Maharashtra

Latur

CC/149/2020

हनमंत नाना तौर - Complainant(s)

Versus

शाखाधिकारी, भारतीय जिवन विमा निगम - Opp.Party(s)

अ‍ॅड. के. जी. देशपांडे

24 Dec 2021

ORDER

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
जिल्‍हा परिषदेची कमान क्र.2 शेजारी, लातूर - 413512
 
Complaint Case No. CC/149/2020
( Date of Filing : 19 Oct 2020 )
 
1. हनमंत नाना तौर
j
...........Complainant(s)
Versus
1. शाखाधिकारी, भारतीय जिवन विमा निगम
j
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Kamalakar A. Kothekar PRESIDENT
 HON'BLE MR. Ravindra S. Rathodkar MEMBER
 HON'BLE MRS. Rekha R. Jadhav MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 24 Dec 2021
Final Order / Judgement

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.

 

ग्राहक तक्रार क्रमांक : 149/2020.                         तक्रार दाखल दिनांक : 16/10/2020                                                                       तक्रार निर्णय दिनांक : 24/12/2021.

                                                                                          कालावधी : 01 वर्षे 02 महिने 18 दिवस

 

(1) हणमंत पिता नाना तौर, वय 55 वर्षे, व्यवसाय : मजुरी.     

(2) मनोज पिता हणमंत तौर, वय 38 वर्षे, व्यवसाय : मजुरी,

     दोघे रा. मुक्तेश्वर मंदिराजवळ, कोळपे कॉलनी,

     औसा, ता. औसा, जि. लातूर.                                                        तक्रारकर्ते

 

                   विरुध्द

 

शाखा अधिकारी, भारतीय जीवन विमा निगम (LIC),

शाखा : उदगीर, ता. उदगीर, जि. लातूर.

ऑफीस : 94-एच, देगलूर रोड, उदगीर.                                               विरुध्द पक्ष

 

गणपूर्ती :       मा. श्री. कमलाकर अ. कोठेकर, अध्यक्ष

                             मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य

                             मा. श्रीमती रेखा जाधव, सदस्य

 

तक्रारकर्ते यांचेकरिता विधिज्ञ :- काशिनाथ जी. देशपांडे (सताळकर)

विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :- सतिश जी. दिवाण

न्‍यायनिर्णय

 

मा. श्री. कमलाकर अ. कोठेकर, अध्यक्ष यांचे द्वारा :-

 

(1)      तक्रारकर्ते यांच्‍या ग्राहक तक्रारीचा आशय असा आहे की, तक्रारकर्ता क्र.1 यांच्या पत्नी अरुणा भ्र. हणमंत तौर (यापुढे संक्षिप्त रुपामध्ये "अरुणा") यांनी विरुध्द पक्ष (यापुढे संक्षिप्त रुपामध्ये "विमा निगम") यांच्याकडून जीवन सरल प्रकारची विमा पॉलिसी घेतलेली होती आणि पॉलिसीचा क्रमांक 985039992 व टेबल 165/21 होता. पॉलिसी 21 वर्षाकरिता असून पॉलिसीद्वारे अपघाती लाभ अनुज्ञेय होता. अरुणा यांनी विमा पॉलिसीचे हप्ते नियमीत भरणा केले होते.

 

(2)      तक्रारकर्ते यांचे पुढे कथन आहे की, दि.23/11/2009 रोजी अरुणा यांचा  वाहन अपघातामध्ये मृत्यू झाला. त्यानंतर तक्रारकर्ते यांनी विमा निगमकडे विमा दावा, एफ.आय.आर., घटनास्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्टमार्टेम रिपोर्ट इ. कागदपत्रे सादर केली.

 

(3)      तक्रारकर्ते यांचे पुढे कथन आहे की, अरुणा यांनी पॉलिसीवर रु.25,000/- कर्ज काढलेले होते. विमा निगमने कर्ज रक्कम वजावट करुन रु.1,25,000/- अनुज्ञेय लाभासह अदा केले. परंतु अपघाती लाभाची रक्कम रु.1,25,000/- अदा केली नाही. त्याबाबत पाठपुरावा केला असता अनावश्यक कागदपत्रांची मागणी करण्यात आली. विमा निगमला नोटीस पाठवली असता दखल घेण्यात आली नाही. उपरोक्त वादकथनाच्या अनुषंगाने अपघाती लाभाची रक्कम रु.1,25,000/- व्याजासह देण्याचा; सेवेतील त्रुटी, मनस्ताप व तक्रार खर्चाकरिता रु.12,000/- देण्याचा विमा निगम यांना आदेश करावा, अशी विनंती तक्रारकर्ते यांनी केली आहे.

 

(4)      विमा निगमने अभिलेखावर लेखी निवेदनपत्र सादर केले आहे. ग्राहक तक्रारीमध्ये नमूद कथने त्यांनी अमान्य केली आहेत. त्यांचे निवेदन आहे की, तक्रारीमध्ये नामनिर्देशीत व्यक्तीला पक्षकार केलेले नाही. नामनिर्देशीत व्यक्तीच्या विमा दाव्यानुसार मृत्यू दावा व बोनस यानुसार देय रु.2,00,542/- रकमेतून कर्ज व व्याज रु.38,147/- वजावट करुन रु.1,62,368/- नामनिर्देशीत व्यक्तीच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले. परंतु अपघातासंबंधी नामनिर्देशीत व्यक्तीने कागदपत्रे सादर केलेली नाहीत आणि तक्रारकर्ते यांच्या नोटीसच्या अनुषंगाने उत्तरामध्ये तसे कळविण्यात आले.

 

(5)      विमा निगमचे निवेदन आहे की, विमा दावा दाखल करताना पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार कागदपत्रे दाखल करणे आवश्यक आहेत.  परंतु नामनिर्देशीत व्यक्तीने अपघातासंबंधी कागदपत्रे सादर न केल्यामुळे अपघाती लाभ देण्याचा निर्णय प्रलंबीत आहे. कागदपत्रांची पूर्तता केल्यास पॉलिसी अंतर्गत लाभ देण्याचे बंधन आहे. त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नसल्यामुळे तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी, अशी विनंती करण्यात आलेली आहे.

 

(6)      तक्रारकर्ते यांची ग्राहक तक्रार, विमा निगमचे लेखी निवेदनपत्र, अभिलेखावर दाखल कागदपत्रे यांचे अवलोकन केले असता व उभय विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे निश्चित करण्यात येऊन कारणमीमांसेसह जिल्हा आयोग पुढीलप्रमाणे निर्णय देत आहे.

                  

                   मुद्दे                                                                         उत्‍तर

 

1. विमा निगमने तक्रारकर्ते यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी

    केल्याचे सिध्द होते काय ?                                                           होय.

2. तक्रारकर्ते अनुतोषास  पात्र आहेत काय ?                                होय.            

3. आदेश काय ?                                                                  अंतिम आदेशाप्रमाणे

 

कारणमीमांसा

 

(7)      मुद्दा क्र. 1 ते 3 :- प्रामुख्याने, अरुणा यांनी विमा निगम यांच्याकडून जीवन सरल (लाभ सहीत) या प्रकारची विमा पॉलिसी घेतल्याचे व पॉलिसीचा क्रमांक 985039992 व टेबल 165/21 असल्याची बाब विवादीत नाही. पॉलिसी अंतर्गत अपघाती लाभ अनुज्ञेय होता, ही बाब विवादीत नाही.  दि.23/11/2009 रोजी अरुणा यांचा मृत्यू झाला, ही बाब विवादीत नाही. अरुणा यांनी विमा पॉलिसीच्या अनुषंगाने रु.25,000/- कर्ज काढल्याचे व विमा निगमने त्या कर्ज व व्याजाची रक्कम वजावट करुन अनुज्ञेय विमा रक्कम अदा केली, ही बाब विवादीत नाही.

 

(8)      मुख्य वादविषय असा आहे की, अरुणा यांचा मृत्यू अपघाती असल्यामुळे विमा निगमने विमा पॉलिसी अंतर्गत अपघाती लाभाची रक्कम तक्रारकर्ते यांना अदा केलेली नाही. त्या अनुषंगाने विमा निगमचा बचाव आहे की, नामनिर्देशीत व्यक्तीने अरुणा यांच्या अपघातासंबंधी कागदपत्रे सादर न केल्यामुळे अपघाती लाभ देण्याचा निर्णय प्रलंबीत आहे आणि कागदपत्रांची पूर्तता केल्यास पॉलिसी अंतर्गत लाभ देण्याचे बंधन आहे. तक्रारकर्ता यांचे वतीने युक्तिवाद करण्यात आला की, तक्रारकर्ते यांनी विमा निगमकडे विमा दावा, एफ.आय.आर., घटनास्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्टमार्टेम रिपोर्ट इ. कागदपत्रे सादर केलेली होती. उलटपक्षी, विमा निगमच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला की, अरुणा यांच्या अपघातासंबंधी त्यांच्याकडे कागदपत्रे सादर केले नाहीत.

 

(9)      विमा निगमने पॉलिसीच्या अट क्र.13 चा आधार घेतला आहे. त्यामध्ये असे नमूद आहे की,

 

          13. Normal requirements for a claim : The normal documents which the claimant shall submit while lodging the claim in case of death of the policy holder shall be claim forms accompanied with original policy document, proof of death, proof of accident/disability, medical treatment prior to the death, employer's certificate, whichever is applicable to the satisfaction of the Corporation. If the age is not admitted under the policy, the proof of age of the life assured shall also be submitted.

 

(10)    विमा निगमने अभिलेखावर दि.23/9/2021 रोजीचे पत्र दाखल केले असून ज्यामध्ये एफ.आय.आर., स्पॉट पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्टमार्टेम रिपोर्ट यांच्या प्रमाणित प्रती किंवा नोटरीद्वारे साक्षांकीत केल्या नसल्याचे व फायनल पोलीस रिपोर्ट / चार्ज शीट किंवा    दंडाधिका-याचा निर्णय दाखल केला नसल्यामुळे त्या कागदपत्रांच्या प्रमाणित प्रत सादर करण्यासंबंधी निर्देश देण्याकरिता विनंती केल्याचे दिसून येते.

 

(11)    पॉलिसी अटीप्रमाणे दावा प्रपत्र, पॉलिसीचे मुळ कागदपत्रे, मृत्यूचा पुरावा, अपघात/अपंगत्वाचा पुरावा, मृत्यूपूर्वी घेतलेला उपचार, नियोक्त्याचे प्रमाणपत्र इ. कागदपत्रे आवश्यक आहेत. परंतु विमा निगमकडून ज्या कागदपत्रांची मागणी करण्यात येत आहे, पॉलिसी अटीप्रमाणे तेच कागदपत्रे आवश्यक असल्याचे निदर्शनास येत नाही. विमा निगमचे असेही कथन नाही की, अरुणा यांचा अपघाती मृत्यू झालेला नाही. पॉलिसी अटीनुसार अरुणा यांचा अपघात झाल्याचे व अरुणा यांचा मृत्यू अपघाती असल्याचे दर्शविण्यासाठी एफ.आय.आर., स्पॉट पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्टमार्टेम रिपोर्ट इ. कागदपत्रे पुरेसे ठरतात. अरुणा यांच्या अपघाती मृत्यूबाबत विमा निगम यांना काही शंका असल्यास त्यांना अन्वेषकाची नियुक्ती करुन योग्य तपास करता आला असता. तसेच तक्रारकर्ते यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांबाबत त्यांचा काही आक्षेप आहे, असेही त्यांचे कथन नाही. अशा स्थितीत त्यांची कागदपत्रांची केलेली मागणी अनावश्यक व अटीच्या विसंगत आहे, असे जिल्हा आयोगाचे मत आहे. वरील विवेचनाअंती विमा निगमने अरुणा यांच्या अपघाती मृत्यूचे लाभ अनावश्यक व अनुचित कारणास्तव प्रलंबीत ठेवून सेवेमध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होते आणि तक्रारकर्ते अपघाती लाभ मिळण्यास पात्र आहेत, या निर्णयाप्रत जिल्हा आयोग येत आहे.

 

(12)    तक्रारकर्ते यांनी मानसिक त्रास व तक्रार खर्चाकरिता एकूण रु.12,000/- रकमेची मागणी केलेली आहे. नुकसान भरपाईची रक्‍कम ठरविताना काही गृहीत त्या–त्‍या परिस्थितीवर आधारीत असतात. असे दिसते की, तक्रारकर्ते यांना उर्वरीत विमा रक्कम परत मिळविण्‍याकरिता पाठपुरावा करावा लागलेला आहे. त्‍यामुळे तक्रारकर्ते यांना मानसिक त्रास होणे नैसर्गिक व स्‍वाभाविक आहे.  विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ते यांना रक्कम परत न केल्‍यामुळे त्यांना जिल्‍हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले, ही बाब स्पष्ट आहे. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्‍ला, सहायता, प्रकरण शुल्‍क इ. खर्चाच्‍या बाबी आहेत. तसेच ग्राहक तक्रार न्‍यायप्रविष्‍ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्‍यय होतो. योग्‍य विचाराअंती मानसिक त्रास व तक्रार खर्चाकरिता एकत्रिरित्या रु.5,000/- मिळण्‍यास तक्रारकर्ता पात्र आहेत, या निर्णयाप्रत जिल्हा आयोग येत आहोत. वरील विवेचनाअंती मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देऊन खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.

 

 

ग्राहक तक्रार क्र. 149/2020.

आदेश

 

 

(1) तक्रार अशंत: मंजूर करण्यात येते.          

(2) विरुध्‍द पक्ष यांनी अरुणा यांच्या वादकथित विमा पॉलिसी क्रमांक 985039992 अन्वये देय असणारी अपघाती लाभाची रक्कम रु.1,25,000/- त्यावरील अनुज्ञेय लाभासह प्रस्तुत आदेशाच्या प्राप्तीपासून 45 दिवसाच्‍या आत तक्रारकर्ते यांना अदा करावी.     

उक्त मुदतीमध्ये रक्‍कम अदा न केल्यास विरुध्‍द पक्ष यांना तक्रार दाखल तारखेपासून रक्‍कम अदा करेपर्यत द.सा.द.शे. 6 टक्‍के दराने व्‍याज द्यावे लागेल.  

          (3) विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना मानसिक त्रासाकरिता व तक्रार खर्चापोटी एकत्रितरित्या रु.5,000/- द्यावेत.

          (4) उभय पक्षकारांना न्यायनिर्णयाची प्रथम प्रत नि:शुल्क द्यावी.

 

 

(श्रीमती रेखा  जाधव)         (श्री. रविंद्र शे. राठोडकर)        (श्री. कमलाकर अ. कोठेकर)

         सदस्‍य                               सदस्‍य                                        अध्‍यक्ष                

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)

-०-

 (संविक/टंक/161221)

 
 
[HON'BLE MR. Kamalakar A. Kothekar]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. Ravindra S. Rathodkar]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Rekha R. Jadhav]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.