निकाल
पारीत दिनांकः- 28/08/2013
(द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष)
तक्रारदारांनी जाबदेणार विरुध्द ते रक्कम घेऊनही हज यात्रेला घेऊन गेले नाहीत म्हणून त्यांच्या विरुध्द तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदार हे मुस्लीम असल्यामुळे त्यांच्या धर्मानुसार जीवनामध्ये एकदातरी हज यात्रेला जावे असे सांगितले असल्यामुळे हज यात्रा करण्याचे त्यांनी ठरवले. तक्रारदारांनी जाबदेणार यांच्याकडे हज यात्रेची चौकशी केली. जाबदेणार ही मक्कामदीना ( हज यात्रा) या ठिकाणी मुस्लीम बाधवांना हज यात्रेसाठी घेऊन जाणारी ट्रॅव्हल कंपनी आहे. जाबदेणार यांनी तक्रारदारास प्रत्येक इसमास - यात्रेकरुस रु 2,25,000/- लागतील असे सांगितले व प्रत्येकाचा पासपोर्ट त्यांच्या मुंबई ऑफिसला जमा करण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदारांनी त्यांच्यासाठी व त्यांच्या पत्नीसाठी जाबदेणारकडे हज यात्रेसाठी पैसे भरण्याचे ठरविले. दिनांक 23/7/2012 रोजी त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र, निगडी शाखा यांच्या खात्यातून रु. 4,50,000/- चा धनादेश जाबदेणारकडे पाठविला. जाबदेणार यांनी त्याची पावती सुध्दा दिली आहे. ही रक्कम जाबदेणार यांना मिळाल्यानंतर तक्रारदार जाबदारांकडून हज यात्रा केव्हा सुरु होणार या बदृ्लची माहिती येण्याची वाट बघत होते. हज यात्रा चालू होण्यासाठी 40 दिवस उरले असताना तक्रारदारांनी अनेक वेळा जाबदेणार यांना यात्रेस जाण्याबद्दलच्या तारखेची चौकशी केली. परंतू प्रत्येक वेळी ते तक्रारदारास खोटे अश्वासन देत होते. हज यात्रेसाठी जाण्याचा कालावधी दिनांक 26/10/2012 रोजी संपला. कारण बकरी ईद पर्यन्तच हज यात्रेला जावयाचे असते. तक्रारदारांनी जाबदेणार यांना रक्कम रु 4,50,000 अॅडव्हान्सचे पूर्वीच दिले होते. हज यात्रेस जाबदेणार यांनी नेलेच नाही म्हणून तक्रारदारांनी त्यासाठी दिलेली रक्कम जाबदेणारकडून परत मागितली. अनेक वेळा मागणी करुनही जाबदेणार फक्त आश्वासन देत होते. या रकमेसाठी तक्रारदार जाबदेणारकडे औरंगाबाद येथे अनेक वेळा जाऊन आले. तरी जाबदेणार यांनी रक्कम दिली नाही. शेवटी दिनांक 12/11/2012 रोजी जाबदेणारकडे गेले असता त्यांनी तक्रारदाराच्या नावाने रक्कम रु 4,50,000/- चा चेक दिनांक 12/11/2012 चा दिला. तो चेक तक्रारदाराच्या बँकेत जमा केला असता चेक दिनांक 21/11/2012 च्या Funds in Sufficient या बँकेच्या शे-यासहीत अनादरीत झाला. या बद्दल जाबदेणार यांना सांगितले असता पुन्हा एकदा बँकेत चेक जमा करावा, या वेळी रक्कम त्यांच्या खात्यात असेल असे सांगितले. म्हणून तक्रारदारांनी दिनांक 06/12/2012 रोजी जमा केला. याही वेळी तो अनादरीत झाला. अशा प्रकारे जाबदेणार यांनी तक्रारदारास फसविले आहे. तक्रारदाराचे पुढे असे म्हणणे आहे की, हज यात्रेला जायचे म्हणून त्यांनी त्यांच्या सर्व समाजामध्ये, नातेवाईकांमध्ये सांगितले होते आणि जाबदेणार यांच्या सेवेतील त्रूटीमुळे ते जावू शकले नाहीत. त्यामुळे समाजातील लोकांनी त्यांना नावे ठेवली, समाजामध्ये मानहानी पत्करावी लागली. या झालेल्या त्रासामुळे तक्रारदारांनी जाबदेणार यांना दिनांक 1/1/2013 रोजी लिगल नोटिस पाठवून रक्कम परत मागितली. नोटिसचे उत्तरही पाठवले नाही व रक्कमही दिली नाही. उलट तक्रारदारास नोटिस पाठवल्यामुळे महागात पडेल अशी फोन वरुन धमकी दिली. या सर्वामुळे तक्रारदारांना त्रास सहन करावा लागला. तक्रारदार जाबदेणार कडून भरलेली रक्कम रु 4,50,000/- व त्यावर द.सा.द.शे. 21 टक्के व्याजासहीत, रु 1 लाख हज यात्रेस पाठवले नाही म्हणून झालेले नुकसान, रु 55,125/-, झालेली मानहानी, त्रास, जाबदेणारकडे औरंगाबाद येथे जाण्याचा खर्च, नोटिसचा खर्च रु 11,000/- असे एकूण रक्कम रु 6,71,125/- इतकी मागतात.
तक्रारदारांनी आपल्या तक्रारीच्या पुष्ठयर्थ कागदपत्रे व शपथपत्र दाखल केली आहेत.
(2) जाबदेणार यांना नोटीस पाठविली असता, नोटीस मिळूनही ते मंचामध्ये अनुपस्थित राहिले म्हणून मंचाने दिनांक 09/04/2013 रोजी त्यांच्याविरुद्ध एकतर्फा सुनावणीचा आदेश पारीत केला.
(3) तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचानी पाहणी केली. तक्रारदारानी जाबदेणार विरुध्द प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. जाबदेणार हे सर्व औरंगाबाद येथील रहिवासी आहेत. परंतु घटना घडण्याचे कारण हे निगडी येथे झालेले आहे. कारण, जाबदेणार यांनी रक्कम रु 4,50,000/- चा चेक दिला असता तक्रारदारांची बँक निगडी येथे असल्यामुळे निगडी बँकेत अनादरीत झाला म्हणून घटना घडण्याचे कारण या मंचाच्या कार्यक्षेत्रात येते.
तक्रारदार हे मुस्लीम आहेत. जीवनामध्ये एकदा तरी हज यात्रा अनुभवावी म्हणून ते व त्यांच्या पत्नीने जाबदेणारकडे प्रत्येकी रु 2,25,000/- असे एकूण रु 4,50,000/- भरले. ती रक्कम जाबदेणार यांना प्राप्त झाली तरी सुध्दा जाबदेणार यांनी त्यांना त्यांचे तिकीटही दिले नाही किंवा हज यात्रेसाठी नेलेही नाही. हज यात्रा बकरी ईद पर्यन्तच असते. त्यावेळेपर्यंत म्हणजे दिनांक 26/10/2012 पर्यन्त वाट पाहूनही जाबदेणार यांनी तक्रारदाराच्या हज यात्रेची व्यवस्था केली नाही, त्या बद्दल कळविले नाही, माहिती दिली नाही, ही त्यांच्या सेवेतील त्रूटी दिसून येते. तसेच जाबदेणार यांनी रक्कम रु. 4,50,000/- तक्रारदारास परत केली नाही. रकमेची मागणी करुनही व औरंगाबाद येथे अनेक वेळा जावूनही ती रक्कम जाबदेणार यांनी तक्रारदारास दिली नाही. शेवटी दिनांक 12/11/2012 रोजी औरंगाबाद येथे गेल्यावर रु 4,50,000/- चा चेक तक्रारदारास दिला. तो ही अनादरीत झाला. हे बँकेच्या स्टेटमेंट वरुन स्पष्ट होते. तक्रारदारांनी रक्कम रु 4,50,000/- भरल्याची पावती व बँक स्टेटमेंट दाखल केले आहे. तक्रारदारास धार्मिक यात्रा करावयाची होती त्यासाठी त्यांनी जाबदेणारकडे दिनांक 23/7/2012 रोजी रु 4,50,000/- जाबदेणारकडे भरले. जाबदेणार यांनी तक्रारदारांची धार्मिक यात्राही घडवून आणली नाही, व त्या बदृलचे स्पष्टिकरण दिले नाही. उलट तक्रारदारानी नोटिस पाठवली म्हणून त्यांना मोबाईलवरुन धमक्या दिल्या. ही जाबदेणार यांची वर्तणूक योग्य नाही असे मंचाचे मत आहे. जाबदेणार हे 2012 पासून तक्रारदाराची रक्कम रु. 4,50,000/- स्वत: कडे ठेऊन ती वापरत आहेत हे स्पष्ट होते. म्हणजेच ते अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब करत असल्याचे दिसून येते. हजला जाण्यासाठी म्हणून तक्रारदारांनी साहाजिकच मनाची व आर्थिक तयारी केली असेल. समाजात, नातेवाईकांमध्ये सांगितले असेल आणि जाबदेणार यांच्या वर्तणूकीमुळे ते जावू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना समाजात मानहानी सहन करावी लागली असेल. तसेच जाबदेणार यांनी रक्कम 4,50,000/- परत केली नाही म्हणून आर्थिक त्रास सहन करावा लागला व वारंवार औरंगाबद येथे जावे लागले म्हणून शारीरिक त्रास सहन करावा लागला म्हणूनच तक्रारदार नुकसानभरपाई मिळण्यास पात्र ठरतात असे मंचाचे मत आहे. म्हणून मंच जाबदेणार क्र. 1 ते 3 यांना असा आदेश देते की त्यांनी तक्रारदारांची रक्कम रु 4,50,000/- घेतल्या पासून म्हणजे दिनांक 23/7/2012 पासून रककम अदा करेपर्यन्त 9 टक्के व्याज दराने दयावी व नुकसानभरपाईपेाटी तसेच तक्रारीचा खर्च म्हणून रु 50,000/- दयावेत.
वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन मंच खालील आदेश पारीत करते.
** आदेश **
1. तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. जाबदेणार क्र. 1 ते 3 यांनी तक्रारदारास रक्कम रु.
4,50,000/- (रु चार लाख पन्नास हजार) दिनांक
23/07/2012 पासून, रक्कम अदा करे पर्यन्त द.सा.
द. शे. 9 % व्याज दराने दयावी व नुकसानभरपाईपोटी
व तक्रारीचा खर्च म्हणून रक्कम रु. 50,000/- आदेशाची
प्रत मिळाल्यापासून सहा आठवड्यांच्या आंत तक्रारदारास
द्यावी.
3. निकालाच्या प्रती दोन्ही बाजूंना नि:शुल्क
पाठविण्यात याव्यात.
(एस. के. पाचरणे) (अंजली देशमुख)
सदस्य अध्यक्ष
अतिरिक्त पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,पुणे