न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 11 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे—
वि.प. क्र.2 ही परदेश दौरे आयोजित करणारी संस्था असून वि.प.क्र.1 हे तिचे कोल्हापूरातील प्राधिकृत प्रतिनिधी आहेत. फेब्रुवारी 2018 मध्ये तक्रारदार यांनी वि.प.क्र.1 यांचेशी संपर्क साधून त्यांना दक्षिण आफ्रिका, झिम्बावे, बोत्सवाना येथे परदेश दौरा करावयाचा आहे असे सांगितले. याबाबत खूप वेळा विचार विनिमय झालेनंतर वि.प.क्र.1 यांनी तक्रारदार यांना निवेदीत दराचे पत्रक दिले. तक्रारदार व त्यांचे कुटुंबिय यांना मुख्यत्वेकरुन क्रृगर नॅशनल पार्क व तेथील 6 गेम व राईड्स पाहणेचे होते व तेथे 3 दिवस वास्तव्य करावयाचे होते व तसे त्यांनी वि.प. यांना स्पष्टपणे सांगितले होते. सदरची इच्छा वि.प. यांनी पूर्णपणे मान्य केली होती. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी दरपत्रक मान्य करुन वि.प. यांना सर्व रक्कम अदा केली. वि.प.क्र.1 यांनी क्रृगर नॅशनल पार्कमधील वास्तव्याकरिता माणसी रु.50,000/- प्रमाणे रक्कम आकारली. तक्रारदारांनी 4 व्यक्तींसाठी रु. 2,00,000/- वि.प. यांना अदा केली. सदर दौ-यासाठी व्हिसा मिळवून देण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करु असे आश्वासन वि.प. यांनी दिले होते. परंतु तक्रारदार यांचे नातवासंदर्भात यलो फिवर लस घेतलेबाबतचे प्रमाणपत्र वि.प.क्र.1 यांच्या कार्यालयाने हरविल्याने तक्रारदार यांना व्हिसा मिळवण्यात अडचणी निर्माण होवून तक्रारदारास प्रवासाचे दिनांकाच्या आदल्या दिवसापर्यंत मानसिक तणावास सामोरे जावे लागले. तसेच वि.प. यांनी क्रृगर नॅशनल पार्कमध्ये तक्रारदारांचे वास्तव्याची व्यवस्था केली नाही. उलट त्यांना क्रृगर नॅशनल पार्कचे नम्बी गेटपासून 2 तासाच्या अंतरावरील बोंगानी माऊंटन लॉजमध्ये वास्तव्य करावयास लावले. तक्रारदार यांना सदर पार्कचे सफारीसाठी वैयक्तिकरित्या जादा खर्च करावा लागला. त्याबाबत तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे नापसंती व्यक्त केली. तथापि वि.प. यांनी त्याची गंभीर दखल घेतली नाही. तक्रारदार यांनी अनेकदा वि.प. यांचेशी मेलद्वारे संपर्क साधला परंतु वि.प. यांनी तक्रारदारांना कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. ठरल्याप्रमाणे तक्रारदारांना किंमत घेवूनही वि.प. यांनी सुविधा पुरविल्या नाहीत. त्यामुळे वि.प. यांनी कराराचा भंग करुन सेवेमध्ये गंभीर त्रुटी केल्या आहेत. म्हणून तक्रारदारांनी वकीलामार्फत दि. 12/7/2018 रोजी वि.प. यांना नोटीस पाठविली. सदर नोटीसीस वि.प. यांनी दि. 10/8/2018 रोजी उत्तर पाठवून तक्रारदाराची मागणी अमान्य केली. म्हणून, तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रारअर्ज या मंचात दाखल केला आहे.
2. प्रस्तुतकामी तक्रारदाराने वि.प. यांचेकडून सेवेतील त्रुटींसाठी रक्कम रु. 10,00,000/- व तक्रार अर्जाचा खर्च वि.प. कडून वसूल होवून मिळावा अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत अ.क्र.1 ते 11 कडे अनुक्रमे तक्रारदार यांनी कुरियरने कागद पाठविल्याची रिसीट, तक्रारदारांनी वि.प. यांना केलले मेल, साऊथ आफ्रिकन नॅशनल पार्क येथील पावती, तक्रारदार यांनी रक्कम भरलेची इन्व्हॉईस, तक्रारदार यांना टूरसंबंधी आलेले मेल, तक्रारदारांनी वि.प. यांना दिलेली नोटीस, सदर नोटीसीस वि.प. यांनी दिलेले उत्तर वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुरावा शपथपत्र दाखल केले आहे.
4. वि.प.क्र.1 व 2 यांनी सदरकामी म्हणणे/कैफियत व अॅफिडेव्हीट व पुरावा शपथपत्र दाखल केले आहे. वि.प. यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. वि.प. क्र.1 व 2 यांनी तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.
i) तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्यातील सर्व मजकूर मान्य व कबूल नाही.
ii) वि.प. यांनी तक्रारदारांना नमूद देशांच्या दौ-याबाबतची संपूर्ण माहिती दिल्यानंतर व तक्रारदाराचे समाधान झाल्यानंतरच वि.प. यानी तक्रारदार यांचेकरिता सहल बुक केली होती. सदर सहलीचा खर्च रु.10,53,228/- तक्रारदार यांनी भरलेला होता. याबाबतच्या अटी व शर्तीवर तक्रारदाराने सहया केल्या आहेत. तक्रारदार हे सहलीला जावून आलेनंतर पश्चातबुध्दीने वि.प. यांचेवर बिनबुडाचे आरोप करीत आहेत. वि.प. यांनी तक्रारदार यांना सर्व इच्छित स्थळांची व्यवस्थित सहल घडविली आहे.
iii) वि.प. यांनी तक्रारदारांना संपूर्ण सहकार्य करुन व्हिसा मिळणेकामी मदत केली आहे. त्यासाठी कोणताही मेहनताना घेतलेला नाही.
iv) तक्रारदार यांना क्रुगर नॅशनल पार्कमध्ये वास्तव्य करावयाचे होते व त्याकरिता वि.प. यांनी हमी दिली हा मजकूर खोटा आहे. अशी कोणतीही हमी वि.प. यांनी दिलेली नव्हती. बोंगानी माऊंटन लॉजमध्ये वास्तव्य करावयास लावले हा मजकूर खोटा आहे. वि.प. यांनी सदर सहलीला जाण्यापूर्वी 3 महिने आधीच सदर सहलीच्या संपूर्ण नियोजनाबाबत माहिती तक्रारदारांना पुरविली होती. तक्रारदारांनी होकार दिल्यानंतरच वि.प. यांनी सदर ठिकाणांचे बुकींग केले होते. तक्रारदार यांना क्रुगर नॅशनल पार्कमध्ये रहावयाचे होते तर त्यांना नक्कीच जास्तीचे पैसे द्यावे लागणार होते. परंतु तक्रारदार हे अत्यंत शिताफीने वि.प. यांचेवर सदर जबाबदारी ढकलू पहात आहेत. वि.प. यांचेकडून कोणतेही बेजबाबदार कृत्य तक्रारदार यांच्या सहलीबाबत घडलेले नाही. सबब, तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.
अशा स्वरुपाचे आक्षेप वि.प. यांनी तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.
5. वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | नाही. |
3 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
6. वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिली आहेत कारण तक्रारदार यांनी वि.प.क्र.1 यांचेशी संपर्क साधून दक्षिण आफ्रिका, झिम्बावे, बोत्सवाना या परदेश दौ-यासाठी सहलीचे नियोजन केले व त्यासाठी वि.प. यांचेकडे रक्कम जमा केली ही बाब वि.प. यांनी त्यांचे म्हणण्यात मान्य केली आहे. सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द झालेली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. वर नमूद मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्ही नकारार्थी दिले आहे कारण प्रस्तुतकामी तक्रारदार व त्यांचे कुटुंबिय यांना मुख्यत्वेकरुन क्रृगर नॅशनल पार्क व तेथील 6 गेम व राईड्स पाहणेचे होते व तेथे 3 दिवस वास्तव्य करावयाचे होते व तसे त्यांनी वि.प. यांना स्पष्टपणे सांगितले होते. सदरची इच्छा वि.प. यांनी पूर्णपणे मान्य केली होती. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी दरपत्रक मान्य करुन वि.प. यांना सर्व रक्कम अदा केली. वि.प.क्र.1 यांनी क्रृगर नॅशनल पार्कमधील वास्तव्याकरिता माणसी रु.50,000/- प्रमाणे रक्कम आकारली. तक्रारदारांनी 4 व्यक्तींसाठी रु. 2,00,000/- वि.प. यांना अदा केली. परंतु वि.प. यांनी क्रृगर नॅशनल पार्कमध्ये तक्रारदारांचे वास्तव्याची व्यवस्था केली नाही. उलट त्यांना क्रृगर नॅशनल पार्कचे नम्बी गेटपासून 2 तासाच्या अंतरावरील बोंगानी माऊंटन लॉजमध्ये वास्तव्य करावयास लावले. तक्रारदार यांना सदर पार्कचे सफारीसाठी वैयक्तिकरित्या जादा खर्च करावा लागला अशा तक्रारी तक्रारदारांनी तक्रारअर्जात केल्या आहेत. परंतु सदर कथनाचे पुष्ठयर्थ तक्रारदार यांनी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारदार व वि.प. यांचेमध्ये झालेल्या सहलीचे कराराची कोणतीही प्रत तक्रारदार यांनी याकामी दाखल केलेली नाही. सहलीचे नियोजन करताना ज्या स्थळांची सहल घडवायची असे उभयतांमध्ये ठरले होते, त्याबाबत कोणताही पुरावा तक्रारदार यांनी याकामी दाखल केलेला नाही. सदर सहलीमध्ये तक्रारदार यांना क्रुगर नॅशनल पार्कमध्ये भेट द्यावयाची होती व तेथे वास्तव्य करावयाचे होते हे तक्रारदाराचे कथन वि.प. यांनी नाकारले आहे. तक्रारदारांनी ज्या स्थळांना भेट द्यावयाची, त्यामध्ये क्रुगर नॅशनल पार्कचा समावेश होता व तेथे तक्रारदारांनी वास्तव्य करावयाचे उभयपक्षी ठरले होते, हे दर्शविणारा कोणताही पुरावा तक्रारदार यांनी दाखल केलेला नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी तक्रारअर्जात जी कथने केली आहेत, ती विश्वासार्ह नाहीत असे या आयोगाचे मत आहे. तक्रारदार यांनी त्यांचे तक्रारअर्जात केवळ मोघम कथने केली आहेत. सदर कथनांचे पुष्ठयर्थ कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारदाराने कथन केलेप्रमाणे तक्रारदार व वि.प. यांचेदरम्यान सहलीचे नियोजन झालेचे व तक्रारअर्जात नमूद ठिकाणे दाखविणेचे ठरले होते तसेच राहणेसाठीची ठिकाणे ठरली होती ही बाब शाबीत करणेसाठी तक्रारदाराने सहलीबाबत ठरलेल्या अटी व शर्ती अथवा ज्या गोष्टी ठरल्या होत्या, त्या दाखविण्यासाठी कोणताही ठोस पुरावा दाखल केलेला नाही. सबब, वि.प. यांनी तक्रारदारांना ठरलेप्रमाणे सहल घडवून आणून न देवून तक्रारदारास द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे ही बाब याकामी शाबीत झालेली नाही या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, तक्रारअर्ज नामंजूर होणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
सबब, प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येतो.
2) खर्चाबाबत आदेश नाहीत.
3) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.