न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 11 व 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार क्र.1 यांची पत्नी व तक्रारदार क्र.2 व 3 यांची आई सौ स्मिता श्रीकृष्ण साळगांवकर यांना दि. 27/6/2014 चे दरम्यान अशक्तपणा व खांद्यांना सूज असलेचे जाणवू लागले म्हणून त्यांना प्रथम श्री शंकर पार्वती हॉस्पीटल येथे उपचार चालू केले होते. सदर हॉस्पीटलमध्ये सौ स्मिता साळगांवकर या दि. 27/6/2014 ते दि. 1/7/2014 अखेर अॅडमिट होत्या. तदनंतर त्यांना पुन्हा त्रास जाणवू लागलेने त्यांना दि. 13/7/2014 रोजी वि.प. यांचे हॉस्पीटलमध्ये दाखल केले होते. वि.प. यांचेकडे अॅडमिट असतानाच यांना 2 ते 3 दिवसात निमोनिया झाला. परंतु त्यावरील उपचाराकडे दुर्लक्ष करुन वि.प. यांनी पेशंटच्या स्तनाच्या कर्करोगाचे अनुषंगाने उपचार चालू केले. दि. 17/7/2014 रोजी सौ स्मिता साळगांवकर यांच्या स्तनाची बायोप्सी वि.प. यांनी घेतली होती. सदर बायोप्सी वि.प. यांनी मुंबई येथे पाठविली आहे. तसेच उपचारादरम्यान सदर पेशंटच्या मानेला मोठी जखम होवून त्यामध्ये पस निर्माण झाला होता. त्याबाबतही वि.प. यांनी आवश्यक ती दक्षता घेतली नाही. पेशंटवर जे तातडीचे उपचार होणे आवश्यक होते ते वि.प. यांचेकडे होत नव्हते. तसेच वि.प. हे पुढील उपचाराबाबत तक्रारदार यांना कोणतीही कल्पना देत नव्हते. त्यामुळे पेशंटबाबत वि.प. यांचे प्रयत्न हे संशयास्पद व अपुरे असे आहेत अशी तक्रारदार यांना शंका येत होती. वि.प. यांनी सदरचा पेशंट बरा झाला आहे असा आभास निर्माण करुन अट्टाहासाने तक्रारदार यांना सदर पेशंटबाबत दि. 24/7/2014 रोजी डिस्चार्ज घेणे भाग पाडले. वास्तविक सदर पेशंट निमोनियामधून बाहेर आलेला नव्हता तसेच पेशंटच्या मानेजवळील जखम ब-यापैकी बळावलेली होती. वि.प.क्र.2 यांनी तक्रारदार यांना वैद्यकीय शास्त्राचे विरोधी सल्ला देवून पेशंटवर उपचार करणेस असमर्थतता दर्शविली तसेच वैद्यकीय सेवा देणेत अक्षम्य कसूर केलेली आहे. वि.प यांनी दुर्लक्ष केलेमुळे सदर पेशंट अतिशय गंभीर अवस्थेत गेला. म्हणून तक्रारदार यांनी दि. 26/7/2014 रोजी सदर पेशंटला अॅपल सरस्वती मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल कोल्हापूर येथे अॅडमिट केले. त्यावेळी सदर हॉस्पीटलने तक्रारदाराकडे बायोप्सी रिपोर्टची मागणी केली. म्हणून तक्रारदारांनी वि.प. यांचेकडे बायोप्सी रिपोर्टची मागणी केली असता वि.प.यांनी सदर रिपोर्ट देणेस टाळाटाळ केली. सदर पेशंट वि.प. यांचे हयगयीमुळे गंभीर झाला होता. प्रथम निमोनिया व मानेवरील जखमेवर उपचार करणे अत्यावश्यक आहे असे प्रतिपादन अॅपल सरस्वती मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल यांचेकडून करणेत आले. परंतु सदरचा पेशंट उपचारास कोणताही प्रतिसाद न देता दि. 3/8/2014 रोजी मयत झाला. अशा प्रकारे केवळ वि.प. यांच्या वैद्यकीय सेवेतील निष्काळजीपणामुळे तक्रारदार क्र.1 यांना त्यांचे पत्नीस व तक्रारदार क्र.2 व 3 यांना त्यांचे आईस मुकावे लागले आहे. त्यानंतर तक्रारदारांनी वि.प. यांचेकडे बायोप्सी रिपोर्टची मागणी केली असता सदरची बायोप्सी मुंबई येथे पाठविली नव्हती ही बाब वि.प. यांचे दि. 20/8/2014 रोजीचे पत्रावरुन सिध्द झालेली आहे. अशा प्रकारे वि.प. यांनी सेवात्रुटी केली आहे. म्हणून, तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रारअर्ज या मंचात दाखल केला आहे.
2. प्रस्तुतकामी तक्रारदाराने वि.प. यांचेकडून हॉस्पीटल खर्चाची रक्कम रु.96,517/-, अॅपल सरस्वती मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल यांचेकडील उपचाराचे खर्चाची रक्कम रु. 1,25,200/-, मानसिक धक्का व परावलंबीत्व यापोटी रु.10,00,000/-, भविष्यकालीन आर्थिक नुकसानीपोटी रु. 4,00,000/-, मानसिक त्रसापोटी रु. 1,00,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.20,000/- वि.प. कडून वसूल होवून मिळावा अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत अ.क्र.1 ते 19 कडे अनुक्रमे सौ स्मिता साळगांवकर यांचे मृत्यूचा दाखला, डिस्चार्ज समरी, इकोकार्डीओग्राफी रिपोर्ट, वि.प. यांचे पत्र, तक्रारदार यांचा बायोप्सी रिपोर्ट मागणीचा अर्ज, वि.प. यांचे फायनल डिटेल्स स्टेटमेंट, पेमेंट रिसीट, हिस्टोपॅथॉलॉजी रिपोर्ट, डिस्चार्ज कार्ड, पेशंटचा इंडोस्कोपी रिपोर्ट, बायोप्सी रिपोर्ट, हिस्टोपॅथ रिपोर्ट, हॅमॅटलॉजी रिपोर्ट, डिस्चार्ज समरी, औषधांची बिले, अॅपल सरस्वती मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल यांचे अंतिम बिल वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. वि.प.क्र.1 व 2 यांनी सदरकामी म्हणणे/कैफियत व अॅफिडेव्हीट, पुरावा शपथपत्र, कागदयादीसोबत सौ स्मिता साळगांवकर यांचे संपूर्ण केसपेपर, लेखी युक्तिवाद वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. वि.प. क्र.1 व 2 यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. वि.प. ने तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.
i) तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्यातील सर्व मजकूर मान्य व कबूल नाही.
ii) वि.प. यांनी वैद्यकीय उपचारामध्ये कोणताही वैद्यकीय निष्काळजीपणा केलेला नाही.
iii) वि.प. यांच्या हॉस्पीटलची प्रसिध्दी पाहूनच तक्रारदारांनी पेशंटला त्यांचे हॉस्पीटलमध्ये अॅडमिट केले होते. त्यावेळी पेशंट ulceration over left breast या आजाराने त्रस्त होती. त्यानंतर पेशंटची हिस्टोपॅथॉलॉजी करण्यात आली. त्यामध्ये Duck Carcinoma cells seen असा निष्कर्ष नोंदविण्यात आला होता.
iv) तदनंतर दि. 18/7/2014 रोजी पुन्हा हिस्टोपॅथॉलॉजी करण्यात आली त्यामध्ये Duck Carcinoma cells seen असा निष्कर्ष आला. तदनंतर दि. 21/7/2014 रोजी पुन्हा हिस्टोपॅथॉलॉजी करण्यात आली, त्यामध्ये Very scanty Tumour – Probably Infiltrating Duck Carcinoma असा निष्कर्ष आला. यावरुन पेशंट ही breast carcinoma या आजाराने त्रस्त असल्याचे दिसून आले.
v) तदनंतर पेशंटची बायोप्सी मुंबई येथे टाटा मेमोरियल हॉस्पीटल यांचेकडे पाठविण्याची होती. परंतु टिश्यू कमी असलेने वि.प. ती बायोप्सी मुंबईला पाठवू शकले नाहीत. सदरची बाब ही तक्रारदारांना दि. 20/8/2014 चे पत्राने कळविलेली आहे आणि बायोप्सीचे चार्जेस परत घेणेबाबतही कळविले आहे.
vi) न्यूमोनिया आजारासाठी पेशंटवर योग्य ते उपचार वि.प. यांनी केलेले होते. सेंट्रल लाईनवरुन पेशंटला इंजेक्शन देणे आवश्यक होते. तसे करण्यापूर्वी तक्रारदारांची संमती घेतलेली होती. पेशंटवर विशेष उपचार करण्यापूर्वी तक्रारदारांची संमती घेण्यात आलेली होती.
vii) वि.प यांनी पेशंटला डिस्चार्ज घेण्याबाबत तक्रारदारांना कधीही सांगितले नव्हते. याउलट तक्रारदार व पेशंट हे वि.प. यांचे हॉस्पीटलमध्ये पुढील उपचार घेणेस तयार नव्हते. त्यामुळे त्यांचे मागणीनुसार पेशंटला डिस्चार्ज देण्यात आला. सबब, वि.प.क्र.1 व 2 यांनी पेशंटवर उपचार करताना कोणताही निष्काळजीपणा केलेला नसल्याने तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.
अशा स्वरुपाचे आक्षेप वि.प.क्र.1 व 2 यांनी तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.
5. वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे वि.प. यांचेकडून नुकसान भरपाईपोटी रक्कम व मानसिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
6. वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्तरे आम्ही होकारार्थी दिली आहेत कारण तक्रारदार क्र.1 यांची पत्नी व तक्रारदार क्र.2 व 3 यांची आई सौ स्मिता श्रीकृष्ण साळगांवकर यांना दि. 13/7/2014 रोजी वि.प. यांचे हॉस्पीटलमध्ये दाखल केले होते. सदर हॉस्पीटलमध्ये त्यांनी दि. 24/7/2014 रोजी पर्यंत उपचार घेतले ही बाब दाखल कागदपत्रांवरुन दिसून येते. तसेच सदरची बाब वि.प.क्र.1 व 2 यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये मान्य केली आहे. सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द झालेली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. प्रस्तुतकामी तक्रारदार यांनी त्यांचे तक्रारअर्जात वि.प. यांनी पेशंटवर उपचार करताना निष्काळजीपणा केला अशी तक्रार केली आहे. याकामी सी.पी.आर. हॉस्पीटल, कोल्हापूर व ससून हॉस्पीटल, पुणे यांचेकडून प्रस्तुत प्रकरणात पेशंटवर उपचार करण्यात निष्काळजीपणा झाला किंवा कसे याबाबत तज्ञांचे मत मागविण्यात आले. सदरचे दोन्ही हॉस्पीटल यांनी दिलेले अहवाल याकामी दाखल आहेत. सदरचे अहवालांमध्ये वि.प. डॉक्टर यांनी तक्रारदार क्र.1 चे पत्नीवर म्हणजेच सौ स्मिता साळगांवकर यांचेवर केले उपचारात निष्काळजीपणा केलेला नाही असे मत वैद्यकीय तज्ञ समिती सी.पी.आर. हॉस्पीटल, कोल्हापूर व वैद्यकीय तज्ञ समिती, ससून हॉस्पीटल, पुणे यांनी नमूद केले आहे. सबब, सदरचे दोन्ही अहवालांचा विचार करता वि.प.क्र.1 व 2 यांनी नमूद पेशंटवर उपचार करताना कोणताही निष्काळजीपणा केलेचे दिसून येत नाही या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
8. मात्र तक्रारदाराने दि. 16/12/2014 रोजी दाखल केले कागदयादीसोबत अ.क्र.4 चे वि.प. हॉस्पीटलचे डॉ अश्विनी माने यांनी तक्रारदार यांना दिलेल्या दि. 20/8/2014 चे पत्राचे अवलोकन करता त्यामध्ये पुढील मजकूर नमूद आहे.
“ वरील संदर्भीय पेशंट आमच्या हॉस्पीटलमध्ये दि. 13/7/2014 ते 24/7/2014 रोजीपर्यंत Infiltrating Duct Cell Carcinoma of Lt. Breast with Axillary Lymphandenitis (TNM Grade T4N2M1) उपचारासाठी अॅडमिट होते. दि. 17/7/2014 रोजी बायोप्सी घेतली होती. त्यामधील हॉस्पीटलमधील बायोप्सीचा रिपोर्ट पेशंटकडे मिळाला पण जे बायोप्सी मुंबईला पाठवायची होती पण टिश्यू कमी असल्याने तो मुंबईला पाठविला नाही. हॉस्पीटलकडून याची कल्पना आपल्याला देणे गरजेचे होते पण ती आमच्याकडून दिली गेली नाही त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत.”
सदर पत्रातील मजकूर पाहता वि.प. यांनी तक्रारदार क्र.1 चे पत्नीची बायोप्सी दि. 17/7/2014 रोजी घेतली होती. परंतु तक्रारदाराकडून त्यासाठीचे चार्जेस घेवून सुध्दा ती तपासणीसाठी मुंबईला पाठवली नाही आणि याची कल्पना तक्रारदार यांना दिलेली नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केलेचे स्पष्ट होते.
9. वास्तविक High risk असताना वि.प. ने बायोप्सी मुंबईला तपासणीसाठी पाठविली असती तर तक्रारदार क्र.1 चे पत्नीवर वेळीच उपचार झाले असते. परंतु सदरची बाब वि.प. यांनी तक्रारदार यांनाही सागितली नव्हती. ही बाब ज्यावेळी पेशंटला अॅपल सरस्वती मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल यांचेकडे उपचारासाठी दाखल केले, त्यावेळी त्यांनी वि.प. कडे पेशंटच्या बायोप्सीची मागणी केली होती व त्यावेळी तक्रारदार क्र.1 यांनी वि.प. यांचेकडे बायोप्सी रिपोर्टची मागणी केली असता सदरचा रिपोर्ट वि.प. ने देणेस टाळाटाळ केली आणि दि. 20/8/2014 चे पत्रामध्ये वि.प. ने वर नमूद केलेप्रमाणे बायोप्सी मुंईला तपासणीस पाठविली नसलेबाबत दिलगीरी व्यक्त केली.
10. या सर्व बाबींचा ऊहापोह करता याकामी वि.प. यांनी तक्रारदार क्र.1 चे पत्नीवर केले उपचारात निष्काळजीपणा केलेला नाही असे वैद्यकीय तज्ञांचा दोन्ही अहवालामधून स्पष्ट होत असले तरीही वि.प. यांनी वर नमूद केलेप्रमाणे तक्रारदाराचे पत्नीची बायोप्सी घेवूनही ती तपासणीसाठी मुंबईला पाठविली नाही. ही सेवेतील त्रुटी आहे असे या आयोगाचे मत आहे. जर ती बायेाप्सी तपासणीसाठी वेळेवर मुंबईला पाठविली असती तर तक्रारदार क्र.1 चे पत्नीवर वेळेवर योग्य ते उपचार झाले असते. सबब, ही वि.प. यांनी तक्रारदाराला दिलेली सेवात्रुटीच आहे असे या आयोगाचे स्पष्ट मत आहे.
11. याकामी तक्रारदारांनी दाखल केलेल्या खालील वरिष्ठ न्यायालयांचे निवाडयांचा आधार हे आयोग घेत आहे.
- (2017) CJ 135 (NC)
Bahadur Singh & Anr.
Vs.
Dr. H.S. Bajwa & Anr.
- (2012) CJ 503 (Raj.)
Santokba Durlabhji Memorial Hospital & Medical Research Instt. & Anr.
-
Bhanwar Lal
- (2012) CJ 930 (NC)
Chl. Apollo Hospital Indore & Ors.
-
Ashish Sanyal & Ors.
12. सबब, याकामी तक्रारदार क्र.1 ते 3 हे वि.प.क्र.1 व 2 यांचेकडून नुकसान भरपाई म्हणून वैयक्तिक व संयुक्तिकरित्या रक्कम रु. 1,00,000/- मिळणेस पात्र आहेत तसेच सदरचे रकमेवर तक्रारदार हे तक्रार दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याजदराने होणारी रक्कम मिळणेस तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु.10,000/- वि.प.क्र.1 व 2 यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तिकरित्या वसूल होवून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
सबब, प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) वि.प.क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.1,00,000/- अदा करावेत व सदर रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
3) मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- व अर्जाचा खर्च रु.10,000/- वि.प.क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदारास अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीं अन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.