जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 203/2020. आदेश दि. 23/05/2022.
अजयकुमार बब्रुवान माकणे, वय 38 वर्षे, व्यवासाय : व्यापार,
रा. औराद शहाजनी, ता. निलंगा, जि. लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) शाखाधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया,
शाखा औराद शहाजनी, ता. निलंगा, जि. लातूर.
(2) शाम वाघमारे, (अधिकृत अधिकारी)
स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा कोड क्र. 62929,
आर. ॲन्ड डी.बी., आरएसीसी, उस्मानाबाद. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- विनोद एम. गोमसाळे
आदेश
मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)यांचे द्वारा :-
(1) प्रस्तुत प्रकरण दाखलपूर्व युक्तिवादासाठी प्रलंबीत आहे. अनेक तारखांना तक्रारकर्ता व त्यांचे विधिज्ञ अनुपस्थित राहिले. युक्तिवादाकरिता तक्रारकर्ता यांना उचित संधी देण्यात आली. दि.18/5/2022 रोजी त्यांच्या मौखिक विनंतीनंतर अंतीम संधी देण्यात आली. आज दि.23/5/2022 रोजी तक्रारकर्ता व विधिज्ञ अनुपस्थित राहिले.
(2) ग्राहक तक्रार व कागदपत्रांचे अवलोकन करण्यात आले. तक्रारकर्ता यांचे वादकथन असे आहे की, विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडून त्यांनी हॉटेल व्यवसायाकरिता दि.22/11/2017 रोजी रु.20,00,000/- कर्ज घेतले आहे. त्यांचे कर्ज अनुत्पादक मालमत्ता ठरल्याच्या कारणास्तव विरुध्द पक्ष यांनी सरफासी ॲक्ट अंतर्गत सूचनापत्र पाठवून रु.17,57,664/- चा भरणा करण्याचे कळविले. तक्रारकर्ता यांचे कथन आहे की, त्यांचे कर्ज अनुत्पादक मालमत्ता झालेले नाही. अशाप्रकारे विरुध्द पक्ष यांनी त्यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी केल्यामुळे नुकसान भरपाई व तक्रार खर्च मिळण्याकरिता प्रस्तुत ग्राहक तक्रार दाखल केलेली आहे.
(3) असे निदर्शनास येते की, विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्ता यांच्याविरुध्द Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 चे कलम 13 (2) अन्वये सूचनापत्र पाठविलेले आहे. तक्रारकर्ता यांच्या वादकथनाच्या अनुषंगाने दखल घेतली असता तक्रारकर्ता यांचे कर्ज अनुत्पादक मालमत्ता ठरले नाही, असे दर्शविणारा उचित पुरावा अभिलेखावर दाखल केलेला नाही. उक्त विवेचनाअंती खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार रद्द करण्यात येते.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-