तक्रारदारांतर्फे :- अॅड.श्रीमती. कुलकर्णी
जाबदेणार क्र. 1 तर्फे :- अॅड.श्री. शहा
जाबदेणार क्र. 2 तर्फे :- अॅड.श्री. भरेकर
****************************************************************
// निकालपत्र //
पारीत दिनांकः- 31/01/2014
(द्वारा – एस्.के. पाचरणे, सदस्य)
तक्रारदार मे. श्री. सद्गुरु कृपा टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स यांनी जाबदारांविरुध्द त्रुटीयुक्त सेवा दिल्याबद्दल ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 12 अन्वये तक्रार अर्ज दाखल केला आहे. तक्रारीतील संक्षिप्त मजकूर पुढीलप्रमाणे आहे.
2. तक्रारदार मे. श्री सद्गुरु कृपा टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सचे प्रोपरायटर श्री. अरुण नारायण काळे यांनी जाबदार क्र. 1 बाफना ऑटोमोटीव्ह आंबेगाव बु. कात्रज, पुणे यांचेकडून टाटा व्हेन्चर्स जी एक्स हे वाहन खरेदी केले. जाबदार क्र. 1 हे टाटा मोटर्स या वाहन उत्पादकांचे अधिकृत विक्रेते आहेत. जाबदार क्र. 2 टाटा मोटर्स हे वाहन उत्पादक आहेत. तक्रारदारांनी दि. 13/5/2011 रोजी रक्कम रु.5,17,062/- देऊन टाटा व्हेंचर्स हे वाहन खरेदी केले याबाबत दि. 13/5/2011 रोजीचे टॅक्स इनव्हॉईस दाखल केले आहे. सदरच्या वाहनाची नोंदणी प्राधिकरणाकडे परिवहन वाहन संवर्गात नोंदणी करण्यात आली. वाहनाचा नोंदणी क्रमांक MH 12/FZ – 2780 आहे. वाहन ताब्यात घेतल्यापासूनच सदरचे वाहन रस्त्यावर वापरतांना त्रास होत होता. यासाठी तक्रारदारांनी वारंवार जाबदार क्र. 1 यांचेकडे संपर्क साधून तोंडी तक्रारी केल्या. तसेच वाहनाच्या जॉबकार्डमध्ये सुध्दा तक्रारीचा उल्लेख करण्यात आला. प्रत्येकवेळी जाबदारांनी तात्पुरती दुरुस्ती करुन दिली, परंतु होणारा त्रास कमी झाला नाही. वाहनामधील क्लचचा प्रॉब्लेम 1000 कि.मी. वापरानंतर आपोआप कमी होईल, असे जाबदारांतर्फे सांगण्यात आले. परंतु क्लचचा प्रॉब्लेम अद्यापही सुटलेला नाही. त्यामुळे तक्रारदारांनी जाबदारांकडे सदरचे वाहन बदलून देण्याची मागणी केली. परंतु जाबदारांकडून वाहनातील दोष दूर करण्यात आले नाही. तसेच वॉरंटी पिरीएडमध्ये वाहन बदलून देण्याबाबत काहीही कार्यवाही झालेली नाही. म्हणून सदरचा तक्रार अर्ज दाखल करण्यात येत आहे.
तक्रारदार जाबदारांकडून दोषी वाहन बदलून मागतात किंवा वाहनाची किंमत रु.5,17,062/- व्याजासह परत मागतात. रु.50,000/- नुकसानभरपाई, रु.5,000/- तक्रार अर्जाचा खर्च आणि इतर दिलासा मागतात.
3. तक्रार अर्ज दाखल करुन घेताना मंचाने अधिकारक्षेत्राचा मुद्दा अनिर्णित ठेऊन दि. 2/7/2012 रोजी प्रकरण दाखल करुन घेण्यात आले.
4. जाबदार क्र. 1 व 2 तर्फ लेखी जबाब, प्रतिज्ञापत्र, कागदपत्रे व लेखी युक्तिवाद सादर करण्यात आला. जाबदार क्र. 1 च्या म्हणण्यानुसार, तक्रारदारांनी सदरचे वाहन टुरिस्ट परवान्यावर खरेदी केले असून त्याचा वापर टुरिस्ट अॅण्ड ट्रॅव्हल्सच्या व्यवसायासाठी करण्यात येत आहे. तक्रारदारांनी सादर केलेल्या टॅक्स इनव्हॉईसनुसार सदरचे वाहन तक्रारदाराच्या वैयक्तिक नावाने नसून मे. श्री सद्गुरु कृपा टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स या नावाने खरेदी केलेले आहे. तक्रारदार वाहनाचा वापर व्यावसायिक उद्देशाने नफा मिळविण्यासाठी करीत आहेत. तक्रारदार वाहन स्वत: चालवित नाहीत. त्यामुळे ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीनुसार तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक होणार नाहीत.
5. जाबदार क्र. 2 च्या म्हणण्यानुसार, जाबदार क्र. 1 आणि 2 यांचे संबंध “ प्रिन्सीपल टू प्रिन्सीपल “ या तत्वावर आधारित आहेत. तक्रारदारांनी सदरच्या वाहनाचा ताबा घेताना वाहन चालवून बघितले होते. जाबदारांनी काही प्राथमिक मुद्दे निर्णयार्थ उपस्थित केले आहेत.
(अ) ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 2 (1) ड मधील तरतुदीनुसार तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक नाहीत. तक्रारदारांनी सदरचे वाहन मे. श्री सद्गुरु कृपा टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स या नावाने खरेदी करुन त्याचा वापर ट्रॅव्हल्सच्या व्यवसायासाठी करण्यात येत आहे.
(ब) तक्रारदार वाहनामध्ये उत्पादकीय दोष असल्याचा उल्लेख करतात. परंतु हे सिध्द करण्यासाठी कोणत्याही तज्ञांचा अहवाल पुरावा म्हणून सादर केलेला नाही.
मा. राष्ट्रीय आयोगाने Maruti Udyog Ltd. V/s. Dr. A.S. Narayan
Rao & Anr. (I) (2010) CPJ 19 (NC) या प्रकरणी दिलेल्या निवाडयानुसार उत्पादकीय दोष आहेत हे सिध्द करण्यासाठी तज्ञांचा अहवाल, पुरावा म्हणून सादर करणे आवश्यक आहे.
(क) तक्रारदारांनी वाहनाचा वैयक्तिक वापर केला असता तर केवळ एक वर्षे 15 दिवस या अल्पावधीत वाहनाचे रनिंग 30,210 कि.मी. झाले नसते. मा. महाराष्ट्र राज्य आयोगाने Mrs. Parul J. Modi V/s. M/s. Tata Motors Ltd. & Anr. CC No. 285/2002, decided on 3/1/2007 या प्रकरणी दिलेल्या निवाडयानुसार वाहनाचा 28,000 कि.मी. पेक्षा अधिक वापर 02 वर्षांमध्ये झालेला असल्यामुळे त्या वाहनामध्ये उत्पादकीय दोष नसून, वाहनाच्या एक्सटेन्सीव्ह वापरामुळे झालेल्या वेअर अॅण्ड टेअर मुळे निर्माण झालेले दोष असावेत. करिता सदरचा तक्रार अर्ज खर्चासह नामंजूर करावा अशी मागणी जाबदार क्र. 2 चे विधिज्ञ श्री. भरेकर यांनी केली.
6. तक्रारदारांनी आपल्या तक्रार अर्जा पुष्टयर्थ कागदपत्रे, शपथपत्र आणि लेखी युक्तिवाद सादर केला आहे. तक्रारदाराचे विधिज्ञ श्रीमती कुलकर्णी यांनी सविस्तर युक्तिवाद केला. तक्रारदाराचा उदरनिर्वाह सदरच्या वाहनावर अवलंबून आहे. जाबदारांनी तक्रारदारांना योग्य सेवा न पुरविल्यामुळे तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत. सदरच्या वाहनामध्ये वारंवार बिघाड होत असल्यामुळे तक्रारदाराच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. करिता, तक्रारदारांनी सदरचे दोषी वाहन बदलून नवीन वाहन मिळणेबाबत मागणी केली आहे. सदरचे वाहन वॉरंटी पिरीएडमध्ये असल्यामुळे जाबदारांनी वाहन बदलून देणे अन्यथा वाहनाची किंमत व्याजासह परत करणे आवश्यक आहे. तक्रारदाराचा तक्रार अर्ज मंजूर करुन योग्य दिलासा मिळावा, अशी मागणी तक्रारदारांच्या विधिज्ञांनी केली.
7. प्रस्तुत प्रकरणातील मंचासमोर सादर झालेली कागदपत्रे, प्रतिज्ञापत्र आणि दोन्ही पक्षकारांच्या विधिज्ञांचा युक्तिवाद मंचाने विचारात घेतला, तक्रारदार ग्राहक नाहीत या जाबदारांच्या म्हणण्याबाबत तक्रारदारांनी अन्य कोणताही मुद्दा किंवा पुरावा सादर केला नाही. तक्रारदारांनी सदरचे वाहन परिवहन संवर्गात नोंदविले असून टुरिस्ट परवाना घेतलेला आहे. वाहनाची आसन क्षमता 06 + 01 आहे. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 2 (1) (ड) मध्ये “ ग्राहक “ या संज्ञेची व्याख्या दिलेली आहे. त्यानुसार सदरच्या वाहनाचा व्यावसायिक उद्देशाने वापर करण्यात येत असल्यामुळे तक्रारदार हे जाबदारांचे “ ग्राहक “ होणार नाहीत, असे मंचाचे मत आहे.
तक्रारदारांनी तक्रार अर्जात उल्लेख केल्याप्रमाणे वाहनामध्ये वारंवार बिघाड होत आहेत. त्यामुळे वारंवार सदरचे वाहन जाबदारांच्या सर्व्हीस सेंटरमध्ये दुरुस्तीसाठी दाखल करावे लागते. वाहन वॉरंटी पिरीएडमध्ये असल्यामुळे जाबदारांनी वॉरंटीच्या अटी व शर्तीनुसार मोफत वाहनाची सर्व्हीसिंग व दुरुस्ती करुन दिलेली आहे. वाहनामध्ये उत्पादकीय दोष (manufacturing defects) असल्याबाबत कोणत्याही तज्ञांचा अहवाल पुरावा म्हणून तक्रारदारांनी दाखल केलेला नाही. मा. राष्ट्रीय आयोगाने Classic Automobiles V/s. Lila Nand Mishra & Anr. I (2010) CPJ 235 (NC) या प्रकरणी दिलेल्या निवाडयानुसार, वाहनामध्ये उत्पादकीय दोष आहेत हे सिध्द करण्याची जबाबदारी तक्रारदाराची आहे. वाहन वारंवार दुरुस्तीसाठी सर्व्हीस स्टेशनला आणावे लागत होते, यावरुन वाहनामध्ये उत्पादकीय दोष होते हे सिध्द होत नाही. तक्रारदारांनी सदरच्या वाहनामध्ये उत्पादकीय दोष असल्याचे सिध्द करण्यासाठी तज्ञांचा अहवाल पुरावा म्हणून सादर केलेला नाही. त्यामुळे सदरच्या वाहनामध्ये उत्पादकीय दोष आहेत हे सिध्द होत नाही, असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
तसेच मा. महाराष्ट्र राज्य आयोगाने Mrs. Parul J. Modi V/s. M/s. Tata Motors Ltd. & Anr. CC No. 285/2002, decided on 3/1/2007 या प्रकरणी दिलेल्या निवाडयानुसार, जर वाहनाचा दोन वर्षांच्या कालावधीत 28,000 कि.मी. वापर झाला असेल तर वाहनामध्ये उत्पादकीय दोष नव्हते आणि काही दोष असलेच तर ते वेअर अॅण्ड टेअर मुळे निर्माण झालेले दोष असावेत.
प्रस्तुतच्या प्रकरणात सदरचे वाहन केवळ एक वर्षे पंधरा दिवस या अल्पावधीत 30,210 कि.मी. वापरलेले आहे. तक्रारदार अदयापही सदरच्या वाहनाचा व्यावसायिक कारणासाठी वापर करीत आहेत. यावरुन वाहनामध्ये उत्पादकीय दोष असल्याचे सिध्द होत नाही. त्यामुळे तक्रारदाराची वाहन बदलून देण्याची मागणी मान्य करता येणार नाही, असा मंचाचा निष्कर्ष आहे.
तक्रारदाराचा व्यवसाय, वाहनाचा केलेला एक्सटेन्सिव्ह वापर आणि वाहनामध्ये उत्पादकीय दोष असल्याचा कोणताही सबळ पुरावा सादर न केल्यामुळे तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे. खर्चाबाबत कोणतेही आदेश करण्यात येत नाहीत.
8. वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन मंच पुढीलप्रमाणे आदेश पारीत करत आहे.
// आदेश //
1. तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2. खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
3. निकालाच्या प्रती उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात
याव्यात.