यांचे खाते तात्पुरते seize/बंद करण्यात आले आहे. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष बँकेच्या अधिका-यांना कळविले की त्याला कोणतेही पत्र किंवा मेसेज न देता त्याचे खाते बंद केले असून पत्नीच्या औषधोपचारासाठी रुपये 2,000/- ची अत्यंत आवश्यकता असल्यामुळे किमान तेवढी रक्कम काढण्याची परवानगी देण्यात यावी. परंतु विरुध्द पक्ष बँकेच्या अधिका-यांनी सदर मागणी कडे पूर्णतः हेतूपरस्पर दुर्लक्ष केले. त्यामुळे तक्रारकर्त्याला आणि त्याच्या पत्नीला शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला आणि औषध न घेताच तुमसर येथे परत यावे लागले. सदरची बाब बँक ग्राहकाप्रती सेवेतील न्युनता आणि अनुचित व्यापर पध्दतीचा अवलंब आहे. दिनांक 13/14.10.2015 रोजी तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष बँकेला नोटीस पाठवून शारीरिक व मानसिक त्रासापोटी रुपये 50,000/- नुकसान भरपाईची मागणी केली. विरुध्द पक्षाला दिनांक 16/10/2015 रोजी सदरची नोटीस प्राप्त झाली मात्र नोटीसची पुर्तता न करता त्याने वकीलामार्फत खोटे उत्तर पाठविले. म्हणून तक्रारकर्त्याने सदर तक्रार दाखल केली असून त्यात खालीलप्रमाणे मागणी केली आहे.
1) तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रुपये 50,000/- देण्याचा विरुध्द पक्षास आदेश व्हावा.
2) तक्रार खर्च रुपये 5,000/- विरुध्द पक्षावर बसवावा.
तक्रारकर्त्याने तक्रारीच्या पुष्ट्यर्थ तयाच्या नावाचा खातेउतारा, विरुध्द पक्षास पाठविलेली नोटीस, पोस्टाची पावती, पोचपावती, विपने दिलेले नोटीसचे उत्तर इ. दस्तऐवज दाखल केलेले आहेत.
- . विरुध्द पक्षाने लेखी जबाबाद्वारे तक्रारीस सक्त विरोध केला आहे. तक्रारकर्त्याचे विरुध्द पक्ष बँकेत तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे चालू खाते असल्याचे कबूल आहे. त्यांचे म्हणणे असे की तक्रारकर्त्याच्या खात्यात दिनांक 8/10/2015 रोजी रुपये 66,486/- NEFT द्वारे जमा झाले होते व तक्रारकर्त्याने दिनांक 9/10/2015 रोजी एटीएम द्वारे रुपये 10,000/- व रुपये 15,000/- आणि धनादेशाद्वारे रुपये 75,000/- त्याच्या खात्यातून काढल्यावर रुपये 10,151/- जमा बाकी होती. त्यांचे पुढे असे म्हणणे आहे की विरुध्द पक्षाच्या बँकेत अग्रवाल मिल्क अँड फुड प्रॉडक्टसचे प्रोप्रा. विनोद अग्रवाल यांचे चालू खाते क्रमांक 41630200000124 आहे. त्यांचे ग्राहक अमृतमय फुड प्रॉडक्टस प्रा.लि.यांनी इंडियन ओव्हरसीज बँक, रायपुर यांचे मार्फत अग्रवाल मिल्क अँड फुड प्रॉडक्टसचे खात्यात जमा करण्यासाठी NEFT द्वारे दिनांक 8/10/2015 रोजी रुपये 66,486/- पाठविले. मात्र नजरचुकीने खाते क्रमांक 41630200000121 या तक्रारकर्ता शैलेश माणिक रामटेके याच्या मेसर्स सुचेता ट्रेडर्सच्या चालू खात्यात सदर रक्कम जमा झाली. तक्रारकर्त्याला सदर रक्कम त्याची नाही हे माहित असूनही त्याने जाणूनबुजून दुस-या दिवशी दिनांक 9/10/2015 रोजी एटीएम आणि धनादेशाद्वारे आपल्या खात्यातून एकून रुपये 1,00,000/-(एक लाख) रक्कम काढून घेतली आणि त्यांच्या खात्यात चुकून जमा झालेली विनोद अग्रवाल यांच्या रुपये 66486/- या रकमेची उचल करुन गैरवापर केला व त्याद्वारे फौजदारी स्वरुपाचा गुन्हा केला आहे.
दिनांक 9/10/2015 रोजी अग्रवाल मिल्क अँड फुड प्रॉडक्टचे प्रोप्रा विनोद अग्रवाल यांनी विरुध्द पक्ष बँकेला पत्र देवून त्यांचे ग्राहक अमृतमय फुड प्रॉडक्टस प्रा.लि. यांनी दिनांक 8/10/2015 रोजी रुपये 66,486/- ची NEFT UTR No IOBAN 15281054255 द्वारे पाठविले परंतु ती रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली नाही याबाबत चौकशी करुन कळविण्याची विनंती केली.
विरुध्द पक्षाने दिनांक 9/10/2015 रोजी बँक ऑफ बडोदा, रिजनल ऑफीस, नागपूर यांना झालेल्या प्रकाराबाबत माहिती दिली आणि त्यांचे निर्देशानुसार नजरचुकीने ज्यांच्या खात्यात सदरची रककम जमा झाली त्या खात्याची चौकशी करुन ते खाते पुढील चौकशीसाठी Hold करण्यात आले. IOB रायपुर यांच्या कडे NEFT बाबतची चौकशी केली असता सदर रक्कम विनोद अग्रवाल यांचे चालु खाते क्रमांक 41630200000124 मध्ये जमा होण्याऐवजी मेसर्स सुचेता ट्रेडर्स यांच्या चालु खाते क्रमांक 41630200000121 मध्ये नजरचुकीने दिनांक 8/10/2015 रोजी जमा झाल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या पत्राची प्रत लेखी जबाबासोबत दाखल केली आहे.
तक्रारकर्त्याच्या खात्याची चौकशी केली असता त्याच्या खात्यात त्याची नसलेली NEFT ची रक्कम रुपये 66,486/- जमा झाली असल्यामुळे नियमाप्रमाणे सदर खाते चौकशीसाठी दिनांक 9/10/2015 रोजी Hold करण्यात आले. परंतु तक्रारकर्त्याने त्याच्या खात्यात चुकीने जमा झालेली दुस-याची रक्कम उचल केल्याचे निदर्शनास आले. बँकेच्या अधिका-यांनी तक्रारकर्त्याची भेट घेवून त्याला त्याच्या खात्यात चुकीने जमा झालेल्या रकमेची व त्याने ती संपुर्ण रक्कम बेकायदेशीररित्या काढून घेतल्याची जाणीव करुन दिली तेव्हा 2 ते 3 दिवसांत सदर रक्कम जमा करतो असे आश्वासन दिले. चौकशी पुर्ण झाल्यावर दिनांक 14/10/2015 रोजी तक्रारकर्त्याचे खाते पुर्ववत ‘unhold’ करण्यात आले. तक्रारकर्त्याला चौकशी करीता त्याचे खाते Hold करण्यात आल्याची संपुर्ण माहिती होती.
तक्रारकर्त्याने त्याच्या खात्यात चुकीने जमा झालेली विनोद अग्रवाल यांची रक्कम आश्वासन देवूनही आजपर्यंत परत केली नाही. मात्र त्याने दुस-याच्या रकमेच्या केलेल्या अपहाराबाबत कारवाही होवू नये म्हणून सदर रक्कम हडपण्याच्या उद्देशाने खोटी कहानी तयार केली आणि मंचाची दिशाभुल करुन सदर तक्रार दाखल केली आहे. संपुर्ण तक्रारीमध्ये तक्रारकर्त्याच्या खात्यात दिनांक 8/10/2015 रोजी रुपये 66,486/- कोणाकडून जमा झाले व त्यावर तक्रारकर्त्याचा अधिकार कसा याचा कोणताही उल्लेख केलेला नाही. तक्रारकर्त्याने दिनांक 13/10/2015 रोजी पाठविलेल्या खोटया नोटीसला विरुध्द पक्ष बँकेने दिनांक 16/11/2015 रोजी वकीलामार्फत उत्तर दिले आहे. सदर उत्तर प्राप्त झाल्यावर आपल्यावर कायदेशीर कार्यवाही होईल या भीतीने सदरची खोटी तक्रार दाखल केली आहे.
ज्या विनोद अग्रवाल यांच्या मिल्क अॅन्ड फुड प्रॉडक्टसची रक्कम तक्रारकर्त्याने बेकायदेशीररित्या बँकेतून काढून हडप केली त्या विनोद अग्रवाल यांनी सदर रक्कम तक्रारकर्त्याने परत न केल्याने मा.दिवानी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, तुमसर येथे वसूलीसाठी दावा दाखल केला आहे त्या दाव्याची प्रत लेखी जबाबासोबत विरुध्द पक्षाने दाखल केली आहे. खरी वस्तुस्थिती लपवून दुस-याची रक्कम हडपण्यासाठी बँकेवर खोटे आरोप लावून सदरची तक्रार दाखल केली असल्याने ती रुपये 50,000/- च्या नुकसानभरपाईसह खारीज करावी अशी विरुध्द पक्षाने विनंती केली आहे. विरुध्द पक्षाने आपल्या कथनाच्या पृष्टर्थ्य बँकेला अग्रवाल यांनी दिलेले पत्र, बँकेने अग्रवाल यांना दिलेले पत्र, IOB यांनी पाठविलेला मेल, तक्रारकर्त्याचे खाते विवरण, अग्रवाल मिल्क प्रॉडक्टसचे खाते विवरण, तक्रारकर्त्याला बँकेने पाठविलेले नोटीस, पोस्टाची पावती व पोचपावती, अग्रवाल मिल्क अॅन्ड फुड प्रॉडक्टस यांनी शैलेश रामटेके याच्यावर दाखल केलेल्या दाव्याची प्रत इ. दस्तावेज दाखल केले आहेत.
- . उभय पक्षांच्या कथनावरुन खालील मुद्दे विचारार्थ घेण्यांत आले. त्यावरील मंचाचे निष्कर्ष व त्याबाबतची कारणमिमांसा खालिलप्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) वि.प.ने न्यूनतापूर्ण व्यवहार केलेला आहे काय? – नाही.
2) तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्यांस पात्र आहे काय? नाही.
3) अंतीम आदेश काय? तक्रार खारीज
कारणमिमांसा
- मुद्दा क्र.1 बाबत – सदरच्या प्रकरणात तक्रारकर्त्याचे विरुध्द पक्ष बँकेत चालु खाते क्रमांक 41630200000121 असल्याचे उभय पक्षांना मान्य आहे. तसेच सदर चालु खात्यात दिनांक 8/10/2015 रोजी NEFT UTR No IOBN 15281054255 मेसर्स अमृतमय फुड प्रॉडक्टस लि. द्वारे रुपये 66,486/- जमा झाल्याबाबतची नोंद विरुध्द पक्षाने दाखल केलेल्या तक्रारकर्त्याच्या खाते उता-यात (दस्त क्र.4) मध्ये आहे. सदर रक्कम जमा होण्यापुर्वी तक्रारकर्त्याच्या खात्यात शिल्लक रक्कम रुपये 43676.69 होती असे सदर खाते उता-यावरुन स्पष्ट होते. तसेच दिनांक 9/10/2015 रोजी तक्रारकर्त्याने त्याच्या वरील चालु खात्यातून एटीएम द्वारे 15,000/- आणि 10,000/- तसेच धनादेश क्रमांक 11770 द्वारे रुपये 75,000/- असे एकूण 1,00,000/- काढल्याचे देखिल सदर खाते उता-यावरुन स्पष्ट होते. सदरची बाब तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीत देखिल नमुद केली आहे.
तक्रारकर्त्याचा मेसर्स अमृतमय फुडसशी कोणताही व्यवहार असल्याचे तक्रारकर्त्याचे म्हणणे नाही. त्यामुळे दिनांक 8/10/2015 रोजी त्याच्या खात्याची जमाबाकी 43676.69 असतांना मे.अमृतमय फुडकडून रुपये 66,486/- ही रक्कम कशाची जमा झाली याचा तक्रारीत कोणताही उल्लेख नाही. सदर रक्कम कशाची जमा झाली याची कोणतीही शहानिशा न करता किंवा ती आपली नाही याची माहिती असतांना देखिल तक्रारकर्त्याने दिनांक 9/10/2015 रोजी आपल्या वरील चालु खात्यातून रुपये 1,00,000/- इतकी रक्कम काढली आहे आणि त्यानंतर त्याची खातेबाकी रुपये 10151.29 झालेली आहे. विरुध्द पक्षाच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारकर्त्याच्या खात्यात दिनांक 8/10/2015 रोजी NEFT द्वारे जमा झालेली रक्कम रुपये 66,486/- ही मेसर्स अमृतमय फुडस प्रा.लि.रायपुर यांनी अग्रवाल मिल्क अॅन्ड फुड प्रॉडक्टस, तुमसर यांच्यासाठी पाठविली होती व ती अग्रवाल मिल्क अॅन्ड फुड प्रॉडक्टस प्रोप्रा विनोद अग्रवाल यांनी विरुध्द पक्ष बँकेला दिनांक 9/10/2015 रोजी विरुध्द पक्षाच्या दस्त क्र.1 अन्वये पत्र देवून सदर NEFT ची रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली नसल्याने चौकशी करुन ती रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्याबाबत विनंती केली. विरुध्द पक्ष बँकेने केलेल्या चौकशीत सदर रक्कम तक्रारकर्त्याच्या खात्यात चुकीने जमा झाल्याचे आढळून आल्यामुळे त्याचे खाते चौकशीसाठी Hold केले आणि तक्रारकर्त्याची भेट घेवून त्यास त्याबाबत कळविले असता त्याने सदर खात्यात जमा झालेली NEFT ची रक्कम काढली असून ती 2 ते 3 दिवसांत बँकेत भरण्याचे कबूल केल्यामुळे दिनांक 9/10/2015 रोजी विरुध्द पक्ष बँकेने मेसर्स अग्रवाल यांना पत्र देवून कळविले. सदरचे पत्र विरुध्द पक्षाने दस्त क्र.2 वर दाखल केले आहे. ओव्हरसीज बँक शाखा, रायपुर यांनी देखिल चौकशी अंती विरुध्द पक्ष बँकेस कळविले की मेसर्स अमृतमय फुडस प्रॉडक्टस यांनी मेसर्स अग्रवाल मिल्क अॅन्ड फुड प्रॉडक्टसचे खाते क्रमांक 41630200000124 यांना NEFT द्वारे पाठविलेली रककम रुपये 66,486/- चुकीने खाते क्रमांक 41630200000121 (सुचेता ट्रेडर्स) यांच्या नावाने जमा जमा करण्यात आल्याचे कळविले असून सदर रक्कम सुचेता ट्रेडर्स कडून वसूल करुन मेसर्स अग्रवाल मिल्क यांना देण्यासाठी विनंती केली आहे. सदर पत्र विरुध्द पक्षाने दस्त क्र.3 वर दाखल केले आहे. तक्रारकर्त्याने त्याद्वारे अधिवक्ता तिवारी यांच्या मार्फत विरुध्द पक्ष बँकेला दिनांक 13/10/2015 रोजी दिलेल्या नोटीसची प्रत दस्त क्र.2 वर दाखल केली असून त्यास विरुध्द पक्षाने दिनांक 16/11/2015 रोजी दिलेल्या उत्तराची प्रत दस्त क्र.5 वर दाखल केली आहे. सदर उत्तरात विरुध्द पक्षाने वरीलप्रमाणे सर्व वस्तुस्थिती नमुद केली आहे. एकंदरीत तक्रारकर्त्याच्या खात्यात दिनांक 8/10/2015 रोजी चुकीने जमा करण्यात आलेली NEFT ची मेसर्स अग्रवाल मिल्क अॅन्ड फुडस प्रॉडक्टसची रक्कम रुपये 66,486/- तक्रारकर्त्याने त्यास कोणताही कायदेशीर अधिकार नसतांना दिनांक 9/10/2015 रोजी काढून घेतली आहे. त्यामुळे सदर प्रकरणी अग्रवाल मिल्क अॅन्ड फुडस प्रॉडक्टसचे विनोद अग्रवाल यांच्या पत्रानंतर केलेल्या चौकशीत सदर रक्कम चुकीने तक्रारकर्त्याच्या चालु खात्यात जमा झाल्याचे सिध्द झाल्याने चौकशीसाठी सदर खाते Hold करण्याची विरुध्द पक्षाची कृती पुर्णतः कायदेशीर आहे आणि त्यामुळे जर तक्रारकर्त्यास कोणतीही असुविधा झाली असेल तर त्यास त्याची स्वतःची बेकायदेशीर कृती कारणीभुत आहे. त्यामुळे विरुध्द पक्षाची तक्रारकर्त्याचे खाते Hold करण्याची कृती ही सेवेतील न्युनता किंवा अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब आहे असे म्हणता येणार नाही. याउलट तक्रारकर्त्याने त्याच्या खात्यात चुकीने जमा झालेली रक्कम रुपये 66,486/- दिनांक 9/10/2015 रोजी काढून घेतली असून सदर रक्कम खात्यात जमा करण्यातबाबत विरुध्द पक्ष बँकेला आश्वासन देवूनही आजपर्यंत बँकेत जमा केलेली नाही. एवढेच नव्हेतर त्यासाठी ज्याची रक्कम चुकीने तक्रारकर्त्याच्या खात्यात जमा झाली होती त्या मेसर्स अग्रवाल मिल्क अॅन्ड फुड प्रॉडक्टस यांनी सदर रक्कम वसुलीसाठी दिवानी न्यायाधीश, तुमसर यांच्या न्यायालयात दावा दाखल केल्यानंतर देखिल आजपर्यंत सदर रकमेचा तक्रारकर्त्याने बँकेत भरणा केला नाही किंवा ती रक्कम ज्याची होती त्यांस देखिल परत केली नाही. विरुध्द पक्षाची सदर कृती ही Criminal misappropriation या सदरात मोडणारी आहे. असे असतांना तक्रारकर्त्याने बँकेविरुध्द सदरची खोटी तक्रार दाखल केल्यामुळे ती रुपये 5,000/- खर्चासह खारीज होण्यास पात्र आहे. म्हणून मुद्दा क्र. 1 ते 3 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविले आहेत.
वरील निष्कर्षास अनुसरुन खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे.
- आ दे श -
तक्रारकर्त्याची ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 च्या कलम 12 खालील
तक्रार खालीलप्रमाणे खारीज करण्यांत येते.
1. तक्रार खारीज.
2. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षास सदरच्या तक्रार खर्चाची रक्कम रुपये 5,000/-
आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आंत दयावी.
2. आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामूल्य पुरविण्यात यावी.
3. प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ प्रत तक्रारकर्त्यास परत करावी.