- नि का ल प त्र -
व्दाराः- मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्या
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे—
यातील वि.प. हे अॅपल कंपनीचे अधिकृत सेवा पुरवठादार असून ते अॅपल कंपनीचे मोबाईल हॅण्डसेट दुरुस्त करुन देणे वगैरे प्रकारची कामे करतात. त्यांचे मॅनेजर श्री निखिल कुमठेकर असून ते कंपनीचे होणा-या सर्व व्यवहारास ते जबाबदार इसम आहेत. तक्रारदार यांनी अॅपल कंपनीचा iphone 7 model – iphone 7 GSM, 128 GB GOLD Serial No. DNPSJDRJHG7M, IMEI No. 359154074982549 अशा वर्णनाचा हॅण्डसेट दि. 26/11/17 रोजी रक्कम रु.75,000/- या रकमेस खरेदी केला होता. सदरचा मोबाईल वॉरंटी कालावधीमध्ये होता. सदर हॅण्डसेटमध्ये बिघाड झालेने तक्रारदार यांनी सदरचा हॅण्डसेट वि.प. यांचेकडे दि. 24/5/17 रोजी दुरुस्तीकरीता दिला. त्यावेळी वि.प. यांनी त्यांच्या नियमाप्रमाणे तक्रारदार यांना iphone 6 SILV, 16 GB Serial No. FDPTCISAGSMP हा जुना लोनर हॅण्डसेट तक्रारदारांचा मोबाईल दुरुस्त होवून येईपर्यंत तात्पुरता वापरणेसाठी दिला होता. सदरचे हॅण्डसेटमध्ये खालील बाजूस स्क्रॅच असलेची बाब वि.प. यांनी तक्रारदाराचे निदर्शनास आणून दिली होती. तदनंतर दि.31/5/17 रोजी तक्रारदार हे त्यांचा दुरुस्त झालेला हॅण्डसेट घेण्यासाठी वि.प. यांचेकडे गेले असता वि.प. यांनी विनाकारण, वापरणेस दिलेल्या लोनर फोनमध्ये स्क्रॅच आहेत, आम्ही तो हॅण्डसेट घेवू शकत नाही, अशी उत्तरे दिली व तक्रारदाराचा दुरुस्त होवून आलेला हॅण्डसेट परत देणेस नकार दिला. म्हणून तक्रारदारांनी वि.प. यांना दि. 12/6/17 रोजी नोटीस पाठवून त्यांचे दुरुस्त होवून आलेल्या हॅण्डसेटची मागणी केली असता वि.प. यांनी त्यास दि.1/7/17 रोजी खोटया मजकुराचे उत्तर पाठविले आहे व लोनर फोनची डॅमेज किंमत रु. 24,476/- ची बेकायदेशीर मागणी केली आहे. वि.प. यांनी तक्रारदार यांना दिलेला लोनर फोन हा ज्या स्थितीत वापरणेस दिला होता, त्याच स्थितीत आहे. त्यास कोणतेही स्क्रॅच पडलेले नाहीत. सबब, तक्रारदारांचा स्वमालकीचा हॅण्डसेट परत मिळावा, मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- व खर्चाची रक्कम रु.10,000/- वि.प.कडून मिळावेत अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
2. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत खरेदी केलेल्या हॅण्डसेटचे टॅक्स इन्व्हॉईस, विम्याची पावती, वि.प. यांचेकडे हॅण्डसेट दिल्याबाबतचा सर्व्हिस रिपोर्ट, वि.प. यांना पाठविलेली नोटीस व त्याची पावती व पोहोचपावती, वि.प. यांनी पाठविलेली नोटीस इ. एकूण 7 कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
3. वि.प. यांनी याकामी हजर होवून दि.05/9/17 रोजी लेखी म्हणणे दाखल केले. वि.प. यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये, तक्रारदाराचे तक्रारअर्जातील संपूर्ण कथने नाकारली आहेत. वि.प. चे कथनानुसार, तक्रारदार यांनी वर नमूद केलेला हॅण्डसेट दुरुस्तीकरिता दि. 24/5/15 रोजी वि.प. यांचेकडे दिला होता. त्याबाबतचा सर्व्हिस रिपोर्ट वि.प. यांनी तक्रारदार यांना लेखी देवून त्यावर सही घेतली होती. तसेच सोबत दुरुस्तीबाबतच्या अटी व शर्तीसुध्दा लेखी दिल्या होत्या. त्यावेळी तक्रारदार यांच्या मागणीवरुन त्यांचा सदरचा फोन दुरुस्ती होईपर्यंत तक्रारदार यांची गैरसोय टाळण्यासाठी वि.प. यांनी त्यांच्याकडील नवीन आयफोन 6 हा लोनर फोन तात्पुरता वापरण्यास दिला होता. सदर लोनर फोनबाबतचे सर्व नियम व अटी प्रस्तुत वि.प. यांनी तक्रारदार यांना समजावून सांगून त्याबाबत आवश्यक तो आयफोन लोन अॅग्रीमेंट लिहून दिला होता. सदर अॅग्रीमेंटवर तक्रारदार यांनी सही केली होती. तसेच सदरच्या लोनर फोनवर डेन्ट, स्क्रॅच अगर डॅमेज नसल्याची खात्री करुनच प्रस्तुत तक्रारदार यांनी लोनर फोन वापरण्यास घेतला होता. मात्र प्रत्यक्षात सदरचा लोनर फोन परत दिला असता त्यावेळी तक्रारदारांच्या समोरच सदर लोनर फोनचा व्हिएमआय चेक केला असता सदरच्या लोनर फोन हेडफोन जॅकजवळ फुटलेला आढळून आला. सदरची बाब लागलीच वि.प. यांनी तक्रारदार यांच्या लक्षात आणून दिली. सदर डॅमेजबाबत फोटोही वि.प. यांनी सदर तक्रारदार यांच्यासमोर काढले आहे. अशा वेळी वि.प. यांनी सदर तक्रारदार यांना स्पष्टपणे सांगितले की, अशा प्रकारचा डॅमेज किंवा हेडफोनजवळ फुटलेला फोन आम्ही परत घेवू शकत नाही तसेच याबाबत प्रस्तुत वि.प. यांनी अॅपल कंपनीबरोबर चर्चाही केली. त्यावेळी अॅपल कंपनीने सुध्दा अशा प्रकारचा डॅमेज फोन घेता येणार नाही. जर ग्राहकांनी कंपनीच्या नियमानुसार चार्जेस दिल्यानंतर ग्राहकाचा मूळ मोबाईल फोन परत देता येईल असे कळविले. सदरची बाब ही वि.प. यांच्या अखत्यारीत नसून ती अॅपल कंपनीच्या अखत्यारीत आहे हे वि.प.यांनी तक्रारदारास स्पष्ट सांगितलेले होते. तरीसुध्दा तक्रारदार यांचा सहानभूतीपूर्वक विचार करुन पुन्हा अॅपल कंपनीशी वि.प. यांनी याबाबत विचारणा केली असता सदर अॅपल कंपनीने डॅमेज किंमत रु. 24,766/- तसेच वि.प. यांनी दिलेला लोनर फोन परत जमा करुन घेवून तक्रारदार यांचा दुरुस्त केलेला आयफोन 7 परत घेवून जाण्याबाबत तक्रारदार यांना विनंती केली. परंतु तक्रारदार यांनी सदरचा पर्याय अमान्य केला व वि.प. यांना नोटीस पाठविली. वि.प. यांनी त्यांच्या सेवेमध्ये कोणतीही त्रुटी केलेली नाही. सबब, तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी अशी विनंती वि.प. यांनी केली आहे.
4. वि.प. यांनी याकामी म्हणण्याचे पुष्ठयर्थ शपथपत्र दाखल केले आहे. तसेच दि. 15/11/17 रोजी कागदयादीसोबत लोन अॅग्रीमेंट, सर्व्हिस रिपोर्ट, अॅपल कंपनीबरोबर झालेल्या चॅटींगचा रिपोर्ट, मेकॅनिकल इन्स्पेक्शन गाईड रिपोर्ट, लोनर फोनचा फोटो इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवादही दाखल केला आहे.
5. वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | वि.प. यांनी तक्रारदाराला द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय |
2 | तक्रारदार हे वि.प. यांचेकडून मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय |
3 | अंतिम आदेश काय ? | अंशतः मंजूर |
कारणमिमांसा–
मुद्दा क्र. 1 –
6. तक्रारदार यांनी अॅपल कंपनीचा iphone 7 model – iphone 7 GSM, 128 GB GOLD Serial No. DNPSJDRJHG7M, IMEI No. 359154074982549 खरेदी केलेला होता. सदरचे हॅण्डसेटमध्ये बिघाड निर्माण झालेने ता. 24/5/17 रोजी सदराचा हॅण्डसेट तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे दुरुस्तीसाठी दिला. तेव्हा वि.प. यांनी त्यांचे नियमाप्रमाणे तक्रारदार यांना iphone 6 SILV, 16 GB Serial No. FDPTCISAGSMP हा जुना लोनर फोन आयफोन 6 मोबाईल हॅण्डसेट तक्रारदाराचा मोबाईल दुरुस्त होऊन येईपर्यंत तात्पुरता वापरणेस (Replacement) दिला होता. सदरचे लोनर फोन आयफोन 6 चे खालील बाजूस स्क्रॅच असलेची बाब वि.प. यांनी तक्रारदारांचे निदर्शनास आणून दिली. ता. 31/5/17 रोजी तक्रारदारांचा सदरचा हॅण्डसेट फोन दुरुस्त झाला असलेबाबत वि.प. यांचेडून फोन आला होता. त्यानुसार तक्रारदार हे वि.प. कडून आयफोन 7 मागणेकरिता व आणणेकरिता गेले असता वि.प. यांनी तक्रारदार यांना वि.प. यांनी वापरणेस दिलेल्या लोनर फोन आयफोन 6 या हॅण्डसेटमध्ये स्क्रॅच आहेत, या कारणास्तव तक्रारदार यांचा त्याची मालकी असलेला दुरुस्त होवून आलेला आयफोन 7 मोबाईल हॅण्डसेट परत करणेस नकार दिला. सबब, सदरचा आयफोन 7 मोबाईल हॅण्डसेट वि.प. यांनी तक्रारदार यांना परत न देवून तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. सदर मुद्याचे अनुषंगाने दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता अ.क्र.1 ला तक्रारदारांनी आयफोन 7 खरेदी केले बाबतचा टॅक्स इन्व्हॉईस दाखल आहे. सदरचे टॅक्स इन्व्हॉईस वरुन तक्रारदारांनी सदरचा हॅण्डसेट रक्कम रु.70,000/- ला खरेदी केलेचे दिसून येते. अ.क्र.2 ला सदरचे हॅण्डसेटची विम्याची पावती दाखल आहे. अ.क्र.3 ला वि.प. यांनी तक्रारदार यांना दिलेला सर्व्हिस रिपोर्ट दाखल आहे. सदरचे सर्व्हिस रिपोर्टचे अवलोकन कले असता Phone get hang, low sound from receiver नमूद आहे. सदरचा हॅण्डसेट वॉरंटी कालावधीत असलेचा दिसून येतो. अ.क्र.4 व 5 ला तक्रारदार यांनी वि.प. यांना पोस्टामार्फत पाठविलेली नोटीस, पावती व पोहोच पावत्या दाखल केलेल्या आहेत. सदरचे कागदपत्रांवरुन तक्रारदार यांचे आयफोन 7 मोबाईल हॅण्डसेटमध्ये दोष उत्पन्न झालेचा दिसून येतो.
7. वि.प. यांनी त्यांचे लेखी म्हणणेमध्ये सदरचा हॅण्डसेट तक्रारदार यांनी ता. 24/5/15 रोजी रिपेअरींग करिता दिलेला होता हे मान्य केलेले आहे. त्याबाबतचा सर्व्हिस रिपोर्ट वि.प. यांनी तक्रारदार यांना लेखी देवून त्यावर सही घेतली होती. तसेच सोबत दुरुस्तीबाबतच्या अटी व शर्तीसुध्दा लेखी दिल्या होत्या. त्यावेळी तक्रारदार यांच्या मागणीवरुन त्यांचा सदरचा फोन दुरुस्ती होईपर्यंत तक्रारदार यांची गैरसोय टाळण्यासाठी वि.प. यांनी त्यांच्याकडील नवीन आयफोन 6 हा लोनर फोन तात्पुरता वापरण्यास दिला होता. सदर लोनर फोनबाबतचे सर्व नियम व अटी प्रस्तुत वि.प. यांनी तक्रारदार यांना समजावून सांगून त्याबाबत आवश्यक तो आयफोन लोन अॅग्रीमेंट लिहून दिला होता. सदर अॅग्रीमेंटवर तक्रारदार यांनी सही केली होती. तसेच सदरच्या लोनर फोनवर डेन्ट, स्क्रॅच अगर डॅमेज नसल्याची खात्री करुनच प्रस्तुत तक्रारदार यांनी लोनर फोन वापरण्यास घेतला होता. मात्र प्रत्यक्षात सदरचा लोनर फोन परत दिला असता त्यावेळी तक्रारदारांच्या समोरच सदर लोनर फोनचा व्हिएमआय चेक केला असता सदरच्या लोनर फोन हेडफोन जॅकजवळ फुटलेला आढळून आला. सदरची बाब लागलीच वि.प. यांनी तक्रारदार यांच्या लक्षात आणून दिली. सदर डॅमेजबाबत फोटोही वि.प. यांनी सदर तक्रारदार यांच्यासमोर काढले आहे. अशा वेळी वि.प. यांनी सदर तक्रारदार यांना स्पष्टपणे सांगितले की, अशा प्रकारचा डॅमेज किंवा हेडफोनजवळ फुटलेला फोन आम्ही परत घेवू शकत नाही तसेच याबाबत प्रस्तुत वि.प. यांनी अॅपल कंपनीबरोबर चर्चाही केली. त्यावेळी अॅपल कंपनीने सुध्दा अशा प्रकारचा डॅमेज फोन घेता येणार नाही. जर ग्राहकांनी कंपनीच्या नियमानुसार चार्जेस दिल्यानंतर ग्राहकाचा मूळ मोबाईल फोन परत देता येईल असे कळविले. तरीसुध्दा तक्रारदार यांचा सहानभूतीपूर्वक विचार करुन पुन्हा अॅपल कंपनीशी वि.प. यांनी याबाबत विचारणा केली असता सदर अॅपल कंपनीने डॅमेज किंमत रु. 24,766/- तसेच वि.प. यांनी दिलेला लोनर फोन परत जमा करुन घेवून तक्रारदार यांचा दुरुस्त केलेला आयफोन 7 परत घेवून जाण्याबाबत तक्रारदार यांना विनंती केली असे वि.प. यांनी लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. त्याअनुषंगाने वि.प. यांनी ता. 15/11/17 रोजी कागदपत्रे दाखल केलेली असून सदर कागदपत्रांमध्ये आयफोन लोन अॅग्रीमेंट दाखल केलेले आहे. सदर लोन अॅग्रीमेंटवर तक्रारदारांची सही आहे. सदरची सही तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्रामध्ये नाकारलेली आहे. सदरचा लोनर फोन ज्या स्थितीत स्वीकारला होता, त्याच स्थितीमध्ये परत केलेला आहे असे पुराव्यात नमूद आहे तथापि वि.प. यांनी त्यांचे पुराव्याचे शपथपत्रामध्ये सदर लोनर फोनबाबत सर्व नियम व अटी वि.प. यांनी तक्रारदाराला तोंडी समजावून सांगितल्या होत्या. सदरचे लोनर फोनवर डेन्ट, स्क्रॅच अगर डॅमेज नसलेची खात्री करुनच प्रस्तुत तक्रारदार यांनी सदरचा लोनर फोन वापरण्यास घेतला होता असे कथन केले आहे. त्या अनुषंगाने वि.प. यांनी सदरचे मूळ लोनर फोनचे फोटो दाखल केलेले आहे. परंतु सदरचे फोटो हे सदरचेच लोनर फोनचे आहेत हे वि.प. यांनी शाबीत केलेले नाही अथवा सदरचे फोटो हे तक्रारदाराचे समक्ष सदरचा लोनर फोन तक्रारदारांचे ताब्यात देतेवेळचे आहेत, या अनुषंगाने कोणताही परिस्थितीजन्य पुरावा (circumstantial evidence) प्रस्तुतकामी वि.प. यांनी दाखल केलेला नाही. त्याकारणाने सदरचे फोटो हे मूळ लोनर फोनचे आहेत हे वि.प. यांनी शाबीत केलेले नाही असे तसेच सदरचा मूळ लोनर फोन तक्रारदारांचे ताब्यात देताना त्यावर कोणताही डेन्ट, स्क्रॅच अगर डॅमेज नसलेचे शाबीत करणेस वि.प. हे असमर्थ ठरले आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
8. प्रस्तुतकामी वि.प. यांनी तक्रारदारांचे आयफोन 7 मध्ये दोष होता हे मान्य केलेले असून सदरचा आयफोन 7 ता. 31/5/17 रोजी दुरुस्त झालेला असून तो घेवून जाणेसाठी वि.प. यांनी तक्रारदाराला फोन केला होता. सदरचा आयफोन 6 हा लोनर फोन तात्पुरता वापरण्यास तक्रारदारांना दिल्याचे वि.प. यांना मान्य आहे. तथापि, सदरचा आयफोन 6 लोनर फोनचा VMI चेक केला असता हेडफोन जॅकजवळ फुटलेला आहे हे सदरचा फोन तक्रारदारांनी दिला असता वि.प. यांचे लक्षात आलेचे वि.प. यांनी कथन केलेले आहे. परंतु सदरचा लोनर फोन तक्रारदार यांचे ताब्यात देणेपूर्वी कोणत्याही प्रकारची VMI Test अथवा चाचणी केली होती याबाबतचा पुरावा वि.प. यांनी मा. मंचात दाखल केलेला नाही. प्रस्तुतकामी अॅपल कंपनीस अशा प्रकारचे डॅमेज फोन घेता येणार नाही तसेच सदरची बाब ही वि.प. यांचे अखत्यारित नसून अॅपल कंपनीच्या अखत्यारित असलेचे वि.प. यांनी कथन केले आहे. परंतु त्याअनुषंगाने वि.प. यांनी दाखल केलेल्या फोन लोन अॅग्रीमेंट मध्ये सदरचे अॅपल कंपनीचे नाव नमूद नाही अथवा सदचे लोन अॅग्रीमेंट मध्ये सदरची बाब अॅपल कंपनीच्या अखत्यारित येते असे नमूद नाही. त्याकारणाने तक्रारदाराचे तक्रारीस नॉन जॉइंडर ऑफ नेसेसरी पार्टीज या तत्वाची बाधा येत नाही असे या मंचाचे मत आहे.
9. सबब, वरील सर्व कागदपत्रांचा विचार करता वि.प. यांनी त्यांचे म्हणणेमध्ये कथन केले आहे की, सदरचे लोनर फोनवर डेन्ट, स्क्रॅच अगर डॅमेज नसल्याची खात्री करुन तक्रारदार यांना लोनर फोन वापरण्यास दिलेला होता, तथापि सदरचे अनुषंगाने वि.प. यांनी परिस्थितीजन्य पुरावा (Circumstantial evidence) दाखल केलेला नाही. केवळ सदरचे फोनचे फोटो दाखल करुन सदरची बाब पूर्णपणे शाबीत होत नाही. वि.प. यांनी त्याची कथने पुराव्यानिशी शाबीत केलेली नाही. तक्रारदारांचा आयफोन 7 हा वि.प. यांचे ताब्यात असून तो पूर्णपणे दुरुस्त झाला असलेचे वि.प. यांनी मान्य केलेले आहे. त्याकारणाने तक्रारदार हे वि.प. यांचेकडे आयफोन 7 मागणेकरिता व आणणेकरिता गेले असता वि.प. यांनी विनाकारण तक्रारदार यांना वि.प. यांनी वापरणेस दिलेल्या लोनर फोन 6 हॅण्डसेटमध्ये स्क्रॅच आहे या कारणास्तव तक्रारदार यांचे मालकीचा आयफोन 7 मोबाईल हॅण्डसेट परत करण्यास नकार देवून तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2 व 3
10. उपरोक्त मुद्दा क्र.1 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता वि.प. यांनी तक्रारदार यांस द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे. सबब, वि.प. यांनी तक्रारदार यांचेकडून आयफोन 6 लोनर फोन स्वीकारुन तक्रारदार यांना त्यांचे मालकीचा आयफोन 7 कंपनीकडून दुरुस्त करुन आलेला हॅण्डसेट परत करावा या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेने तक्रारदार यांस मानसिक व शारिरिक त्रास झाला व सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले. त्या कारणाने तक्रारदार हे वि.प. यांचेकडून मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व तक्रारीचा खर्च रु. 3,000/- मिळणेस पात्र आहेत. सबब, मुद्दा क्र.2 व 3 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.4 - सबब आदेश.
आ दे श
1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो. 2) वि.प. यांनी तक्रारदार यांचेकडून आयफोन 6 लोनर फोन स्वीकारुन तक्रारदार यांना त्यांचे मालकीचा आयफोन 7 कंपनीकडून दुरुस्त होवून आलेला मोबाईल हॅण्डसेट तक्रारदार यांना त्वरित अदा करावा. 3) वि.प. यांनी तक्रारदार यांना मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- (रक्कम रु.पाच हजार फक्त) व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- (रक्कम रुपये तीन हजार मात्र) अदा करावी. 4) वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी. 5) विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 25 व 27 प्रमाणे वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते. 6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात. |
|