जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 169/2021. तक्रार दाखल दिनांक : 10/08/2021. तक्रार निर्णय दिनांक : 09/06/2022.
कालावधी : 00 वर्षे 09 महिने 30 दिवस
प्रभावती व्यंकटराव माडजे, वय 48 वर्षे, व्यवसाय : घरकाम व शेती,
रा. हणमंतवाडी (येरोळ), ता. शिरुर अनंतपाळ, जि. लातूर. तक्रारकर्ती
विरुध्द
(1) व्यवस्थापक, युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कं.लि.,
विभागीय कार्यालय नं. 202, दुसरा मजला, विनर्स कोर्ट,
झेड के वरती, लुल्ला नगर, सहाने सुजान पार्क, पुणे - 411 040.
(2) व्यवस्थापक, जयका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रा.लि., दुसरा मजला,
जयका बिल्डींग, कमर्शिअल रोड, सिव्हील लाईन्स, नागपूर - 440 001.
(3) तालुका कृषि अधिकारी, कृषि कार्यालय, शिरुन अनंतपाळ, जि. लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ती यांचेकरिता विधिज्ञ :- ए.एम.के. पटेल
विरुध्द पक्ष क्र.1 यांचेकरिता विधिज्ञ :- एस.यू. शास्त्री
विरुध्द पक्ष क्र.2 यांचेकरिता विधिज्ञ :- दिपक एम. परांजपे
विरुध्द पक्ष क्र.3 : स्वत: / प्रतिनिधी
आदेश
मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी आहे की, महाराष्ट्र शासनाच्या वतीने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत राज्यातील सर्व शेतक-यांचा विरुध्द पक्ष क्र.1 (विरुध्द पक्ष क्र.1 यापुढे "विमा कंपनी") यांच्याकडे दि.10/12/2019 ते 9/12/2019 कालावधीकरिता विमा उतरविण्यात आलेला होता. विरुध्द पक्ष क्र.2 (यापुढे "जयका इन्शुरन्स") हे विमा योजना राबविण्यासाठी विमा सल्लागार आहेत आणि विरुध्द पक्ष क्र.3 (यापुढे "तालुका कृषि अधिकारी") हे विमा योजनेची अंमलबजावणी करतात.
(2) तक्रारकर्ती यांचे पुढे कथन आहे की, त्यांचे पती व्यंकटराव माणिकराव माडजे (यापुढे "मयत व्यंकटराव") हे शेतकरी होते आणि त्यांच्या नांवे मौजे हणमंतवाडी (येरोळ), ता. शिरुर अनंतपाळ, जि. लातूर येथे गट क्र.129/अ मध्ये सामाईक क्षेत्र 87 आर. शेतजमीन होती. दि.2/8/2018 रोजी मयत व्यंकटराव हे दुचाकीवरुन हणमंतवाडी गावाकडे येत असताना अचानक कुत्रा अंगावर आल्यामुळे बचाव करताना रस्त्यावर पडून त्यांच्या डोक्यास गंभीर मार लागला आणि वैद्यकीय उपचारास्तव नेत असताना मृत्यू पावले. पोलीस ठाणे, शिरुर अनंतपाळ येथे क्र. 23/2020 अन्वये घटनेची नोंद करण्यात आली.
(3) तक्रारकर्ती यांचे पुढे कथन आहे की, मयत व्यंकटराव हे शेतकरी होते आणि विमा योजनेनुसार ते लाभार्थी होते. तक्रारकर्ती ह्या वारस असल्यामुळे विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे सादर केली. त्यानंतर विमा दावा प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, लातूर यांच्याद्वारे जयका इन्शुरन्स यांच्याकडे पाठविण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आले. विमा कंपनी व जयका इन्शुरन्स यांच्याद्वारे निर्देशीत त्रुटींची पूर्तता करण्यात आली. परंतु अवास्तव कागदपत्रांची मागणी करण्यात येऊन त्यांचा विमा प्रस्ताव प्रलंबीत ठेवला आणि सेवेमध्ये त्रुटी निर्माण केलेली आहे. उपरोक्त वादकथनाच्या अनुषंगाने विमा कंपनी, जयका इन्शुरन्स व तालुका कृषि अधिकारी यांच्याकडून विमा रक्कम रु.2,00,000/-; शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रु.10,000/- व तक्रार खर्च रु.5,000/- अपघात तारखेपासून द.सा.द.शे. 15 टक्के व्याज दराने देण्याचा आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ती यांनी केलेली आहे.
(4) विमा कंपनीने अभिलेखावर लेखी निवेदनपत्र सादर केले आहे. विमा कंपनीचे कथन आहे की, महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक क्र.शेअवि-2018/प्र.क्र.193/11अे, दि.19 सप्टेंबर, 2019 अन्वये गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यासाठी कार्यपध्दती व मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. दूर्घटनेनंतर 45 दिवसाच्या कालावधीमध्ये दावा विहीत नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्रासह तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे नोंदविणे आवश्यक आहे. त्यानंतर प्रस्ताव जयका इन्शुरन्स यांच्याकडे पाठविण्यात येऊन तो विमा कंपनीकडे सादर करण्यात येतो. प्रस्तुत प्रकरणात विमा कंपनीस केवळ सूचना प्राप्त झालेली आहे. दाव्यासंदर्भात दावा प्रपत्र व आवश्यक कागदपत्रे प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे तक्रारकर्ती यांच्या दाव्यासंबंधी निर्णय घेता आलेला नाही. तक्रारकर्ती यांनी तक्रारीमध्ये नमूद केलेली कथने विमा कंपनीने अमान्य केलेली आहेत. अंतिमत: ग्राहक तक्रार रद्द करण्यात यावी, अशी विनंती केली आहे.
(5) जयका इन्शुरन्स यांनी अभिलेखावर लेखी निवेदनपत्र सादर केले आहे. सर्वप्रथम त्यांनी अपघात विमा योजनेखाली प्राप्त होणा-या दाव्यासंबंधी होणा-या कार्यपध्दतीचा तपशील नमूद केला. त्यांच्या कथनाप्रमाणे दावा मंजूर-नामंजुरीची बाब विमा कंपनीच्या अखत्यारीत असते आणि जयका इन्शुरन्स हे केवळ मध्यस्त आहेत. त्यांचे पुढे कथन आहे की, दि.2/8/2020 रोजी तक्रारकर्ती यांच्या पतीचे अपघाती निधन झाले. तक्रारकर्ती यांनी तालुका कृषि अधिका-यांकडे सादर केलेला अर्ज दि.20/10/2020 रोजी प्राप्त झाला. अर्जाची शहानिशा करताना दाव्यासोबत जोडलेल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी निदर्शनास आल्या. त्यामुळे दि.5/5/2021 रोजी तक्रारकर्ती यांच्याकडे वाहन चालविण्याच्या परवान्याची मागणी करण्यात आली. परंतु तक्रारकर्ती यांनी कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे अपूर्ण दावा विमा कंपनीकडे पाठविता आला नाही. जयका इन्शुरन्सने त्यांची जबाबदारी त्वरीत व व्यवस्थित पार पाडली आहे आणि त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नाही. शेवटी तक्रारकर्ती यांची तक्रार रद्द करण्यात यावी, अशी त्यांनी विनंती केलेली आहे.
(6) तालुका कृषि अधिकारी यांनी अभिलेखावर लेखी निवेदनपत्र सादर केले आहे. तक्रारकर्ती यांनी तक्रारीतील मजकुराची सत्यता सिध्द करावी, असे त्यांचे निवेदन आहे. पुढे त्यांचे कथन आहे की, मयत व्यंकटराव यांचा रस्ता अपघातामध्ये मृत्यू झाल्यानंतर त्यांच्याकडे विमा संचिका सादर करण्यात आली. त्यांच्या वरिष्ठ कार्यालयामार्फत विमा संचिका विमा कंपनीकडे पाठविण्यात आली. मयत व्यंकटराव यांचा रस्ता अपघातामध्ये मृत्यू झालेला असताना संचिका दाखल करताना वैध वाहन चालक परवाना दाखल केलेला नव्हता. त्याबाबत तक्रारकर्ती यांना पत्राद्वारे कळविल्यानंतरही तो सादर करण्यात आला नाही. विमा संचिका मंजूर करणे अथवा नामंजूर करण्याचे अधिकार विमा कंपनीस आहेत. त्यांची चूक नाही. त्यांनी जबाबदारी पूर्ण पार पाडली आहे. अंतिमत: त्यांच्याविरुध्द ग्राहक तक्रार रद्द करण्यात यावी, अशी विनंती केली आहे.
(7) तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार, विरुध्द पक्ष यांचे लेखी निवेदनपत्र, उभय पक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच तक्रारकर्ती व विमा कंपनीतर्फे विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ती यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी
केल्याचे सिध्द होते ? होय (जयका इन्शुरन्सने)
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने अनुतोष आहे काय ? होय (अंशत:)
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(8) मुद्दा क्र. 1 ते 3 :- प्रामुख्याने, महाराष्ट्र राज्यातील शेतक-यांना विमा कंपनीने गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजनेंतर्गत अपघाती विमा संरक्षण दिलेले होते, याबद्दल उभय पक्षांमध्ये विवाद नाही. अभिलेखावर दाखल 7/12 उता-यामध्ये गाव : येरोळ, ता. शिरुर अनंतपाळ येथील भुमापन क्रमांक व उपविभाग : 129/अ मध्ये भोगवाटदार मयत व्यंकटराव यांचे नांवे सामाईक क्षेत्र 0.87 हे. असल्याचे निदर्शनास येते. यावरुन मयत व्यंकटराव हे शेतकरी होते आणि गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजनेकरिता लाभार्थी होते, ही बाब स्पष्ट होते. अभिलेखावर दाखल करण्यात आलेल्या पोलीस घटनास्थळ पंचनामा, मरनोत्तर पंचनामा, शवचिकित्सा अहवाल इ. कागदपत्रांचे अवलोकन केले असता मयत व्यंकटराव यांचा दुचाकी अपघातामध्ये डोक्यास मार लागल्यामुळे मृत्यू झाल्याचे निदर्शनास येते.
(9) उभयतांच्या वाद-प्रतिवाद पाहता मयत व्यंकटराव यांच्या मृत्यूनंतर तक्रारकर्ती यांनी तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे विमा दावा दाखल केला, ही बाब स्पष्ट आहे. त्यानंतर तालुका कृषि अधिका-यांनी वरिष्ठ कार्यालयामार्फत जयका इन्शुरन्स यांच्याकडे विमा दावा प्रस्ताव सादर केला. जयका इन्शुरन्सच्या कथनानुसार तक्रारकर्ती यांच्या अर्जाची शहानिशा करताना दाव्यासोबत जोडलेल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी निदर्शनास आल्या आणि दि.5/5/2021 रोजी तक्रारकर्ती यांच्याकडे वाहन चालविण्याच्या परवान्याची मागणी करण्यात आली; परंतु तक्रारकर्ती यांनी कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे अपूर्ण दावा विमा कंपनीकडे पाठविता आला नाही. विमा कंपनीचे कथन आहे की, प्रस्तुत प्रकरणात विमा कंपनीस केवळ सूचना प्राप्त झालेली असून दाव्यासंदर्भात दावा प्रपत्र व आवश्यक कागदपत्रे प्राप्त झालेले नाहीत. यावरुन तक्रारकर्ती यांचा विमा दावा प्रस्ताव जयका इन्शुरन्स यांच्याकडे प्रलंबीत आहे आणि तो विमा कंपनीकडे पाठविण्यात आला नाही, हे स्पष्ट होते.
(10) तक्रारकर्ती यांचेतर्फे महाराष्ट्र शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे शासन परिपत्रक क्रमांक : शेअवि-2018/प्र.क्र.193/11अे, दि.19 सप्टेंबर, 2019 दाखल करण्यात आलेले आहे. विमा कंपनीनेही आपल्या लेखी निवेदनपत्रामध्ये त्या शासन परिपत्रकाचा संदर्भ नमूद केलेला असून त्याप्रमाणे कार्यवाही अपेक्षीत असल्याचे नमूद केले. शासन परिपत्रकानुसार जयका इन्शुरन्सने अपूर्ण विमा प्रस्तावाबाबत विमा कंपनीस कळविणे; त्याची संगणक प्रणालीमध्ये नोंद करणे; त्याचा अहवाल शासकीय यंत्रणेकडे पाठविणे इ. कार्यवाही करणे आवश्यक आहे. प्रस्तुत प्रकरणामध्ये तक्रारकर्ती यांच्या विमा दाव्याबाबत त्रुटींची पूर्तता करण्याबाबत तक्रारकर्ती यांना कळविलेले दिसून येते. वास्तविक पाहता, त्रुटींची पूर्तता केल्याचे तक्रारकर्ती यांचे निवेदन असले तरी त्याबाबत उचित पुरावा दिसून येत नाही. तक्रारकर्ती यांचा विमा दावा प्रस्ताव आहे त्या स्थितीमध्ये विमा कंपनीकडे पाठविणे किंवा त्याबाबत विमा कंपनीस कळविणे आवश्यक होते. परंतु जयका इन्शुरन्सने तक्रारकर्ती यांचा विमा दावा प्रस्ताव अपूर्ण असल्याच्या कारणास्तव विमा कंपनीकडे पाठविलेला नाही आणि विमा कंपनीस तक्रारकर्ती यांच्या विमा दाव्याबाबत उचित निर्णय घेता आलेला नाही. हे सत्य आहे की, विमा योजनेच्या अनुषंगाने विमा दाव्यांच्या त्रुटींची पूर्तता करुन परिपूर्ण प्रस्ताव विमा कंपनीकडे पाठविण्याकरिता जयका इन्शुरन्स ही मध्यस्त यंत्रणा आहे. त्याकरिता त्यांना मोबदला / दलाली (Brokerage) मिळते. परंतु, जयका इन्शुरन्सने तक्रारकर्ती यांचा विमा दावा अनाधिकाराने स्वत:कडे प्रलंबीत ठेवून सेवेमध्ये त्रुटी निर्माण केलेली आहे, असे अनुमान काढणे न्यायोचित आहे.
(11) तक्रारकर्ती यांच्या विमा दाव्याबाबत कागदपत्रे अप्राप्त असल्यामुळे विमा कंपनीस विमा दाव्याबाबत निर्णय घेता आलेला नाही. अशा स्थितीमध्ये जयका इन्शुरन्स यांनी तक्रारकर्ती यांच्या विमा दाव्याची कागदपत्रे विमा कंपनीस सादर करावेत आणि त्यानंतर विमा कंपनीने दाव्याबाबत निर्णय घ्यावा, असे निर्देश देणे न्यायोचित ठरेल.
(12) तक्रारकर्ती यांच्या विधिज्ञांनी अभिलेखावर मा. बॉम्बे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने ‘लताबाई रावसाहेब देशमुख /विरुध्द/ महाराष्ट्र शासन व इतर-2’, रिट पिटीशन नं.10185/2015, तसेच मा. बॉम्बे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने ‘भागुबाई देविदास जावळे /विरुध्द/ महाराष्ट्र शासन व इतर’, रिट पिटीशन नं.2420/2018 मध्ये दि.27/11/2018 रोजी दिलेल्या निवाड्याचा संदर्भ सादर केला आहे. तसेच महाराष्ट्र राज्य आयोगाच्या औरंगाबाद खंडपिठाने "ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि. /विरुध्द/ श्रीमती गंगुबाई विष्णू शिंदे", प्रथम अपिल क्र. 1126/2019, निर्णय दि.5/10/2021; "ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि. /विरुध्द/ श्रीमती गयाबाई अप्पासाहेब जाधव", प्रथम अपिल क्र. 158/2020, निर्णय दि.24/11/2021; "न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लि. /विरुध्द/ श्रीमती सोजरबाई रामचंद्र दहीगल", प्रथम अपिल क्र. 1095/2019, निर्णय दि.30/11/2021; "न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लि. /विरुध्द/ किसन बाबुराव काकडे", प्रथम अपिल क्र. 345/2018, निर्णय दि.17/12/2021 या न्यायनिर्णयांचा संदर्भ सादर केला. वास्तविक पाहता, प्रस्तुत तक्रारीतील वाद-तथ्याच्या अनुषंगाने उक्त न्यायनिर्णयातील तत्वे लागू पडत नाहीत.
(13) विवेचनाअंती, जयका इन्शुरन्सने तक्रारकर्ती यांचा विमा दावा चुक व अयोग्य कारणास्तव स्वत:कडे प्रलंबीत ठेवून सेवेमध्ये त्रुटी निर्माण केलेली आहे. त्याकरिता उचित नुकसान भरपाई किंवा खर्च रक्कम मिळण्याकरिता तक्रारकर्ती पात्र ठरतात. हे सत्य आहे की, विमा रक्कम देण्याचे जयका इन्शुरन्स यांना निर्देशीत करता येणार नाही. परंतु, जयका इन्शुरन्सने विमा दावा स्वत:कडे प्रलंबीत ठेवल्यामुळे विमा कंपनीकडे पाठविण्यात आलेला नाही आणि विमा दाव्याचा निर्णय होऊ शकला नाही. तसेच विमा कंपनीने तक्रारकर्ती यांना विमा रक्कम न दिल्यामुळे जिल्हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले, हे स्पष्ट आहे. योग्य विचाराअंती सेवेतील त्रुटीकरिता रु.10,000/- मिळण्यास तक्रारकर्ती पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत जिल्हा आयोग येत आहोत. उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) तक्रारकर्ती यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्द पक्ष क्र.2 जयका इन्शुरन्सने प्रस्तुत आदेशाच्या प्राप्तीपासून 15 दिवसांच्या आत तक्रारकर्ती यांचा विमा दावा / प्रस्ताव आहे त्या स्थितीमध्ये विरुध्द पक्ष क्र.1 विमा कंपनीकडे पाठवून द्यावा.
(3) उक्त आदेश क्र.2 प्रमाणे विमा दावा / प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर विरुध्द पक्ष क्र.1 विमा कंपनीने 21 दिवसाच्या आत तक्रारकर्ती यांच्या विमा दावा / प्रस्तावाबाबत निर्णय घ्यावा आणि तो तात्काळ तक्रारकर्ती यांना कळविण्यात यावा.
(4) विरुध्द पक्ष क्र.2 जयका इन्शुरन्सने प्रस्तुत आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाचे आत सेवेतील त्रुटीकरिता तक्रारकर्ती यांना रु.10,000/- द्यावेत.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-