जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 118/2021. आदेश दिनांक : 10/03/2022.
प्रमोद पिता शिवलिंग जवादे, वय 38 वर्षे, व्यवसाय : व्यापार,
रा. उटगे नगर, मुक्तेश्वर रोड, औसा, ता. औसा, जि. लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) शाखा व्यवस्थापक, एम.एस.ई.बी. कार्यालय, औसा, ता. औसा, जि. लातूर.
(2) एम.एस.ई.बी. कार्यकारी अभियंता, निलंगा, ता. निलंगा, जि. लातूर.
(3) अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी डिस्ट्रीब्युशन कं.लि.,
साळे गल्ली, लातूर, ता. व जि. लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- एम.एम. कुर्ले
नि. क्र.1 वर आदेश
मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)यांचे द्वारा :-
(1) विरुध्द पक्ष यांच्याकडून जळीत धान्य व साहित्याची नुकसान भरपाई मिळण्याकरिता तक्रारकर्ता यांनी प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे.
(2) तक्रारकर्ता यांना ग्राहक तक्रारीमध्ये दाखलपूर्व युक्तिवादासाठी वेळोवेळी उचित संधी दिलेली आहे. असे निदर्शनास येते की, मागील अनेक तारखांना तक्रारकर्ता व त्यांचे विधिज्ञ अनुपस्थित आहेत.
(3) विद्युत वाहिनीची तार उद्योग केंद्रावर पडल्यामुळे ठिणग्या निर्माण होऊन ज्वारी, सोयाबीन, हरभरा, तुर, पत्रा शेड, शेती बारदाना जळाल्याचे तक्रारकर्ता यांनी नमूद केलेले आहे. त्या अनुषंगाने दखल घेऊन अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारकर्ता हे विरुध्द पक्ष यांचे 'ग्राहक' आहेत काय ? हा मुद्दा विचारार्थ उपस्थित होतो. असे निदर्शनास येते की, तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून विद्युत जोडणी घेतल्याबद्दल उचित पुरावा सादर केलेला नाही. तसेच ग्राहक तक्रारीमध्ये ग्राहक क्रमांक किंवा विद्युत मीटर क्रमांक नमूद नाही.
(4) सकृतदर्शनी, तक्रारकर्ता हे विरुध्द पक्ष यांच्याकडून विद्युत जोडणी घेऊन विद्युत वापर करीत असल्याचे सिध्द होत नाही. तक्रारकर्ता हे ग्राहक संरक्षण अधिनियम, 2019 चे कलम 2(7) अन्वये ‘ग्राहक’ संज्ञेच्या कक्षेमध्ये येत नाहीत. त्या अनुषंगाने तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार दाखल करुन घेण्यास पात्र नाही आणि ग्राहक तक्रार रद्द करण्यात येते.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-
(संविक/स्व/10322)