जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 57/2020. तक्रार दाखल दिनांक : 26/02/2020. तक्रार निर्णय दिनांक : 24/05/2022.
कालावधी : 02 वर्षे 02 महिने 28 दिवस
अखिलेश पिता दिपक भुसागरे, वय 16 वर्षे, व्यवसाय : शिक्षण
(अज्ञान), अ.पा.क. पिता दिपक पिता नारायण भुसागरे,
वय 42 वर्षे, व्यवसाय : शेती, रा. लोहारा, ता. उदगीर, जि. लातूर.
ह.मु. विजय हॉस्टेलच्या बाजूस, खर्डेकर स्टॉप,
औसा रोड, लातूर, ता. जि. लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) संचालक, आकाश मेडीकल / आय.आय.टी. जे.ई.ई. / फाऊंडेशन
डिव्हीजन ऑफ आकाश एज्युकेशन सर्व्हीसेस लि., रजि. ऑफीस :
आकाश टॉवर - 8, पुसा रोड, नवी दिल्ली - 110 005.
(2) संचालक, फ्रेंचायसी शाखा, आकाश मेडीकल / आय.आय.टी. जे.ई.ई. /
फाऊंडेशन, कायमखानी इस्टेट, अंबाजोगाई रोड,
लातूर, ता. जि. लातूर - 413 512. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- सुधीर एन. गुरव
विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :- अनिल के. जवळकर
आदेश
मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांच्या तक्रारीचा आशय असा की, तक्रारकर्ता (यापुढे "अखिलेश") यांनी चाचणी परीक्षा उत्तीर्ण होऊन दि.17/6/2019 रोजी विरुध्द पक्ष क्र.2 यांच्या संस्थेमध्ये रु.70,000/- चा रोख भरणा करुन प्रवेश घेतला. त्यानंतर दि.17/9/2019 रोजी पुन्हा रु.27,217/- व दि.10/10/2019 रोजी रु.7,250/- रकमेचा भरणा केला. दोन वर्षाकरिता रु.1,98,240/- शुल्क होते आणि त्यांना शुल्क हप्त्यांमध्ये भरणा करण्याची सवलत देण्यात आलेली होती. तसेच चाचणी परीक्षेतील गुणामुळे अखिलेश यांच्या शुल्कामध्ये 10 टक्के सवलत देण्यात येणार होती.
(2) अखिलेश यांचे पुढे कथन आहे की, ते दि.24/6/2019 पासून विरुध्द पक्ष क्र.2 यांच्या संस्थेतून शिकवणी घेत असताना त्यांना विरुध्द पक्ष यांची शिकवण्याची पध्दत समजत नव्हती. शिकवण्याची पध्दती समजत नसल्यामुळे अखिलेश यांनी दि.30/9/2019 पासून शिकवणीस जाणे बंद केले. त्यानंतर अखिलेश यांच्या वडिलांनी दि.24/6/2019 ते 30/9/2019 या कालावधीमध्ये दिलेल्या शिकवणीचे शुल्क कपात करुन उर्वरीत रक्कम देण्याची विनंती केली असता दखल घेतलेली नाही. विरुध्द पक्ष यांना विधिज्ञांमार्फत सूचनापत्र पाठवूनही त्यांना रक्कम परत करण्यात आलेली नाही. उक्त वादकथनाच्या अनुषंगाने रु.1,04,967/- व्याजासह देण्याचा; शारीरिक व मानसकि त्रासाकरिता रु.50,000/- देण्याचा व तक्रार खर्चाकरिता रु.10,000/- देण्याचा विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केलेली आहे.
(3) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी लेखी निवेदनपत्र सादर केले आहे. त्यांच्या कथनानुसार तक्रारकर्ता त्यांचे "ग्राहक" नाहीत. तसेच तक्रार मुदतबाह्य असून ग्राहक तक्रार दाखल करण्याकरिता जिल्हा आयेाग, लातूर यांना प्रादेशिक कार्यक्षेत्र नाही. ग्राहक तक्रारीमध्ये नमूद बहुतांश मजकूर विरुध्द पक्ष यांनी अमान्य केला आहे.
(4) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांचे पुढे निवेदन आहे की, अखिलेश यांच्या शिकवणीकरिता एकूण रु.1,04,967/- शुल्क भरणा करण्यात आले. अखिलेश हे दि.14/11/2019 पर्यंत त्यांच्याकडे शिकवणीसाठी येत होते. त्यानंतर दुस-या शिकवणीस जाण्याचे सांगून दि.14/11/2019 रोजी अर्ज केला. तसेच अखिलेश यांच्या वडिलांनी दि.15/11/2019 रोजी शिक्षण शुल्क परत मिळण्यासाठी अर्ज केला. नोंदणी शुल्क व प्रवेश शुल्क हे अदेय आहेत. त्यांचा कर्मचारी वर्ग तज्ञ आहे. उलट, अशिलेख यांचे इंग्रजी ज्ञान कच्चे होते.
(5) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांचे पुढे निवेदन आहे की, नोंदणी शुल्क व प्रवेश शुल्क वजावट करुन व उपस्थित राहिलेल्या तासिकेकरिता रक्कम वजावट करुन उर्वरीत रु.15,395/- परत करण्याचे निश्चित केले. त्या अनुषंगाने रु.15,395/- स्वीकारण्याचा तक्रारकर्ता यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती केलेली आहे.
(6) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, विरुध्द पक्ष यांचे लेखी निवेदनपत्र, उभय पक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच उभय पक्षांतर्फे विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वादमुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी
केल्याचे सिध्द होते काय ? होय.
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? होय.
असल्यास किती ? अंतिम आदेशाप्रमाणे
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(7) मुद्दा क्र. 1 ते 3 :- अखिलेश यांनी दि.17/6/2019 रोजी विरुध्द पक्ष क्र.2 संस्थेमध्ये शिकवणी वर्गासाठी प्रवेश घेतलेला होता, ही बाब विवादीत नाही. अखिलेश यांच्या शिकवणी वर्गाकरिता रु.1,04,967/- भरणा करण्यात आले, ही बाब विवादीत नाही. अखिलेश यांनी पाठ्यक्रम पूर्ण न करता मध्यंतरी विरुध्द पक्ष क्र.2 यांच्या शिकवणीचे वर्ग बंद केले, ही बाब विवादीत नाही.
(8) उभयतांमध्ये मुख्य वादाचा मुद्दा हा शिकवणी वर्गाकरिता भरणा केलेले शुल्क परत मिळण्याकरिता आहे. तक्रारकर्ता यांच्या कथनानुसार त्यांना रु.1,04,967/- व्याजासह परत मिळावयास पाहिजे. उलटपक्षी, विरुध्द पक्ष यांच्या प्रतिवादानुसार तक्रारकर्ता हे रु.15,395/- परत मिळण्यास पात्र आहेत.
(9) शिकवणी वर्गाकरिता अखिलेश व त्यांचे वडिलांची स्वाक्षरी असणारे अटी व शर्तीचे पत्रक अभिलेखावर दाखल आहे. शुल्क परतावा धोरणानुसार नोंदणी शुल्क व प्रवेश शुल्क हे 30 दिवसानंतर देय नाहीत. परंतु शिक्षण शुल्क हे 30 दिवसानंतर परत करावयाचे असल्यास शिक्षण घेतल्याच्या दिवसाप्रमाणे हिश्शेवारी प्रमाणामध्ये देय आहेत.
(10) निर्विवादपणे, अखिलेश यांनी दि.24/6/2019 पासून शिकवणी वर्गास जाण्यासाठी सुरुवात केली. अखिलेश यांच्या कथनानुसार त्यांनी दि.30/9/2019 पासून शिकवणी वर्गास जाणे बंद केले. परंतु विरुध्द पक्ष यांच्या प्रतिवादानुसार अखिलेश हे दि.14/11/2019 पर्यंत शिकवणीसाठी येत होते आणि त्यांच्या वडिलांनी दि.15/11/2019 रोजी शिक्षण शुल्क परत मिळण्यासाठी अर्ज केला. अभिलेखावर दाखल असणा-या Application for Withdrawal, Withdrawal Format व अखिलेश यांचा दि.15/11/2019 रोजीचा हस्तलिखीत अर्ज पाहता दि.15/11/2019 पासून शिकवणी वर्ग बंद केल्याचे निदर्शनास येते. त्याप्रमाणे अखिलेश हे 4 महिने 22 दिवस शिकवणी वर्गास उपस्थित होते.
(11) शिकवणी वर्गाचा एकूण कालावधी 599 दिवस आहे. एकूण पाठ्यक्रम शुल्क रु.1,98,240/- आहेत. Request for Fee Refund प्रपत्रामध्ये Date of Commencement of Course : 1st Term : 21/6/2019 व 2nd Term : 1/3/2020 असल्याचे निदर्शनास येते. अखिलेश यांची शिकवणी वर्गास 144 दिवस उपस्थिती होती. अखिलेश हे 599 पैकी 144 दिवस शिकवणी वर्गास उपस्थित असल्यामुळे अटी व शर्तीच्या पत्रकानुसार हिश्शेवारी प्रमाणानुसार उर्वरीत शुल्क परत मिळण्यास पात्र ठरतात.
(12) असे दिसते की, एकूण पाठ्यक्रम शुल्क रु.1,98,240/- आहेत आणि त्यापैकी नोंदणी व प्रवेश शुल्क वजावट केले असता रु.1,54,580/- शिक्षण शुल्क येतात. 599 दिवसाकरिता रु.1,54,580/- शिक्षण शुल्क असल्यामुळे हस्सेवारी प्रमाणाच्या दृष्टीने 144 दिवसाच्या शिकवणीकरिता रु.37,152/- शुल्क आकारणी होऊ शकतात. नोंदणी शुल्क रु.17,700/-, प्रवेश शुल्क रु.25,960/- व शिक्षण शुल्क रु.37,152/- याप्रमाणे रु.80,812/- रक्कम अखिलेश यांनी भरणा केलेल्या एकूण रु.1,04,967/- मधून वजावट केली असता रु.24,155/- मिळण्याकरिता तक्रारकर्ता हे पात्र आहेत. त्यामुळे तक्रारकर्ता हे रु.15,395/- मिळण्यास पात्र असल्याचा विरुध्द पक्ष यांचा बचाव मान्य करता येणार नाही. तसेच विरुध्द पक्ष यांनी हिस्सेवारी प्रमाणाबाबत विश्लेषण दिलेले नाही. अशा स्थितीमध्ये विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होते आणि वर नमूद केल्याप्रमाणे रु.24,155/- मिळण्याकरिता तक्रारकर्ता पात्र ठरतात.
(13) तक्रारकर्ता यांनी शिक्षण शुल्क रक्कम द.सा.द.शे. 15 टक्के व्याज दराने मागणी केलेली आहे. प्रकरणाची वस्तुस्थिती विचारात घेऊन दि.15/11/2019 पासून द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज देण्याकरिता विरुध्द पक्ष यांना आदेश करणे न्यायोचित राहील, या निष्कर्षाप्रत आम्ही येत आहोत.
(14) तक्रारकर्ता यांनी मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.50,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.10,000/- रकमेची मागणी केलेली आहे. नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करताना त्या–त्या परिस्थितीवर गृहीतक आधारीत असतात. असे दिसते की, तक्रारकर्ता यांना शिक्षण शुल्क परत मिळविण्याकरिता पाठपुरावा करावा लागलेला आहे. त्यामुळे तक्रारकर्ता यांना मानसिक व शारीरिक त्रास होणे नैसर्गिक व स्वाभाविक आहे. तसेच विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना योग्य रक्कम परत न केल्यामुळे जिल्हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले, ही बाब स्पष्ट आहे. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्ला व सहायता, प्रकरण शुल्क इ. खर्चाच्या बाबी आहेत. तसेच ग्राहक तक्रार न्यायप्रविष्ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो. योग्य विचाराअंती मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.5,000/- व तक्रार खर्चाकरिता एकत्रिरित्या रु.3,000/- मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत जिल्हा आयोग येत आहोत.
(15) उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार अशंत: मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारकर्ता यांना रु.24,155/- परत करावेत.
ग्राहक तक्रार क्र. 57/2020.
(3) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारकर्ता यांना रु.24,155/- रकमेवर दि.15/11/2019 पासून रक्कम अदा करेपर्यत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज द्यावे.
(4) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारकर्ता यांना शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.5,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- द्यावेत.
(5) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत करावी.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-
(संविक/स्व/17522)