जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 297/2019. तक्रार दाखल दिनांक : 11/10/2019 तक्रार निर्णय दिनांक : 22/12/2021.
कालावधी : 02 वर्षे 02 महिने 11 दिवस
सौ. वंदना भ्र. भगवान केंद्रे, वय 38 वर्षे, व्यवसाय : शेती,
रा. रोहिणा (अंबिका), ता. चाकूर, जि. लातूर. तक्रारकर्ती
विरुध्द
(1) शाखा व्यवस्थापक, नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि.,
हनुमान चौक, लातूर.
(2) व्यवस्थापक, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,
शाखा लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्री. कमलाकर अ. कोठेकर, अध्यक्ष
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
मा. श्रीमती रेखा जाधव, सदस्य
तक्रारकर्ती यांचेकरिता विधिज्ञ :- यू.डी. कांबळे
विरुध्द पक्ष क्र.1 यांचेकरिता विधिज्ञ :- एस.डी. कुलकर्णी
विरुध्द पक्ष क्र.2 एकतर्फा
न्यायनिर्णय
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ती यांच्या ग्राहक तक्रारीचा आशय असा आहे की, मौजे रोहिणा, ता. चाकूर येथे गट क्र. 560 मध्ये त्यांच्या व त्यांचा मुलगा श्रीनिवास यांच्या नांवे प्रत्येकी 1 हेक्टर 65 आर शेतजमीन आहे. पंतप्रधान पीक विमा (खरीप) योजनेंतर्गत दि. 28/7/2017 रोजी तक्रारकर्ती व श्रीनिवास यांच्या नांवे असलेल्या शेतजमिनीतील सोयाबीन पिकाच्या विम्याकरिता प्रत्येकी रु.1,320/- विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडील त्यांच्या बँक खाते क्र.109611002107161 मध्ये जमा केले. तक्रारकर्ती यांच्या मुलाच्या नांवे रु.36,200/- प्राप्त झाला. परंतु तक्रारकर्ती यांच्या नांवे पीक विमा रक्कम प्राप्त झाली नाही. विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडे पाठपुरावा केला असता दखल घेतलेली नाही. विरुध्द पक्ष यांना नोटीस पाठविली असता खोटे उत्तर दिलेले आहे. उपरोक्त कथनाच्या अनुषंगाने रु.36,200/- पीक विमा व्याजासह देण्याचा; मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रासाकरिता रु.50,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.5,000/- देण्याचा विरुध्द पक्ष क्र.1 यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ती यांनी केलेली आहे.
(2) विरुध्द पक्ष क्र.1 यांनी अभिलेखावर लेखी निवेदनपत्र दाखल केले असून तक्रारकर्ती यांच्या तक्रारीतील कथने त्यांनी अमान्य केली आहेत. त्यांच्याविरुध्द तक्रार दाखल करण्यास कारण घडलेले नाही आणि तक्रार मुदतबाह्य असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. विरुध्द पक्ष क्र.2 यांच्या दि.7/6/2019 रोजीच्या पत्रानुसार तक्रारकर्ती यांच्या खात्यावर रु.36,200/- रक्कम जमा झालेली आहे. पीक विमा योजनेच्या नियमांचे तक्रारकर्ती यांनी पालन केलेले नाही. तक्रारकर्ती यांनी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडून पीक विमा पॉलिसी घेतल्याचे दिसून येत नाही. श्रीनिवास भगवान केंद्रे यांचे बँकेमख्ये खाते असल्याचे दिसून येत नाही आणि तो पीक विमा योजनेचा लाभार्थी नाही. त्यांनी तक्रारकर्ती यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी केलेली नाही आणि तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी, अशी विनंती केली आहे.
(3) विरुध्द पक्ष क्र.2 यांना जिल्हा आयोगाचे सूचनापत्र प्राप्त झाले. ते जिल्हा आयोगापुढे उपस्थित राहिले नाहीत आणि लेखी निवेदनपत्र दाखल केले नाही. त्यामुळे त्यांच्याविरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात आले.
(4) तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार, विरुध्द पक्ष क्र.1 यांचे लेखी निवेदनपत्र, अभिलेखावर दाखल कागदपत्रे यांचे अवलोकन केले असता व उभय विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे निश्चित करण्यात येऊन कारणमीमांसेसह जिल्हा आयोग पुढीलप्रमाणे निर्णय देत आहे.
मुद्दे उत्तर
1. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्ती यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी
केल्याचे सिध्द होते काय ? होय.
2. तक्रारकर्ती अनुतोषास पात्र आहेत काय ? होय.
3. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(5) मुद्दा क्र. 1 ते 3 :- अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता विरुध्द पक्ष क्र.2 यांच्या शाखेतील तक्रारकर्ती यांच्या खात्यामध्ये दि.28/7/2017 रोजी त्यांच्या स्वत:च्या व मुलगा श्रीनिवास यांच्या नांवे प्रत्येकी रु.1,320/- भरणा केल्याचे निदर्शनास येते. तक्रारकर्ती यांच्या वादकथनानुसार श्रीनिवास यांच्या पीक विम्याची रक्कम रु.36,200/- त्यांच्या खात्यामध्ये जमा झाली; परंतु त्यांच्या स्वत:च्या पीक विम्याची रक्कम प्राप्त झालेली नाही. उलटपक्षी, विरुध्द पक्ष क्र.1 यांचे कथन आहे की, तक्रारकर्ती यांच्या खात्यावर रु.36,200/- रक्कम जमा झालेली आहे आणि तक्रारकर्ती यांनी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडून पीक विमा पॉलिसी घेतल्याचे दिसून येत नाही.
(6) अभिलेखावर उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारकर्ती यांनी स्वत: व मुलगा श्रीनिवास यांचे नांवे विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडील त्यांच्या खात्यामध्ये प्रत्येकी रु.1,320/- भरणा केल्याचे निदर्शनास येते. तक्रारकर्ती यांचे कथन की, त्यांच्या खात्यामध्ये मुलगा श्रीनिवास यांच्या पीक विम्याची रक्कम रु.36,200/- प्राप्त झाली. उभयतांचा वाद-प्रतिवाद पाहता तक्रारकर्ती यांचेद्वारे प्रत्येकी रु.1,320/- याप्रमाणे भरणा केलेली रक्कम पीक विम्याच्या अनुषंगाने भरणा केलेली होती आणि दोघांपैकी एकास पीक विमा रक्कम प्राप्त झाली, असे अनुमान काढणे न्यायोचित आहे.
(7) प्रश्न असा निर्माण होतो की, दोघांपैकी कोणत्या एक व्यक्तीचे नांवे पीक विमा मंजूर झाला आणि उर्वरीत एक व्यक्तीकरिता पीक विमा का मंजूर झाला नाही. विरुध्द पक्ष क्र.2 यांनी तक्रारकर्ती यांच्या नोटीसच्या अनुषंगाने दिलेल्या उत्तरामध्ये पीक विमा प्रस्ताव व हप्ता रक्कम रु.1,320/- मुख्यालय डाटा सेंटर रेकॉर्ड क्र. 1711BKL0497LDC1001638 अन्वये विमा कंपनीकडे मुदतीमध्ये जमा केल्याचे नमूद केले आहे. विरुध्द पक्ष यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांनुसार श्रीनिवास केंद्रे यांचे नांवे पोर्टल एमआयएस मध्ये आढळून आले नाही, असे नमूद केले आहे. उपलब्ध कागदपत्रांनुसार पीक विमा प्राप्त न होणारी उर्वरीत व्यक्ती कोण आहे, हे पुराव्याद्वारे सिध्द होऊ शकलेले नाही. तक्रारकर्ती यांनी स्वत: व मुलगा श्रीनिवास यांच्या पीक विम्यासाठी विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडे रक्कम भरणा केल्याचे निदर्शनास येते. त्यापैकी एक व्यक्तीकरिता पीक विमा मंजूर होऊन रक्कम प्राप्त झालेली आहे. वादविषयाच्या अनुषंगाने विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी स्वत:चे निर्दोषत्व सिध्द करण्यासाठी उचित पुरावे सादर केलेले नाहीत. अशा स्थितीमध्ये विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्ती यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी केल्याचे ग्राह्य धरण्यात येते. त्या अनुषंगाने तक्रारकर्ती विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांच्याकडून रु.36,200/- पीक विमा मिळविण्यास पात्र आहे. मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देऊन खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) तक्रार अशंत: मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारकर्ती यांना पीक विम्याची रक्कम रु.36,200/- प्रस्तुत आदेशाच्या प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत अदा करावी. उक्त मुदतीमध्ये रक्कम अदा न केल्यास तक्रार दाखल तारखेपासून रक्कम अदा करेपर्यत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज द्यावे लागेल.
(3) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारकर्ती यांना मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.3,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.2,000/- द्यावेत.
(4) उभय पक्षकारांना न्यायनिर्णयाची प्रथम प्रत नि:शुल्क द्यावी.
(श्रीमती रेखा जाधव) (श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्री. कमलाकर अ. कोठेकर)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-
(संविक/टंक/171221)