जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 128/2020. तक्रार दाखल दिनांक : 21/09/2020. तक्रार निर्णय दिनांक : 23/05/2022.
कालावधी : 01 वर्षे 08 महिने 02 दिवस
सदानंद पि. रामकिशन नरहरे, वय 45 वर्षे, व्यवसाय : नोकरी,
रा. पंचायत समिती, निलंगा, ता. निलंगा, जि. लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) शाखा व्यवस्थापक, महाराष्ट्र ग्रामीण बँक,
शाखा : कासार बालकुंदा, ता. निलंगा, जि. लातूर.
(2) शाखा व्यवस्थापक, स्टेट बँक ऑफ इंडिया,
शाखा : टिळक नगर, मेन रोड, लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- ए.एम.के. पटेल
विरुध्द पक्ष क्र.1 यांचेकरिता विधिज्ञ :- सुजयकुमार बी. देशमुख
विरुध्द पक्ष क्र.2 अनुपस्थित / एकतर्फा
आदेश
मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी आहे की, त्यांचे विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडे बचत खाते असून त्याचा क्रमांक 80043418874 आहे. आर्थिक व्यवहाराकरिता त्यांनी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडून ए.टी.एम. कार्ड घेतले. विरुध्द पक्ष क्र.1 हे विरुध्द पक्ष क्र.2 यांच्या अंतर्गत कार्य करतात.
(2) तक्रारकर्ता यांचे पुढे कथन आहे की, दि.17/6/2020 रोजी दुपारी 2.09 वाजता विरुध्द पक्ष क्र.2 यांच्या ए.टी.एम. सेंटरमध्ये रु.10,000/- काढण्याकरिता त्यांनी ए.टी.एम. मशीनमध्ये पूर्ण प्रक्रिया केली. त्यावेळी तक्रारकर्ता यांना रक्कम प्राप्त झाली नाही; मात्र रु.10,000/- कपात केल्याचा संदेश प्राप्त झाला. तक्रारकर्ता यांनी शिल्लक तपासून व विवरणपत्र काढून खात्री केली असता रु.10,000/- वजावट झाल्याचे निदर्शनास आले. तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्र.1 यांना घटनेबाबत सूचित केले असता 7 दिवसामध्ये रक्कम जमा होईल, असे सांगण्यात आले. त्यानंतर मौखिक व लेखी पाठपुरावा करुनही त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात आली नाही. तसेच तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्या सूचनेप्रमाणे खात्यामध्ये रु.590/-भरणा केले. तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांच्या संकेतस्थळावर तक्रार केली; परंतु दखल घेण्यात आली नाही. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी निर्माण केली आहे. अंतिमत: रु.10,000/- रकमेवर प्रतिदिन रु.100/- याप्रमाणे नुकसान भरपाई देण्याचा; रु.25,000/- नुकसान भरपाई देण्याचा; मानसिक त्रासाकरिता रु.10,000/- देण्याचा व तक्रार खर्चाकरिता रु.5,000/- देण्याचा विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना आदेश करण्यात यावा, अशी तक्रारकर्ता यांनी विनंती केली आहे.
(3) विरुध्द पक्ष क्र.1 यांनी लेखी निवेदनपत्र दाखल केले असून ग्राहक तक्रारीतील बहुतांश मजकूर चूक असल्याच्या कारणास्तव अमान्य केलेला आहे. त्यांचे कथन आहे की, दि.1/7/2020 रोजी त्यांनी पोर्टल प्रणालीद्वारे प्राथमिक तक्रार नोंदवून तक्रारकर्ता यांच्या प्रकरणाबाबत विरुध्द पक्ष क्र.2 यांना कळविले होते. मात्र विरुध्द पक्ष क्र.2 यांनी ते नामंजूर केले. त्यानंतर दि.7/7/2020 रोजी पुन्हा विरुध्द पक्ष क्र.2 यांना पोर्टल प्रणालीद्वारे द्वितीय तक्रार नोंदवून तक्रारकर्ता यांच्या तक्रारीबाबत कळविले असता पैसे काढल्याचा व्यवहार पूर्ण झाल्याचे सांगून विरुध्द पक्ष क्र.2 यांनी तक्रार नामंजूर केली. त्यांनी तक्रारकर्ता यांना पूर्ण सहकार्य केले आहे आणि त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नाही. अंतिमत: ग्राहक तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी, अशी विनंती केलेली आहे.
(4) विरुध्द पक्ष क्र.2 यांना सूचनापत्र प्राप्त होऊनही ते अनुपस्थित राहिले आणि लेखी निवेदनपत्र सादर केले नाही. त्यामुळे त्यांच्याविरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात आले.
(5) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, विरुध्द पक्ष क्र.1 यांचे लेखी निवेदनपत्र, उभय पक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच उभय पक्षांतर्फे विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वादमुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी
केल्याचे सिध्द होते काय ? होय.
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? होय.
असल्यास किती ? अंतिम आदेशाप्रमाणे
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(6) मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारकर्ता यांचे विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडे बचत खाते असून त्याचा क्रमांक 80043418874 आहे आणि त्यांनी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडून ए.टी.एम. कार्ड घेतले आहे, ही बाब विवादीत नाही.
(7) दि.17/6/2020 रोजी दुपारी 2.09 वाजता विरुध्द पक्ष क्र.2 यांच्या ए.टी.एम. सेंटरमध्ये रु.10,000/- काढण्याकरिता तक्रारकर्ता यांनी ए.टी.एम. मशीनमध्ये पूर्ण प्रक्रिया केली, ही बाब विवादीत नाही. तक्रारकर्ता यांचे कथन आहे की, त्यांना ए.टी.एम. मधून रक्कम प्राप्त झाली नाही; मात्र रु.10,000/- कपात केल्याचा संदेश प्राप्त झाला. त्यांनी पाठपुरावा करुनही विरुध्द पक्ष यांनी त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा केलेली नाही. उलटपक्षी, विरुध्द पक्ष क्र.1 यांच्या प्रतिवादानुसार विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडे पोर्टल प्रणालीन्वये तक्रारकर्ता यांच्या प्रकरणाबाबत कळविले असता ते नामंजूर केले.
(8) निर्विवादपणे, ए.टी.एम. मशीनद्वारे होणा-या व्यवहाराचा पाया कोअर बँकिंग यंत्रणेवर उभारलेला आहे. कोअर बँकिंग यंत्रणेत ग्राहकांचे खाते केंद्रीय महासंगणकावर जोडलेली असतात. विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याद्वारे पुरविलेल्या ए.टी.एम. कार्डचा विरुध्द पक्ष क्र.2 यांच्या ए.टी.एम. मशीनमध्ये वापर केला, हे स्पष्ट आहे. ए.टी.एम. द्वारे रक्कम काढण्यासाठी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर रु.10,000/- प्राप्त झाले नाहीत. तक्रारकर्ता यांच्या खात्यातून कपात झालेले रु.10,000/- पुनश्च: त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले नाहीत. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी बचावापृष्ठयर्थ विरुध्द पक्ष क्र.2 यांना दि.1/7/2020 व दि.7/7/2020 रोजी पोर्टल प्रणालीद्वारे कळविल्यासंबंधी पुरावा दाखल केलेला नाही. तसेच विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्ता यांची कपात झालेली रक्कम परत करण्यासाठी उचित प्रयत्न केल्याचे आढळून येत नाही.
(9) तक्रारकर्ता यांनी भारतीय रिझर्व बँकेच्या परिपत्रक क्रमांक RBI/2019-20/67, DPSS.CO.PD No.629/02.01.014/2019-20, दि.20 सप्टेंबर, 2019 चा आधार घेतला आहे. त्याचे अवलोकन केले असता अयशस्वी व्यवहार पुन:स्थापित करण्यासाठी कमाल 5 दिवसाचा अवधी दिसून येतो. तसेच 5 दिवसानंतर प्रतिदिन रु.100/- नुकसान भरपाई देय आहे.
(10) तक्रारकर्ता यांचे विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडे खाते नसले तरी त्यांनी विरुध्द पक्ष क्र.2 यांच्या ए.टी.एम. मशीनद्वारे सेवा घेतल्याचे दिसून येते. ए.टी.एम. मशीनच्या वापराबाबत व झालेल्या व्यवहाराबाबत विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडे कथित दिवसाच्या नोंदी उपलब्ध असल्यामुळे त्यासंबंधी पुरावा दाखल करण्याची संधी होती. परंतु विरुध्द पक्ष क्र.2 यांनी जिल्हा आयोगापुढे उपस्थित राहून लेखी निवेदनपत्र सादर केले नाही आणि तक्रारकर्ता यांची वादकथने व पुराव्यांचे खंडन केले नाही. अशा स्थितीत तक्रारकर्ता यांच्या वादकथने व त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांस आव्हानात्मक निवेदन व विरोधी पुरावा उपलब्ध दाखल केला नसल्यामुळे तक्रारीतील वादकथने व तक्रारीपृष्ठयर्थ दाखल कागदपत्रे विरुध्द पक्ष क्र.2 यांना मान्य आहेत, असे अनुमान काढणे न्यायोचित वाटते.
(11) उक्त विवेचनाअंती तक्रारकर्ता यांच्या खात्यातून कपात झालेली रक्कम पुनश्च: खात्यामध्ये जमा करण्यासाठी विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी उचित प्रयत्न केलेला नाही, हे सिध्द होते. त्या अनुषंगाने विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्ता यांना सेवा देण्यामध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होते आणि तक्रारकर्ता हे विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांच्याकडून रु.10,000/- रकमेसह रक्कम मिळेपर्यंत प्रतिदिन रु.100/- नुकसान भरपाई मिळण्यास पात्र ठरतात.
(12) तक्रारकर्ता यांनी मानसिक त्रासाकरिता रु.10,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.5,000/- रकमेची मागणी केलेली आहे. नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करताना त्या–त्या परिस्थितीवर गृहीतक आधारीत असतात. असे दिसते की, तक्रारकर्ता यांना रक्कम मिळविण्याकरिता पाठपुरावा करावा लागलेला आहे. त्यामुळे तक्रारकर्ता यांना मानसिक त्रास होणे नैसर्गिक व स्वाभाविक आहे. तसेच विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना रक्कम परत न केल्यामुळे जिल्हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले, ही बाब स्पष्ट आहे. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्ला व सहायता, प्रकरण शुल्क इ. खर्चाच्या बाबी आहेत. तसेच ग्राहक तक्रार न्यायप्रविष्ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो. योग्य विचाराअंती मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.5,000/- व तक्रार खर्चाकरिता एकत्रिरित्या रु.3,000/- मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत जिल्हा आयोग येत आहोत.
(13) उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार अशंत: मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारकर्ता यांना रु.10,000/- परत करावेत.
(3) उक्त आदेश क्र.2 चे अनुपालन करेपर्यंत विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारकर्ता यांना दि.23/6/2020 पासून प्रतिदिन रु.100/- याप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी.
(4) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारकर्ता यांना मानसिक त्रासापोटी रु.5,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- द्यावेत.
(5) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत करावी.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-