Maharashtra

Osmanabad

CC/19/143

कमलाकर दासराव पवार - Complainant(s)

Versus

सहाय्यक अभियंता म.रा.वि.वि.कं.लि. शिराढोण - Opp.Party(s)

श्री व्ही.व्ही.वटाणे

27 Jan 2021

ORDER

DISTRICT CONSUMER REDRESSAL FORUM OSMANABAD
Aria of Collector Office Osmanabad
 
Complaint Case No. CC/19/143
( Date of Filing : 02 May 2019 )
 
1. कमलाकर दासराव पवार
रा. रांजणी ता. कळंब जि. उस्मानाबाद
उस्मानाबाद
महाराष्ट्र
...........Complainant(s)
Versus
1. सहाय्यक अभियंता म.रा.वि.वि.कं.लि. शिराढोण
शिराढोण ता. कळंब जि. उस्मानाबाद
उस्मानाबाद
महाराष्ट्र
2. उप कार्यकरी अभियंता महाराष्ट्र राज्य विधुत वितरण कं.लि. कळंब
कळंब ता. कळंबजि. उस्मानाबाद
उस्मानाबाद
महाराष्ट्र
3. कार्यकारी अभियंता महारष्ट्र राज्य विधुत वितरण कंपनी मर्यादित उस्मानाबाद
उस्मानाबाद ता. जि. उस्मानाबाद
उस्मानाबाद
महाराष्ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. किशोर द. वडणे PRESIDENT
 HON'BLE MR. मुकुंद भ. सस्‍ते MEMBER
 HON'BLE MR. शशांक श. क्षीरसागर MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 27 Jan 2021
Final Order / Judgement

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, उस्‍मानाबाद.

ग्राहक तक्रार क्रमांक : 143/2019.          तक्रार दाखल दिनांक : 02/05/2019.                                          तक्रार आदेश दिनांक :  27/01/2021.                                                                   कालावधी: 01 वर्षे 08 महिने 25 दिवस

श्री. कमलाकर दासराव पवार, वय 50 वर्षे,

व्‍यवसाय : शेती, रा. रांजणी, ता. कळंब, जि. उस्‍मानाबाद.             तक्रारकर्ता

    

            विरुध्‍द                              

 

(1) सहायक अभियंता, म.रा.वि.वि.कं.म.,

    शिराढोण, ता. कळंब, उस्‍मानाबाद.

(2) (उपकार्यकारी) अभियंता, म.रा.वि.वि.कं.म.,

    कळंब, ता. कळंब, उस्‍मानाबाद.

(3) कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कं.म.,

    उस्‍मानाबाद, ता.जि. उस्‍मानाबाद.                        विरुध्‍द पक्ष

 

गणपुर्ती :-  (1) श्री. किशोर दत्‍तात्रय वडणे, अध्‍यक्ष

           (2) श्री. मुकुंद भगवान सस्‍ते, सदस्‍य

           (3) श्री. शशांक शरदचंद्र क्षीरसागर, सदस्‍य

 

           तक्रारकर्ता यांचेतर्फे विधिज्ञ :  व्‍ही.व्‍ही. वटाणे

           विरुध्‍द पक्ष यांचेतर्फे विधिज्ञ : शरद प्रताप घोगरे

 

आदेश

 

 

श्री. किशोर दत्‍तात्रय वडणे, अध्‍यक्ष यांचे द्वारा :-

 

1.     तक्रारकर्ता यांच्‍या तक्रारीचा आशय असा आहे की, मौजे रांजणी येथे त्‍यांच्‍या मालकी व कब्‍जेवहिवाटीची गट क्र.80, क्षेत्र 1 हे. 20 आर. शेतजमीन आहे. त्‍यांचा ग्राहक क्रमांक 606560141985 आहे. तक्रारकर्ता यांनी सन 2016-17 मध्‍ये शेतजमिनीमध्‍ये 86032 ऊस पिकाची लागवड केली होती. ऊस बेणे, नांगरण, मोगडणी, पाळी, शेणखत, रासायनिक खते इ. करिता त्‍यांनी रु.1,20,000/- खर्च केला. तसेच शेतजमीन क्षेत्रामध्‍ये कोठारी कंपनीचा रु.81,175/- किंमतीचा ठिबक सिंचन संच बसविला.

 

2.    तक्रारकर्ता यांचे पुढे कथन आहे की, ऊस पिकास 22 ते 23 कांडे येऊन गाळपासाठी परिपक्‍व झालेला होता. प्रतिएकर 70 टन व प्रतिटन रु.2,200/- दर याप्रमाणे रु.4,62,000/- उत्‍पन्‍न झाले असते.

 

3.    तक्रारकर्ता यांचे पुढे कथन आहे की, त्‍यांच्‍या ऊस लागवड क्षेत्रातून दक्षीण-उत्‍तर लघुदाब वि‍द्युत वाहिनीचे दोन सिमेंट पोल उभे आहेत. तक्रारकर्ता यांनी दि.25/5/2017 रोजी लेखी अर्जाद्वारे विद्युत वाहिनीच्‍या तारा ढिल्‍या असल्‍यामुळे झोळ असल्‍याची माहिती विरुध्‍द पक्ष क्र.1 यांचे कार्यालयामध्‍ये दिली. परंतु तारेचा झोळ दुरुस्‍त करण्‍यासाठी टाळाटाळ केली. परिणामी दि.13/11/2017 रोजी दुपारी 12.30 वाजता ढिल्‍या तारांचे एकमेकांस घर्षण होऊन ठिणग्‍या ऊस पिकावर पडल्‍या आणि ऊस पिकासह ठिबक सिंचन संच जळून खाक झाला. घटनेबाबत पोलीस ठाणे, शिराढोण; तलाठी, रांजणी; तहसीलदार व अग्‍नीशामक दलास कळविले. पोलीस स्‍टेशन, शिराढोण यांनी दि.19/11/2017 रोजी पंचनामा केला. तसेच विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 यांच्‍या पंचनाम्‍यामध्‍ये विद्युत तारेमध्‍ये झोळ आल्‍याचे व ऊस पीक जळाल्‍याचे मान्‍य केले आहे.  

 

4.    तक्रारकर्ता यांचे पुढे कथन आहे की, विरुध्‍द पक्ष यांनी घटनेची माहिती 24 तासाचे आत विद्युत निरीक्षक यांना दिली नाही. तक्रारकर्ता यांनी माहिती दिल्‍यानंतर विद्युत निरीक्षक यांनी 25 दिवसानंतर चौकशी करुन अहवाल तयार केला. तोपर्यंत विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 3 यांनी झोळ असलेल्‍या तारेची दुरुस्‍ती केली. त्‍यामुळे विद्युत निरीक्षक चौकशी करण्‍यासाठी आले असता झोळ किंवा स्‍पार्कींग आढळून आले नाही. घटना विरुध्‍द पक्ष यांचा निष्‍काळजीपणा व हलगर्जीपणामुळे घडलेली असून नुकसान भरपाई देण्‍यास विरुध्‍द पक्ष टाळाटाळ करीत आहेत. विधिज्ञांमार्फत नोटीस पाठवूनही नुकसान भरपाई देण्‍याकरिता विरुध्‍द पक्ष यांनी दखल घेतली नाही. वर नमूद वादविषयाचे अनुषंगाने तक्रारकर्ता यांनी ऊस पिकाकरिता रु.4,62,000/-, ठिबक सिंचन संचाकरिता रु.81,175/-, मानसिक त्रासाकरिता रु.50,000/- व ऊस बेणे, नांगरण, मोगडणी, पाळी, शेणखत, रासायनिक खते इ. करिता रु.1,20,000/- अशी एकूण रु.7,13,175/- नुकसान भरपाई देण्‍याचा विरुध्‍द पक्ष यांना आदेश करण्‍यात यावा, अशी विनंती केलेली आहे.

 

5.    विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 3 यांनी अभिलेखावर लेखी निवेदन दाखल केले आहे. त्‍यांनी तक्रारकर्ता यांच्‍या ग्राहक तक्रारीतील कथने अमान्‍य केली आहेत. त्‍यांचे कथन आहे की, विरुध्‍द पक्ष यांच्‍या चुकीमुळे घटना घडलेली नाही. कारण जे विद्युत कनेक्‍शन दिले जाते; त्‍यावेळेस तो ग्राहक होतो. घटना डी.पी. पासून चार पोल अंतरावर शॉटसर्कीटमुळे घडली आहे;  परंतु सदर पोलवर कुठल्‍याही प्रकारच्‍या ताराचा झोळ नव्‍हता आणि तारा नमूद जमीन गट क्रमांक क्षेत्रामध्‍ये येत नाहीत. त्‍यामुळे तारेच्‍या ठिणग्‍या पडण्‍याचा व ऊस पिकाला आग लागण्‍याचा प्रश्‍न उदभवत नाही. घटना तारेच्‍या झोळामुळे घडलेली नसल्‍यामुळे नुकसान भरपाई देण्‍याकरिता ते जबाबदार नाहीत. विद्युत निरीक्षक, उस्‍मानाबाद यांच्‍या अहवालानुसार वाहिनीवर कोठेही स्‍पार्कींगच्‍या खुना आढळून आलेल्‍या नाहीत. पंचनाम्‍यानुसार पोल तारामधील अंतर अर्ध्‍या फुटापेक्षा जास्‍त दिसून येते आणि स्‍पार्कींगमुळे आग लागल्‍याचे दिसून येत नाही. तसेच कारखान्‍याकडे ऊस नोंद दिसून येत नाही. तक्रारकर्ता यांना विद्युत वाहिनीवरुन विद्युत पुरवठा दिलेला नसल्‍यामुळे तक्रारकर्ता यांना ग्राहक नात्‍याने तक्रार दाखल करण्‍याचा अधिकार नाही. शेवटी तक्रारकर्ता यांची तक्रार खर्चासह नामंजूर करण्‍यात यावी, अशी विनंती विरुध्‍द पक्ष यांनी केलेली आहे.

 

6.    तक्रारकर्ता यांची तक्रार, विरुध्‍द पक्ष यांचे लेखी निवेदन व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारीमध्‍ये उपस्थित वादविषयाचे निवारणार्थ उपस्थित होणा-या मुद्दयांची कारण‍मीमांसा त्‍यांच्‍यापुढे दिलेल्‍या उत्‍तराकरिता खालीलप्रमाणे देण्‍यात येते.

 

            मुद्दे                                 उत्‍तर

 

1. तक्रारकर्ता हे ग्राहक संरक्षण कायदा, 1986 अन्‍वये

   'ग्राहक' संज्ञेत येतात काय ?                                  होय.

2. विरुध्‍द पक्ष यांच्‍या विद्युत वाहिनीच्‍या तारांतील घर्षणामुळे           होय.

   तक्रारकर्ता यांचे ऊस पीक व ठिबक सिंचन संच जळाल्‍याचे  

   सिध्‍द होते काय ? आणि त्‍या अनुषंगाने विरुध्‍द पक्ष यांनी

   तक्रारकर्ता यांना द्यावयाच्‍या सेवेमध्‍ये त्रुटी केली आहे काय ?        

3. तक्रारकर्ता नुकसान भरपाईसह तक्रार खर्च मिळण्‍यास                होय.

   पात्र आहेत काय ?                                                 

4.  आदेश काय ?                                         शेवटी दिल्‍याप्रमाणे

 

कारणमीमांसा

 

7.    मुद्दा क्र. 1 :- तक्रारकर्ता यांचे नांवे विरुध्‍द पक्ष यांनी कृषी प्रयोजनार्थ 5 अश्‍व शक्‍ती विद्युत पुरवठा दिल्‍याचे वीज आकार देयकावरुन निदर्शनास येते. विरुध्‍द पक्ष यांनी मुद्दा उपस्थित केला की, तक्रारकर्ता यांना विद्यु‍त वाहिनीवरुन विद्युत पुरवठा दिला नसल्‍यामुळे तक्रारकर्ता हे ‘ग्राहक’ होऊ शकत नाहीत. परंतु वीज आकार देयक पाहता विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना कृषी प्रयोजनार्थ विद्युत जोडणी दिलेली आहे आणि तक्रारकर्ता हे वीज सेवा घेत असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. त्‍या अनुषंगाने आम्‍ही मुद्दा क्र.1 चे उत्‍तर होकारार्थी देत आहोत.

 

8.    मुद्दा क्र. 2 :- तक्रारकर्ता यांचे कथन आहे की, त्‍यांच्‍या ऊस लागवड क्षेत्रातून दक्षीण-उत्‍तर लघुदाब वि‍द्युत वाहिनीचे दोन सिमेंट पोल उभे असून विद्युत वाहिनीच्‍या तारा ढिल्‍या असल्‍यामुळे झोळ असल्‍याची माहिती देऊनही तो दुरुस्‍त करण्‍यासाठी विरुध्‍द पक्ष यांनी टाळाटाळ केली आणि परिणामी दि.13/11/2017 रोजी दुपारी 12.30 वाजता ढिल्‍या तारांचे एकमेकांस घर्षण होऊन ठिणग्‍या ऊस पिकावर पडल्‍या आणि ऊस पिकासह ठिबक सिंचन संच जळून खाक झाला. उलटपक्षी तक्रारकर्ता यांची वादकथने अमान्‍य करताना विरुध्‍द पक्ष यांनी कथन केले की, पोलवर कुठल्‍याही प्रकारच्‍या ताराचा झोळ नव्‍हता आणि तारा नमूद जमीन गट क्रमांक क्षेत्रामध्‍ये येत नाहीत. विद्युत निरीक्षक, उस्‍मानाबाद यांच्‍या अहवालानुसार वाहिनीवर कोठेही स्‍पार्कींगच्‍या खुना आढळून आलेल्‍या नाहीत आणि तारेच्‍या ठिणग्‍या पडण्‍याचा व ऊस पिकाला आग लागण्‍याचा प्रश्‍न उदभवत नाही.

 

9.    असे दिसते की, दि. 13/11/2017 रोजी तक्रारकर्ता यांचे ऊस पीक व ठिबक सिंचन संचाच्‍या जळीत घटनेनंतर विरुध्‍द पक्षांसह पोलीस खाते व महसूल यंत्रणेकडे दि.14/11/2017 रोजी अर्ज करुन तक्रारकर्ता यांनी पंचनामा करण्‍याची व नुकसान भरपाई देण्‍याची विनंती केलेली आहे. त्‍या अनुषंगाने पोलीस व महसूल यंत्रणेने पंचनामा केल्‍याचे आढळते. 

 

10.   पोलीस ठाणे, शिराढोण, ता. कळंब यांनी दि.19/11/2017 रोजी घटनास्‍थळ पंचनामा केलेला दिसतो आणि त्‍यामध्‍ये विद्युत वितरण कंपनीच्‍या तारा ढिल्‍या असल्‍याने त्‍या तारामध्‍ये स्‍पार्कींग होऊन ठिणग्‍या पडून संपूर्ण ऊस व ठिबक सिंचन संच जळाल्‍याचा उल्‍लेख आढळतो. 

 

11.    तलाठी, रांजणी यांनी दि.14/11/2017 रोजी केलेल्‍या पंचनाम्‍यामध्‍ये विद्युत तारेचे शॉर्टसर्कीट झाल्‍यामुळे तक्रारकर्ता यांच्‍या शेतातील 1 हे. 20 आर. ऊस पीक व ठिबक सिंचन संच जळाल्‍यामुळे रु.10,00,000/- चे नुकसान झाल्‍याचा उल्‍लेख आहे.

 

12.   श्री. लक्ष्‍मण बाळू गायके, कनिष्‍ठ अभियंता, शाखा मोहा, अतिरिक्‍त कार्यभार शाखा शिराढोण यांनी दि.14/11/2017 रोजी पंच व त्‍यांच्‍या कर्मचा-यांच्‍या समक्ष घटनास्‍थळ पंचनामा केलेला आहे. तो पंचनामा उपकार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कं.लि., उपविभाग कळंब यांच्‍यासह पंच व कर्मचा-यांनी स्‍वाक्षरीत केल्‍याचे आढळून येते. सदर घटनास्‍थळ पंचनाम्‍यामध्‍ये खालीलप्रमाणे मजकूर नमूद आहे.

 

     सदरील घटनास्‍थळाची पाहणी केली असता विद्युत तारामध्‍ये झोळ दिसून येत आहे. सदरील अंदाजे अर्ध्‍या फुटाचे पेक्षा जास्‍त दिसून येत आहे. सदरील तारामध्‍ये स्‍पार्कींगमुळे आग लागल्‍याचे किंवा स्‍पार्कींगचे डॉट दिसून येत नाही. त्‍यामुळे सदरील घटनास्‍थळामधील ऊसाला नेमकी कशामुळे आग लागली हे निश्चित निष्‍पन्‍न होत नाही व दोन तारामधील अंतर हे अर्धा फुट अंतर आहे व त्‍या दोन तारामध्‍ये स्‍पार्कींग होऊ शकते.

 

13.   विद्युत निरीक्षक, विद्युत निरीक्षण विभाग, उस्‍मानाबाद यांनी तक्रारकर्ता यांच्‍या ऊस जळीत प्रकरणाची चौकशी करुन दि.28/2/2018 रोजी पत्राद्वारे कळविले आहे. त्‍या पत्रामध्‍ये अपघाताचा निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नमूद आहे.

 

    

 

अपघाताचा निष्‍कर्ष :-

 

     महावितरण कंपनीकडून सदर अपघाताची सूचना व अहवाल, अपघातस्‍थळाचे प्रत्‍यक्ष केलेले निरीक्षण व तपासणी, नोंदविलेले जबाब, तसेच प्राप्‍त नमुना-अ यावरुन खालीलप्रमाणे अभिप्राय देत आहोत.

 

      दि.13/11/2017 रोजी दुपारी 12.50 वाजताच्‍या दरम्‍यान श्री.कमलाकर दासराव पवार, गट नं. 80, मौजे रांजणी, ता. कळंब, जि. उस्‍मानाबाद यांच्‍या शेतामधून महावितरणची 3 फेज 3 वायर लघुदाब वाहिनी गेलेली आहे. घटनास्‍थळी निरीक्षण केले असता दोन पोलमधील व वाहकादरम्‍यानचे उभे अंतर व्‍यवस्थित आढळून आले. तसेच वाहिनीवर कोठेही स्‍पार्कींगच्‍या खुणा आढळून आलेल्‍या नाहीत. परंतु सदर अपघात दि.13/11/2017 रोजी झाला व अपघाताची सूचना या कार्यालयास दि.5/2/2018 रोजी प्राप्‍त झाली व या कार्यालयामार्फत चौकशी दि.8/2/2018 रोजी करण्‍यात आली. त्‍यामुळे अपघातस्‍थळी परिस्थितीजन्‍य पुराव्‍याअभावी सदर अपघात कशामुळे घडला असावा, याबाबत निश्चित बोध होत नाही.

 

14.   उभयतांचा वाद-प्रतिवाद व दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारकर्ता यांचे ऊस पीक व ऊसामध्‍ये असणारा ठिबक सिंचन संच आगीमुळे जळाल्‍याची बाब स्‍पष्‍ट आहे. परंतु वादविषयाच्‍या अनुषंगाने तक्रारकर्ता यांच्‍या ऊस पिकास लागणा-या आगीचे कारण   काय ? हा प्रश्‍न निर्माण होतो.

 

15.   विद्युत निरीक्षकांच्‍या निष्‍कर्षानुसार अपघात दि.13/11/2017 रोजी झाल्‍यानंतर अपघाताची सूचना दि.5/2/2018 रोजी प्राप्‍त झाली आणि चौकशी दि.8/2/2018 रोजी करण्‍यात आली. परंतु परिस्थितीजन्‍य पुराव्‍याअभावी अपघातस्‍थळी अपघात घडण्‍याचा निश्चित बोध होत नाही, असा त्‍यांचा निष्‍कर्ष आहे. वास्‍तविक, अशा दुर्घटनाची चौकशी करण्‍यासाठी विद्युत निरिक्षक हे सक्षम व तज्ञ व्‍यक्‍ती आहेत. परंतु विद्युत निरीक्षकांना विलंबाने सूचना प्राप्‍त झाल्‍यामुळे अपघाताचे कारण निश्चित होऊ शकले नाही. असे दिसते की, विद्युत निरीक्षकांनी विरुध्‍द पक्ष क्र.2 यांना कारणे दाखल नोटीस पाठविलेली आहे आणि दी इंटीमेशन ऑफ अॅक्‍सीडेंट (फॉर्म अॅन्‍ड टाईप ऑफ सर्व्‍हीस ऑफ नोटीस) रुल्‍स, 2005 चे नियम क्र.2 नुसार अपघात तक्रारीची प्रथम सूचना संबंधीत घटना घडल्‍यापासून 24 तासाचे आत व माहिती नमुना फॉर्म 48 तासाचे आत त्‍यांच्‍या कार्यालयाकडे प्राप्‍त होणे आवश्‍यक आहे. त्‍या अनुषंगाने नियमाचे उल्‍लंघन केल्‍यामुळे जबाबदार का धरु नये, याबाबत खुलासा करण्‍याचे नमूद केले आहे.

 

16.   विरुध्‍द पक्ष यांचे कनिष्‍ठ अभियंता श्री. लक्ष्‍मण बाळू गायके यांनी दि.14/11/2017 रोजी पंच व त्‍यांच्‍या कर्मचा-यांच्‍या समक्ष घटनास्‍थळ पंचनामा केलेला आहे. दि.13/11/2017 रोजी ऊस जळीत दुर्घटना घडल्‍यानंतर दुस-या दिवशी त्‍यांनी प्रत्‍यक्ष पाहणी पंचनामा केल्‍याचे आढळते. त्‍यांच्‍या पाहणीमध्‍ये विद्युत तारामध्‍ये झोळ होता. तसेच दोन तारामधील अंतर हे अर्धा फुट अंतर होते आणि त्‍या दोन तारामध्‍ये स्‍पार्कींग होऊ शकते, असे त्‍यांनी नमूद केले. परंतु तारामध्‍ये स्‍पार्कींगमुळे आग लागल्‍याचे किंवा स्‍पार्कींगचे डॉट दिसून येत नाही, असेही त्‍यांनी नमूद केले.

 

17.   स्‍पार्कींगमुळे आग लागल्‍याचे किंवा स्‍पार्कींगचे तारांमध्‍ये डॉट दिसून येत नाही, असे पंचनाम्‍यामध्‍ये नमूद केले असले तरी प्रत्‍यक्ष घटनास्‍थळ पाहणी करताना कनिष्‍ठ अभियंता श्री. लक्ष्‍मण बाळू गायके यांनी छायाचित्रे घेतलेली नाहीत. तारांमध्‍ये घर्षण होऊन ठिणग्‍या पडण्‍याची क्रिया घडताना प्रत्‍येकवेळी तारांवर ठिणग्‍यांच्‍या खुणा निर्माण होतात, ही बाब कितपत ग्राह्य धरणे योग्‍य होईल. हे सत्‍य आहे की, कनिष्‍ठ अभियंत्‍यांनी प्रत्‍यक्ष घटनास्‍थळाची पाहणी केली आहे. त्‍यांच्‍या पाहणीमध्‍ये विद्युत तारांमध्‍ये झोळ दिसून आला. तसेच दोन तारांमधील अंतर अर्धा फुट होते आणि दोन तारांमध्‍ये स्‍पार्कींग होऊ शकते. परंतु घटनास्‍थळाच्‍या ठिकाणी असणा-या दोन विद्युत खांबामध्‍ये किती अंतर होते ? खांबावरील विद्युत प्रवाही तारांमध्‍ये किती अंतर होते ? याचे स्‍पष्‍टीकरण त्‍यांनी दिलेले नाही. दोन खांबातील अंतर व तारांमधील अंतर यासाठी कायद्याने कोणते निकष ठरवून दिलेले आहेत, याचाही ऊहापोह केलेला नाही. विद्युत तारांचा एकमेकांना स्‍पर्श न होण्‍यासाठी लाकडी काठी किंवा पी.व्‍ही.सी. पाईपचा वापर केलेला होता, असे पंचनाम्‍यामध्‍ये आढळत नाही. तसेच दुर्घटनेच्‍या दिवशी विद्युत रोहित्रामध्‍ये असणारे फ्युज जळाले काय किंव कसे ? हे आढळून येत नाही. पंचनाम्‍यामध्‍ये नमूद स्थितीप्रमाणे दोन तारांमध्‍ये झोळ असणे आणि तारांमध्‍ये अर्धा फुट अंतर असणे, ही बाब पाहता वादळवारा किंवा मोठ्या वा-यामुळे दोन तारा एकमेकांना स्‍पर्श होण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही आणि विद्युतप्रवाही तारा एकमेकांना स्‍पर्श झाल्‍यास ठिणग्‍या उडणे स्‍वाभाविक आहे.

 

18.   विरुध्‍द पक्ष यांचे असेही कथन नाही की, घटनास्‍थळी असणारी विद्युत वाहिनी, विद्युत खांबामधील अंतर, विद्युत तारामधील अंतर, विद्युत रोहित्र इ. हे नियमानुसार अस्तित्‍वात होते. विद्युत वितरण करण्‍यासाठी उभारलेले उपरी तारमार्ग, विद्युत खांब व विद्युत रोहित्र इ. संलग्‍न विद्युत संच मांडणीची वेळोवेळी आवश्‍यक देखभाल, दुरुस्‍ती व ते सुरक्षीत ठेवणे ही विरुध्‍द पक्ष यांची जबाबदारी आहे. विद्युत दुर्घटना घडते, तेव्‍हा मानवी चुका, निकृष्‍ठ देखभाल, विद्युत उपकरणांची चूक मांडणी, अप्रशिक्षीत कर्मचारी वर्ग, त्‍यांच्‍यातील समन्‍वय इ. कारणे असू शकतात.

 

19.   दोन खांबातील अंतर जास्‍त असल्‍यामुळे किंवा तारा ढिल्‍या असल्‍यामुळे विद्युत तारांमध्‍ये झोळ निर्माण होऊ शकतो. विद्युत प्रवाहीत तारा एकमेकांच्‍या संपर्कात आल्‍यानंतर आगीच्‍या ठिणग्‍या पडणे नैसर्गिक बाब आहे. ठिणग्‍यांच्‍या खुणा किंवा व्रण तारांवर आढळून आले नसले तरी दोन तारांतील झोळ व अंतर पाहता ऊस क्षेत्रामध्‍ये विद्युत तारांच्‍या घर्षणामुळे ठिणग्‍या पडून आग लागलेली आहे, अशी एकमेव शक्‍यता आहे. अभिलेखावर दाखल वर्तमानपत्राचे अवलोकन केले असता तक्रारकर्ता यांचे ऊस पीक जळाले, यास पुष्‍ठी मिळते. अंतिमत: तक्रारकर्ता यांचे ऊस पीक व ठिबक सिंचन संच जळीत घटनेमागे विद्युत तारांद्वारे निर्माण झालेल्‍या ठिणग्‍या कारणीभूत आहेत, असे जिल्‍हा आयोगाचे मत आहे. विद्युत तारांमुळे घडलेल्‍या अपघाताच्‍या अनुषंगाने विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्‍या सेवेमध्‍ये त्रुटी निर्माण केलेली आहे, या निष्‍कर्षाप्रत आम्‍ही येत आहोत. वरील विवेचनावरुन आम्‍ही मुद्दा क्र.2 चे उत्‍तर होकारार्थी देत आहोत.

 

20.   मुद्दा क्र. 3 :- तक्रारकर्ता यांनी जळीत ऊस पिकाकरिता प्रतिएकर 70 टन ऊस उत्‍पादन व प्रतिटन रु.2,200/- दरानुसार रु.4,62,000/- नुकसान भरपाई मिळावी, अशी विनंती केली आहे. तक्रारकर्ता यांचे कथन आहे की, ते रांजणी कारखान्‍याचे सभासद आहेत आणि त्‍यांची शेतजमीन व कारखाना यामध्‍ये 1 कि.मी. अंतर आहे. कारखान्‍याकडे केलेल्‍या ऊस नोंदीची पोहोच पावती अभिलेखावर दाखल आहे. तक्रारकर्ता यांचे गाळपासाठी परिपक्‍व ऊस पीक आगीमध्‍ये जळाल्‍यानंतर ते ऊस पीक साखर कारखान्‍याकडे गाळपासाठी नेले काय किंवा त्‍या जळीत ऊस पिकाची काय विल्‍हेवाट लावली, याचे स्‍पष्‍टीकरण दिलेले नाही. जळीत ऊस पीक हे 22 ते 23 कांडयाचे व परिपक्‍व असल्‍यामुळे साखर कारखाना असे जळीत ऊस प्राधान्‍याने गाळपासाठी नेते. हेही सत्‍य आहे की, जळीत ऊस पीक असल्‍यास त्‍यास काहीअंशी दर कमी मिळतो. परंतु तक्रारकर्ता यांनी त्‍यांचे जळीत ऊस पीक साखर कारखान्‍याने गाळपासाठी नेले किंवा नाही, याचा खुलासा केलेला नाही. अशी संदिग्‍धता असल्‍यामुळे योग्‍य विचाराअंती तक्रारकर्ता हे विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडून जळीत ऊस पिकासाठी रु.35,000/- नुकसान भरपाई मिळण्‍याकरिता पात्र आहेत, या निर्णयाप्रत आम्‍ही येत आहोत.

 

21.   तक्रारकर्ता यांच्‍या जळीत ठिबक सिंचन संचाकरिता नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे. पोलीस पंचनाम्‍यामध्‍ये ठिबक सिंचन जळाल्‍याचा उल्‍लेख आहे. तक्रारकर्ता यांनी दि.10/11/2016 रोजी रु.81,175/- किंमतीचे ठिबक सिंचन खरेदी केल्‍याची पावती दिसून येते. जळीत घटना दि.13/11/2017 रोजी घडलेली आहे. त्‍यावेळी 1 वर्ष ठिबक सिंचन संचाचा वापर झालेला होता. सर्वसाधारण ठिबक सिंचन संचाचे कमाल आयुष्‍य त्‍याच्‍या वापरानुसार ठरते. तक्रारकर्ता यांनी 1 वर्ष ठिबक संचाचा वापर केला असल्‍यामुळे त्‍याकरिता 10 टक्‍के घसारा ग्राह्य धरणे उचित आहे. त्‍याप्रमाणे रु. 8,118/- वजावट करता रु.73,057/- नुकसान झाले, असे आम्‍ही मानतो. वरील विवेचनावरुन तक्रारकर्ता  हे विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडून जळीत ऊस पीक व ठिबक सिंचन संचाकरिता एकूण रु.1,08,057/- नुकसान भरपाई मिळण्‍याकरिता पात्र आहेत.

 

22.   तक्रारकर्ता यांनी मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.50,000/- रकमेची मागणी केलेली आहे. नुकसान भरपाईची रक्‍कम ठरविताना काही गृहीत त्‍या–त्‍या परिस्थितीवर आधारीत असतात. असे दिसते की, तक्रारकर्ता हे व्‍यवसायाने शेतकरी आहेत. ऊस जळीत घटनेनंतर त्‍यांना मुख्‍य बागायती पिकापासून वंचित रहावे लागले. तक्रारकर्ता यांना स्‍वत:चे दैनंदीन व्‍यवहार बाजुला ठेवून पोलीस, महसूल, विद्युत महामंडळ इ. यंत्रणाकडे जावे लागले. तसेच नुकसान भरपाई मिळविण्‍याकरिता करावा लागलेला पाठपुरावा करावा लागलेला आहे. त्‍यामुळे तक्रारकर्ता यांना त्रास सहन करावा लागणे स्‍वाभाविक आहे. तक्रारकर्ता यांची रु.50,000/- नुकसान भरपाईची मागणी असली तरी योग्‍य विचाराअंती त्‍याकरिता तक्रारकर्ता  रु.5,000/- मिळण्‍यास पात्र आहेत.

 

23.   विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना नुकसान भरपाई न दिल्‍यामुळे तक्रारकर्ता यांना या जिल्‍हा आयोगापुढे प्रस्‍तुत तक्रार दाखल करणे भाग पडले. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्‍ला, सहायता, प्रकरण शुल्‍क इ. खर्चाच्‍या बाबी आहेत. तसेच ग्राहक तक्रार न्‍यायप्रविष्‍ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्‍यय होतो. योग्‍य विचाराअंती तक्रार खर्चाकरिता तक्रारकर्ता रु.3,000/- मिळण्‍यास पात्र आहेत, या निर्णयाप्रत आम्‍ही येत आहोत.

 

24.   ऊस लागवडीचा पूर्वमशागत खर्च, बेणे, नांगरण, मोगडणी, पाळी, खते इ. करिता रु.1,20,000/- रकमेची मागणी असंयुक्तिक आहे. कारण जे उत्‍पन्‍न किंवा नफा मिळणार असतो त्‍यामध्‍येच हे खर्च समाविष्‍ट असतात. तक्रारकर्ता यांना मिळणा-या उत्‍पन्‍नाच्‍या अनुषंगाने तक्रार निर्णयीत करण्‍यात येत असल्‍यामुळे वर नमूद खर्च विचारात घेता येणार नाहीत.

 

25.   वरील विवेचनावरुन मुद्दा क्र. 3 चे उत्‍तर होकारार्थी देऊन आम्‍ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.

 

आदेश

 

 

 

 

 

 

 

 

 

 

      1. विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 3 यांनी तक्रारकर्ता यांना जळीत ऊस पीक व जळीत ठिबक सिंचन संचाच्‍या नुकसान भरपाईपोटी रु.1,08,057/- द्यावेत.

      2. विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 3 यांनी तक्रारकर्ता यांना मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.5,000/- नुकसान भरपाई द्यावी.

3. विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 3 यांनी तक्रारकर्ता  यांना तक्रार खर्चापोटी रु.3,000/- द्यावेत.

        4. उपरोक्‍त आदेशाची अंमलबजावणी विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 3 यांनी आदेश प्राप्‍तीपासून 45 दिवसाचे आत करावी.

 

 

 

  (श्री. किशोर द. वडणे)      

(श्री. मुकुंद भ. सस्‍ते)               अध्‍यक्ष             (श्री. शशांक श. क्षीरसागर)

      सदस्‍य                                                 सदस्‍य

     जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, उस्‍मानाबाद.

    -oo-

 
 
[HON'BLE MR. किशोर द. वडणे]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. मुकुंद भ. सस्‍ते]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. शशांक श. क्षीरसागर]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.