जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 28/2019. तक्रार दाखल दिनांक : 06/02/2019 तक्रार निर्णय दिनांक : 20/12/2021.
कालावधी : 02 वर्षे 10 महिने 14 दिवस
संजय पि. लक्ष्मण बंडगर, वय 35 वर्षे,
व्यवसाय : शेती, रा. चिखुर्डा, ता. जि. लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) शाखा व्यवस्थापक, बजाज फायनान्स कंपनी,
बार्शी रोड, लातूर.
(2) शाखा व्यवस्थापक, स्टेट बँक ऑफ इंडिया, चंद्र नगर,
लातूर. (जुनी स्टेट बँक ऑफ हैद्राबाद.) विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्री. कमलाकर अ. कोठेकर, अध्यक्ष
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
मा. श्रीमती रेखा जाधव, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- एन.बी. काळे
विरुध्द पक्ष क्र.1 यांचेकरिता विधिज्ञ :- ए.आर. बाहेती
न्यायनिर्णय
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांच्या ग्राहक तक्रारीचा आशय असा आहे की, त्यांनी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडून मासिक हप्त्यावर सॅमसंग कंपनीचा फ्रिज खरेदी केला. रु.19,350/- करिता मासिक 10 हप्त्याप्रमाणे करार क्र.37793499 दि.9/9/2016 करण्यात आला. सुरुवातीचा 1 हप्ता आगाऊ अनामत भरणा करुन विरुध्द पक्ष क्र.2 बँकेचे एकूण 9 धनादेश क्र.333275 ते 333283 दिले. मासिक हप्त्यांची परतफेड करताना शेवटचा हप्ता दि.5/6/2017 रोजी भरणा करता आला नाही. परंतु दि.19/6/2017 रोजी त्यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे पावती क्र.64356 नुसार रोखीने हप्ता रक्कम भरणा केली. त्यानंतर तक्रारकर्ता यांनी त्यांचा न वटता परत आलेला धनादेश क्र.333283 परत देण्याची विनंती केली असता तो मुख्यालयात असल्यामुळे परत मागविण्यास वेळ लागेल, असे सांगण्यात आले. धनादेश परत मिळण्याकरिता तक्रारकर्ता पाठपुरावा करीत असताना विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तो धनादेश वटवून रु.2,012/- खात्यावर वळती करुन घेतल्याचा दि.4/1/2018 रोजी भ्रमनध्वनी संदेश प्राप्त झाला. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी बेकायदेशीरपणे रक्कम वळती करुन सेवेमध्ये त्रुटी निर्माण केलेली आहे. उपरोक्त वादकथनाच्या अनुषंगाने रु.2,012/- व्याजासह परत करण्याचा, नुकसानीबद्दल रु.15,000/- देण्याचा, मानसिक त्रासाकरिता रु.10,000/- व आर्थिक त्रासाकरिता रु.10,000/- देण्याचा विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केली आहे.
(2) विरुध्द पक्ष क्र.1 यांनी लेखी निवेदनपत्र दाखल केले असून त्यांनी तक्रारीतील कथने अमान्य केली आहेत. त्यांचे कथन आहे की, तक्रारकर्ता यांनी अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी केलेल्या सॅमसंग रेफ्रिजरेटर व ग्रामीण वैयक्तिक अपघात विम्याकरिता विरुध्द पक्ष क्र.1 यांनी कर्ज दिलेले होते. त्याचा अनुक्रमे कर्ज खाते क्र. 530RCD27308777 व 530RPA27308807 होता. दोन्ही कर्जाचे एकूण मासिक हप्ता रु.2,012/- याप्रमाणे 10 हप्ते महिन्याच्या 5 तारखेस भरणा करावयाचे होते आणि त्याकरिता तक्रारकर्ता यांनी धनादेश क्र.333275 ते 333283 दिलेले होते. त्यापैकी 9 हप्त्याचा धनादेश क्र. 333283 हा अपु-या शिल्लक रकमेमुळे न वटता परत आला. तक्रारकर्ता यांनी हप्ता रोखीने भरला असला तरी विरुध्द पक्ष क्र.1 यांनी धनादेश अनादरीत शुल्क व विलंब शुल्क भरले नाहीत आणि खाते विवरणपत्रामध्ये रु.413/- थकीत दर्शवले. जानेवारी 2018 मध्ये तक्रारकर्ता यांच्या खात्यातून त्यांनी रु.2,012/- कपात करुन घेतल्याचे कथन खोटे असल्याचे नमूद केले आहे. ते पुढे कथन करतात की, धनादेश क्र.333283 हा दि.5/6/2017 रोजी निर्गमीत केला असल्यामुळे तो जानेवारी 2018 मध्ये वटणे शक्य नाही. तक्रारकर्ता यांनी खुलासा होण्याकरिता त्यांच्याकडे संपर्क साधलेला नाही. तक्रारकर्ता यांची तक्रार खोटी असल्यामुळे रद्द करण्यात यावी आणि देय रक्कम रु.413/- देण्याचा तक्रारकर्ता यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती विरुध्द पक्ष क्र.1 यांनी केलेली आहे.
(3) विरुध्द पक्ष क्र.2 यांना सूचनापत्र बजावणीसाठी आवश्यक कार्यवाही न केल्यामुळे त्यांच्याविरुध्द तक्रार रद्द करण्याचे जिल्हा आयोगाने आदेश केलेले आहेत.
(4) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, विरुध्द पक्ष क्र.1 यांचे लेखी निवेदनपत्र, अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे निश्चित करण्यात येऊन कारणमीमांसेसह जिल्हा आयोग पुढीलप्रमाणे निर्णय देत आहे.
मुद्दे उत्तर
1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये
त्रुटी केल्याचे सिध्द होते काय ? होय
2. तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? होय; अंशत:
3. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(5) मुद्दा क्र. 1 ते 3 :- प्रामुख्याने, तक्रारकर्ता यांनी खरेदी केलेल्या सॅमसंग रेफ्रिजरेटरसाठी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडून कर्ज घेतल्याचे व कर्ज परतफेडीकरिता त्यांनी विरुध्द पक्ष क्र.2 बँकेचे धनादेश दिल्याची बाब विवादीत नाही. त्यापैकी धनादेश क्र. 333283 अपु-या शिल्लक रकमेमुळे न वटता परत आला, ही बाब विवादीत नाही. त्यानंतर थकीत हप्त्याची रक्कम तक्रारकर्ता यांनी रोख स्वरुपात भरणा केली, ही बाब विवादीत नाही.
(6) प्रश्न उपस्थित होतो की, थकीत हत्याची रोख रक्कम भरणा केल्यानंतरही विरुध्द पक्ष क्र.1 यांनी धनादेश क्र. 333283 वटविला काय किंवा कसे ? तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्र.1 यांना दिलेला धनादेश क्र.333283 हा दि.4/1/2018 रोजी वटल्याचे तक्रारकर्ता यांच्या बँक पासबुक नोंदीवरुन निदर्शनास येते. विरुध्द पक्ष क्र.1 यांचे कथन आहे की, धनादेश क्र.333283 दि.5/6/2017 रोजी निर्गमीत केला असल्यामुळे तो जानेवारी 2018 मध्ये वटणे शक्य नाही. असे असतानाही तो धनादेश वटलेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. वास्तविक, तक्रारकर्ता यांनी थकीत हप्त्याची रक्कम रोख स्वरुपात भरणा केल्यानंतर त्या हप्त्याकरिता स्वीकारलेला व अनादरीत झालेला धनादेश तक्रारकर्ता यांना परत केला किंवा कसे, याचा उचित स्पष्टीकरण विरुध्द पक्ष क्र.1 यांनी दिलेले नाही. तक्रारकर्ता यांच्याकडून धनादेश अनादरीत शुल्क व विलंब शुल्क रु.413/- थकीत असल्याचे विरुध्द पक्ष क्र.1 यांचे कथन आहे. वास्तविक, तक्रारकर्ता यांच्याकडे असणा-या थकीत रकमेकरिता योग्य कायदेशीर कार्यवाही करण्याचा त्यांना अधिकार आहे. या ठिकाणी थकीत रकमेच्या वसुलीकरिता धनादेश क्र.333283 परत केला नाही, असेही विरुध्द पक्ष क्र.1 यांचे कथन नाही. तक्रारकर्ता यांनी धनादेश क्र.333283 परत मिळण्याकरिता विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडे पत्रव्यवहार केलेला दिसून येतो. परंतु विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्ता यांना धनादेश क्र.333283 परत केला, हे सिध्द होत नाही.
(7) हे सत्य आहे की, धनादेश क्र.333283 वटल्यामुळे तक्रारकर्ता यांच्या खात्यातून दि.4/1/2018 रोजी रु.2,012/- कपात झाले. असेही निदर्शनास येते की, विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्ता यांना धनादेश क्र.333283 परत केलेला नव्हता. धनादेशाची 3 महिन्याची मुदत असताना मुदतीनंतर तो कसा वटला, हा विवाद येथे नसून तो धनादेश विरुध्द पक्ष क्र.1 यांच्या ताब्यात असताना व संबंधीत हप्त्याची परतफेड झालेली असताना तो धनादेश बँकेमध्ये कसा वटविण्यासाठी पाठविण्यात आला, हा मुद्दा महत्वाचा आहे. जिल्हा आयोगाच्या मते, धनादेश क्र.333283 तक्रारकर्ता यांना परत केला असता तर तो धनादेश वटण्याचा प्रश्न निर्माण झाला नसता. परंतु विरुध्द पक्ष क्र.1 यांनी त्यांच्या ताब्यातील धनादेश तक्रारकर्ता यांना परत न केल्यामुळे तो पुन्हा बँकेमध्ये वटविण्यासाठी गेला. अशाप्रकारे विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी निर्माण केल्याचे सिध्द होते. त्या अनुषंगाने निर्माण होणा-या परिणामाची जबाबदारी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्यावर येते आणि विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्ता यांना रु.2,012/- अदा करणे न्याय्य राहील, असे जिल्हा आयोगाचे मत आहे.
(8) तक्रारकर्ता यांनी आर्थिक व मानसिक त्रासाकरिता एकूण रु.35,000/- रकमेची मागणी केलेली आहे. नुकसान भरपाईची रक्कम ठरविताना काही गृहीत त्या–त्या परिस्थितीवर आधारीत असतात. असे दिसते की, तक्रारकर्ता यांना रक्कम परत मिळविण्याकरिता पाठपुरावा करावा लागलेला आहे. त्यामुळे तक्रारकर्ता यांना मानसिक त्रास होणे नैसर्गिक व स्वाभाविक आहे. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्ता यांना रक्कम परत न केल्यामुळे त्यांना जिल्हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले, ही बाब स्पष्ट आहे. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्ला, सहायता, प्रकरण शुल्क इ. खर्चाच्या बाबी आहेत. तसेच ग्राहक तक्रार न्यायप्रविष्ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो. योग्य विचाराअंती मानसिक त्रास व तक्रार खर्चाकरिता एकत्रिरित्या रु.3,000/- मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहेत, या निर्णयाप्रत आम्ही येत आहोत.
(9) विरुध्द पक्ष क्र.2 यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी केल्याचे किंवा तक्रारकर्ता यांचे त्यांच्याविरुध्द विशिष्ट आरोप असल्याचे सिध्द होत नाही. त्यामुळे त्यांच्या विरुध्द आदेश नाहीत. विवेचनाअंती मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देऊन खालीलप्रमाणे आदेश देण्यात येतो.
आदेश
1. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्ता यांना रु.2,012/- प्रस्तुत आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत द्यावेत.
उक्त आदेशाचे पालन मुदतीमध्ये न केल्यास आदेश तारखेपासून द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज देय राहील.
ग्राहक तक्रार क्र.28/2019.
2. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्ता यांना मानसिक त्रासाकरिता व तक्रार खर्चापोटी एकत्रितरित्या रु.3,000/- द्यावेत.
3. उभय पक्षकारांना न्यायनिर्णयाची प्रथम प्रत नि:शुल्क द्यावी.
(श्रीमती रेखा जाधव) (श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्री. कमलाकर अ. कोठेकर)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-
(संविक/टंक/141221)