निकालपत्र :- (दि.05/08/2011) ( सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.1 ते 4 हे हजर झाले. त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले. अंतिम युक्तीवादाच्या वेळेस तक्रारदारचे वकील व सामनेवाला क्र.1 चे वकील यांनी युक्तीवाद केलेला आहे. सदरची तक्रार तक्रारदाराचा सामनेवाला यांनी मोबाईल हॅन्डसेट बाबत विक्री पश्चात सेवा न दिलेने दाखल केलेली आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी- तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 यांचे सवर्हीस सेंटर मधून सामनेवाला क्र.3 उत्पादक कंपनीचा सॅमसंग 17 इंची सीआरसी कॉम्पयुटर इतर संबंधीत पार्टसह दि.01/08/2008 रोजी रक्कम रु.26,000/- ला खरेदी केला. सामनेवाला क्र.1 यांनी त्याचे बील व वॉरंटी कार्ड दिले आहे. मात्र वॉरंटी कार्डवर आवश्यक तो मजकूर भरलेला नाही. सामनेवाला क्र.1 हे डिलर आहेत. सामनेवाला क्र.2 हे सामनेवाला क्र. 1 व 3 चे सर्व्हीस सेंटर आहे. सामनेवाला क्र.3 ही माल उत्पादक कंपनी आहे. सदर कॉम्प्युटर चार महिने व्यवस्थीत चालला तदनंतर कॉम्प्युटरच्या स्क्रिनवर पांढरे पट्टे येऊ लागले व तो व्यवस्थित काम करेना म्हणून तो सामनेवाला क्र.1 यांचेकडे दुरुस्तीसाठी दिला. सामनेवाला यांनी काही दिवसांनी तो दुरुस्त करुन परत दिला. पुन्हा वर नमुद दोष निर्माण झाला. तसे सामनेवाला कंपनीस कळवून दि.26/02/2010 रोजी त्यामध्ये उत्पादित दोष असलेने तो सामनेवाला क्र.1 यांचेकडे परत दिलेला आहे. सदर कॉम्प्युटर 2 ते 3 वेळा दुरुसत करुनही चालला नसलेने त्याचे उत्पादनातच दोष असलेने असा कॉम्प्युटर तक्रारदारास देऊन फसवणूक केलेली आहे. सदर कॉम्प्युटरला तीन वर्षाची वॉरंटी दिलेली आहे. तक्रारदारास सदर कॉम्प्युटर दुरुस्तीस दिलेनंतर त्याबदली दुसरा कॉम्प्यूटर अदयाप दिलेला नाही. त्यामुळे तक्रारदाराचे दरमहा रु.15000/- इतके अर्थिक नुकसान होत आहे. तक्रारदाराने सामनेवाला क्र. 1 ते 3 यांना दि.02/06/2010 रोजी वकीलांमार्फत रजि.पोष्टाने नोटीस पाठवली. त्यास काहीही उत्तर दिलेले नाही. तसेच सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचे दुकानाचे नांव बदलून सामनेवाला क्र.4 श्री सर्व्हीसेस या नावाने दि.27/09/2010 रोजी खोटेनाटे पत्र पाठवून कॉम्प्युटर तक्रारदाराने नेला नसलेबाबत पत्र पाठवले. वस्तुत: तक्रारदार कॉम्प्युटरसंबंधी चौकशी करणेसाठी तेथे गेला असता सदर कॉम्प्युटर व्यवस्थित चालत नसलेचे आढळून आलेने व त्यामध्ये उत्पादित दोष असलेची खात्री पटलेने तक्रारदाराने सदर कॉम्प्युटरच्या बदल्यात वैयक्तिक व संयुक्तिकरित्या सामनेवाला यांनी त्याच मॉडेलचा व त्याच किंमतीचा नवीन कॉम्प्युटर दयावा अथवा कॉम्प्युटरची रक्कम रु.26,000/- द.सा.द.शे. 18 टक्के वयाजाने परत दयावी म्हणून सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. तसेच तक्रारदाराने कॉम्प्युटर दुरुस्तीस दिलेनंतर वेळोवेळी स्वत: जाऊन व फोनव्दारे चौकशी केली असता अजून कॉम्प्युटर दुरुस्त झाला नाही, नवीन पार्टस मिळालेले नाहीत, मॉडेल बंद झालेले आहे अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन कॉम्प्युटर देणेस टाळाटाळ केली आहे; तक्रारदारास वेळोवेळी हेलपाटे मारावे लागले आहेत. तसेच दि.26/02/2010 पासून त्यास कोणताही धंदा करता आलेला नाही. त्यामुळे त्याचे मनसिक व आर्थिक नुकसान झालेले आहे. तक्रारदार हा सामनेवालांचा ग्राहक असून वॉरंटीप्रमाणे कॉम्प्युटर बदलून नवीन न दिलेने सामनेवालांनी सेवात्रुटी केली आहे. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह मंजूर करुन कॉम्प्युटर खरेदीपोटीची रक्कम रु.26,000/- शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.20,000/- आर्थिक नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.20,000/- नोटीसचा खर्च रु.2,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/- असे एकूण रक्कम रु.73,000/- द.सा.द.शे. 18 टक्के व्याजाने तक्रारदारास देणेबाबत सामनेवालांना वैयक्तिक व संयुक्तिकरित्या देणेचा हुकूम व्हावा अशी विनंती केलेली आहे. तक्रारदाराने वैकल्पिकरित्या पूर्वी खरेदी केलेल्या कॉम्प्युरप्रमाणे नवीन कॉम्प्युटर साहित्यासहीत नुकसान भरपाईसह देणेचा हुकूम व्हावा अशी विनंती केलेली आहे. (03) तक्रारदाराने तक्रारीच्या पुष्टयर्थ खरेदी बील, वॉरंटी कार्ड, वर्क ऑर्डर, वकील नोटीस, सामनेवाला यांना पाठवलेले पत्र, रजिस्टर पोष्टाची पावती, नोटीस परत आलेचा शेरा व नोटीस इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (04) सामनेवाला क्र.1 यांचे लेखी म्हणणेनुसार तक्रारदाराचा अर्ज खोटा,चुकीचा लबाडीचा रचनात्मक व बेकायदेशीर असलेने मान्य व कबूल नाही. तक्रारदाराची तक्रार मान्य केले कथनाखेरीज परिच्छेद निहाय नाकारलेली आहे. सामनेवाला पुढे असे पतिपादन करतात की, सामनेवाला क्र.1यांनी तक्रारदारास पॅक सॅमसंग कंपनीचा मॉनिटर दिलेला आहे व कॉम्प्युटर बंदिस्त कव्हरमधून दिलेला आहे. त्यामुळे वॉरंटी कार्ड हे बंदिस्त पॅकमधेच होते. त्यामुळे तक्रारदाराचे ताब्यात आहे. ते भरुन घेणेबाबत त्यास ब-याचवेळेला विनंती करुनही त्यांनी आढमुठे धोरुन सिव्कारले व वॉरंटी कार्ड भरुन घेतले नाही. सामनेवाला क्र.3 ही उत्पादक कंपनी आहे. सामनेवाला क्र.2 ही कंपनीचे कोल्हापूर येथील कार्यालय आहे. सामनेवाला क्र.4 हे अधिकृत सर्व्हीसींग सेंटर आहे. सामनेवाला क्र.1 यांनी हा कॉम्प्युटर फॉर्च्यून कॉम्प्युहार्ड राजारामपूरी 8 वी गल्ली, कोल्हापूर यांचेकडून खरेदी केलेला आहे व कंपनीचे मूळ ऑफिस पुणे येथे आहे. तक्रारदाराने सदर दोन्ही कार्यालयाला पक्षकार केले नसलेने नॉन जॉइन्डर ऑफ नेसेसरी पार्टी तत्वाचा बाध येतो. त्यामुळे प्रस्तुत अर्ज नामंजूर होणेस पात्र आहे. सामनेवाला क्र.1 यांनी नमूद कॉम्प्युटर इंजिनिअरकडून तपासणी करुन सामनेवाला क्र.4 कडे दुरुस्तीसाठी पाठवला व तक्रारदाराची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांना दुसरा मॉनिटर जोडून दिला. सामनेवाला क्र.1 यांची नियमानुसार तक्रार नोंद करून घेणे व कॉम्प्युटर सर्व्हीस सेंटरपर्यंत पोहोच करणे इथपर्यंत जबाबदारी आहे. कॉम्प्युटर दुरुस्त करुन झालेनंतर तो तक्रारदारास नेऊन दिला. मात्र तक्रारदाराने मॉनिटर दुरुस्त न झालेचा खोटानाटा कांगावा करुन नवीन मॉनिटरची मागणी केली. सामनेवाला क्र.4 यांनी दि.27/09/2010 रोजी तक्रारदारास कॉम्प्युटर मॉनिटर दुरुस्त झालेबाबत व ते घेऊन जाणेबाबत विनंती पत्र दिलेले आहे. त्यास तक्रारदाराने प्रतिसाद दिलेला नाही. नविन कॉम्प्युटर घेणेचे दृष्टीने सदरची खोटी तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारदाराचा कॉम्प्युटर आजही सुस्थितीत आहे. तक्रारदारास कॉम्प्युटर सिस्टीमचे सखोल ज्ञान नाही. तक्रारदाराने कॉम्प्युटर दुरुस्तस दिलेनंतर त्यास दुसरा कॉम्प्युटर बदलीस दिलेला आहे व हा कॉम्प्युटर सुस्थितीत आहे. अशा परिस्थितीत नवीन कॉम्प्युटर अथवा त्याचा मोबदला देणेचा प्रश्नच उदभवत नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावा अशी विनंती सदर मंचास केली आहे. (05) सामनेवाला क्र.1 यांनी आपले लेखी म्हणणेच्या पुष्टयर्थ कोणतीही कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. (06) सामनेवाला क्र. 2 ते 4 यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार सामनेवाला क्र.4 हे सामनेवाला सॅमसंग कंपनीचे फ्रॅंन्चासी आहे. सामनेवाला क्र.3 हे उत्पादक आहेत. दि.22/12/2010 रोजी न्यायाधिशांनी दिलेल्या आदेशानुसार सदर मॉनिटर कुशल इंजिनिअर यांचेकडून तपासून घेऊन व्यवस्थीत असेल तर घेऊन जाणेस कळवले. परंतु दि.18/01/2011 पर्यंत तक्रारदार तपासून बघणेस अथवा नेणेस आलेले नाहीत; सबब सामनेवाला यांनी सेवेत कोणताही कसुर केलेला नाही. (07) सामनेवाला क्र.2 ते 4 यांनी त्यांचे म्हणणेच्या पुष्टयर्थ कोणतेही कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. (08) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे तसेच सामनेवालांचे लेखी म्हणणे तसेच उभय पक्षांच्या वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1. सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी केली आहे काय ? --- 2. काय आदेश ? ---शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1 :- तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 यांचे सवर्हीस सेंटर मधून सामनेवाला क्र.3 उत्पादक कंपनीचा सॅमसंग 17 इंची सीआरसी कॉम्पयुटर इतर संबंधीत पार्टसह दि.01/08/2008 रोजी रक्कम रु.26,000/- ला खरेदी केला. सामनेवाला क्र.1 यांनी त्याचे बील व वॉरंटी कार्ड दिले आहे ही बाब सामनेवाला यांनी मान्य केली आहे. मात्र वॉरंटी कार्डवर आवश्यक तो मजकूर भरलेला नाही या तक्रारदाराचे कथनाचा विचार करता सामनेवाला यांनी वॉरन्टी कार्ड हे पॅकमध्ये असते. पॅक फोडलेनंतर ते भरुन घेण्याची जबाबदारी तक्रारदाराची होती. त्यास वांरवार सुचना देऊनही त्यांनी ते भरुन घेतले नसलेचे प्रतिपादन केले आहे. सदर वॉरन्टी कार्ड भरुन घेतले नसले तरी सदर वॉरन्टी कार्ड तक्रारदारास दिलेबाबत मान्य केले आहे. प्रस्तुत कॉम्प्युटरचे खरेदी बील व वॉरन्टी कार्ड, वर्क ऑर्डर प्रस्तुत प्रकरणी दाखल आहे. सदर वॉरंन्टी कार्डनुसार कलम 10 खाली सामनेवाला क्र.3 यांची उत्पादने व त्यास असणारी वॉरन्टी कालावधी नमुद केला आहे. त्यामध्ये तक्रारदाराने खरेदी केलेल्या मॉनिटरला 3 वर्षाचा वॉरंन्टी कालावधी आहे. सदर वॉरंन्टीनुसार इतर उत्पादनामध्ये काही पार्ट वॉरंन्टीसाठी अंतर्भूत नसलेचे नमुद केले आहे. मात्र नमुद मॉनिटर कॉम्प्युटरसाठी अशी नोंद नसलेने असे कॉम्प्युटरचे व मॉनिटरचे पार्ट वॉरंटी अंतर्गत अंतर्भूत केलेले आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तक्रारदाराने दि.01/08/2008 रोजी नमुद कॉम्प्युटर खरेदी केलेला आहे; त्याने दाखल केलेल्या वर्क ऑर्डरच्या सत्यप्रतीचे अवलोकन केले असता सदर वर्क ऑर्डर ही दि.26/02/2010 ची असून नमुद कॉम्प्युटर हा सुस्थितीत असलेचा ओके रिपोर्ट आहे. तसेच तक्रारदाराने सदर कॉम्प्युटरबाबत दिलेली तक्रार ही कलर डिस्प्लेबाबत आहे. त्यामुळे तो दुरुस्तीसाठी आलेला आहे. दि.27/09/2010 रोजी सामनेवाला यांनी तक्रारदारास “ Your product CRT MONITOR bearing Serial No.AR17H9LQ621057H and Model No KS17ARLGKMXTP deposited for repair at our Authorized Service Centre in FEB 2010 दुरुस्तीस सामनेवालांचे ताब्यात दिलेचे दिसून येते. तसेच सदर पत्रामध्ये सदर दुरुस्ती करणेत आली असून तक्रारदाराचा अदयावत संपर्क साधणेसाठी नंबर उपलब्ध होऊ शकला नाही तरीही सामनेवालांनी उपलब्ध नंबरवर व्हाईस कॉल दिलेला आहे. त्यास प्रत्त्यूत्तर आलेले नाही. तसेच दुरुस्त झालेले खाते मॉनिटर हा दुरुस्त होऊनदेखील एक महिन्याचे आत न नेलेस त्याची जबाबदारी तक्रारदारावर राहील असे कळवलेचे दिसून येते. वरील वस्तुस्थितीचा विचार करता तक्रारदाराने दि.26/02/2010 रोजी कॉम्प्युटर दुरुस्तीसाठी दिलेला आहे व सदर कॉम्प्युटर दुरुस्त झालेबाबत सामनेवाला यांनी दि.27/09/2010 रोजी कळवलेचे दिसून येते. प्रस्तुतची तक्रार दि.16/10/2010 रोजी दाखल केलेली आहे. तक्रारदाराने दि.02/06/2010 रोजी वकील नोटीस दिलेली आहे. सदर नोटीस स्विकारणेस नकार दिलेचे दिसून येते. यावरुन प्रस्तुतची तक्रार दाखल झालेनंतर सामनेवाला यांनी कार्यवाही केलेचे निदर्शनास येते. सबब योग्य त्या कालावधीत कॉम्प्युटर दुरुस्ती केलेचे दिसून येत नाही. सबब दुरुस्तीसाठी 7 महिन्याचा कालावधी घेतलेचे प्रथम दर्शनी निदर्शनास येते. सबब सामनेवाला यांनी विक्री पश्चात सेवा देणेस कसूर केला आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येते. तक्रारदाराने प्रस्तुत कॉम्प्युटरचे मॉनिटरमध्ये उत्पादित दोष असलेचे प्रतिपादन केलेले आहे. मात्र प्रस्तुत तक्रारीचे बारकाईने अवलोकन केले असता मॉनिटरवर पांढरे तांबडे पट्टे येऊ लागलेने व्यवस्थित कामकाज करता येईना. त्यामुळे कॉम्प्युटर दुरुस्तीसाठी सामनेवालांचे ताब्यात दिलेचे प्रतिपादन केलेले आहे. मात्र सदर कॉम्प्युटर मॉनिटरवर उत्पादित दोषअसलेबाबत तक्रारदाराने पुरावा समोर आणलेला नाही. याउलट सामनेवाला क्र.1 यांनी सदर कॉम्प्युटर मॉनिटरमध्ये उत्पादित दोष नाही. सदर मॉनिटर सुस्थितीत व चांगल्या अवस्थेत असून मे. मंचासमोर चालवून दाखवणेस तयार आहे. तसेच कोणतेही माहितगार तज्ज्ञ इसमाची कमिशनर म्हणून नेमणूक करावी याबाबत दि.18/01/2011रोजी अर्ज दिलेला आहे. यावेळी तक्रारदार गैरहजर होता.तदनंतर तक्रारदार व त्यांचे वकील सातत्याने गैरहजर राहिलेले आहेत. वस्तुत: तक्रारदारास खरोखरच त्यामध्ये उत्पादित दोष आहे हे सिध्द करणेसाठी चांगली संधी होती. मात्र सदर अर्ज दिलेनंतर तक्रारदार सदर मंचासमोर उपस्थित राहिलेला नाही. त्यामुळे तक्रारदार म्हणतो म्हणून सदर कॉम्प्युटर मॉनिटरमध्ये उत्पादित दोष होता असे म्हणता येणार नाही. तसेच प्रस्तुत मॉनिटर हा दुरुस्त केलेचे प्रतिपादन सामनेवाला यांनी केलेले आहे व तो सुस्थितीत आहे. यावरुन त्यामध्ये उत्पादित दोष होता हे तक्रारदार संधी असूनही सिध्द करु शकलेला नाही. सबब त्यास नमुद कॉम्प्युटर मॉनिटर बदलून नवीन मागता येणार नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मात्र विनामोबदला सदर कॉम्प्युटर मॉनिटर पूर्ण दुरुस्तीसह योग्य स्थितीत व कामकाज करणेस योग्य स्थितीत चालणेस पात्र असा दुरुस्त होऊन मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सामनेवाला यांनी प्रस्तुत मॉनिटर दुरुस्त केलेला आहे व तो तक्रारदाराने तपासून ताब्यात घ्यावा. सामनेवाला यांनी तक्रारदारास दिलेला बदली मॉनिटर तक्रारदाराने सामनेवाला यांना परत दयावा या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सामनेवाला यांनी विक्री पश्चात सेवा देणेस केलेला विलंब विचारात घेता तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रास झालेला आहे. मात्र आर्थिक नुकसानीबाबत कोणताही पुरावा मे. मंचासमोर आणलेला नाही. याचा विचार करता तक्रारदार शारिरीक व मानसिक त्रासापोटी व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम मिळणेस पात्र आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते. 2) सामनेवाला यांनी दुरुस्त करुन ठेवलेला कॉम्प्युटर मॉनिटर तक्रारदार यांनी तपासून ताब्यात घ्यावा. तक्रारदाराकडे असलेला सामनेवाला यांचा बदली दिलेला कॉम्प्यटर मॉनिटर तक्रारदाराने सामनेवाला यांना परत करावा. 3) सामनेवाला यांनी तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु.2,000/-(रु.दोन हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) अदा करावेत.
| | [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |