न्या य नि र्ण य
(व्दाराः- मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्या)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा 2019 चे कलम 34 व 35 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांना व्यावसायिक गरजेपोटी जुन्या चारचाकी टेम्पोची आवश्यकता होती. टेम्पो चालक या नात्याने तक्रारदार क्र.2 यांचा मामेभाऊ श्री उदय गणेशाचार्य त्यांना मदत करणार होता. वि.प. हे जुन्या वाहनांचा देणे-घेणेचा व्यवसाय करतात. त्याकारणाने तक्रारदारांनी वि.प. यांचेशी संपर्क केला. तक्रारदारांनी वि.प. यांचेकडे रजिस्ट्रेशन फी पोटी रु.1,000/- व अॅडव्हान्स म्हणून रु. 24,000/- जमा केले आहेत. दुर्दैवाने दि. 2/8/2020 रोजी तक्रारदार यांचे मामेभाऊ कै उदय गणेशाचार्य यांचे कोरोनाने निधन झाले. त्यामुळे तक्रारदारांनी टेम्पो घेण्याचा निर्णय स्थगित केला. म्हणून तक्रारदारांनी वि.प. यांचेकडे रु. 24,000/- ची मागणी केली. परंतु वि.प. यांनी तक्रारदारांना सदरची रक्कम देणेस टाळाटाळ केली आहे. म्हणून तक्रारदारांनी वकीलामार्फत दि. 15/7/2021 रोजी वि.प. यांना नोटीस पाठविली. परंतु त्यास वि.प. यांनी कोणतेही उत्तर दिलेले नाही. सबब, वि.प. यांनी सेवेत त्रुटी केल्याने तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. सबब, तक्रारदारास वि.प. यांचेकडून अॅडव्हान्सपोटी दिलेली रक्कम रु.24,000/- मिळावी, सदर रकमेवर 12 टक्केप्रमाणे व्याज मिळावे, तसेच मानसिक त्रासापोटी रक्कमरु. 5,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- देणेचा आदेश वि.प. यांना व्हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
2. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत वि.प. यांचे व्हिजिटींग कार्ड, बँकेचे पासबंकाची प्रत, तक्रारदारांनी वि.प. यांना पाठविलेली नोटीस, सदर नोटीसची पोस्टाची पावती व पोहोच पावती इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
3. वि.प. यांना याकामी तक्रारअर्जाची नोटीस लागू होवूनही ते या कामी हजर झाले नसल्याने त्यांचेविरुध्द दि. 07/04/2022 रोजी एकतर्फा आदेश करण्यात आला.
4. तक्रारदारांचा तक्रारअर्ज, दाखल केलेली अनुषंगिक कागदपत्रे, तक्रारदाराचे पुराव्याचे शपथपत्र, लेखी युक्तिवाद यांचा विचार करता निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे वाहनाचे अॅडव्हान्सपोटी दिलेली रक्कम व मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | अंशतः मंजूर. |
कारणमिमांसा –
मुद्दा क्र. 1 व 2 –
5. वि.प. हे अॅटो वर्ल्ड या नावाने जुन्या वाहनांचा देणे-घेणेचा व्यवसाय करत होते. तक्रारदार यांना स्वतःचे व्यावसायिक गरजेपोटी टेम्पोची आवश्यकता होती. त्या कारणाने तक्रारदारांनी वि.प याचेकडे संपर्क साधला. चर्चेअंती तक्रारदारांनी वि.प. यांना रजिस्ट्रेशन फी पोटी रक्कम रु.1,000/- अदा कले. सदर रक्कम मिळाल्यानंतर वि.प. यांनी तक्रारदारांना चांगले व सुस्थितीतील वाहन खरेदी देणेचे मान्य व कबूल केले. त्याकारणाकरिता तक्रारदारांकडे अॅडव्हान्सपोटी वि.प. यांनी रकमेची मागणी केली असता तक्रारदारांनी ता. 2/7/2020 रोजी रक्कम रु. 24,000/- ऑनलाईन पेमेंटने वि.प यांना अदा केली. तथापि तक्रारदार यांचे मामेभाऊ कै. उदय गणेशाचार्य यांचे ता. 2/8/2020 रोजी कोरोनाने निधन झाले. तक्रारदारांचे मामेभाऊ हेच तक्रारदारांना मदत करणार होते. सदर मामेभाऊ मयत झालेने तक्रारदार यांनी टेम्पो घेण्याचा निर्णय स्थगित केला व वि.प. यांचेकडून रक्कम रु.24,000/- अॅडव्हान्सपोटी जमा केलेली रकमेची मागणी केली असता वि.प यांनी तक्रारदारांना चुकीची कारणे सांगून सदरची रक्कम परत करणेस टाळाटाळ केली. सबब, तक्रारदारांनी वादातील वाहन घेण्याचा निर्णय स्थगित केलेनंतर वि.प यांनी सदर वाहनापोटी अॅडव्हान्स घेतलेली रक्कम रु. 24,000/- तक्रारदार यांना परत न करुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो.
6. प्रस्तुतकामी तक्रारदार यांनी तक्रारीसोबत अ.क्र.1 ला वि.प. यांचे व्यवसायाचे व्हिजिटींग कार्ड दाखल केलेले आहे. अ.क्र.2 ला ता. 12/10/2018 रोजीचा तक्रारदार यांचा जनता सहकारी बँक लि. पुणे येथील स्वतःचे सेव्हिंग्ज अकाऊंटचा खातेउतारा दाखल केलेला आहे. सदरचे खातेउता-याचे अवलोकन करता, ता. 2/07/2020 रोजी युपीआय पेमेंटने तक्रारदारांचे सदर खातेउता-यावरुन रक्कम रु. 24,000/- ऑनलाईन पेमेंटने Withdraw झालेचे दिसतात. त्याअनुषंगाने तक्रारदारांने ता. 7/4/2022 रोजीचे पुराव्याचे शपथपत्राचे अवलोकन करता तक्रारदारांनी वि.प. यांना ता. 2/7/2020 रोजी रक्कम रु. 24,000/- ऑनलाईन पेमेंट द्वारे वि.प यांना अदा केलेचे कथन केले आहे. प्रस्तुतकामी वि.प यांनी सदचे सेव्हिंग्ज खात्यावरील व्यवहार आयोगात हजर होवून नाकारलेला नाही अथवा तक्रारदारांचे पुराव्याचे शपथपत्रामधील कथने नाकारलेली नाहीत. सबब, सदरची रक्कम वि.प यांना ऑनलाईन पेमेंटने तक्रारदारांनी अदा केलेली असलेने तक्रारदार हे वि.प यांचे ग्राहक आहेत. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
7. प्रस्तुतकामी तक्रारदार यांनी ता. 28/01/2022 रोजी वि.प. हे तक्रारीत नमूद पत्त्यावर व्यवसाय करत असून सदरचे पत्त्यावर आयोगाचे आदेशाप्रमाणे ता. 8/12/2021 रोजी नोटीस पाठविली असता ता. 10/12/2021 रोजी सदरची नोटीस वि.प. यांना लागू होवून देखील वि.प. आयोगात हजर नाहीत असे पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे. त्याअनुषंगाने वि.प. यांना पोस्टाने पाठविलेल्या ता. 8/12/2021 रोजीचे नोटीसीची पोस्टाची पावती व सदरचे पोस्टपावतीचे अनुषंगाने इंडिया पोस्ट संकेत स्थळाची प्रत दाखल केलेली आहे. सदरचे इंडिया पोस्टाचे ट्रॅक रिपोर्टचे अवलोकन करता ता. 10/12/2021 रोजी Item delivered to Auto address नमूद आहे. सबब, ता. 7/4/2022 रोजी वि.प. यांना आयेागाची नोटीस दि. 10/12/2021 रोजी लागू होवून देखील गैरहजर असलेने वि.प. यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारीत करणेत आलेला आहे.
8. वरील विवेचनाचा विचार करता वि.प. यांना संधी असून देखील वि.प. यांनी तक्रारदारांची कथने नाकारलेली नाहीत. सबब, तक्रारदारांचे पुराव्याचे शपथपत्रातील कथनांचा विचार करता, वादातील वाहनाचे रजिस्ट्रेशन चार्जेस रु.1,000/- वगळता उर्वरीत रक्कम रु.24,000/- तक्रारदार यांनी वि.प. यांना त्यांचे सेव्हिंग्ज खात्यावरुन ऑनलाईन पेमेंटद्वारे अदा केली होती ही बाब सिध्द होती.
9. ता. 2/8/2020 रोजी तक्रारदार क्र.2 यांचे मामेभाऊ कोरोनाने मयत झाले. त्या कारणाने तक्रारदारांनी वादातील वाहन टेम्पो घेण्याचा निर्णय स्थगित केला व रक्कम रु. 24,000/- ची मागणी वि.प यांना वकीलामार्फत ता. 15/7/22 रोजी केलेची प्रत तक्रारीसोबत दाखल केली असून त्याची पोस्टाची पावती व सदर नोटीस वि.प. यांना मिळालेची पोस्टाची ता. 23/7/2021 ची पोहोचपावती दाखल केलेली आहे. सदरची कागदपत्रे वि.प. यांनी नाकारलेली नाहीत तसेच तक्रारदारांनी व्हाट्सअॅपद्वारे वि.प. यांना नोटीस पाठविली असून सदरची नोटीस वि.प. यांनी वाचलेचे तक्रारीत कथन केले आहे. सबब, वरील सर्व कागदपत्रांचे बारकाईने विचार करता, तक्रारदारांनी वि.प. यांना सदरचे टेम्पो वाहनाचे अॅडव्हान्सची रक्कम रु. 24,000/- ची मागणी करुन देखील तसेच नोटीस द्वारे वि.प. यांना कळवून देखील वि.प यांनी सदरचे नोटीसीस तक्रारदार यांना आजतागायत कोणतेही उत्तर न देता तसेच तक्रारदारांची सदरचे रकमेची मागणीची टाळाटाळ करुन सदरची रक्कम परत न देवून वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.3
10. उपरोक्त मुद्दा क्र.1 व 2 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे. सबब, तक्रारदार हे वि.प.यांचेकडून अॅडव्हान्सपोटी दिलेली रक्कम रु.24,000/- परत मिळणेस पात्र आहेत तसेच सदर रकमेवर तक्रार दाखल तारीख 10/11/2021 पासून सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदार यांना मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्के प्रमाणे व्याज मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. या बाबींचा विचार करता तक्रारदाराचे नुकसान झाले आहे तसेच तक्रारदार यास मानसिक व शारिरिक त्रास झाला आहे. या सर्व बाबींचा विचार करता तक्रारदार हे वि.प. यांचेकडून मानसिक त्रासापोटी रक्कम रु.3,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.2,000/- मिळणेस पात्र आहेत. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.4 - सबब आदेश.
| - आ दे श - - तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
- वि.प. यांनी तक्रारदार यांना रक्कम रु. 24,000/- अदा करावी. तसेच सदर रकमेवर तक्रार दाखल तारीख 10/11/2021 पासून सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदार यांना मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
- वि.प. यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.3,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.2,000/- अदा करावी.
- वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
- विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 2019 मधील तरतुदीप्रमाणे वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
- आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.
|