Maharashtra

Latur

CC/73/2021

शालीनीदेवी विनायक गायकवाड - Complainant(s)

Versus

शाखा प्रबंक, दि. ओरिएंंटल इंशुरंस कं. लि. - Opp.Party(s)

अ‍ॅड. पि. एल. शिंदे

29 Aug 2022

ORDER

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
जिल्‍हा परिषदेचे गेट क्र.2 शेजारी, लातूर - 413512
 
Complaint Case No. CC/73/2021
( Date of Filing : 09 Mar 2021 )
 
1. शालीनीदेवी विनायक गायकवाड
f
...........Complainant(s)
Versus
1. शाखा प्रबंक, दि. ओरिएंंटल इंशुरंस कं. लि.
f
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. REKHA R. JADHAV PRESIDENT
 HON'BLE MR. Ravindra S. Rathodkar MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 29 Aug 2022
Final Order / Judgement

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.

 

ग्राहक तक्रार क्रमांक : 73/2021.                        तक्रार दाखल दिनांक : 09/03/2021.                                                                           तक्रार निर्णय दिनांक :  29/08/2022.

                                                                                 कालावधी :  01 वर्षे 05 महिने 20 दिवस

 

शालिनीदेवी विनायकराव गायकवाड (पाटील),

वय 65 वर्षे, व्यवसाय : घरकाम, रा. सोमाणी हॉस्पिटलजवळ,

टिळक नगर, लातूर, ता. जि. लातूर.                                                         तक्रारकर्ती

 

                        विरुध्द

 

 

 शाखा प्रबंधक, दी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि.,

शाखा कार्यालय : लोखंडे कॉम्प्लेक्स, पहिला मजला,

सिंध टॉकीजसमोर, सुभाष चौक, लातूर - 413 512.                                विरुध्द पक्ष

 

 

गणपूर्ती :          मा. श्रीमती रेखा जाधव, अध्‍यक्ष (अतिरिक्त कार्यभार)

                        मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य

                                   

तक्रारकर्ती यांचेकरिता विधिज्ञ :- प्रमोद एल. शिंदे

विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :- एस.जी. डोईजोडे

 

आदेश 

मा. श्रीमती रेखा जाधव, अध्‍यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-

 

(1)       तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, त्या मयत विनायकराव रामराव गायकवाड (पाटील) यांच्या पत्नी आहेत. मयत विनायकराव हे सरस्वती शिक्षक सहकारी पतसंस्था मर्या., लातूर या संस्थेचे सभासद होते. पतसंस्थेने विरुध्द पक्ष यांच्याकडे घेतलेल्या जनता व्यक्तिगत अपघात विमा (समुह) योजनेच्या सभासद यादीमध्ये मयत विनायकराव यांचा अनुक्रमांक 106 होता. अपघात विमा योजनेकरिता पतसंस्थेने विरुध्द पक्ष यांच्याकडे दि.30/12/2014 रोजी रु.720/- हप्ता भरणा केलेला आहे.

 

 

(2)       तक्रारकर्ती यांचे पुढे कथन असे की, दि.4/2/2019 रोजी मयत विनायकराव हे शेताकडे जात असताना त्यांच्या लुना वाहनास पाठीमागून येणा-या दुचाकीने धडक दिली आणि उपचारादरम्यान दि.2/3/2019 रोजी ते मृत्यू पावले. त्यानंतर मयत विनायकराव यांची शवचिकित्सा व पोलीस यंत्रणेद्वारे घटनास्थळ पंचनामा करण्यात आला.

 

 

(3)       तक्रारकर्ती यांचे पुढे कथन असे की, त्यांनी पतसंस्थेमार्फत विरुध्द पक्ष यांच्याकडे कागदपत्रांसह दावा प्रस्ताव सादर केला. परंतु विरुध्द पक्ष यांनी दि.5/9/2019 रोजीच्या पत्रान्वये मृत्यूसमयी मयताचे वय 73 असल्यामुळे विमा योजनेच्या अटी व शर्तीनुसार विमा दावा नामंजूर केल्याचे कळविले. तक्रारकर्ती यांचे कथन असे की, विमा हप्ता भरणा करताना मयत विनायकराव यांचे वय 69 होते. त्यामुळे विरुध्द पक्ष यांनी सेवेमध्ये त्रुटी निर्माण केलेली आहे. उक्त वादकथनाच्या अनुषंगाने रु.3,00,000/- विमा रक्कम व्याजासह देण्याचा; मानसिक त्रासाकरिता रु.25,000/- देण्याचा व तक्रार खर्चाकरिता रु.10,000/- देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ती यांनी केलेली आहे.

 

 

(4)       विरुध्द पक्ष यांनी लेखी निवेदनपत्र दाखल केले आहे. त्यांनी ग्राहक तक्रारीतील बहुतांश मजकूर अमान्य केला आहे. त्यांचे कथन असे की, विमापत्राच्या अटी व शर्तीच्या बाबींची पूर्तता केल्यास विमा रक्कम देण्यास त्यांची जबाबदारी असेल. मयत विनायकराव रामराव गायकवाड (पाटील) यांच्या अपघाती मृत्यूपश्चात त्यांच्याकडे विमा प्रस्ताव दाखल करण्यात आला; परंतु मृत्यूसमयी मयताचे वय 73 वर्षे असल्यामुळे विमा योजनेच्या अटी व शर्तीनुसार तो नामंजूर करुन दि.5/9/2019 रोजीच्या पत्राद्वारे तक्रारकर्ती यांना कळविले.  जनता व्यक्तीगत अपघात विमापत्राच्या अटी व शर्तीनुसार सभासदाचे वय 70 वर्षापेक्षा जास्त नसावे लागते. प्रस्तुत प्रकरणामध्ये इन्क्वेस्ट पंचनामा व शवचिकित्सा अहवालानुसार मयताचे वय 75 वर्षे होते. विमापत्राच्या अटी व शर्तीनुसार सभासदाच्या वयाची अट 10 ते 70 वर्षे आहे. मयत विनायकराव यांना विमापत्र निर्गमीत करताना त्यांचे वय 70 वर्षापेक्षा कमी असल्यामुळे विमा हप्ता स्वीकारण्यात आलेला होता. तक्रारकर्ती यांचा विमा दावा त्यांनी नामंजूर केला असून विमा रक्कम देण्याचे त्यांच्यावर दायित्व येत नाही. त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नाही आणि तक्रारकर्ती यांची तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी, अशी विनंती केली आहे.

 

(5)       तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार, विरुध्द पक्ष यांचे लेखी निवेदनपत्र, उभय पक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच उभय पक्षांतर्फे विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्‍यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्‍यात येतात आणि त्‍या मुद्दयांची कारणमीमांसा त्‍यांच्‍यापुढे दिलेल्‍या उत्‍तराकरिता खालीलप्रमाणे देण्‍यात येते.

                       

मुद्दे                                                                                          उत्तर

 

(1) विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्ती यांचा विमा दावा नामंजूर करुन

      सेवेमध्‍ये त्रुटी केल्‍याचे सिध्‍द होते काय ?                                                        होय.

(2) मुद्दा क्र.1 च्‍या अनुषंगाने तक्रारकर्ती अनुतोषास पात्र आहेत काय  ?                  होय.

     असल्‍यास किती ?                                                                          अंतिम आदेशाप्रमाणे

(3) काय आदेश  ?                                                                               अंतिम आदेशाप्रमाणे

 

कारणमीमांसा

 

(6)       मुद्दा क्र. 1 ते 3 :- प्रामुख्याने, मयत विनायकराव हे सरस्वती शिक्षक सहकारी पतसंस्था मर्या., लातूर या संस्थेचे सभासद होते आणि पतसंस्थेने त्यांच्या सभासदांचा विरुध्द पक्ष यांच्याकडे जनता वैयक्तिक अपघात विमा योजनेद्वारे विमा उतरविलेला आहे, ही बाब विवादीत नाही. मयत विनायकराव हे पतसंस्थेचे सभासद असल्यामुळे विमापत्राद्वारे त्यांना विरुध्द पक्ष यांच्याद्वारे विमा संरक्षण दिले, हे विवादीत नाही. मयत विनायकराव यांचा विमा कालावधीमध्ये वाहन अपघात होऊन मृत्यू झाला, हे विवादीत नाही. मयत विनायकराव यांच्या मृत्यूनंतर विरुध्द पक्ष यांच्याकडे विमा दावा दाखल करण्यात आला आणि विरुध्द पक्ष यांनी विमा दावा नामंजूर केला, हे विवादीत नाही.

 

(7)       विरुध्द पक्ष क्र. 1 यांचे दि. 5/9/2019 रोजीचे पत्र पाहता मयत विनायकराव यांचे वय 73 असल्यामुळे विमापत्राच्या अटी व शर्तीनुसार विमा दावा नामंजूर केल्याचे दिसून येते. विमा नामंजूर करण्याच्या कृत्याचे समर्थन करताना विरुध्द पक्ष नमूद करतात की, जनता व्यक्तिगत अपघात विमापत्राच्या अटी व शर्तीनुसार सभासदाच्या वयाची अट 10 ते 70 वर्षे आहे. परंतु इन्क्वेस्ट पंचनामा व शवचिकित्सा अहवालानुसार मयताचे वय 75 वर्षे असल्यामुळे तक्रारकर्ती यांचा विमा दावा त्यांनी नामंजूर केला आणि विमा रक्कम देण्याचे त्यांच्यावर दायित्व येत नाही.

 

(8)       उभयतांचा वाद-प्रतिवाद पाहता मयत विनायकराव यांच्या वयाच्या अनुषंगाने विमा रक्कम देण्यासंबंधी विवाद निर्माण झाल्याचे स्पष्ट आहे. मयत विनायकराव यांचे वय सिध्द होण्यासाठी शासकीय किंवा अन्य ओळखपत्र अभिलेखावर दाखल नाही. विरुध्द पक्ष यांना विमा संरक्षणार्थ दिलेल्या सभासद यादीमध्ये मयत विनायकराव यांचे नांव अनुक्रमांक 106 वर नमूद आहे. त्या ठिकाणी त्यांचे वय 69 दिसून येते. विमा कालावधी दि.31/12/2014 ते 30/12/2019 आहे आणि निश्चितच विमापत्र घेण्यापूर्वी सभासदांची यादी विरुध्द पक्ष यांना दिलेली आहे. त्या अनुषंगाने सन 2014 मध्ये मयत विनायकराव यांचे वय 69 असल्याचे ग्राह्य धरले असता दि.2/3/2019 रोजी त्यांच्या मृत्यूसमयी 74  होते. तक्रारकर्ता यांच्या विधिज्ञांचा युक्तिवाद असा की, विमापत्राद्वारे 5 वर्षाकरिता दिर्घ विमा संरक्षण दिलेले होते आणि विमा दायित्व स्वीकारताना मयत विनायकराव यांचे वय 69 असल्याचे ज्ञात असतानाही विमा हप्ता स्वीकारलेला असल्यामुळे मयत विनायकराव यांच्या मृत्यूपश्चात विमा रक्कम देण्याचे दायित्व अमान्य करता येणार नाही.

 

(9)       तक्रारकर्ता यांनी अभिलेखावर सरस्वती शिक्षक सहकारी पतसंस्था मर्या., लातूर यांच्या नावे निर्गमीत केलेले POLICY SCHEDULE अभिलेखावर दाखल केले आहे. त्यामध्ये The Insurance under this Policy, in addition to the following special condition(s) is subject to general terms, conditions, clauses, warranties specified in Janata Personal Accident Insurance Policy attached hereto. This schedule and policy are to be read. असा उल्लेख आढळतो. परंतु Policy Shedule शी संलग्न अटी व शर्ती जोडलेल्या दिसून येत नाहीत. प्रश्न निर्माण होतो की, विमापत्राच्या अटी व शर्तीनुसार मयत विनायकराव यांना विमा संरक्षण अस्तित्वात होते काय किंवा कसे ? असे दिसते की, विमापत्र घेताना मयत विनायकराव यांचे 69 वर्षे वय होते आणि विमा जोखीम कालावधी 5 वर्षे होता. निर्विवादपणे, विमा जोखीम कालावधीमध्ये त्यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे. सभासद यादीचे अवलोकन केले असता 71 वर्षे वय असणा-या सभासदासही विमा संरक्षण दिल्याचे दिसून येते. विरुध्द पक्ष यांनी JANATA PERSONAL ACCIDENT INSURANCE POLICY शिर्षक दर्शविणारे अटी व शर्तीचे पत्रक अभिलेखावर दाखल केलेले आहे. त्या पत्रकावर विमापत्राचा क्रमांक, जोखीम कालावधी, विमाधारकाचे नांव, अधिकृत प्राधिका-याद्वारे साक्षांकन व अन्य आवश्यक बाबी दिसून येत नाहीत. ते पत्रक वादकथित विमापत्राचा संलग्न व अविभाज्य घटक असल्याचे दिसून येत नाही आणि वाद-तथ्ये व संबध्द तथ्याच्या अनुषंगाने पुराव्यासाठी दखल घेता येणार नाही. आमच्या मते, विरुध्द पक्ष यांनी दाखल केलेले पत्रक हे पतसंस्थेस निर्गमीत केलेल्या विमापत्राच्या अटी व शर्ती होऊ शकत नाहीत.

 

(10)     उक्त विवेचनाअंती विमापत्रान्वये 10 ते 70 वय असणा-या सभासदांना विमा संरक्षण दिलेले होते आणि मयत विनायकराव यांना वयाच्या 70 वर्षापर्यंत विमा जोखीम देता येऊ शकते, हा विरुध्द पक्ष यांचा बचाव ग्राह्य धरता येत नाही. विरुध्द पक्ष यांनी अयोग्य व अनुचित कारणास्तव विमा दावा नामंजूर करुन सेवेमध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होते आणि  तक्रारकर्ती रु.3,00,000/- विमा रक्कम मिळण्यास पात्र आहेत. प्रकरणाची वस्तुस्थिती विचारात घेऊन विमा दावा नामंजूर केल्याच्या तारखेपासून म्हणजेच दि.5/9/2019 पासून द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज देण्याकरिता विरुध्द पक्ष यांना आदेश करणे न्यायोचित होईल.

 

(11)     तक्रारकर्ता यांनी मानसिक त्रासाकरिता रु.25,000/- व तक्रार खर्चाकरिता रु10,000/- रकमेची मागणी केलेली आहे. नुकसान भरपाईची रक्‍कम निश्चित करताना त्या–त्‍या परिस्थितीनुसार गृहीतक निश्चित केले जातात. असे दिसते की, विमा दावा नामंजूर केल्यामुळे तक्रारकर्ता यांना जिल्‍हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्‍ला व सहायता, प्रकरण शुल्‍क इ. खर्चाच्‍या बाबी आहेत आणि तक्रारकर्ता यांना मानसिक त्रास होणे नैसर्गिक व स्‍वाभाविक आहे.  शिवाय, ग्राहक तक्रार न्‍यायप्रविष्‍ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्‍यय होतो. योग्‍य विचाराअंती मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.5,000/- व तक्रार खर्चाकरिता एकत्रिरित्या रु.3,000/- मिळण्‍यास तक्रारकर्ता पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत जिल्हा आयोग येत आहे.

 

(12)     उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.

 

आदेश

 

(1) तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार अशंत: मंजूर करण्‍यात येते.   

(2) विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्ती यांना रु.3,00,000/- (रुपये तीन लक्ष फक्त) विमा रक्कम द्यावी.

 

ग्राहक तक्रार क्र.  73/2021.

 

तसेच, विरुध्‍द पक्ष यांनी उक्त रु.3,00,000/- रकमेवर दि.5/9/2019 पासून संपूर्ण रक्‍कम अदा करेपर्यत द.सा.द.शे. 6 टक्‍के दराने व्‍याज द्यावे.             

(3) विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्ती यांना शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.5,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- द्यावेत.

(4) विरुध्‍द पक्ष यांनी प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत करावी.

 

 

(श्री. रविंद्र शे. राठोडकर)                                                        (श्रीमती रेखा  जाधव)                

             सदस्‍य                                                                           अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)             

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)

-०-

 
 
[HON'BLE MRS. REKHA R. JADHAV]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. Ravindra S. Rathodkar]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.