जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 82/2022. तक्रार दाखल दिनांक : 11/03/2022. तक्रार निर्णय दिनांक : 22/04/2022.
कालावधी : 00 वर्षे 01 महिने 11 दिवस
(1) अशोक बळीराम पवार, वय 32 वर्षे, व्यवसाय : व्यापार,
रा. बार्शी रोड, राजे शिवाजी नगर, लातूर.
(2) मोहम्मद चाँदसाब शेख, वय 36 वर्षे, व्यवसाय : व्यापार,
रा. खाडगाव रोड, मल्लीनाथ मंदीराजवळ, कपील नगर, लातूर. तक्रारकर्ते
विरुध्द
शाखाधिकारी, टाटा ए.आय.जी. जनरल इन्शुरन्स कं.लि.,
निर्मल हाईटस्, दुसरा मजला, युनीट नं. बी-303,
नंदी स्टॉप, औसा रोड, लातूर - 413 512. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ते यांचेकरिता विधिज्ञ :- एन.जी. पटेल
आदेश
मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-
(1) प्रस्तुत तक्रार दाखलपूर्व युक्तिवादासाठी ठेवण्यात आलेली असून आज दि.22/4/2022 रोजी तक्रारकर्ते व त्यांचे विधिज्ञ अनुपस्थित आहेत.
(2) तक्रारकर्ता क्र.1 यांनी त्यांच्या मालकीच्या बोलेरो पीक-अप वाहन क्र. एम.एच. 24 / ए.यू. 2904 चा तक्रारकर्ता क्र.2 यांच्याशी विक्री व्यवहार करुन दि.29/9/2020 रोजी ताबा दिलेला आहे. दि.17 व 18/6/2021 च्या मध्यरात्री पीक-अप वाहन चोरीस गेले. विरुध्द पक्ष यांनी दि.25/8/2021 रोजीच्या पत्राद्वारे विमा करार रद्द झाल्याचे कळविले आहे. विरुध्द पक्ष यांनी बोलेरो पीक-अप वाहन क्र. एम.एच. 24 / ए.यू. 2904 वाहनाच्या विम्याची रक्कम अदा न केल्यामुळे तक्रारकर्ते यांनी प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे.
(3) अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन करण्यात आले. विमा पॉलिसी तक्रारकर्ता क्र.1 यांच्या नांवे निर्गमीत केल्याचे व विमा कालावधी दि.8/1/2021 ते 7/1/2022 असल्याचे निदर्शनास येते. दि.29/9/2020 रोजी करण्यात आलेल्या खरेदीखतानुसार तक्रारकर्ता क्र.1 यांनी त्यांच्या मालकीचे बोलेरो पीक-अप वाहन क्र. एम.एच. 24 / ए.यू. 2904 वाहन तक्रारकर्ता क्र.2 यांना विक्री केल्याचे निदर्शनास येते. पोलीस यंत्रणेकडे दाखल प्रथम खबर अहवालानुसार तक्रारकर्ता क्र.2 यांनी बोलेरो पीक-अप वाहन क्र. एम.एच. 24 / ए.यू. 2904 चोरीसंबंधी फिर्याद नोंदविल्याचे निदर्शनास येते. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी दि.25/8/2021 रोजीच्या पत्राद्वारे वाहन चोरीच्या तारखेस तक्रारकर्ता क्र.2 यांच्याशी विमा संविदा अस्तित्वात नसल्याचे व जी.आर. 17 तरतुदीनुसार हस्तांतरणाशिवाय वाहन विक्री केल्याचे कळविलेले दिसून येते.
(4) सकृतदर्शनी, निदर्शनास येते की, वाहन क्र. एम.एच. 24 / ए.यू. 2904 करिता तक्रारकर्ता क्र.1 यांचे नांवे विमापत्र निर्गमीत केलेले आहे. विमा संविदेच्या संदर्भाने विचार करता, तांत्रिक दृष्टीने, तो जोखीम व्यवस्थापनाचा एक प्रकार असून ज्यामध्ये विमा कंपनी विमाकर्त्याकडून प्रतिफल स्वीकारुन संबंधीत घटकाबाबत उद्भवणारी संभाव्य नुकसान भरपाई देण्याची हमी स्वीकारते. म्हणजेच विमा प्रमाणपत्रांतर्गत अपघातापासून होणा-या धोक्यापासून विमाकर्त्यास आर्थिक संरक्षण मिळते. प्रस्तुत प्रकरणाच्या अनुषंगाने दखल घेतली असता ज्यावेळी विमा संरक्षीत वाहन क्र. एम.एच. 24 / ए.यू. 2904 चोरीस गेले त्यावेळी विक्री व्यवहारानुसार तक्रारकर्ता क्र.2 यांच्याकडे वाहनाचा ताबा होता. विमा संविदेच्या तत्वानुसार तक्रारकर्ते व विरुध्द पक्ष यांच्यामध्ये विमा करार संपुष्टात आलेला आहे. अशा स्थितीमध्ये तक्रारकर्ते हे विरुध्द पक्ष यांचे "ग्राहक" होऊ शकत नाहीत आणि ग्राहक तक्रार समर्थनीय ठरत नाही. त्या अनुषंगाने ग्राहक तक्रार रद्द करणे क्रमप्राप्त आहे आणि खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार रद्द करण्यात येते.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-