न्या य नि र्ण य
(व्दाराः- मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्या)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे—
वि.प. क्र.1 ते 3 या नॉन बँकींग फायनान्स संस्था आहेत. तक्रारदार यांना वस्तू खरेदी करणेसाठी 0 टक्के व्याजदरावर वि.प.क्र.1 यांनी ऑफर दिल्या होत्या. त्या अनुषंगाने तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडून दि. 15/4/2017 रोजी सोनी एलईडी टीव्ही रक्कम रु. 27,000/- ला खरेदी केला. सदर कर्जाचा हप्ता रु.1,500/- तक्रारदाराचे बँक खात्यातून भरला जात होता. परंतु कर्जाची संपूर्ण रक्कम पूर्ण होण्याअगोदर दि. 14/11/17 रोजी वि.प.क्र.1 यांनी सदरचे कर्ज बंद केले. यावेळी फक्त रु.12,000/- इतके शिल्लक कर्ज होते. सदरचे शिल्लक रु.12,000/- असलेले कर्ज हे वैयक्तिक कर्जामध्ये 32 टक्के व्याजामध्ये वर्ग केले. तदनंतर वि.प. यांनी दिलेल्या ऑफर नुसार तक्रारदारांनी रु.10,154/- या किंमतीला रेडमीचा मोबाईल दि.2/11/17 रोजी खरेदी केला. त्यानंतर वि.प.क्र.1 यांनी तक्रारदारास 19 टक्के व्याजदराने वैयक्तिक कर्जाची ऑफर दिली होती. त्याअनुषंगाने तक्रारदारांनी वि.प.क्र.1 यांचेकडून रु.60,000/- इतके कर्ज दि.10/11/2017 रोजी 19 टक्के व्याजदरावर 3 वर्षे मुदतीसाठी घेतले. परंतु सदर कर्जातून विम्यापोटी, प्रोसेसिंग फी पोटी तसेच आरोग्य विम्यापोटी एकूण रकमा कपात करण्यात येवून तक्रारदाराचे खात्यात फक्त रु.53,614/- इतकीच रक्कम जमा झाली. सदर कर्जाचा हप्ता वजा करताना तक्रारदार यांच्या बँक खात्यातून 32 टक्के व्याजदराने रु. 3,137/- इतका वजा झाला. वास्तविक पाहता, 19 टक्के दराने महिना रु.2,200/- इतका हप्ता वजा होणे गरजेचे होते. याबाबत तक्रारदारांनी वि.प. यांचेकडे चौकशी केली असता असे समजून आले की, टीव्ही खरेदीसाठी घेतलेल्या कर्जातील शिल्लक राहिलेली रु. 12,000/- ही रक्कम वि.प यांनी तक्रारदाराचे वैयक्तिक कर्जामध्ये वर्ग केली व अशा एकूण रक्कम रु. 72,000/- वर 32 टक्के व्याजदराने व्याज वि.प.क्र.1 यांनी वसूल केले आहे. म्हणून तक्रारदारांनी वि.प. यांना नोटीस पाठविली. परंतु त्यास वि.प.यांनी कोणतेही प्रतिउत्तर दिले नाही. वास्तविक पाहता, तक्रारदारांनी टीव्हीसाठी घेतलेले कर्ज हे 0 टक्के व्याजदरावर घेतले होते. पण वि.प.क्र.1 यांनी सदरची उर्वरीत कर्ज रक्कम रु. 12,000/- वैयक्तिक कर्जामध्ये अधिक करुन त्यावर 32 टक्के व्याजाची आकारणी केली आहे. तसेच वि.प. यांनी कोणतेही कारण नसताना तक्रारदार यांचे नावे दोन विमा पॉलिसी काढलेल्या आहेत व त्यांची रक्कम वसुल केली आहे. म्हणून तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. सबब, वि.प.क्र.1 ते 3 यांना रक्कम रु.12,000/- चे कर्ज हे 0 टक्के व्याजदराने देणेचा आदेश व्हावा व फक्त रु. 60,000/- इतकीच रक्कम वसूल करणेचा आदेश पारीत करावा, 32 टक्के व्याजदराऐवजी 19 टक्के व्याजदराने कर्ज वसूल करण्याचचा आदेश व्हावा, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.2,50,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु.50,000/- देणेचा आदेश व्हावा व अनुचित व्यापारी प्रथा बंद करणेचा आदेश वि.प. यांना व्हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
2. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत तक्रारदारांनी वि.प. यांचेडून घेतलेल्या कर्जाचे खातेउतारे, व्याजाचे प्रमाणपत्र, नाहरकत दाखला, कर्ज मंजूरीचा दाखला, बँकेतील खात्याचा उतारा, कर्ज परतावा शेडयुल, विमा पॉलिसीस, वि.प. यांना पाठविलेली नोटीस इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
3. वि.प.क्र.1 ते 3 यांचेविरुध्द ता. 15/1/2018 रोजी नो से चा आदेश पारीत झालेला होता. तथापि वि.प.क्र.1 ते 3 यांनी रक्कम रु.300/- ची कॉस्ट तक्रारदार यांना अदा करणेचे अटीवर सदर वि.प.क्र.1 ते 3 यांचेविरुध्द नो से चा आदेश रद्द करणेत आला व वि.प.क्र.1 ते 3 यांचे म्हणणे दाखल करुन घेण्यात आले. वि.प.क्र.4 यांचेविरुध्द नो से चा आदेश पारीत करण्यात आला. वि.प.क्र.5 यांना आयोगाची नोटीस लागू होवून देखील ते आयोगात वारंवार पुकारता गैरहजर. सबब, वि.प.क्र.5 यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारीत करणेत आला आहे. तक्रारदारांनी त्यांचे पुराव्याचे शपथपत्रामध्ये वि.प.क्र.1 ते 3 यांचेविरुध्द दाद मागितली आहे. सदरची न्यायीक नोंद (Judicial note) हे आयोग घेत आहे.
4. वि.प.क्र.1 ते 3 यांनी याकामी दि.3/07/18 रोजी तक्रारदाराचे तक्रारअर्जास म्हणणे दाखल केले असून तक्रारअर्जातील बहुतांशी कथने नाकारली आहेत. वि.प. यांचे कथनानुसार, तक्रारदारानी बजाज फायनान्स लि. यांना याकामी आवश्यक पक्षकार केलेले नाही. तक्रारदार व वि.प. यांचेमधील व्यवहार हा करारावर अवलंबून आहे. तक्रारदारांनी त्यांचे तक्रारअर्जात कोठेही असे नमूद केलेले नाही की, वि.प. यांनी करारातील अटी व शर्तींचा भंग केलेला आहे. ग्राहक संरक्षण कायद्याप्रमाणे प्रस्तुतची तक्रार चालणेस पात्र नाही. तक्रारदाराने टीव्ही साठी घेतलेल्या कर्जाची परतफेड केल्यानंतर तक्रारदारास आणखी रु.12,000/- चे कर्जाची आवश्यकता असल्याने तक्रारदाराचे टीव्हीसाठी घेतलेले कर्ज बंद करण्यात येवून रक्कम रु.60,000/- चे वैयक्तिक कर्ज तक्रारदारास देण्यात आले. तक्रारदारास सुरुवातीला रक्कम रु. 60,000/- चे वैयक्तिक कर्ज देण्यात आले होते. तदनंतर तक्रारदाराने आणखी रु.12,000/- चे कर्जाची मागणी केल्याने त्यास नवीन कर्ज रु.72,000/- चे 32 टक्के व्याजदराने देण्यात आले. सदर कर्जाचा फ्लॅट रेट हा 19 टक्के असून Reducing Rate 32 टक्के आहे. तक्रारदारास देण्यात आलेल्या विमा पॉलिसी या तक्रारदाराचे मागणीनुसार रद्द करण्यात आल्या व त्याची रक्कम रु.3,946/- ही तक्रारदारास परत करण्यात आली. सबब, वि.प. यांनी कोणतीही सेवात्रुटी न दिल्याने तक्रारअर्ज नामंजूर करण्यात यावा अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.
5. वि.प. यांनी याकामी कागदयादीसोबत खातेउतारा, तक्रारदाराने दिलेल्या संमतीचा पुरावा, कर्ज परताव्याबाबतची शीट इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.
6. तक्रारदारांचा तक्रारअर्ज, वि.प. क्र.1 ते 3 यांचे म्हणणे, दाखल केलेली अनुषंगिक कागदपत्रे, तक्रारदाराचे पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद यांचा विचार करता निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | अंशतः मंजूर. |
कारणमिमांसा –
मुद्दा क्र. 1 –
7. प्रस्तुतकामी वि.प.क्र.1 ते 3 या नॉन बँकींग फायनान्स संस्था आहेत. सदरच्या संस्था इतर बँकींग कामाशिवाय ग्राहकांना वस्तू खरेदी करणेसाठी व वैयक्तिक कारणासाठी कर्ज पुरवठा करतात. तक्रारदार यांना वस्तू खरेदी करण्यासाठी 0 टक्के व्याजदरावर वि.प.क्र.1 यांनी ऑफर दिलेली होती. त्याअनुषंगाने तक्रारादार यांनी वि.प.क्र.1 यांचेकडून लोन अकाऊंट नं. 4270CD37828650 मधून 0 टक्के व्याजदरावर ता. 15/4/2017 रोजी सोनी एलईडी टीव्ही रु.27,000/- किंमतीला खरेदी केला तसेच रेडमी मोबाईल फोन ता. 2/11/2017 रोजी रक्कम रु. 10,154/- ला लोन अकाऊंट नं. 427REM55265116 0 टक्के व्याजदराने खरेदी केला. सदरचे वस्तूंची खरेदी वि.प. बँकेकडून 0 टक्के व्याजदराने कर्ज घेवून खरेदी केलेची बाब वि.प यांनी नाकारलेली नाही. सबब, तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2
8. उपरोक्त मुद्दा क्र.1 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत. तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडून वर क्र.1 मध्ये नमूद केलेल्या वस्तू 0 टक्के व्याजदराने कर्जे घेवून खरेदी केलेल्या होत्या. तथापि वि.प. यांनी तक्रारदार यांनी वि.प यांचेकडे घेतलेल्या रक्कम रु.60,000/- वैयक्तिक कर्ज व रक्कम रु.12,000/- टीव्हीवरील राहिलेले कर्ज असे एकूण कर्ज रु. 72,000/- वर 32 टक्के व्याजदर लावून सदरचे कर्ज वसूल केले. सबब, वि.प. यांनी तक्रारदारांचे सदर कर्जावर अतिरिक्त व्याज आकारुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. सदर मुद्याचे अनुषंगाने दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता तक्रारदारांनी तक्रारीसोबत अ.क्र.1 ला अकाऊंट स्टेटमेंट, अ.क्र.2 ला इंटरेस्ट सर्टिफिकेट, अ.क्र.3 ला नो ऑबजेक्शन सर्टिफिकेट दाखल केलेला आहे. सदरचे कागदपत्रांवरुन तक्रारदारांनी वि.प.क्र.1 यांचेकडून लोन अकाऊंट 427OCD37828650 मधून 0 टक्के व्याजदरावर ता. 15/4/2017 रोजीपासून रक्कम रु.27,000/- इतके कर्ज अदा केलेले असून सदरचे कर्जाचा मासिक हप्ता रु.1,500/- तक्रारदार यांनी वि.प.क्र.1 यांना ता. 2/06/2017 रोजी पासून ता. 14/11/2017 रोजी अखेरपर्यंत भरलेला दिसून येतो. तसेच तक्रारदार यांनी अ.क्र.5 ला ता. 13/2/18 रोजीचे इंटरेस्ट सर्टिफिकेट दाखल केलेले असून सदरचे इंटरेस्ट सर्टिफिकेटवरुन रक्कम रु.10,154/- चे कर्ज 0.00 टक्के दराने दिलेचे दिसून येते. सबब, सदरचे कागदपत्रांवरुन वि.प.क्र.1 यांनी तक्रारदार यांना वस्तूचे खरेदीपोटी 0 टक्के व्याजदराने कर्ज दिलेले होते. सदरची बाब वि.प. यांनी म्हणणेमध्ये मान्य केलेली आहे.
9. प्रस्तुतकामी तक्रारदारांचे पुराव्याचे शपथपत्राचे अवलोकन करता वि.प. यांनी रक्कम रु.27,000/- चे कर्जाची संपूर्ण रक्कम पूर्ण होण्याअगोदर ता. 14/11/2017 रोजी तक्रारदार यांना पूर्वकल्पना न देता स्वतःहून बंद केले. यावेळी रक्कम रु.12,000/- इतके कर्ज शिल्लक कर्ज होते. सदरचे शिल्लक कर्ज रु.12,000/- वि.प. यांनी वैयक्तिक कर्जामध्ये 32 टक्के व्याजामध्ये वर्ग केले. वि.प.क्र.1 यांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता 0 टक्के व्याजदराचे कर्ज रक्कम रु.12,000/- हे वैयक्तिक कर्जामध्ये वर्ग केले व त्यावर 32 टक्के व्याजदर लावला. वि.प.क्र.1 यांनी तक्रारदारांना 19 टक्के व्याजदराने वैयक्तिक कर्जाची ऑफर दिली होती. तक्रारदार यांनी वि.प.क्र.1 यांचेकडून रक्कम रु.60,000/- चे कर्ज लोन अकाऊंट नं. 427pst58176125 अन्वये ता.10/11/2017 रोजी 19 टक्के व्याजदरावर 3 वर्षाचे मुदतीमध्ये फेडण्याचे अटीवर घेतले. त्याअनुषंगाने सदरची रक्कम रु. 60,000/- जमा होण्याऐवजी रक्कम रु.53,614/- इतकीच रक्कम जमा झाली. वि.प.क्र.1 यांनी फ्युचर ग्रुप इन्शुरन्स रक्कम रु.3,102/-, प्रोसेसिंग फी रु. 2,340/-, मॅक्स बुपा हेल्थ इन्शुरन्स रु.844/-, अशी एकूण रक्कम रु. 6,380/- तक्रारदार यांचेकडून वजा करुन घेतली. तसेच एकूण रक्कम रु.72,000/- रुपयावर 32 टक्के व्याजदराने वि.प.क्र.1 यांनी तक्रारदारांकडून वसूल केले. याबाबत तक्रारदाराने अ.क्र.6 लोन अकाऊंट स्टेटमेंट, अ.क्र.7 ला इंटरेस्ट सर्टिफिकेट, अ.क्र.8 ला plc Small tickets size loan amount ची प्रत दाखल केलेली आहे. तसेच अ.क्र.12 ला वि.प.क्र.1 यांचे रिपेमेंट शेडयुल दाखल केलेले असून सदरचे शेडयुलमध्ये
Original amount finance Rs.60,000/-,
Amount Finance- Rs.72,000/-,
Interest Rate – 32.02%,
Total Instalment – 36
नमूद आहे. तक्रारदारांचे सदरचे पुराव्याचे शपथपत्राचे अनुषंगाने वि.प.क्र.1 व 2 यांनी दाखल केलेल्या म्हणणेचे अवलोकन करता वि.प.क्र.1 व 2 यांनी तक्रारदारांना दोन पॉलिसी दिलेल्या होत्या. फ्युचर ग्रूप इन्शुन्स रु. 3,102/- व मॅक्स बूपा हेल्थ इन्शुरन्स रु. 844/- अशी एकूण रक्कम रु. 3,940/- सदरचे दोन्ही पॉलिसी रद्द करुन तक्रारदारांचे मागणीप्रमाणे रक्कम रु.3,940/- तक्रारदार यांना ता. 31/12/2017 रोजी रिफंड केलेले आहेत. त्याअनुषंगाने वि.प. यांनी तक्रारदाराचे अकाऊंट स्टेटमेंट दाखल केलेले आहे. सदरची बाब तक्रारदार यांनी नाकारलेली नाही. सबब, सदरचे अकाऊंट स्टेटमेंट वरुन तक्रारदारांना सदरचे दोन्ही पॉलिसी रद्द करुन एकूण रु.3,946/- मिळालेचे सिध्द होते. वि.प.क्र.1 व 2 यांचे म्हणणेचे अवलोकन करता तक्रारदार यांचे मागणी प्रमाणे वि.प. यांनी लोन अकाऊंट 427pst58176125 नुसार प्रथम तक्रारदार यांना रक्कम रु.60,000/- चे वैयक्तिक कर्ज अदा केले. परंतु तक्रारदार यांचे संमतीने रक्कम रु.12,000/- चे वैयक्तिक कर्ज सदरचे कर्जांमध्ये जमा करुन तक्रारदार यांना एकूण रक्कम रु. 72,0000/- वैयक्तिक कर्ज 32 टक्के व्याजदराने अदा केले. सदरचे कर्जाचा फ्लॅट रेट ऑफ इंटरेस्ट 19 टक्के होता आणि Reducing Rate (IPR) 32 टक्के होता. तक्रारदार यांचे मागणीवरुन रक्कम रु.12,000/- जादा रक्कम देणेत आली आणि तक्रारदारांचे संमतीने CD Loan हे Personal loan मध्ये रुपांतरीत केले. त्याअनुषंगाने वि.प. यांनी Copy of the proof of confirmation व Loan term sheet दाखल केलेले आहे. सदरचे कागदपत्रांचे अवलोकन करता ता. 10/11/2017 रोजी तक्रारदार यांना रक्कम रु. 60,000/- चे कर्ज 19 टक्के व्याजदराने 36 महिने हप्त्यांची रक्कम रु. 2,614/- दिसून येते. सबब, वरील कागदांवरुन वि.प.क्र.1 व 2 यांनी तक्रारदारांना रक्कम रु. 60,000/- वैयक्तिक कर्ज 19 टक्के व्याजदराने अदा केलेचे वि.प. यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन सिध्द होते. वि.प. यांनी त्यांचे लेखी म्हणणेमध्ये तक्रारदार यांचे संमतीने रक्कम रु.12,000/- चे लोन वैयक्तिक कर्जात जमा केलेचे कथन केले आहे. तथापि, सदरचे तक्रारदारांचे संमतीने जमा केलेचे अथवा सदरचे एकूण कर्जावर रकमेवर 32 टक्के व्याजदर Reducing Rate of interest ने अदा करणेचे तक्रारदार यांना कळविलेचे अनुषंगाने वि.प. यांनी कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही.
10. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन तसेच तक्रारदारांचे पुराव्याचे शपथपत्रावरुन वि.प. यांनी ता. 15/4/2017 रोजी रक्कम रु. 27,000/- चे 0 टक्के व्याजदरांचे टी.व्ही.साठी घेतलेले कर्ज तक्रारदारांना न कळविता ता. 14/11/2017 रोजी बंद केले व शिल्लक रक्कम रु.12,000/- वैयक्तिक कर्जामध्ये जमा केली. सदरचे पुराव्याचे शपथपत्रामधील तक्रारदारांची कथने वि.प. यांनी नाकारलेली नाहीत. तक्रारदारांनी वि.प.क्र.1 ते 3 यांना नोटीस पाठवून सदरचा व्याजदर 32 टक्के वरुन 19 टक्के करावा व रु. 12,000/- वैयक्तिक कर्जामधून काढून टी.व्ही. च्या कर्जामध्ये वर्ग करावीत विनंती केली. त्याअनुषंगाने वि.प.क्र.1 ते 3 यांना नोटीस पाठविली. सदरचे नोटीसीची प्रत तक्रारदार यांनी दाखल केलेली आहे. तथापि सदरचे नोटीसीस वि.प. यांनी कोणतेही उत्तर दिलेले नाही. सबब, वि.प.क्र.1 व 3 यांनी तक्रारदारांनी टी.व्ही.साठी घेतलेले कर्ज 0 टक्के व्याजदराने घेतले असताना देखील उर्वरीत कर्ज रक्कम रु. 12,000/- तक्रारदारांचे सहमतीशिवाय वैयक्तिक कर्जामध्ये जमा करुन सदरचे कर्जावर 32 टक्के व्याजदर आकारणी करुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. तसेच रक्कम रु. 60,000/- वैयक्तिक कर्जावर रक्कम 19 टक्के व्याजदर असताना देखील सदरचे कर्जावर 32 टक्के व्याजदर आकारुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
11. सबब, वि.प.क्र.1 ते 3 यांनी तक्रारदार यांचेकडून टी.व्ही.साठी घेतलेल्या कर्ज रकमेपैकी उर्वरीत कर्ज रक्कम रु.12,000/- कर्जावर 0 टक्के व्याजदर तसेच वैयक्तिक कर्ज रक्कम रु.60,000/- वर 32 टक्के व्याजदराऐवजी 19 टक्के व्याजदराने कर्ज वसूल करणेचे निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
मुद्दा क्र.3
12. वि.प. क्र.1 ते 3 यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेने तक्रारदार हे वि.प.क्र.1 ते 3 यांचेकडून मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.8,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- मिळणेस पात्र आहेत. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.4 - सबब आदेश.
| - आ दे श - - तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
- वि.प.क्र.1 ते 3 यांनी तक्रारदार यांचंकडून टी.व्ही.साठी घेतेल्या कर्ज रकमेपैकी उर्वरीत कर्ज रक्कम रु. 12,000/- 0 टक्के व्याजदराने आकारणी करुन तसेच वैयक्तिक कर्ज रक्कम रु.60,000/- वर 32 टक्के व्याजदराऐवजी 19 टक्के व्याजदराने आकारुन करुन सदरची दोन्ही कर्जे वसूल करुन घ्यावीत.
-
- वि.प.क्र.1 ते 3 यांनी तक्रारदारांना मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.8,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- अदा करावी.
- वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प.क्र.1 ते 3 यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
- विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदयातील तरतुदींप्रमाणे वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
- आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.
|