न्या य नि र्ण य
(व्दाराः- मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्या)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांना वि.प.क्र.1 यांनी दि. 2/04/2013 रोजी मॉडेल नं. CAHF-500 Sr.No. 13 M 3434 Blue Star Makes या कंपनीचा डी-फ्रीज विक्री केलेला होता. विक्री केलेनंतर सदरचा डी-फ्रीज काही कालावधीकरिताच व्यवस्थित सुरु राहिला. त्यानंतर सप्टेंबर 2013 मध्ये सदरचे डी-फ्रीजमध्ये बिघाड झालेने तक्रारदार यांचे दुग्धजन्य पदार्थ खराब झाले. तेव्हा वि.प.क्र.1 यांनी हाफ कुलींगचा बिघाड दुरुस्ती करुन दिलेला होता. तदनंतर दि. 7/3/2014 रोजी सदरचा डी-फ्रीज पुन्हा कुलींग होऊ न लागलेने वि.प.क्र.2 यांनी दुरुस्तीकरिता व्यक्ती पाठवून दिली होती. परंतु त्यांनी देखील कोणत्याही प्रकारे दुरुस्ती करुन दिली नाही. सदरचा डी-फ्रीज हा दि.7/3/2014 रोजी बंद पडलेला होता. परंतु वि.प. हे दुरुस्ती करण्यास टाळाटाळ करु लागल्याने तक्रारदार यांनी वि.प. यांना वकीलामार्फत दि. 15/3/14 रोजी नोटीस पाठविली. परंतु तरीही वि.प. यांनी त्याची दखल घेतली नाही. सदरचा डी-फ्रीज हा वॉरंटी पिरिएडमध्ये आहे. सबब, वि.प. यांनी सेवात्रुटी केल्यामुळे तक्रारदारांनी प्रस्तुतचा तक्रारअर्ज दाखल केला आहे. तक्रारदार यांनी याकामी डी-फ्रीजमधील पदार्थांच्या झालेल्या नुकसानीपोटी रक्कम रु. 25,000/-, डी-फ्रीज बंद झालेने झालेल्या नुकसानीची रक्कम रु.15,000/-, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- व तक्रारअर्जाचा खर्च रु.5,000/- देणेचा आदेश वि.प. यांना व्हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
2. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत डी-फ्रीज खरेदीचे बिल, डी-फ्रीज दुरुस्तीचा सर्व्हिस रिपोर्ट, फिल्ड रिपोर्ट, वि.प. यांना पाठविलेली नोटीस, नोटीसची पावती, डी-फ्रीजचे वॉरंटी कार्ड इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
3. वि.प.क्र.1 व 2 यांनी याकामी तक्रारदाराचे तक्रारअर्जास म्हणणे दाखल करुन तक्रारदाराची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारली आहे. वि.प. यांचे कथनानुसार, तक्रारदारांनी सदरचा डी-फ्रीज व्यापारी कारणासाठी खरेदी केलेला असलेने तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक नाहीत. त्याकारणे सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 प्रमाणे चालणेस पात्र नाही. वि.प. यांनी तक्रारदारास ता. 2/4/2013 रोजी सदरचा डी-फ्रीज विक्री केलेला असून त्याअनुषंगाने सदरचे डी-फ्रीजला लागणा-या इलेक्ट्रीसीटी, व्होल्टेज तसेच इतर सर्व बाबींची कल्पना तोंडी तसेच लेखी तक्रारदारांना सांगितली होती. सदचे डी-फ्रीजचे कार्य खरेदी केले तारखेपासून सप्टेंबरपर्यंत योग्य असून त्यामध्ये कोणताही उत्पादित दोष नव्हता. सप्टेंबर 2013 मध्ये वि.प. यांचे मेकॅनिक यांनी सदरचे डी-फ्रीजची पाहणी केली असता, सदरचे डी-फ्रीजचे वायरिंग हे योग्य नव्हते. त्यामुळे सदरचे वायरिंग सैल झालेने डी-फ्रीजचे कार्य योग्य होत नव्हते. त्या कारणाने वि.प. यांचे मेकॅनिक यांनी सदरचे वायरिंग हे वि.प. यांचे स्टँडर्डप्रमाणे कोणतेही शुल्क न आकारता बदलून दिले. तक्रारदारांनी वॉरंटीमधील अटींचा भंग केलेला आहे. वि.प. यांनी वॉरंटीप्रमाणे सर्व सोयी तक्रारदारांना दिलेल्या आहेत. वि.प. यांनी तक्रारदारांचे तक्रारीप्रमाणे डी-फ्रीज हा दुरुस्त केलेला असून त्यानुसार मार्च 2014 पर्यंत सदरचा डी-फ्रीज हा योग्य प्रकारे काम करत होता. तक्रारदार व त्यांचे कामगारांनी सदरचे मशिनचा वापर योग्यरित्या न केलेने मशिनचे वायरिंग बदलावे लागले व ते सैल झाले. तक्रारदारांनी कोणताही तज्ञाचा अहवाल त्यांचे कथनानुसार दाखल केलेला नाही. सदरचे मशिनमध्ये कोणतेही नुकसान हे दुरुस्ती करुन देणेसारखे असलेस त्याकरिता संपूर्ण मशिन अथवा मशिनचे किंमत देणे योग्य नाही. तक्रारदारांनी सदरचे मशिनचा वापर 18 महिने करुन त्यापासून उत्पन्न घेतले आहे. त्या कारणाने तक्रारदारांची मागणी ही मान्य करु नये अशी विनंती वि.प.क्र.1 व 2 यांनी केली आहे.
4. वि.प. यांनी याकामी पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
5. तक्रारदारांचा तक्रारअर्ज, वि.प.यांचे म्हणणे, दाखल केलेली अनुषंगिक कागदपत्रे, तक्रारदाराचे व वि.प. यांचे पुराव्याचे शपथपत्र, लेखी युक्तिवाद यांचा विचार करता निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | तक्रारदार हे मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
5 | अंतिम आदेश काय ? | अंशतः मंजूर. |
कारणमिमांसा –
मुद्दा क्र. 1 –
6. वि.प.क्र.1 यांचे इलेक्ट्रॉनिक उपकरणे विक्री करणेचा व्यवसाय आहे. वि.प.क्र. 2 हे सर्व्हिसिंग सेंटर आहे. तक्रारदार यांना वि.प.क्र.1 यांनी ता. 2/4/13 रोजी चलन नं. 708 मॉडेल नं. CAHF-500 Sr.No. 13 M 3434 Blue Star Makes या कंपनीचा डी-फ्रीज विक्री केलेला होता. प्रस्तुतकामी वि.प. यांनी म्हणणे दाखल केलेले असून तक्रारदार यांनी सदरचा डी-फ्रीज व्यापारी कारणाकरिता (commercial purpose) खरेदी केलेला असलेने तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक नाहीत असे कथन केले आहे. सबब तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. सदर मुद्याचे अनुषंगाने तक्रारदार यांनी तक्रारीसोबत वि.प. यांचेकडून सदरचा डी-फ्रीज खरेदी केलेचे डिलीव्हरी चलन दाखल केलेले असून सदरचा डी-फ्रीज तक्रारदार यांनी वि.प.यांचेकडून रक्कम रु.25,000/- इतक्या रकमेस खरेदी केलेला आहे. सदरची पावती वि.प. यांनी नाकारलेली नाही तसेच तक्रारदार यांनी तक्रारदार यांच्या उपजिविकेचे साधन हे बेकरी व्यवसाय आहे असे पुराव्याचे शपथपत्रावर कथन केलेले आहे. तथापि वि.प. यांनी त्यांच्या लेखी म्हणण्यातील कथनाप्रमाणे तक्रारदार हे सदरच्या डी-फ्रीजचा वापर व्यापारी कारणाकरिता करतात असा कोणताही कागदोपत्री पुरावा याकामी दाखल केला नसल्याने वि.प. यांचे सदरचे म्हणणे पुराव्याअभावी हे आयोग विचारात घेत नाही. सबब, तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडून वादातील डी-फ्रीज खरेदी केलेला असल्यामुळे तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत या निष्कर्षाप्रत हे आयेाग येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2
7. उपरोक्त मुद्दा क्र.1 मधील विवेचनाचा विचार करता तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत. वादातील डी-फ्रीजची विक्री केलेनंतर सदरचा डी-फ्रीज काही कालावधीकरिता व्यवस्थित सुरु राहिला. त्यानंतर सप्टेंबर 2013 मध्ये डी-फ्रीजमध्ये बिघाड झाल्याने तक्रारदार यांचे दुग्धजन्य पदार्थ खराब झाले. वि.प.क्र.1 यांनी हाफ कुलींगचा बिघाड दुरुस्त करुन दिला. परंतु तक्रारदार यांना कोणतीही नुकसानीची रक्कम दिली नाही. त्याबाबत तक्रारदार यांनी कोणतीही हरकत घेतली नाही. तथापि सदरचा डी-फ्रीज ता. 7/3/2014 रोजी पुन्हा कुलींग होऊ न लागलेने वि.प.क्र.2 यांनी दुरुस्तीकरिता व्यक्ती पाठवून देखील सदरच्या डीफ्रीजमध्ये कोणतीही दुरुस्ती केली नाही. त्याकारणाने सदरचा डी-फ्रीज ता.7/3/2014 पासून बंद पडलेल्या अवस्थेत होता. सबब, तक्रारदार यांनी सदरच्या डी-फ्रीजबाबत वि.प. यांना वेळोवेळी दुरुस्ती करणेबाबत कळवून देखील वि.प. यांनी दि.7/3/2014 नंतर तक्रारदार यांना दुरुस्ती न करुन देवून तसेच सदोष डी-फ्रीज देवून तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. सदर मुद्याचे अनुषंगाने वि.प. यांनी दाखल केलेल्या म्हणण्याचे अवलोकन करता वि.प. यांनी वादातील डी-फ्रीजला लागणारा इलेक्ट्रीसीटी, व्होल्टेज व इतर सर्व बाबींची तोंडी व लेखी कल्पना तक्रारदार यांना दिलेली होती. डी-फ्रीजचे कार्य खरेदी केले तारखेपासून सप्टेंबर पर्यंत योग्य असून त्यामध्ये कोणताही उत्पादित दोष नव्हता. सप्टे. 2013 मध्ये वि.प. यांचे मेकॅनिक यांनी सदर डी-फ्रीजची पाहणी केली असता डी-फ्रीजचे वायरिंग हे योग्य नव्हते, त्यामुळे वायरिंग सैल असलेमुळे सदर डी-फ्रीजचे कार्य योग्य होत नव्हते. त्यानुसार वि.प. यांचे मेकॅनिकने वि.प. यांचे स्टॅंडर्डप्रमाणे कोणतेही शुल्क न वापरता सदराचे वायरिंग बदलून दिले. तक्रारदार यांनी वॉरंटीमधील अटींचा भंग केलेला आहे. वि.प. यांनी वॉरंटीप्रमाणे सर्व सोयी तक्रारदार यांना दिलेल्या आहेत. तक्रारदार यांचे तक्रारीप्रमाणे वि.प. यांनी सदरचा डी-फ्रीज दुरुस्त केलेला असून त्यानुसार मार्च 2014 पर्यंत सदरचा डी-फ्रीज योग्य प्रकारे काम करीत होता. तक्रारदार व त्यांच्या कामगारांनी सदरच्या मशीनचा वापर योग्य रितीने न केल्याने सदरचे वायरिंग हे बदलावे लागले व ते सैल झाले. प्रस्तुत तक्रारदार यांनी कोणताही तज्ञांचा अहवाल दाखल केलेला नाही, सबब, तक्रारदार यांची तक्रार नामंजूर करणेत यावी असे म्हणणे वि.प. यांनी दिलेले आहे.
8. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करता ता. 13/8/20 रोजी वि.प. यांनी सदरचा डी-फ्रीज दुरुस्त करुन दिलेचा सर्व्हिस रिपोर्ट दाखल केला आहे. सदर सर्व्हिस रिपोर्टचे अवलोकन करता,
डीफ्रीजचे वायरिंग कॉन्टॅक्ट लूज होते, रिवायरिंग करुन डीफ्रीज चालू करुन दिला, वर्कींग ओके. असे नमूद आहे.
तसेच अ.क्र.3 ला ता. 7/2/14 रोजी चा सर्व्हिस रिपोर्ट दाखल असून त्याचे अवलोकन करता
डीफ्रीज चेक केला असता कॉम्प्रेस पंपींग प्रॉम्ब्लेम, डीफ्रीज वर्कशॉपला पाठविणे आवश्यक, असे नमूद आहे.
सदरचे सर्व्हिस रिपोर्ट वि.प. यांनी नाकारलेले नाहीत. प्रस्तुतकामी ता. 3/4/2019 रोजी स्वयंभू रेफ्रिजरेटर्स यांचेकडील दाखला दाखल केलेला असून सदर दाखल्याचे अवलोकन करता
मशीनच्या कॉम्प्रेसरमध्ये दोष असलेने वादातील रेफ्रिजरेटरमध्ये दोष निर्माण झालेला आहे. येणेप्रमाणे सदरचा दोष असलेमुळे रेफ्रिजरेटर मॉडेल नं. CAHF-500 Sr.No. 13 M 3434 Blue Star Makes हा कार्यान्वीत राहू शकत नाही.
असे नमूद असून त्याअनुषंगाने साक्षीदार स्वयंभू रेफ्रिजरेटर प्रोप्रा. मनोज माधवराव शिंदे या साक्षीदारांचे शपथपत्र सदरकामी दाखल केलेले आहे. सदरच्या अॅफिडेव्हीटमध्ये रेफ्रिजरेटरमध्ये असलेल्या दोषांबाबतचा दाखला दि.3/4/19 रोजी दिलेला असून त्यामधील सर्व मजकूर खरा व बरोबर आहे असे नमूद आहे. सदरचे साक्षीदारांचे पुरावा शपथपत्र व दाखला वि.प. यांनी नाकारलेला नाही. सबब, वरील सर्व कागदपत्रांचा विचार करता वि.प. यांचे कथनानानुसार, वादातील डीफ्रीज मार्च 2014 अखेर योग्य प्रकारे काम करत होता. तथापि दाखल कागदपत्रांवरुन सदरचा डीफ्रीजमध्ये दि. 7/2/2014 रोजी वि.प. यांचे सर्व्हिसिंग रिपेार्टनुसार कॉम्प्रेसर पंपींगमध्ये बिघाड झालेचे कागदपत्रांवरुन सिध्द होते. प्रस्तुतकामी तक्रारदार यांनी वि.प. यांना ता. 15/3/2014 रोजी वकीलमार्फत नोटीस पाठविलेची प्रत दाखल केली आहे. सदरची नोटीस पोहोचून देखील वि.प. यांनी डी-फ्रीज दुरुस्त करुन दिलेला नाही अथवा सदरच्या नोटीसीस कोणतेही उत्तर दिलेले नाही. त्याकारणाने सदरचा डी-फ्रीज ता. 7/3/2014 रोजी पासून बंद अवस्थेत आहे. या सर्व बाबींचा विचार करता वि.प. यांनी तक्रारदार यांच्याकडून डीफ्रीजचा मोबदला स्वीकारुन देखील तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेमध्ये त्रुटी केलेली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.3
9. उपरोक्त मुद्दा क्र.1 व 2 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे. तक्रारदार यांनी प्रस्तुतकामी डी-फ्रीज बंद राहिल्याने रक्कम रु.15,000/- नुकसान भरपाईची मागणी आयोगामध्ये केलेली आहे. तथापि त्याअनुषंगाने कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. त्याकारणाने सदरची रक्कम मिळणेस तक्रारदार अपात्र आहेत. सबब, वि.प. यांनी तक्रारदार यांना डी-फ्रीज बदलून द्यावा अथवा सदर डी-फ्रीजची खरेदीची रक्कम रु. 25,000/- अदा करावी व सदर रकमेवर तक्रार दाखल तारीख 17/7/2014 पासून सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदार यांना मिळेपावेतो द.सा.द.शे. 9 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.4
10. वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेने तक्रारदार हे वि.प. यांचेकडून मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- मिळणेस पात्र आहेत. सबब, मुद्दा क्र.4 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.5 - सबब आदेश.
| - आ दे श - - तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
- वि.प.क्र.1 ते 3 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना डीफ्रीज मॉडेल क्र. CAHF-500 Sr.No. 13 M 3434 Blue Star Makes बदलून द्यावा.
-
अथवा सदर डीफ्रीजचे खरेदीची किंमत रक्कम रु. 25,000/- अदा करावी व सदर रकमेवर तक्रार दाखल तारीख 17/07/2014 पासून सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदार यास मिळेपावेतो द.सा.द.शे.9 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे. - तक्रारदार यांनी सदोष डिफ्रीज वि.प. यांना परत द्यावा.
- वि.प. क्र.1 ते 3 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- अदा करावी.
- वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
- विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदयातील तरतुदीप्रमाणे वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
- आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.
|