जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 221/2018. तक्रार दाखल दिनांक : 03/09/2018. तक्रार निर्णय दिनांक : 30/01/2023.
कालावधी : 04 वर्षे 04 महिने 27 दिवस
दिलीप विनायक सागावे, वय 38 वर्षे,
धंदा : व्यापार, रा. मुरुड, ता. जि. लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) शाखा व्यवस्थापक, चोला मंडळ एम.एस. जनरल इन्सोरन्स कं.लि.,
शाखा कार्यालय अशोक हॉटेलजवळ, मेन रोड, लातूर, ता. जि. लातूर.
(2) सिटी कार डेंटींग ॲन्ड स्प्रे पेंटींग, प्रोप्रा. सय्यद खुसरो अमजद,
रा. गुरु हॉटेलजवळ, राजीव गांधी चौक, रिंग रोड, लातूर, ता. जि. लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- युवराज वाय. इंगोले
विरुध्द पक्ष क्र.1 अनुपस्थित / एकतर्फा चौकशी
विरुध्द पक्ष क्र.2 यांचेकरिता विधिज्ञ :- महेंद्रकुमार डी. इंगळे
आदेश
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, त्यांच्या अशोक लिलॅन्ड टेम्पो (दोस्त) वाहनाकरिता विरुध्द पक्ष क्र.1 (यापुढे 'विमा कंपनी') यांच्याकडे विमापत्र क्र. 3379/ 01097921/000/02 अन्वये दि.22/10/2016 ते 21/10/2017 कालावधीमध्ये विमा संरक्षण घेतले होते. तक्रारकर्ता यांच्या वाहनास दि.28/9/2017 रोजी अपघात झाला आणि वाहनाचे रु.3,50,000/- ते रु.4,00,000/- चे नुकसान झाले. तक्रारकर्ता यांच्या सूचनेनंतर विमा कंपनीच्या प्रतिनिधीने घटनास्थळी येऊन वाहनाचा पंचनामा केला. तक्रारकर्ता यांनी विमा दावा दाखल केला. विमा कंपनीच्या प्रतिनिधीने वाहन दुरुस्तीसाठी पाठविले. त्यानंतर विमा कंपनीच्या प्रतिनिधी व गॅरेज मालकाने तक्रारकर्ता यांच्या 4-5 को-या फॉर्मवर स्वाक्ष-या घेतल्या. गॅरेज मालकाने केवळ जुजबी कामे करुन वाहन नेण्यास सांगितले. परंतु वाहनाचे काम अर्धवट झाल्यामुळे वाहन ताब्यात घेण्यास नकार दिला. तक्रारकर्ता यांचे वाहन गॅरेजमध्ये थांबून असल्यामुळे प्रतिदिन रु.1,000/- ते रु.1,200/- चे नुकसान होत आहे. विधिज्ञांमार्फत नोटीस पाठविली असता विमा कंपनीने दखल घेतली नाही. उक्त कथनाच्या अनुषंगाने वाहन क्र. एम.एच. 24 ए.बी. 5777 चे झालेले नुकसान पूर्णपणे व्यवस्थित काम करुन देऊन निकामी झालेले पार्ट बदलून देण्याचा; प्रतिदिन रु.1,000/- ते रु.1,200/- नुकसान भरपाई देण्याचा; मानसिक त्रास व तक्रार खर्चाकरिता रु.10,000/- देण्याचा आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केली आहे.
(2) विरुध्द पक्ष क्र.1 विमा कंपनीस जिल्हा आयोगाचे सूचनापत्र प्राप्त झाल्यानंतर ते अनुपस्थित राहिले. त्यामुळे त्यांच्याविरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात आले.
(3) विरुध्द पक्ष क्र.2 हे जिल्हा आयोगापुढे उपस्थित राहिले; परंतु लेखी निवेदनपत्र दाखल केले नाही. त्यामुळे त्यांच्याविरुध्द 'विना लेखी निवेदनपत्र' आदेश करण्यात आले.
(4) अभिलेखावर दाखल विमापत्र क्र. 3379/010997921/000/02 चे अवलोकन केले असता तक्रारकर्ता यांच्या वाहन क्र. एम.एच. 24 ए.बी. 5777 करिता दि. 22/10/2016 ते 21/10/2017 कालावधीकरिता विमा संरक्षण दिल्याचे दिसून येते. तक्रारकर्ता यांच्या कथनानुसार दि.28/9/2017 रोजी त्यांच्या वाहनास अपघात होऊन वाहनाचे नुकसान झाले. त्यानंतर वाहन दुरुस्तीकरिता गॅरेजमध्ये नेण्यात आले असता तेथे को-या फॉर्मवर स्वाक्ष-या घेण्यात आल्या आणि वाहनाचे काम अपूर्ण स्वरुपात केल्यामुळे ते गॅरेजमध्ये थांबलेले आहे.
(5) विमा कंपनी व विरुध्द पक्ष क्र.2 यांनी लेखी निवेदनपत्र सादर केलेले नाही. त्यामुळे तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार व दाखल कागदपत्रांकरिता विरोधी निवेदन व पुरावा नाही. असे दिसते की, तक्रारकर्ता यांनी अपघाताची सूचना पोलीस यंत्रणेस दिलेली नाही. तक्रारकर्ता यांच्या कथनानुसार त्यांच्या वाहनाचे रु.3,50,000/- ते रु.4,00,000/- चे नुकसान झालेले आहे. विरुध्द पक्ष क्र.2 यांनी वाहन क्रमांक एम.एच. 24 ए.बी. 5777 नमूद करुन अंदाजपत्रक दिलेले दिसते. त्यानुसार रु.2,88,925/- खर्च नमूद आहे. तक्रारकर्ता यांच्या वाहनाची दुरुस्ती करण्यात आली, हे तक्रारकर्ता यांना मान्य आहे. परंतु त्यांच्या कथनानुसार वाहनाचे जुजबी स्वरुपाचे कामे करण्यात आले आणि अपूर्ण कामे केल्यामुळे वाहन ताब्यात घेण्यास त्यांनी नकार दिला. वाद-तथ्यानुसार दखल घेतली असता गॅरेजमध्ये वाहनाचे कोणती कामे पूर्ण केली आणि कोणती कामे अपूर्ण आहेत, याचे उचित व योग्य स्पष्टीकरण नाही. शिवाय, वाहनासंबंधी कथित कामाबद्दल छायाचित्रे दाखल नाहीत.
(6) वाद-तथ्यानुसार तक्रारकर्ता यांची अनुतोष मागणीसंबंधी आवश्यक व उचित पुरावा नाही. त्या अनुषंगाने विमा कंपनी व विरुध्द पक्ष क्र.2 यांनी सेवा देण्यामध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होत नाही आणि तक्रारकर्ता अनुतोषास पात्र नाहीत. करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) ग्राहक तक्रार नामंजूर करण्यात येते.
(2) खर्चासंबंधी आदेश नाहीत.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-